अठराव्या शतकाच्या सुरुवातीला धृपदगायनाच्या परंपरेला काही प्रमाणात ओहोटी लागली. महंमदशा रंगीले यानं दिल्लीत ख्याल या नव्या गायनप्रकाराला प्रोत्साहित केलेलं दिसून येतं.
- डॉ. विकास कशाळकर vikaskashalkar@gmail.com
अठराव्या शतकाच्या सुरुवातीला धृपदगायनाच्या परंपरेला काही प्रमाणात ओहोटी लागली. महंमदशा रंगीले यानं दिल्लीत ख्याल या नव्या गायनप्रकाराला प्रोत्साहित केलेलं दिसून येतं. दरगाह कुलीखान यानं सन १०४० च्या आसपास वेगवेगळे कलावंत व कलावती यांची माहिती लिहून ठेवली आहे. नूरबाई ‘जंगला’ हा प्रकार गाण्यात प्रवीण होती, तसंच महंमदशाच्या दरबारातला बीनकार व गायक न्यामतखाँ यानं दिल्लीदरबारात ख्यालगायनाची सुरुवात केल्याचं मानलं जातं. पुढं ही परंपरा कव्वाल बच्चे आणि तानरसखाँ यांनी दिल्लीत रुजवली. लखनौमध्ये त्या काळी ठुमरीगायन लोकप्रिय होतं व नंतर वाजीदअली शहा यांच्या विस्थापनानंतर अनेक कलाकार लखनौ सोडून इतरत्र स्थायिक झाले. उस्ताद नथ्थनखाँ पीरबक्ष हे ग्वाल्हेरला आल्यावर त्यांना राजाश्रय मिळाला. त्यांची अनेक रागांवर हुकमत होती, अनेक चिजा त्यांना पाठ होत्या. नातू हद्दूखाँ आणि हस्सूखाँ यांना लहानपणापासून तालीम मिळाल्यामुळे ते ख्यालगायनात तरबेज होते. स्वच्छ आकार, सुबक मांडणी, शुद्ध रागविचार अशा विविध गुणसंपन्न गायकीची मुहूर्तमेढ ग्वाल्हेर इथं रोवली गेली, म्हणून या शैलीला ‘ग्वाल्हेरगायकी’ असं म्हटलं जाऊ लागलं.
यापूर्वी धृपदगायकीला ‘बानी’ किंवा ‘वाणी’ असंं म्हटलं जायचं. ख्यालगायकीत ‘घराणं’ अशी संज्ञा रूढ झाली; कारण, एकाच घराण्यातले अनेक कलाकार प्रस्तुतीमधील साधर्म्यामुळे घराण्याचे गायक म्हणून ओळखले गेले. वास्तविक, नथ्थन पीरबक्ष यांच्याकडे घग्गे खुदाबक्ष (आग्रेवाले) यांनीही तालीम घेतली; परंतु त्यांची प्रस्तुती वेगळी होती म्हणून ते ‘आग्रा घराण्या’चे गायक म्हणून ओळखले जाऊ लागले.
‘ग्वाल्हेर’, ‘आग्रा’, ‘जयपूर’ या घराण्यांना धृपदांच्या बाबींचा आधार आहेच; मात्र, ख्यालगायकी ही त्यातील रागविचार, तालविचार, लयविचार, भावसौंदर्य, बंदिशीची मांडणी अशा अनेक घटकांमुळे धृपदगायकीपेक्षा वेगळी जाणवते.
धृपदाची सुरुवात बहुतेक वेळा ‘नोम् तोम्’नं होते, त्याला ‘अनिबद्ध गान’ असं म्हणतात. ही आलापी खूप सुंदर असली तरी तालविरहित असते. ताल म्हणजे गाण्यातलं चैतन्य. रागाच्या आलापीत सौंदर्य आणि चैतन्य यांचा एकत्रित आविष्कार आणि त्याला कल्पकतेची जोड दिल्यामुळे ख्याल लोकप्रिय झाला. ख्यालामध्ये धृपद, धमारापेक्षा सुटसुटीतपणा आहे. धृपदापेक्षा अधिक स्पष्टपणे जाणवणारा मुखडा आहे. या मुखड्यामुळे बढत म्हणजे चलत्व व विराम यांसोबत विचारांना पूर्णत्व प्राप्त होतं.
एक विचार संपवून दुसरा विचार सुरू करत ख्यालगायन पुढं पुढं सरकतं. त्यात नवा विचार आहे. स्वर-तालाचा एकमेकांशी संवाद आहे. स्वर-शब्दांचं भावदर्शन आहे, चमत्कृती आहे आणि कौशल्यालाही वाव आहे. ख्याल म्हणजे एक सुंदर सजवलेला पुष्पगुच्छ आहे.
ग्वाल्हेर घराण्यातली विविध स्वरांवरची उपज म्हणजे गुलाब, जरबेरा, ग्लॅडिओलस, निशिगंध अशी नाजूक कलाकृती असते, तर छोट्या छोट्या खोवलेल्या डहाळ्या या षड्जावर येऊन मिळणाऱ्या सरळ, सपाट ताना भासतात.
तालाच्या कॅनव्हासवर मांडलेले हे स्वरसमूह रागाचं रंगीबेरंगी चित्र निर्माण करतात. गमक, खटका, खेच, मिंड अशा गानक्रियांतून राग उभा होतो.
क्षणापूर्वी रांगणारा राग उभा राहतो आणि धावायलाही लागतो. बहुतेक वेळा सरळ; पण कधी कधी छोटी वळणं घेऊन श्रोत्यांना सुखानुभव देतो. अमूर्त रागाला मूर्तरूप मिळतं आणि शेवटी तो अमूर्तात विलीन होतो. म्हणजे, एकाच मैफलीत रागाचा पूर्ण जीवनपट उलगडून दाखवला जातो.
ग्वाल्हेरच्या बंदिशी बहुतेक वेळा झुमरा, तिलवाडा या तालांत बांधलेल्या असतात. पूर्वी या घराण्यात दोन ते तीन आवर्तनांच्या अस्ताई व अंतऱ्याची एकत्र गाण्याची पद्धत होती. आताच्या लयीपेक्षा काहीशी जलद लय बड्या ख्यालासाठी निवडली जायची. हल्ली एकाच आवर्तनात अस्ताई गायिली जाते. रागविस्तार काहीसा रमतगमत पुढं सरकतो.
स्वरवाक्य व शब्दवाक्य यांचा मिलाफ या गायकीत आहे. विस्तारात अवरोही तान एखादं विमान अलगद विमानतळावर उतरावं तशी समेवर येऊन मिळते. ताल पक्का असावा, दमछाक न होता सहजतेनं सम पकडावी याकरता गुरू स्वतः डग्ग्यावर ताल धरून गाणं शिकवत असत.
ग्वाल्हेरमध्ये जयाजीराव शिंदे यांच्या दरबारात नामवंत गवई नोकरीस होते. नथ्थनखाँ, हद्दूखाँ, हस्सूखाँ यांच्या विविधरंगी गायनशैलीतून अनेक नामवंत गायक तयार झाले. महाराष्ट्रात बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, रामकृष्णबुवा वझे यांनी ही गायकी आणली. बाळकृष्णबुवांनी फार मोठा शिष्यपरिवार तयार केला. बाळकृष्णबुवांच्या गायकीवर धृपद, टप्पा आणि ख्यालशैलीचा प्रभाव एकत्रितपणे दिसायचा. कारण, त्यांचे गुरू देवजीबुवा परांजपे यांनी धृपद, टप्पा व ख्यालाची जवळजवळ ३६ वर्षं तालीम घेतली होती. शिवाय, रहमतखाँ यांचे बंधू महंमदखाँ यांचाही सहवास बाळकृष्णबुवांना लाभला. औंध-सांगली-मिरज इथल्या त्या काळच्या संस्थानिकांनी राजाश्रय दिल्यामुळे विष्णू दिगंबर पलुसकर, गुंडोबुवा इंगळे, अनंत मनोहर जोशी अशी नामवंत गायकमंडळी महाराष्ट्रात उदयाला आली हे महाराष्ट्राचं भाग्यच नव्हे का!
(सदराचे लेखक संगीताचे अभ्यासक आणि ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ’ या संस्थेचे अध्यक्ष आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.