‘कांडा’ची कहाणी हत्तिणीच्या सुंदर, देखण्या, निष्पाप पिलाची कहाणी असल्याने, तिचा अनुबंध वास्तवाचा भाग बनलेल्या केरळच्या गर्भार हत्तिणीच्या मृत्यूशी जुळणे-जुळवणे अर्थपूर्ण ठरलेय.
- डॉ. श्रीपाल सबनीस
केरळच्या गर्भार हत्तिणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घालून तिच्या मृत्यूचं कारण ठरलेलं मानवी क्रौर्य निषेधार्ह मानून ‘आम्ही तुझे गुन्हेगार आहोत’, अशी प्रांजळ कबुली ‘कांडा’ पुस्तकाच्या प्रारंभीच लेखिका सुनीताराजे पवार यांनी नोंदवलीय. मानवी अंतःकरणातील सद्भावनांची साक्ष पवार यांच्या संवेदनशील मनाचं दर्शन घडवते.
‘कांडा’ची कहाणी हत्तिणीच्या सुंदर, देखण्या, निष्पाप पिलाची कहाणी असल्याने, तिचा अनुबंध वास्तवाचा भाग बनलेल्या केरळच्या गर्भार हत्तिणीच्या मृत्यूशी जुळणे-जुळवणे अर्थपूर्ण ठरलेय. ही काल्पनिक कथा निसर्ग आणि मानवाच्या सर्वार्थाच्या अनुबंधाचं अंतरंग अभिव्यक्त करते. प्राणी आणि मानवाच्या भावभावनांचं रहस्य उलगडते. प्रकृती आणि संस्कृतीचं द्वंद्व पेलते. जीवन-मृत्यूचा गुंता सोडवताना वीरमरणाचा अर्थही अधोरेखित करते.
माणसाच्या जगातील मूठभर अतिरेक्यांचा खुनी खेळ सोसताना राजे, मंत्री, नेते यांच्यासह सर्वसामान्य माणसंसुद्धा कायम अस्वस्थ झालेल्या काळात पवार यांच्या कादंबरीचा नायक ‘कांडा’ स्वतःच्या जिवाचं बलिदान देऊन हजारो जनतेसह शेकडो हत्तींना वाचवतो. माणूस आणि प्राणी यांना जीवदान देऊन स्वत: हुतात्मा होणारा ‘कांडा’ हत्ती आहे. म्हणूनच या कादंबरीचं नायकपद क्रांतिकारी ठरतं. कांडाचं व्यक्तित्व जिवंत झालंय.
हत्ती आणि प्राणिसृष्टीचा शास्त्रशुद्ध अभ्यास, त्यांच्या भावभावनांचं प्राकृतिक व सांस्कृतिक नाट्य या कादंबरीत कलात्मक सौंदर्याच्या धाग्यांनी उत्तमरीत्या विणलं गेलंय. आफ्रिकेच्या जंगलातून हत्तीण व पिलाची ताटातूट करून ‘कांडा’ला विकणारा तोशिबा असंवेदनशील व व्यवहारी माणसाचा अस्सल प्रतिनिधी म्हणून समोर येतो. हजारो मैलांच्या जहाज व पाण्याच्या प्रवासातून कांडाला ‘त्रावणकोर’ संस्थानात आणलं जातं. आईविना ‘कांडा’ व प्रवासातील अनाथ ‘कृष्णा’ यांच्या वेदनेचं नातं घट्ट जुळणारं आहे.
कृष्णा आणि कांडाची जीवनकथा लपाछपीसारख्या खेळांनी व सहवासातील सुखी संवेदनांनी एकात्म बनलीय. याच मैत्रीशेजारी शिदंबाची मुलगी आणि कृष्णाच्या प्रेमाची कोवळीक फुलताना दिसते. कृष्णा अनाथ असल्याने शिदंबाच्या नातेवाइकांनी जातपात व खानदान वगैरे पारंपरिक प्रतिष्ठेच्या संदर्भांनी कृष्णा व शिदंबाच्या मुलीच्या लग्नास विरोध केलाय. संस्कृतीच्या नावे माणसाने किती विकृती पोसलीय याचं दर्शन यानिमित्ताने वाचकांना घडतं. कृष्णाच्या व मुलीच्या प्रेमात कांडाही सुज्ञ भूमिका बजावतो. आपल्या सोंडेवर कृष्णाला उचलून त्याच्यावर प्रेम करणाऱ्या मुलीशेजारी कांडा त्याला ठेवतो. मानवी स्त्री-पुरुषांच्या प्रेमभावनांचा सन्मान करण्याचं शहाणपण प्राण्यात आहे, पण नात्याच्या माणसांत नसावं? शहाणं कोण, माणसं की प्राणी?
पवार यांनी या कथानकाची वातावरणनिर्मिती समर्थपणे केलीय, अनेक नाट्यपूर्ण प्रसंग डोळ्यांपुढे हुबेहूब उभे राहतात. एका हत्तीचा राग माहुतावर निघतो. शिदंबा जखमी होतो. हत्तीचं आजारीपण व मृत्यू, देवस्थानच्या पालखीची मिरवणूक, मुख्य हत्ती मणिराजचा थाटमाट व त्याचा सन्मान... ‘मणिराज’ची रिक्त जागा ‘कांडा’कडे सन्मानानेच आली आणि २०० हत्तींच्या कळपासह संपूर्ण मंदिर व राजे यांच्या गोतावळ्याचं आकर्षण ‘कांडा’ बनला. युवराज, कांडा आणि कृष्णा या समवयस्क समकालीनांचा विकास लेखिकेने अनेक संदर्भांनी सुंदररीत्या चित्रित केलाय. त्यातून कालचक्राची अटळता स्वयंसिद्ध ठरते. तसंच, सर्वच घटनांच्या मुळाशी ‘नियती’चं सूत्र सदैव कार्यरत असल्याची भावना श्रद्धाळू वाचकांच्या मनात जागृत होते.
कादंबरीचं निवेदन प्रत्ययकारी आहे. प्रसंगातील अंतरंगी तपशील व्यक्तींना उजाळा देतो. प्राणी व मानवाच्या भावविश्वाची गुंफण सुंदर जमलीय. पवार यांची भाषाशैली समृद्ध जाणिवांची साक्ष देते. उदा.
१) या संत माणसाला बछड्याची वेदना कळली. २) इंद्राचा ऐरावत तर स्वर्गातून भूमीवर उतरला नाही ना? ३) पाण्यात पैंजणं रुणझुणत होती. ४) त्याचा रुबाब खानदानी होता. अलौकिक गुणांनी तो सम्राट वाटत होता. कांडाचा मृत्युसमयीचा चित्कार काळजाला भिडतो. कृष्णाचा मित्राच्या मरणाचा आक्रोशही मनाला सुन्न करतो. राजेसाहेबांनी शेवटी ‘कांडा’ला ‘खरा सेनानी’ म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी हात जोडले. सहकारी निष्ठावंत हत्तींनी सलामी दिली. हे सारं पवार यांच्या लेखणीने समरसून पेरलंय.
अतिरेक्याच्या संशयास्पद हालचाली फक्त कांडाच ओळखतो आणि त्याच्या छाताडावर पाय रोवून आपला संताप व्यक्त करतो; पण त्याच क्षणी बॉम्बस्फोट होऊन कांडाचा अंत होतो. अतिरेकी मरतो; पण कांडाच्या बलिदानातून मंत्री-राजे व हजारो माणसं २०० हत्तींसह वाचतात. हिंसेचं थैमान घालणारी क्रूर प्रवृत्ती, संस्कृतीविकासाच्या दोन हजार वर्षांनंतरसुद्धा अतिरेकी मानवी रूपात जिवंत कशी? या प्रश्नाच्या उत्तरात संपूर्ण विश्वमानवता मौनात आहे. संस्कृतीचं शहाणपण संशयास्पद ठरणारी ही मानवी क्रौर्याची व प्राण्याच्या मानवनिष्ठेची जगावेगळी सुंदर कथा मराठी कादंबरीविश्वात सर्वार्थाने नावीन्यपूर्ण आहे. निवेदन, वातावरणनिर्मिती, व्यक्तिरेखांचं चित्रण, प्रसंगवर्णन आणि प्राणी व मानवाचे संवाद-संघर्षवादी अनुबंध आकळताना वाचक प्रगल्भ बनतो.
पुस्तकाचं नाव : कांडा
लेखक : सुनीताराजे पवार
प्रकाशक : अक्षरबंध प्रकाशन, नीरा
वितरक : संस्कृती प्रकाशन (९८२३०६८२९२)
पृष्ठं : १००
मूल्य : १५० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.