आमचं ‘सैनिकी कुटुंब’ होतं. सात दशकांपूर्वी याचा अर्थ ‘अभिजनवर्गातलं कुटुंब’ असा होता. याचा अर्थ असाही होता की, ‘शिस्त’ हेच अशा घरातील मुलांच्या जडणघडणीचं मुख्य वैशिष्ट्य होतं.
आमचं ‘सैनिकी कुटुंब’ होतं. सात दशकांपूर्वी याचा अर्थ ‘अभिजनवर्गातलं कुटुंब’ असा होता. याचा अर्थ असाही होता की, ‘शिस्त’ हेच अशा घरातील मुलांच्या जडणघडणीचं मुख्य वैशिष्ट्य होतं. ‘काय करावं आणि काय करू नये,’ हे स्पष्ट ठरलेलं होतं. बरोबर काय आणि चुकीचं काय यात शंकेला जागा नव्हती. मोठ्यांचा आदेश असेल तसंच वागायचं हा नियम होता. माझे वडील सैनिक होते. त्यामुळं घरातही ते शिस्तपालक असावेत असा तर्क केला जाऊ शकतो; पण तसं बिलकूल नव्हतं. सैनिक असले तरी बेशिस्तीबद्दल शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशासारखे ते नव्हते; न्यायशास्त्राचे प्राध्यापक असावेत तसे होते. घरात शिस्त राखण्याचं काम आईकडे होतं. दुसऱ्या महायुद्धात तिनं ‘आर्मी मेडिकल कॉप्स’मध्ये फील्ड हॉस्पिटलमधील अधिकारी म्हणून सेवा केली होती. त्यासाठी तिला ‘कैसर-ए-हिंद’ पुरस्कार मिळाला होता. वडील युद्धावरून परतले आणि आईनं सैन्यातली सेवा सोडावी म्हणून त्यांनी तिचं मन वळवलं. तिनं सैन्याचा निरोप घेतला; पण लष्करी शिस्तीनं तिची रजा कधीच घेतली नाही!
आई तर्काच्या स्पष्ट प्रकाशात जग पाहत असे. मोठे लोक - वयानं मोठे असल्यामुळे - बरोबरच असतात आणि म्हणून लहानांनी नेहमी त्यांच्या शब्दानुसार वागायचं या तत्त्वावर आमचं घर चालत असे. माझं लहान मुलांचं जग होतं. मोठ्यांचा तर्क माझ्या समजण्याच्या पलीकडचा होता. म्हणून कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याची माझी आणि त्यांची दृष्टी निराळी होती.
उदाहरणच सांगायचं तर, मला जेव्हा खेळायचं असायचं किंवा चित्र काढायचं असायचं तेव्हा ते मला सांगायचे ‘ते बाजूला ठेव आणि भूगोल, इतिहास, अंकगणित, नाहीतर व्याकरणाचा अभ्यास कर.’ मला योग्य वाटेल असं काही मी करायला जायचो तेव्हा तो माझा उद्धटपणा आहे असं त्यांना वाटायचं. आपणही कधीतरी लहान होतो याची जाणीव मोजक्याच प्रौढांना असावी! माझ्या लहानपणीच्या असंख्य शिक्षा आमच्या या अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा परिणाम होत्या. त्यातल्या दोन शिक्षा तुम्हाला सांगतो.
जुन्या काळी सैन्यातले अधिकारी वार्षिक सुट्टी घेऊन कुटुंबासह आपल्या गावी जायचे. आम्ही झाशीला असतानाची ही गोष्ट आहे. सुट्टीसाठी आम्ही असेच कोल्हापूरला आजोबांकडे आलो. प्रसिद्ध चित्रपटदिग्दर्शक भालजी पेंढारकर यांना भेटायला एके दिवशी वडिलांनी मला जयप्रभा स्टुडिओत नेलं. खरं तर वडील सैनिक आणि भालजी दिग्दर्शक; पण मराठा-इतिहासावरचं प्रेम हा त्यांच्या मैत्रीचा समान धागा. भेटून परतत असताना भालजी मला म्हणाले : ‘‘यशवंत, तुझ्या वाढदिवशी ‘वहिनीं’नी - म्हणजे माझ्या आईनं - मला जेवायला बोलावलंय. वाढदिवसाची भेट म्हणून तुला काय हवंय?’’
मी चटकन म्हणालो : ‘खरोखरची तलवार.’
‘तलवार घेऊन काय करशील?’ त्यांनी गंभीरपणे विचारलं.
‘स्वराज्याचं रक्षण’ मी उत्तर दिलं. तो क्षण निघून गेला.
एका आठवड्यानंतर माझ्या वाढदिवसाचं जेवण झाल्यावर भालजीकाकांनी तपकिरी चामड्यात ठेवलेली, सुंदर नक्षी असलेली खरीखुरी तलवार आणि बाहेरून चमकदार पितळी खिळे असलेली ढाल मला भेट दिली. माझा आनंद गगनात मावेना. सुट्टी संपली. आम्ही झाशीला परत आलो. आल्या आल्या मी ढाल आणि तलवार मित्रांना दाखवली. बघून सगळे चकित झाले. प्रत्येकानं ती ढाल-तलवार हातात घेऊन पाहिली. तेवढ्यात आमचा ‘हेर’ अनिल आला आणि स्वराज्याच्या एका किल्ल्याला मोगलांकडून धोका असल्याची बातमी त्यानं दिली. समोर उभ्या राहिलेल्या संकटावर आमच्यात सल्लामसलत झाली. गनिमी कावा करून शत्रूला ताबडतोब उत्तर दिलं पाहिजे असं ठरलं. लढाईची हत्यारं माझी होती. अर्थात्, मी ‘शिवाजीमहाराज’ झालो आणि बाकी सगळे मावळे; परंतु मुघल सैन्य कुणीच होईना. मग करायचं काय? नेमकं त्या वेळी लॉनच्या बाजूला असलेल्या गुलाबाच्या बागेकडे माझं लक्ष गेलं. मला अचानक कल्पना सुचली. बागेकडे बोट दाखवत मी ओरडलो : ‘तो बघा शत्रू!’ लगेच ‘हर हर महादेव’ असा जयघोष सुरू झाला. पुढच्या तासाभरात बेफाम ‘कत्तल’ झाली. मावळ्यांनी मोठं धाडस दाखवलं. ‘शत्रुसैन्या’ची संख्या जास्त होती, तरी शेवटी लढाई आम्हीच जिंकली आणि विजयाचा आनंद साजरा करत असतानाच आईची गाडी पोर्चमध्ये शिरली. आईला बागकामाची भयंकर आवड होती. ती बाग तिनं स्वतः तयार केलेली होती स्वतःच गुलाबांची काळजी घेतली होती. तिच्या मेहनतीमुळं बाग छान फुलली होती. येणाऱ्या ‘पुष्पमहोत्सवा’त तिला पहिला नंबर मिळणार अशी सगळीकडे चर्चा होती.
गाडीतून उतरत आई म्हणाली : ‘हॅलो भैया...’ पण पुढचे शब्द तिच्या घशातच अडकले. आपला जीव की प्राण असलेली बाग पूर्णतः उद्ध्वस्त झालेली तिनं पाहिली. संध्याकाळी माझी ‘सॉल्लिड’ धुलाई झाली.
दुसरा प्रसंग ‘मेयो’तल्या माझ्या शाळेतला आहे. तसा अभ्यासात मी हुशार होतो; पण गणित मात्र कमजोर. हा विषय शिकवणारे ओ. पी. अग्रवाल (ओपीए) माझे सगळ्यांत नावडते शिक्षक होते. ‘ओपीए’सर हे उंचीनं - बुटांच्या टाचांसह - चार फूट, दहा इंच होते. त्यामुळे फळ्यावर लिहिणं त्यांच्यासाठी रोजचं आव्हान होतं. उड्या मारून मारून गणितातली प्रमेये आणि समीकरणं ते फळ्यावर लिहायचे. एकदा असाच एक नकोसा वाटणारा गणिताचा प्रकार त्यांनी सोडवायला दिला. सगळ्या वर्गाचं म्हणणं होतं की, सरांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी काहीतरी शक्कल लढवली नाही तर सगळेच मरणार! वर्गाला ‘वाचवण्याची’ जबाबदारी माझ्यावर आली. ती अंगावर घेत फळ्याच्या अगदी वरच्या भागावर मी लिहिलं :
‘ओपा पोपा लिटल् मॅन
ट्राय अँड रब धिस, इफ यू कॅन
तसं मी का केलं हे आजवर मला कळलेलं नाही; परंतु फळ्याच्या वरच्या कोपऱ्यात लिहिलेल्या त्या सयमक ओळी पाहून ‘ओपीए’सर साहजिकच भयंकर संतापले.
‘कुणी केलंय हे?’ असं रागावलेल्या स्वरात विचारत वर्गातल्या प्रत्येकाची ते झडती घेऊ लागले. शेवटी माझ्यावर त्यांची नजर खिळली.
‘यशवंत, हे काम तुझंच असणार. नाही होऊन पडू नकोस!’ सर म्हणाले.
मीही कबूल केलं. मग काय, शिक्षा!
आजकाल शिक्षक मोठ्यानं नुसते ओरडले तरी मुलं आणि त्यांचे पालक त्यांना घाबरवून सोडतात; पण त्या काळी चूक झाली की तेल लावलेल्या बांबूच्या छडीचा आणि गुन्हेगाराच्या पार्श्वभागाचा फार वेदनादायक संपर्क यायचा! जास्तीत जास्त सहा फटके देण्याची तेव्हा मर्यादा होती आणि कमाल शिक्षेसाठी अर्थातच मी पात्र होतो. मी खाली वाकलो; पण का कुणास ठाऊक, ‘ओपीए’सर थांबले.
‘तू तसं का केलंस?’’ असं त्यांनी मला विचारलं. तेव्हा, माझ्या ‘सर्जनशील’तेच्या जोरावर मी त्यांना समजावून सांगितलं : ‘सर, मी निर्दोष आहे. माझ्या आत एक पिशाच्च आहे, त्याचा हा पराक्रम आहे. त्यानंच मला तसं वागायला लावलं.’
‘असंय का?’’
‘ओपीए’सरांच्या डोळ्यांत एक दुष्ट चमक दिसली.
‘तसं असेल तर त्या पिशाच्चाला तू तुझ्या आतमध्ये राहू दिल्याबद्दल तुला सहा फटके आणि असलं हे कृत्य त्यानं तुला करायला लावल्याबद्दल त्यालाही मोजून सहा फटके मिळतील! चल, वाक...’
तुम्हाला सांगतो, मला शिक्षा देण्यासाठी ‘ओपीए’सरांनी ही जी काही ‘मेहनत’ घेतली होती, तिच्यामुळे मी आठवडाभर नीट बसू शकलो नाही!
अनेक वर्षं या गोष्टींवर मी विचार केला. शिक्षेचं म्हणाल तर मला कबूलच आहे की ‘प्रौढ नजरे’तून या दोन्ही प्रकरणांत मी चुकीचं आणि असंवेदनशीलतेनं वागलो; पण या नाण्याला दुसरी बाजूही आहे. त्या दुपारी झाशीतल्या लॉनवर खरोखरच मुघल सैन्य आगेकूच करताना मी पाहिलं होतं! आईला मात्र खराब झालेली गुलाबाची बाग दिसली. कदाचित्, मी गुलाबाची बाग बघायला हवी होती आणि तिनं मुघल सैन्य. याच रीतीनं ‘ओपीए’सरांचा राग योग्य होता. आपापल्या दृष्टीनं आई आणि सर हे दोघंही बरोबर होते.
हे किस्से सांगत असताना बालपणीची निरागसता कुरवाळण्याचा मी प्रयत्न करत नाहीय किंवा प्रौढांचा बुद्धिवाद आणि जगाविषयीच्या ‘प्रौढ ज्ञाना’चा निषेधही करत नाहीय. मला माहीत आहे की, लहान मुलांच्या सहज आणि निष्पाप नजरेनं जीवनाकडे बघण्याची कला काही प्रौढ लोकांच्यातही असते, ‘द लिटल प्रिन्स’ लिहिणारे फ्रेंच लेखक आंत्वुआन् द संट्-एक्झुपेरी यांच्यात होती तशी. याउलट, काही मुलंदेखील प्रौढांइतकीच स्वार्थी आणि उथळ असू शकतात.
मला वाटतं, जसजसे आपण मोठे होत जातो तसतसा आपल्यातला निरागसपणा कमी कमी होत जातो आणि हळूहळू आपल्यापासून तो दूर जातो. आपल्यातील मुलाला धरून ठेवण्यासाठी आपण लढत असतो, तरीही आपला साधेपणा हिरावून घेतला जातो; आपण कोण आहोत, आपल्याला काय करायचं आहे आणि कशावर विश्वास ठेवायचा आहे हे शोधण्यासाठी आपण धडपडत असताना कठोर वास्तव आपल्या समोर येतं.
ही लढाई आपल्यातील मूल मरेपर्यंत इंचाइंचानं हरली जाते आणि हळूहळू आपले डोळे जादूमय जगातलं सुंदर इंद्रधनुष्य पाहण्याची क्षमता गमावून बसतात. काहीजण त्या मुक्कामावर लवकर पोहोचतात, तर काही नंतर...आणि एक दिवस आपल्याला समजतं की, गुलाबाची बाग ही कधीही मुघल सैन्य असू शकत नाही!
आपल्या गोंडसपणापासून दूर जाणारा हा प्रवास वास्तवाशी तडजोडीच्या मार्गानं जातो. आपल्या स्वत्त्वाची झीज करणारी सौदेबाजी आणि आपली अगतिकता जगाला दिसू नये म्हणून घातलेले आपले मुखवटेही याच मार्गावर असतात. परिणामी, आपण चतुर आणि व्यावहारिक बनतो; पण आनंदासाठी नव्हे तर स्वार्थासाठी. प्रौढ होण्याचा आपला प्रवास म्हणजे जीवनाशी जुळवून घेण्याच्या शोकान्तिकेची कहाणी बनते आणि जीवनात नेमकं काय महत्त्वाचं आहे हे आपण विसरून जातो.
कधी कधी मला प्रश्न पडतो की, ‘तर्क’ हाच ज्ञानाचा एकमेव स्रोत आहे का? कारण; सुंदर चित्र पाहताना, कविता वाचताना किंवा संगीत ऐकताना मी अनेकदा आतल्या आत हलून जातो आणि असं वाटतं की, या अनुभवातून जे सत्य गवसतं ते बुद्धिवादी विज्ञानाच्या आधारे केलेल्या गणितातून हाती येणाऱ्या सत्याहून मोठं असतं. निदान, तशी माझी धारणा आहे. ती चुकीचीही असू शकेल. आपण वयानं वाढत जाणार याला तर काही इलाज नाही; पण आपली निरागसता न गमावता आपण वाढू शकणार नाही का? आपल्यातील लहान मुलाशी मैत्री कायम ठेवून आपण प्रौढ होऊ शकणार नाही का? एकाच वेळी तर्क आणि स्वप्न या दोहोंचा आपण अनुभव घेऊ शकत नाही का? स्वतःमधील गुरुत्वाकर्षणामुळं टिकून राहिलेल्या ताऱ्यांना केवळ हायड्रोजन आणि हेलियम वायूचे गोळे न समजता काळोख्या आकाशात लटकलेले लखलखते कंदील म्हणून आपण पाहू शकणार नाही का? जगाचा अर्थ लावण्यासाठी तर्काची गरज असते यात शंका नाही; पण त्या तर्काला माणसाळवण्यासाठी, बुद्धीला अदृश्य असलेलं सत्य दाखवण्यासाठी आणि जीवनात जे महत्त्वाचं असतं नेमकं तेच आपल्या डोळ्यांना दिसत नाही याची आठवण करून देण्यासाठी आपल्याला हृदयाचीदेखील आवश्यकता असते. जगातील सर्वात सुंदर गोष्टी पाहिल्या किंवा स्पर्शिल्या जाऊ शकत नाहीत; फक्त अनुभवल्या जाऊ शकतात.
रुख-ए-मुस्तफा है वो आईना
कि अब ऐसा दूसरा आईना
न हमारी बज्मे खयाल में,
न दुकान-ए-आईना साज में
(हृदय हाच ईश्वराचा आरसा आहे, त्यातच त्याचं पावित्र्य आणि तेज झळकतं.)
(सदराचे लेखक ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ, तसंच अर्थशास्त्र-इतिहास-राजकीय घडामोडी या विषयांचे अभ्यासक-संशोधक आहेत.)
(अनुवाद: डॉ. रघुनाथ कडाकणे)
(raghunathkadakane@gmail.com)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.