‘हे राज्य कोणाचे?’

शेवटी विधानसभेत विश्वास ठराव संमत झाला आणि राज्यातल्या जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला. अनेक दिवसांचं नाट्यमय घटनांनी नटलेलं कथानक राजतिलक कार्यक्रमाने समाप्त झालं.
Thorale Madhavrao Peshave
Thorale Madhavrao PeshaveSakal
Updated on
Summary

शेवटी विधानसभेत विश्वास ठराव संमत झाला आणि राज्यातल्या जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला. अनेक दिवसांचं नाट्यमय घटनांनी नटलेलं कथानक राजतिलक कार्यक्रमाने समाप्त झालं.

- डॉ. उदय कुलकर्णी udayskulkarni2@gmail.com

शेवटी विधानसभेत विश्वास ठराव संमत झाला आणि राज्यातल्या जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला. अनेक दिवसांचं नाट्यमय घटनांनी नटलेलं कथानक राजतिलक कार्यक्रमाने समाप्त झालं. या काळात, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि राजलोभ, या गुणांचं प्रत्यक्ष दर्शनही मतदात्यांना झालं. दृष्टीआड झालेली खलबतं, पदांची अदलाबदल, सर्वोच्च न्यायालयातील निर्णय या स्थानकांना पार करत महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस राजवट आली. इतिहासातदेखील नाना आणि महादजींनी राज्य कसं सांभाळलं याची समीकरणं लगेच समोर आली. त्याचबरोबर राजकारण हा काहीसा आवश्यक पण गढूळ प्रकार सामान्यांसाठी एक गूढच आहे, हे पुन्हा एकदा दिसलं.

स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांत राजकारणातील नीतिमत्ता कुठल्या दिशेने गेली, याबद्दल दुमत नाही. जसे स्वातंत्र्यलढ्यातील योद्धे राजकारणातून बाहेर पडले, या अधोगतीला वेग आला, तरीही भारतात आपण बरेच बरे असंच म्हणावं लागेल.

अजून निवडणूक निकाल मान्य नाही म्हणून मावळत्या राष्ट्राध्यक्षांनी विधिमंडळावर धडक मोर्चा आणला, अमेरिकेसारखी चौकशी इथं झालेली नाही. याहून कळस म्हणजे शेजारील देशात पंतप्रधानाला पदच्युत करून फाशी दिलेली आपण पाहिली आहे. दुसऱ्या बाजूच्या शेजाऱ्यांनी तर आजन्म राष्ट्राध्यक्ष झाल्याचं जाहीर करून सत्तासंघर्षाचा प्रश्नच संपवून टाकलाय!

पूर्वी मोगलाईमध्ये बापाविरुद्ध बंड करून आणि भावंडांना मारूनच सिंहासनाची वाट मोकळी होत असे. महाराष्ट्रात शिवछत्रपतींनी स्थापन केलेलं स्वराज्य नैतिक मूल्यांवर आधारित होतं, त्यामुळे सत्तेचा संघर्ष मराठेशाहीच्या इतिहासात अपवादानेच आढळतो. पण मनुष्य स्वभाव काही सहज बदलत नाही. कट-कारस्थानं तेव्हाही काही कमी नव्हती. गारद्यांच्या गर्दीत ‘काका मला वाचवा’ची आरोळी प्रसिद्ध आहे. आजही त्या प्रसंगाची आठवण झाली की मराठी माणसाच्या छातीचा ठोका चुकतो, यात शंका नाही.

पण या प्रसंगापूर्वीची कथा काहीशी अकथित आहे. पानिपतोत्तर काळात, नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर, मराठेशाहीचे शत्रू चोहोकडून उठले. षोडशवर्षीय माधवराव पेशवा आणि त्यांच्या मातुःश्री गोपिकाबाई एकीकडे, तर माधवरावांचे महत्त्वाकांक्षी चुलते राघोबादादा दुसऱ्या बाजूस, असे राज्यात दोन तट पडले. राघोबादादा पराक्रमी, अटकेपार जरीपटका नेणारे यशस्वी सेनानायक; पण कारभार भोंगळ, स्वभाव चंचल आणि विलासी; तर माधवराव सदैव दक्ष, तरुण, मनस्वी, कर्तव्यतत्पर; पण अननुभवी, अशी दोघांची व्यक्तिरेखा. आपल्या तीर्थरूपांस मान देऊन कारभार हाकायचा हा माधवरावांचा प्रयत्न असे. तरी शेवटी मतभेद ऐरणीवर आले तेव्हा राघोबादादांनी बंड केलं आणि निजामाला आपल्या मदतीला बोलावलं. घोडनदी आणि आळेगाव इथं मराठ्यांची आपसांतच लढाई झाली. हे पाहून, माधवराव आपण होऊन आपल्या चुलत्याकडे शरण गेले. तेव्हापासून काही दिवस राघोबादादा आणि त्यांच्या समर्थकांची सद्दी चालली. यानंतर एकाच वर्षात निजामाशी राक्षसभुवन इथं युद्धाचा प्रसंग उद्भवला आणि माधवरावांचं तेज सर्वांच्याच नजरेत भरलं. राघोबादादांनी गोपिकाबाईंना पत्र लिहिलं, ‘चिरंजीव आमच्यापेक्षा अधिक जाले.’

पण विक्रमाने जसा आपला हट्ट सोडला नाही, तसंच राघोबादादांचं. सत्तेविना जी बेचैनी आजही आपल्या राज्यकर्त्यांना येते, तशीच परिस्थती त्यांचीही झाली. १७६५ मध्ये बिदनूरच्या अरण्यात हैदर अलीचा मोठा पराभव करून मराठा सैन्य परत आलं आणि राघोबादादांनी आपल्या मागण्या पुढे केल्या. एका समकालीन अस्सल पत्रात हा मजकूर आढळतो : ‘श्रीमंत उभयता पुण्यास आले. आठ दिवस जाहलियावर थोरले श्रीमंतांनी बोली घातली की, ‘निम्मे राज्य वाटून द्यावे.’ धाकटे श्रीमंतांनी उत्तर दिले, ‘राज्य कोणाचे? आम्ही वाटणार कोण? आमच्याने वाटवत नाही. सर्व राज्य तुमचेच आहे. तुम्ही सर्व करणे’, याप्रमाणे जाबसाल झाले.’

राघोबादादा अर्थात नाखूष झाले आणि नाशिकला निघून गेले. तिथं पुन्हा आपल्या पाठिराख्यांबरोबर खलबतं सुरू केली. हे पाहून, चिंतो विठ्ठल या राघोबादादांच्या समर्थकाला, माधवरावांनी एक उपदेशात्मक पत्र लिहिलं :

‘ही दौलत मोठी. या दौलतेस सर्व लहान-मोठ्यांनी अनुकूल असून, जेणेकरून दौलत नीट होय, तेच सर्वांनी करावे. ते येकीकडे राहून दौलत दोहो जागा करावी, हेच तीर्थस्वरूपांचे मानस. त्यास, आम्हास काही करणे नाही. कारण की, ही दौलत पहिल्यापासून एकांनीच करावी, वरकडाचा भार करणारावरच असावा, याप्रमाणे चालत आले असता, आता वडिलांचे मानस की, ‘आम्हास गुजराथ द्यावी आणि सर्व किल्ल्याचा बंदोबस्त आम्हीच करू’ म्हणतात. त्यास आम्हास काही करणे नाही. का की, अशाने ही दौलत चालणार नाही व दोहो जागा दौलत जाल्याने लौकिकही वाईट. यास्तव सर्व वडिलांनीच करावे. आम्ही स्वस्थ भलते जागी राहू. आपल्या आपल्यात भांडून दौलत बुडवली हा लौकिक कशास पाहिजे?’

१७७२ मध्ये माधवरावांच्या मृत्यूनंतर, महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या राघोबादादांनी नारायणराव पेशवे यांच्याविरुद्ध कट केला आणि त्यांचा काटा काढला. त्यानंतर बहुनायकी बारभाईंचं राज्य आलं, त्यातून राज्यावर अनेक संकटं कोसळली. शेवटी इंग्रज बळावले आणि आपण आपलं स्वातंत्र्य गमावून बसलो.

माधवरावांच्या पत्रात जे अनेक रंग आहेत, ते आजही आपण राजकारणात पाहतो. हा देश आणि या देशात महाराष्ट्र, ही दौलत खरोखरीच मोठी आहे. छत्रपती शिवराय आणि त्यांचे उत्तराधिकारी ज्या प्रवृत्तींविरुद्ध लढले आणि एका प्रगत, समृद्ध, स्वायत्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, त्या राज्याचा ऱ्हास होऊ नये ही काळजी घेणे हे आजच्या राज्यकर्त्यांचं आद्यकर्तव्य आहे. हाच त्यांचा राजधर्म आहे.

‘हे राज्य कोणाचं ?’, या प्रश्नाचं उत्तर राज्यकर्त्यांनी द्यायचं आहे. प्रजेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता, कल्याणकारी राज्य त्यांनी चालवावयाचं आहे ... बस्स, इतनीसी गुजारिश है.

(सदराचे लेखक शल्यचिकित्सक असून, अठराव्या शतकातील मराठेशाहीच्या इतिहासावर त्यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.