सलाम की कुर्निसात?

आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये शिष्टाचाराला एक विशेष महत्त्व आहे. परदेशी पाहुणे आले की त्यांना सामोरं जाण्याचा एक शिरस्ता आहे, शिवाय अंतर्गत पदांचा क्रम दिलेली एक यादी आहे.
Etiquette
Etiquettesakal
Updated on
Summary

आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये शिष्टाचाराला एक विशेष महत्त्व आहे. परदेशी पाहुणे आले की त्यांना सामोरं जाण्याचा एक शिरस्ता आहे, शिवाय अंतर्गत पदांचा क्रम दिलेली एक यादी आहे.

आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये शिष्टाचाराला एक विशेष महत्त्व आहे. परदेशी पाहुणे आले की त्यांना सामोरं जाण्याचा एक शिरस्ता आहे, शिवाय अंतर्गत पदांचा क्रम दिलेली एक यादी आहे. यात राष्ट्रपती सर्वोच्च स्थानी, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, सचिव, सेनाधिकारी असा क्रम ठरवलेला आहे. परराष्ट्रीय पाहुणे आणि एतद्देशीय पदाधिकारी यांचे मान आणि प्राथमिकता ठरलेली असते. पूर्वी अनेकदा पंतप्रधान स्वतः इतर देशांतील अध्यक्षांच्या स्वागतासाठी जात असत, आता अपवादानेच जातात. अर्थात, या प्रथा सारख्या बदलत राहतात.

१९४७ पूर्वी सशस्त्र सेनेचा मुख्य याचं महत्त्व व्हाईसरॉयनंतर असे. १८४१ मध्ये कंपनीच्या गव्हर्नर जनरलमागे मद्रास, मुंबई आणि आग्य्राच्या राज्यपालांचा क्रम लागत असे. कलकत्ता आणि मुंबईचे धर्मगुरू (बिशप) सेनापतीपेक्षाही उच्च पदावर असत. सध्याचा क्रम लोकप्रतिनिधी आणि सचिव यांना अधिक महत्त्व देणारा आहे, असे हे बदल होत राहतात.

या सर्व पदांच्या क्रमवारीत, मानापमान - मानसन्मान, हे काही अचानक निर्माण झाले नाहीत. विशेषकरून दोन राष्ट्रं यांचं आपल्या प्रतिनिधींना योग्यरीत्या वागवलं जातं की नाही याकडे लक्ष असतं आणि पूर्वी तर दोघांत याविषयी बरीच घासाघीस होत असे. ईस्ट इंडिया कंपनी जरी व्यापाऱ्यांच्या मालकीची असली, तरी आम्ही आमच्या राजाचे प्रतिनिधी, अशी बतावणी करण्याची त्यांना सवय होती. अगदी पहिले इंग्रज वकील जेव्हा मोगल बादशहासमोर गेले, त्यांनी भेट दिलेल्या वस्तूंबरोबर त्यांनादेखील तुच्छ लेखण्यात येत असे. शिवछत्रपतींच्या दरबारातदेखील इंग्रज वकील मुंबईहून आले, तेव्हा त्यांना आपल्याकडे लक्ष वेधण्यास विशेष प्रयत्न करावे लागले होते. बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पांकडे हे वकील याचकाच्या रूपाने आले. जेव्हा ते नानासाहेबांकडे गेले तेव्हा तर, ‘तुम्ही कशाकरिता आलात?’ अशी विचारणाही केली गेली.

पुढे १७६१ नंतर इंग्रज सत्ता प्रबळ होऊ लागली. १७७४ मध्ये रघुनाथरावाने पेशवाई मिळवण्यासाठी इंग्रजांशी तह केला आणि पहिलं आंग्ल-मराठा युद्ध सुरू झालं. तहाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास कलकत्त्याहून कर्नल अप्टन हा इंग्रज वकील पुण्यात दाखल झाला आणि त्याला पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी पाठवण्यात आलं. वाटाघाटी व भेटींपूर्वी शिष्टाचार ठरलेला नव्हता. त्याबद्दल प्रथम चर्चा झाली. १७७५ मध्ये ३१ डिसेंबरला सकाळी भेटीसाठी मुहूर्त असल्याचं इंग्रजांना कळवून मराठ्यांचा वकील माधवराव सदाशिव कर्नल अप्टनच्या तंबूत पोचला. मराठा वकिलास सुचविण्यात आलं की, सखाराम बापू आणि नाना फडणीस यांनी सामोरं येणं अपेक्षित आहे; तर माधवराव सदाशिवने उत्तर दिलं की, ‘ते पेशव्यांचे वजीर आहेत... आणि पेशवा राजासमान आहे, त्यांनी सामोरं येण्याची प्रथा नाही. ते कोणा वकिलासमोर अथवा कंपनीच्या सेवकांना भेटावयास जात नाहीत.’ मग इंग्रजांनी युक्तिवाद केला की, अप्टन स्वतः उच्चाधिकारी आहे आणि इंग्लंडच्या राजाचाच चाकर असल्याने या वाटाघाटींकरिता राजाने त्यास पूर्ण अधिकार दिले आहेत.

हा निरोप आल्यावर सखाराम बापू आणि नाना फडणीस भेटायला येण्यास तयार झाले. दोघांच्या छावण्यांच्या मध्यावर भेटण्याची हिंदुस्थानात प्रथा आहे, असं मराठ्यांनी कळवलं. त्याप्रमाणे अप्टन आपल्या लवाजम्यासह आणि बापू आणि नानाही आपल्या साथीदारांबरोबर निघाले. दोन्ही बाजूने हत्तींवर विराजमान या प्रभृती शंभर पावलांच्या अंतरावर आल्या. बापू हत्तीवरून उतरले आणि अप्टनही खाली उतरला. प्रथम दोघांच्या बरोबर आलेल्या मंडळींनी आलिंगन दिलं. ‘माझं वय झालं आहे आणि मला ऊन सहन होत नाही,’ असं सांगून बापू तिथून निघून गेले. मग हाच सारा प्रकार नाना फडणीसांबरोबर झाला आणि आलिंगनानंतर दोघेही खास दरबार तंबूत गेले.

इंग्रजांनी भेटीविषयी माहिती दिली आहे की, नाना फडणीसांबरोबर सोळा अंबारी असलेले हत्ती आणि दहा हजारांचं सैन्य होतं. तंबूत थोडी शिष्टाचाराची बोलणी होऊन दोघे दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरवून माघारी गेले. पुढं अनेक महिने वाटाघाटी चालल्या आणि पुरंदरचा समझोताही झाला. पुढंही इंग्रज वकील चार्ल्स मॅलेटचं पुण्यास आगमन झालं तेव्हा सुरुवातीस या शिष्टाचाराविषयी बरीच घासाघीस झाली. शेवटी १८०० मध्ये ‘इंग्रज राजाचं पत्र पेशव्यांनी उभं राहून घ्यावं,’ अशी मागणी इंग्रजांनी केली. ती नाना फडणीसांनी चतुराईने टोलवून लावली. अशा या प्राथमिक शिष्टाचाराचे नियम ठरवण्याच्या पायऱ्या होत्या. या शिष्टाचारात बरंच काही दडलेलं आहे. थोरल्या माधवराव पेशव्यांनी १७६३ मध्ये राक्षसभुवन इथे निजामाचा पराभव केला. पुढंही निजामाशी संबंध चांगले राहिले. १७६९ मध्ये माधवराव पेशवे आणि निजामाची भेट झाली, त्याचं वर्णन ‘तुजुके असफिया’ नामक फारसी ग्रंथात दिलं आहे ते असं.

‘माधवरावाने निजामाला भेटताना आपली मान वाकवली नाही, जे यापूर्वीच्या पेशव्यांनी केलं होतं. त्याऐवजी माधवरावाने ताठरपणे उभं राहून केवळ आपला हात मस्तकाशी नेला. निजामाला हे पसंत पडलं नाही आणि त्याने या सलामाला उत्तर दिलं नाही. पण दोन्हीकडील सरदारांनी याचा फारसा ऊहापोह न केल्याने, याचा लवकरच उभयतांना विसर पडला.’

शेवटी सलाम करावा की कुर्निसात हा शिरस्ता राष्ट्रांच्या आपापल्या शक्तीनुसार ठरतो, रूढी बदलू शकतात; पण त्यासाठी राष्ट्र शक्तिशाली असणं आवश्‍यक असतं.

(सदराचे लेखक शल्यचिकित्सक असून अठराव्या शतकातल्या इतिहासावर त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.