सामान्य-असामान्य : खरा शत्रू

विश्वास माझ्याकडे अविश्वासानंच आला होता. नव्हे आणला गेला होता. आल्यापासून ‘मला काही झालेलं नाही. सगळे जबरदस्तीनं घेऊन आलेत,’ असंच आणि एवढंच घोकत होता.
Real Enemy
Real Enemysakal
Updated on

- डॉ. संजय वाटवे

विश्वास माझ्याकडे अविश्वासानंच आला होता. नव्हे आणला गेला होता. आल्यापासून ‘मला काही झालेलं नाही. सगळे जबरदस्तीनं घेऊन आलेत,’ असंच आणि एवढंच घोकत होता. माझ्याशी बोलण्याचीही इच्छा नव्हती. विश्वास उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ होता. पैशाअडक्याची कमतरता नव्हती. बायको चांगली होती. एक छोटा मुलगाही होता. वरकरणी पाहता सर्व काही आलबेल होतं. होतंच तसं. पण नव्हतं सुख आणि शांती. सुखसुद्धा खाता यायला हवं ना..

विश्वास सुरुवातीपासूनच तुटक होता. खरं म्हणजे तुसडा, माणूसघाणा होता. अतिशय अबोल आणि सतत विचारमग्न. काय विचार करायचा कोणालाच कळायचं नाही. मित्र फारसे नव्हतेच. कोणाशी भांडणं वगैरे झाली नाहीत; पण लोकांत मिसळायला आवडायचं नाही. फार फार तर ऑनलाइन गेम खेळायचा. एकटा एकटा असायचा.

सगळ्यांच्या वागण्या-बोलण्याचा अभ्यास मात्र चाललेला असायचा. मनातलं कोणाशी शेअर करत नसे. चेष्टामस्करीत कधी सहभागी नसायचा. कधी काही झालंच, तर कुढत बसायचा. सरावानं चेहरा नॉर्मल ठेवायचा. घरच्यांनी मात्र अबोल आहे, रिझर्व्ह्‌ड आहे, असं ठरवून दोषांवर पांघरूण घातलं.

या सगळ्याचा परिणाम असा, की तो कधीच शांत नसायचा. समोरच्यांच्या वागण्याकडे साशंकतेनं बघायचा. या घुम्या, एकलकोंड्या वागण्याचा सगळ्यांत जास्त त्रास बायकोला भोगायला लागत असे. कसलंही सहजीवन नाही. कशात सहभागी नाही. मौज मजा नाही. आनंद, खुशी नाही. तिनं साम, दाम, दंड, भेद सगळे उपाय करून पाहिले.

शेवटी डायव्होर्सची धमकी देऊन माझ्याकडे आणलं. तिचे सगळे अनुभव उसासे टाकत रडतच सांगितले. शेवटी ती म्हणाली, ‘माझं लग्न माणसाशी झालंय, की लाकडाच्या ओंडक्याशी? कशातच रस नाही. कोणतीही गोडी नाही. आनंद, दुःख नाही. कोणत्याही भावना नाहीत. असतात फक्त अबोल शंका आणि घुमे संशय.’

विश्वासशी मी चर्चा सुरू केली. त्याचं कवच फोडायला बरेच प्रयत्न करावे लागले. शेवटी डोकेदुखी, निद्रानाश यासाठी औषध घ्यायला तयार झाला. काही आठवडे औषध घेतल्यावर बराच निवळला. मनातली तगमग कमी झाली. हळूहळू मनातलं सांगायला लागला. जगात कोणावरच विश्वास नव्हता.

प्रत्येक माणूस कपटानं वागतो असा संशय असल्यामुळे सर्व बाबतीत अति सावध, अति जागरूक असायचा. पुढे विश्वासघात होईल म्हणून कोणाशी संबंध नको असायचे. टिंगल टवाळी होईल म्हणून गप्पांत भाग घ्यायचा नाही. सगळं जग वाईट आहे. सगळे आपल्याला फसवतात अशाच विचारानं जगाकडे बघायचा. त्याचा हा तद्दन संशयीपणा कोऱ्या, कोरड्या चेहऱ्यामागे झाकला गेला होता; पण बाहेरचे शत्रू त्रास देतायत, या भ्रमामुळे सतत घालमेल असायची.

गोळ्या, इंजेक्शन, सायकोथेरपी असे उपचार बरेच महिने चालले. सुरुवातीला त्यानं शत्रूंची यादी केली होती आणि ते कसे कसे त्रास देतात हे लिहिलं होतं. नंतर पुन्हा ती यादी काढली असता सगळे भ्रम होते, हे त्याच्या लक्षात आलं. दोन वर्षांनी सपत्नीक भेटायला आला. प्रसन्न, हसतमुख चेहरा, चमकदार डोळे, आणि भेटण्या बोलण्यास उत्सुक अशी देहबोली.

खूप मोठ्या पदावर आणि पगारावर प्रमोशन मिळालं होतं. त्याचं सेलिब्रेशन म्हणून बायकोला घेऊन मालदीवला जाणार होता. आपले विचार भरभरून मांडत होता. ‘‘जगात माझ्यासारख्या अगणित केसेस असतील- जे स्वतःच्या विचारभ्रमामुळे स्वतःचं आणि इतरांचं आयुष्य कुरतडत असतात. स्वतःच्या अधोगतीला आणि दुःखाला कारणीभूत होतात; पण ते उपचार का घेत नाहीत? अवघड गुंतागुंतीची ऑपरेशन्स लीलया करून घेतात; पण जीवनाकडे बघण्याची सजग दृष्टी देणारी ही ट्रीटमेंट का करून घेत नाहीत?

सायकियाट्री ही नुसती जीवनमरणाशी निगडित नसून आयुष्य सुंदर करण्याची ट्रीटमेंट आहे. तुमचं आहे ते आयुष्य सुलभ, सुखकर करण्याची ट्रीटमेंट आहे. थोडक्यात सायकियाट्री म्हणजे क्वालिटी ऑफ लाइफची ट्रीटमेंट. माझ्या मते ही सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. अर्थात सगळी घाण केल्यानंतर मी हा धडा शिकलो. खरं सांगू का डॉक्टर शत्रू बाहेर नसतो.... खरा शत्रू आतच असतो!’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.