बोलण्याच्या गोष्टी (डॉ. वैशाली देशमुख)

dr vaishali deshmukh write article in saptarang
dr vaishali deshmukh write article in saptarang
Updated on

अनेकदा मुलं भलत्या विषयांवर, भलत्या वेळेला किंवा भलत्या लोकांसमोर अचानक काहीतरी प्रश्न विचारतात आणि मग पालक बहुतेकदा ठरलेली उत्तरं देतात. खरं तर कधी न कधी या प्रश्‍नांना तोंड द्यावं लागणार. या विषयांतलं अवघडलेपण आणि अज्ञान आधी दूर करून मग मुलांपर्यंत विचार पोचवायचं काम शेवटी पालकांचंच आहे. अन्यथा पालकांची जागा इंटरनेट घेईल आणि मिळणाऱ्या माहितीला धरबंद राहणार नाही. शिवाय त्या आयत्या मिळालेल्या माहितीचा विचारांचं इंजिन सुरू करण्यासाठी काय उपयोग? त्यासाठी चर्चेचे दरवाजे सताड उघडे ठेवायला हवेत.

मुलांचे प्रश्न ः
'काय झालं, काय झालं, आई? काय बोलत होता तुम्ही?'', 'आजोबांना काय झालंय, आई?'', 'बाबा, तुमचा पगार किती?'', 'अत्याचार म्हणजे काय?'', 'आमच्या वर्गातल्या त्रिशाच्या आईबाबांचा घटस्फोट होणारेय'', 'सिगरेट ओढणं चांगलं नसतं ना? मग काका का ओढतात?''
आई-बाबांची उत्तरं ः
'काही नाही रे...'', 'तुला कशाला मोठ्या माणसांच्या गोष्टीत नाक खुपसायचं?'', 'तू तिकडे जा पाहू. मोठी झालीस की कळेल तुला!'', 'असल्या गोष्टींबद्दल बोलू नये लहान मुलांनी.''

नाती, प्रेम, व्यसनं, कायदा तोडणं, घटस्फोट, आजारपणं, लिंगभेद, लैंगिकता या काहीशा गुंतागुंतीच्या आणि संकोचून टाकणाऱ्या बाबी. पैसे, जमा-खर्च, बचत, आर्थिक नियोजन, आर्थिक विषमता या आणखी काही किचकट गोष्टी. हे विषय अतिशय महत्त्वाचे आहेत याविषयी कुणाचं दुमत नसतं; पण शंका ही असते, की मुलांशी त्याबाबत बोलावं का, या वयात त्यांना हे समजेल का, आणि त्याची गरज आहे का! मुलं मोठी झाल्यावर ही माहिती आपोआपच मिळेल, अशी सुप्त आशाही वाटते; पण मुलंच ती, काही वेळा गुगली टाकतात. भलत्या विषयांवर, भलत्या वेळेला किंवा भलत्या लोकांसमोर अचानक काहीतरी (आपल्या मते) भलते प्रश्न विचारतात आणि मग आपण वर दिलेली उत्तरं देतो.

गेल्या काही वर्षांतल्या या घटना आठवू या. मुंबईतले बॉंबस्फोट, ट्‌वीन टॉवर्सवरचा हल्ला, दिल्लीमधली गॅंग रेप, अमेरिकेत शाळांवर झालेले गोळीबार, प्रसिद्ध व्यक्तींच्या आत्महत्या, डोळे पांढरे करणारे आर्थिक गैरव्यवहार करून परदेशी पळून गेलेले व्यावसायिक, चित्रपट कलाकारांचे गाजलेले घटस्फोट, सध्या लैंगिक अत्याचारांविरुद्ध चालू असलेली "मी टू' चळवळ.... प्रत्येक वेळी माध्यमांमध्ये याविषयी भरभरून लिहून येतं, टीव्हीवर तावातावानं चर्चा होते, त्याचे भीषण फोटो आणि व्हिडिओज व्हायरल होतात. अशा खळबळजनक बातम्या माध्यमांमध्ये इतक्‍या ढळढळीतपणे चमकतात, की मुलांपासून लपवून ठेवणं शक्‍यच नसतं. मग येतात प्रश्न! काय उत्तर द्यायचं? कारण तसं पाहायला गेलं, तर माणूस म्हणून आपल्यालाही या घटना गोंधळवून टाकतात. त्यांच्या मागची कारणमीमांसा आकलनाच्या पलीकडली वाटते. त्यावरचे उपाय काही म्हणता सुचत नाहीत. मग बोलायचं तरी काय? साहजिकच आपण ते विषय टाळतो. मुलं त्यांच्या परीनं त्यांचा अर्थ काढतात; पण खरं बघायला गेलं, तर या बातम्यांमागं नुसत्या सनसनाटीपलीकडं बरंच काही असतं. त्यांचा धागा पकडून संभाषणाचा रोख विधायक दिशेनं वळवता येणं शक्‍य आहे. उदाहरणार्थ, एखाद्या दहशतवादी हल्ल्यानंतर- त्या व्यक्ती दहशतवादाकडे का वळल्या असतील, हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांची मनोवस्था, त्या हल्ल्याचे जगावर झालेले परिणाम अशा गोष्टींविषयी बोलण्याची संधी म्हणून या घटनांकडे बघता येईल का? हा एक प्रसंग पाहू ः

घरात एक जवळचं लग्न होतं. जुईनं त्यासाठी एका भारीतल्या ड्रेसचा हट्ट धरला. तिला तो ड्रेस घ्यावा, असं आईला वाटत नव्हतं; पण आपण नकार का देतोय, याचा तिनंही नीट विचार केला नव्हता. त्यामुळे ती काहीतरी थातुरमातुर उत्तरं देत होती आणि जुईचा हट्ट वाढतच चालला होता. "असले चमकदार कपडे जुई नंतर कधी परत वापरणार नाही, काही दिवसांनी तिला ते बसणारही नाहीत, आत्तापासून कशाला तिला एवढ्या खर्चाची सवय लावायची,' असे काही विचार तिच्या या नकारामागं होते. आजूबाजूला चाललेली उधळपट्टी जुईला दिसत होती. लग्न म्हणजे भरपूर खर्च, छान छान कपडे, नटणं-मुरडणं अशीच तिची कल्पना होती. "सगळे घेतात मग मलाच का नाही?' असा तिचा साधा प्रश्न होता. आईनं शांतपणे विचार केला, तेव्हा ती जुईशी या विषयावर बोलली. लग्न, त्याचा अर्थ, त्यात होणारे विधी, त्याचं बदलत चाललेलं स्वरूप, त्यावर केला जाणारा वारेमाप खर्च, त्यातून मागं राहणारी आर्थिक ओढाताण अशा काही गोष्टींवर तिला समजेल अशा भाषेत तिच्याबरोबर चर्चा केली. बाबांनीही त्यांची मतं व्यक्त केली. त्यातलं काही जुईला पटलं, काही नाही. थोडंफार कळलं, बरचसं नाही; पण या विषयावर तिची विचारप्रक्रिया चालू झाली एवढं खरं. काहीशा प्रौढपणाच्या, जबाबदारीच्या जाणीवेनंही तिच्या मनात अंकुर धरला. या प्रसंगातून आई-बाबांना नाती, खर्च, परंपरा असे कितीतरी विषय छेडता आले. शिवाय जुईच्या मनातल्या द्वंद्वाला त्यांनी पुरेसं महत्त्व दिल्यामुळं तिचा आत्मसन्मानही जोपासला गेला. ड्रेसच्या बाबतीत दोन्ही पक्षांना मान्य होईल अशी तडजोड होण्याचा मार्ग मोकळा झाला हा बोनस.

मुलं जेव्हा एखाद्या महागड्या वस्तूची मागणी करतात, तेव्हा "आत्ता माझ्याकडे पैसे नाहीयेत रे' असं थोडं सवयीचं, थोडं सोयीचं उत्तर देण्यापेक्षा आपली त्यामागची भूमिका सांगता येईल का? फक्त ती आधी स्वत:ला स्पष्ट हवी. पैसे खर्च करण्याचा प्राधान्यक्रम काय आहे, एखादी गोष्ट खरेदी न करण्याची आपली काय कारणं आहेत हे वेळीच स्पष्ट केलं आणि त्यावर ठाम राहिलं, की बरं असतं. नाहीतर आई-बाबा म्हणजे एक "एटीएम'च वाटतं मुलांना. मुख्यत: मुलं मोठी होतात, कॉलेजच्या दिशेनं वाटचाल करू लागतात, तेव्हा हे जास्त जाणवतं. "हेचि फळ काय मम तपाला,' असं वाटून पालक तेव्हा खूप दुखावले जातात; पण आर्थिक बाबींविषयी मुलांशी कधीच स्पष्टपणे बोललो नसू, तर याचा विचार त्यांना कसा करता येणार? "घर घर की कहानी' नावाचा एक जुना पिक्‍चर आहे. त्यात मुलं सारख्या मागण्या करत असतात. शेवटी वडील सहा महिन्यांसाठी घराचा कारभार मुलांवर सोपवतात, तेव्हा कुठं मुलांना कळतं पगाराच्या पैशात घर चालवणं ही काय चीज आहे ते! परवा पेपरमध्ये एक बातमी आली होती. वाढदिवसाचे साठलेले पैसे काही मुलांनी केरळच्या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून दिले. आपल्या हक्काच्या पैशाचा असाही उपयोग करता येतो, फक्त मजा करण्यासाठी नाही हा आपल्या मुलांमध्ये किती छान विचार रुजवला या पालकांनी!

सिद्धार्थ गौतमाला कोणत्याही दु:खाला सामोरं जायला लागू नये, याची त्याच्या वडिलांनी पुरेपूर काळजी घेतली. त्याला राजवाड्याच्या सोनेरी पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवलं. त्याचं कोवळं मन या सगळ्या आघातांनी कोमेजून जायला नको असा हेतू यामागे होता त्यांचा; पण शेवटी एका वेळी सिद्धार्थला या गोष्टींना सामोरं जावं लागलं! मुलांना सत्य परिस्थितीपासून फार काळ लपवून नाही ठेवता येत आपल्याला. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही. कधी न कधी त्यांना त्याला तोंड द्यायला लागणार. या विषयांतलं आपलं अवघडलेपण आणि अज्ञान आधी दूर करून मग मुलांपर्यंत विचार पोचवायचं काम शेवटी आपलंच आहे. नाहीतर मग पालकांची जागा इंटरनेट घेईल आणि मिळणाऱ्या माहितीला धरबंद राहणार नाही. शिवाय त्या आयत्या मिळालेल्या माहितीचा विचारांचं इंजिन सुरू करण्यासाठी काय उपयोग? त्यासाठी चर्चेचे दरवाजे सताड उघडे ठेवायला हवेत. तात्पुरत्या सुटकेसाठी सहज म्हणून सुरुवातीला सांगितलेल्या प्रतिक्रिया आपण जेव्हा वापरतो, त्यांनी ते बंद होण्याची शक्‍यता असते. उलट असे संवेदनशील विषय इतर कुणा बेजबाबदार सूत्राकडून समजण्यापेक्षा आपणच मुलांना समजावलेले बरे, हो ना? आणि अशी संधी मुलं आपल्याला देत असतात अधूनमधून. ती ओळखायला मात्र शिकायला हवं . वयाला सुसंगत, समजेल अशा भाषेत, समाधान होईल इतपत माहिती द्यायची म्हणजे जवळजवळ आखुडशिंगी-बहुगुणी म्हशीचा शोध लावण्याइतकंच अवघड... पण "प्रॅक्‍टिस मेक्‍स मॅन परफेक्‍ट.' त्यामुळे प्रयत्न करत राहू या, नक्की जमेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.