ही साधी कहाणी आहे - एक वैयक्तिक गोष्ट. तिच्यावर तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, मला फारसा फरक पडत नाही.
ही साधी कहाणी आहे - एक वैयक्तिक गोष्ट. तिच्यावर तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, मला फारसा फरक पडत नाही. मात्र तसं घडलं होतं इतकंच मी म्हणू शकतो. १९७१ मध्ये मरिन लाइन्सला असलेल्या ‘क्षमा भवन’ या एका जुन्या पद्धतीच्या बंगल्यात बहिणीसोबत राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. परराष्ट्र सेवेतल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पन्नासच्या दशकात बांधलेलं ते एक सुंदर घर होतं. त्याच्या पश्चात त्याची बायको त्या घरात एकटी राहत होती. आम्ही भाड्याने तिथं राहात होतो. ३ डिसेंबरचा दिवस होता. तारीख मला आठवते, कारण त्या संध्याकाळी घरी आलो तेव्हा कुसुम खिडकीवर तपकिरी कागद चिकटवत होती. पाकिस्तानने आपल्या अकरा विमानतळांवर एकाच वेळी हवाई हल्ले केले होते आणि आपल्याला युद्धात ढकललं होतं. बातमी आश्चर्यकारक नव्हती. ‘ऑपरेशन सर्चलाइट’ सुरू केल्यानंतर तीस लाख बंगालींची कत्तल करण्यात आली होती आणि आणखी दहा लाख निर्वासित म्हणून भारतात पळून आले होते. त्यामुळे युद्ध होणार का नाही हा प्रश्नच नव्हता; कधी होणार इतकाच होता.
पण याचा या कथेशी काहीच संबंध नाही. तिची सुरुवात एक दोन बाय तीन इंची काचेची फ्रेम असलेल्या चित्राने झाली. रस्त्याकडेच्या एका दुकानातील त्या चित्राकडे माझं मन ओढलं गेलं होतं. कालीमातेची प्रतिकृती होती. ती विकत घेण्याचं तसं काही विशेष कारण नव्हतं; ना मी धार्मिक होतो, ना देवीचा भक्त. तरीही... त्यात काहीतरी होतं म्हणून ती विकत घेतली. घरकामात ताईला मदत करून झाल्यावर अभ्यासाच्या टेबलाजवळच्या एका कोनाड्यात चित्र ठेवून दिलं. विषय संपला.
त्या रात्री दोन गोष्टी घडल्या : शहरावर शत्रूचं विमान घिरट्या घालताना दिसल्याची अफवा उठली. तशातच सायलेन्सरच्या पुंगळी काढलेल्या दुचाकी गाड्या आसपास घुमू लागल्या. त्याला घाबरून शेजारच्या इमारतीतील एकजण बाल्कनीतून खाली पडला आणि ‘शहीद’ होता होता राहिला.
दुसरी गोष्ट या कथेशी संबंधित होती. दुसऱ्या दिवशी पहाटे मला एक स्वप्न पडलं. स्वप्न की दृष्टान्त माहीत नाही. लालसर-काळ्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी ‘तिचं’ अस्तित्व जाणवलं आणि माझ्या शरीराचे अगणित तुकडे होऊन असह्य अत्यानंदाने धापा टाकत असल्याचा भास झाला. तो अनुभव सहन करण्याच्या पलीकडचा असल्याने मी पूर्वावस्थेत येण्यासाठी याचना करत असल्याचं आठवतं. मग हळूहळू माझ्या देहाचे विखुरलेले कण अन् कण एकमेकांत मिसळत गेले. तिथे किती वेळ पडून राहिलो माहीत नाही; पण जेव्हा भानावर आलो, तेव्हा सूर्यकिरणं झाडांच्या पानांमधून झिरपत होती, किचनमध्ये किटलीतला चहा उकळत होता आणि ताई ऑफिसला जाण्याची तयारी करत होती. त्या विचित्र घटनेला जास्त ‘बटर-चिकन’ खाल्ल्याचा परिणाम समजून ती मनातून काढून टाकली, किंवा तसं मला वाटलं.
मी रिझर्व्ह बँकेत रुजू झालो आणि नागपूरला बदली झाली. पाहतो तर, पहिल्याच दिवशी मला दिलेल्या टेबलावरच्या काचेखाली देवीची हुबेहूब तशीच प्रतिकृती होती. थोडं विचित्र वाटलं; पण मी सोडून दिलं. अशाच तऱ्हेने वरवर साध्या; पण कोणत्या ना कोणत्या रीतीने देवीशी संबंधित गोष्टी घडत राहिल्या. काहीतरी विचित्र घडत असल्याचं माझ्या लक्षात आलं नव्हतं असं नव्हे; परंतु त्याचा उलगडा करण्याइतपत मी मोठा नव्हतो.
अठरा वर्षं निघून गेली. दरम्यान लग्न झालं, करिअर करण्यावर माझं लक्ष केंद्रित झालं. संसार सुरू झाला. वेळ मजेत निघून गेला. आणि एके दिवशी - कदाचित योग्य वेळ आली होती म्हणून असेल - ‘तिच्या’विषयीचे विचार मनात पुन्हा येऊ लागले. हळूहळू तिच्या अस्तित्वाचा शोध घेणं मला महत्त्वाचं वाटू लागलं. खरोखरच ‘ती’ आहे, की तो केवळ माझ्या कल्पनेचा खेळ आहे!
साधना कशी करावी यावरची ढीगभर पुस्तकं विकत आणली आणि वाचन सुरू केलं. सगळ्यांचं सार एकच होतं : गुरुकृपा झाल्याशिवाय दैवी बोध होणार नाही. पण गुरू मिळत नव्हता. मात्र, जाहिरातबाजी करून ‘निर्वाणा’चं पॅकेज खपवणारे बऱ्याच संस्थांचे आणि पंथांचे स्वामी बाजारात होते. पण ब्रँडेड शर्ट घ्यावा तसा ‘साक्षात्कार’ विकत घेता येतो यावर विश्वास बसत नव्हता. म्हणून मी तो नाद सोडला. दोन वर्षांनंतर चेन्नईला बदली झाली. एका शनिवारी मित्रासोबत ‘मद्रास लिटररी सोसायटी’च्या लायब्ररीकडे जात होतो. वाटेत त्याला म्हटलं, ‘‘रामकृष्ण मठाशी संबंधित अण्णा सुब्रमण्यम - गुरू आणि देवीचे उपासक म्हणून ख्याती असलेले - यांना काही महिन्यांपूर्वी मी पत्र लिहिलं होतं; पण उत्तर आलं नाही.’’
‘अण्णा सुब्रमण्यम?’ गुरुमूर्तीने विचारलं.
‘होय. त्यांच्याबद्दल तू काही ऐकलंयस का?’ मी म्हणालो.
जवळच्या इमारतीकडे बोट दाखवत गुरू म्हणाला, ‘हे काय, इथेच राहतात ते; पण अतिशय सनातनी आणि कर्मठ म्हणून प्रसिद्ध आहेत. तुला शर्ट-पॅण्टमध्ये बघून त्यांना काय वाटेल सांगता येत नाही.’ दारावरची घंटी वाजवली. आम्हाला आत नेलं गेलं. मन प्रसन्न करणाऱ्या खोलीतलं वातावरण. धोती आणि अंगवस्त्रम नेसून एक ऋषितुल्य व्यक्ती खोलीच्या कडेला बसलेली.
‘काय पाहिजे?’ धीरगंभीर, नम्र; पण कोरड्या स्वरात त्यांनी विचारलं. कसंबसं धाडस करून मी सगळी कहाणी त्यांना कथन केली आणि देवीची उपासना करण्यासाठी मला कोणी गुरू मिळाला नाही हेही सांगितलं.
‘तुमचं नाव थोरात का?’ त्यांनी विचारलं.
‘हो.’ एकदम चकित होऊन मी म्हणालो.
‘मठाच्या कार्यालयात गहाळ झालेलं एक पत्र आज मिळालं आहे, ते तुमचंच दिसतंय आणि प्रत्यक्ष तुम्हीही इथं हजर आहात.’ सगळी चौकशी झाल्यावर ते म्हणाले, ‘तुम्ही संध्या वंदनम नियमितपणे करता का?’
‘नाही. मी क्षत्रिय असल्याने लहानपणी मला ती दीक्षा दिली गेली नाही.’
अचानक ते भडकले. भीतीने अंगावर काटा आला. ‘गायत्री मंत्राचा द्रष्टा कोण आहे? विश्वामित्र! तो काय ब्राह्मण होता? शास्त्रात स्वच्छपणे सांगितलेलं आहे, शिकण्याची इच्छा पवित्र असेल आणि शिकणारा पात्र असेल, तर गुरूने विद्या दिलीच पाहिजे. काही दशकांचा उशीर झाला तुम्हाला; पण तरीही तुम्ही प्रथम गायत्री मंत्राची दीक्षा मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे.’
संभाषण कोणत्या दिशेने जात होतं हे माझ्या ध्यानात आलं - अर्थात कुठेही नाही. हाच इतिहास होता. देव हा काही ठराविक लोकांची मक्तेदारी झाली होती, त्यामुळे वाईट वाटून घेण्यात काही अर्थ नव्हता. निघायचं म्हणून मी उठलो. ‘बसा..’ ते पुन्हा कडाडले. ‘‘अजून माझं बोलणं संपलेलं नाही. त्या टेबलावर पंचांग पडलेलं आहे; घेऊन या इकडे.’ आणि अशा रीतीने मला प्रारंभिक दीक्षा मिळाली आणि प्रवास सुरू झाला.
उन्हाळ्याच्या सुटीला आल्यावर गुरुवर्य प्रा. श्रीनिवास दीक्षितसरांना घडलेली हकिगत सांगितली. एरवी गंभीर असणारे सर हसले. ‘अण्णा सुब्रमण्यन यांच्याबाबतीतल्या या अनुभवावरून तू एक धडा घे की, जीवनात काहीही घडू शकतं. शेरलॉक होम्सने म्हटलं होतं ना - सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतरही जे उरतं, ते अघटित असतं.’ त्यानंतर करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी लिहिलेलं आणि स्वतः स्वाक्षरी केलेलं १९४६ सालचं पुस्तक कपाटातून काढलं आणि ते मला देत म्हणाले, ‘एकेकाळी आमचं कुटुंब करवीर पीठाशी संबंधित होतं. ही प्रत जपून ठेव. एखाद्या दिवशी तुला उलगडा होईल.’
प्रवास खडतर होता. आध्यात्मिक आणि लौकिक, आधिभौतिक आणि भौतिक यांच्यामध्ये पिंजून गेलेल्या मला अगदी पहिली पायरी गाठण्यासाठीदेखील अनेक वर्षं संघर्ष करावा लागला. अनेक विधी आणि कर्मकांडं पार पाडत असताना असंख्य प्रसंग आले. शारीरिक पातळीवरील बंधनांचा मी बळी ठरलो आणि माझं मन मात्र त्या दिव्य प्रकाशापासून दूर दूर गेलं. दैवी अनुभव चित्तवेधक होता; परंतु जग कमी मोहक नव्हतं. मला अनेकदा वाटायचं -
वो सिजदा ही क्या, जिसमे एहसास रहे सर झुकाने का?
इबादत और बाकायदे होश, तौहीने इबादत हे!!
(जिथे भक्ताला भक्तीची जाणीव असते, त्या उपासनेचा उपयोग तरी काय?
उपासना आणि तिची जाणीव उपासनेचा अनादरच होय)
अण्णांनी गायत्री उपासनेची दीक्षा दिली; परंतु तिचं काय? दोन दशकांपेक्षा अधिक काळ तिने माझ्या स्वप्नात येऊन मला झपाटलेलं होतं. ती खरंच आहे का नाही, या प्रश्नाने मला भंडावून सोडलं होतं. कधी वाटायचं ती आपल्या जवळच आहे, तर कधी वाटायचं ती आपल्यापासून खूप दूर आहे. निराशेमध्ये कित्येकदा तिला शोधण्याचा खटाटोप सोडून द्यावा असं वाटलं. एक-दोन प्रसंगी मी तो नाद सोडलादेखील. पण, साधनेपासून दूर राहण्याचा पर्याय तर अनाथ मुलानं अंधाऱ्या एकाकी रस्त्यावरून चालण्यापेक्षाही वाईट होता. कोणती तरी शक्ती मला सतत मागे खेचत होती. काही काळ मदर तेरेसा यांनी माझा हात धरून ‘आत्म्याची काळी रात्र’ ही निराशेची नव्हे, तर प्रगतीची संधी असल्याचं स्पष्ट केलं. मी सोडून देऊ शकत नसलेली देवी एकीकडे आणि ज्याशिवाय माझा निभाव नव्हता असं लौकिक जग दुसरीकडे. या खेळात अनेक वर्षं गेली.
शेवटी चेन्नईजवळील कांचीपुरमच्या धुळीने माखलेल्या पठारावर मला ‘गुरूंचे गुरू’ सापडले आणि सेलमजवळच्या डोंगरमाथ्यावरच्या एका महाराजांनी मला देवीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवला. कांची पर्माचार्यांनी देवीच्या एका मूर्तीची स्वतः पूजा केली आणि मला ती दिली आणि डोंगरावरील त्या संतपुरुषाने देवीची आराधना कशी करायची ते शिकवलं. मला वाटलं, एवढ्या बळावर काही आठवड्यांत देवी प्रत्यक्ष दर्शन देईल. पण, पुढे काय वाढून ठेवलंय ते मला कळलं असतं, तर कदाचित मी वेगळा विचार केला असता. उपासनेची शिस्त जीवघेणी होती. कदाचित त्या शिस्तीच्या कठोरतेमुळेच मनात संशय रुजला.सिद्धांत स्पष्ट होता. ठरल्या वेळी उठणं, यथासांग विधी करणं, होमहवन करणं, जप करणं, उपवास करणं आणि तपस्या करणं. हे सगळं आधीच मांडलं गेलं होतं. असं सगळं नित्यनेमाने, श्रद्धेने आणि सचोटीने ठरावीक काळापर्यंत करत राहिलात, तर तुमच्या अंतरंगात आवश्यक ते बदल होऊन तुम्ही हळूहळू तिच्या अस्तित्वापर्यंत - जिथे अंधाराचा अंश नाही - पोहचाल अशी खात्री देण्यात आली होती. काळाच्या कसोटीवर टिकलेला हा मार्ग होता, त्यात चुकीला वाव नव्हता.
पण मानवी इच्छेपुढे दैवी शक्ती झुकू शकते किंवा तिने झुकावं ही कल्पना मला पटत नव्हती. देवत्व प्रकट करण्यासाठी किंवा त्याने भक्ताला आध्यात्मिक अनुभूती देण्यासाठी काही ठरावीक मंत्र असतात किंवा तसे असावेत, ही गोष्ट मला मानवण्यासारखी नव्हती. शेवटी एक दिवस मी कर्मकांडाचा मार्ग सोडून दिला. गैरसमज होऊ नये म्हणून सांगतो की, अहंकारापोटी मी तसं केलं नाही. परंतु, आईची अपार माया आणि गणिती सूत्रानुसार आध्यात्मिक अनुभव देण्याचं वचन देणारी उपासनेची पद्धत या गोष्टींचा मेळ बसू शकत नाही असं मला वाटलं - म्हणून सोडला.
पहाटे तीनला उठण्यापेक्षा हे कमी त्रासदायक असल्याने मी सगळ्या विधींची जबाबदारी घरच्या पुजाऱ्याकडे सोपवली आणि लहान मुलाप्रमाणे देवीकडे जाऊन तिच्याशी मोकळ्या गप्पा मारून मन हलकं करत पुढची वाटचाल करण्याचा मार्ग पत्करला. दरम्यान, कांची पर्माचार्यांनी दिलेल्या देवीची स्थापना आमच्या आवारातील मंदिरात झाली. याच सुमारास मी निवृत्त झालो. परिणामी, तिच्याशी मनसोक्त गप्पा मारण्यासाठी मोकळा झालो. एके दिवशी तिच्याशी बोलताना मी म्हटलं, ‘आम्ही थोडी बचत केली असली तरी आर.बी.आय.च्या पेन्शनवर वडिलोपार्जित घर सांभाळणं अवघड आहे.’’ बोललो आणि विसरलो. त्याच्या दोन दिवसांनंतर ‘टाटा केमिकल बोर्डा’चे सदस्य म्हणून सहभागी होण्याचं मला निमंत्रण मिळालं! नंतर अनेक निमंत्रणं आली आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर, आमच्या गरजेपेक्षा आम्हाला खूप खूप जास्त मिळालं, मिळत गेलं. काही काळाने मी तिला आणखी काहीतरी अडचण सांगितली आणि तीदेखील मिटली. असं पुन्हा पुन्हा घडलं. एक वेळ अशी आली की व्यक्तिगत अडचणीबद्दल बोलण्याची किंवा तिच्याकडून काही मागण्याची मला भीती वाटू लागली. कारण मी तिच्याकडे काही मागणं आणि त्याची पूर्तता होणं याच्यात एक कार्य-कारणभाव तयार झाला होता.
पण तेव्हाच मला कळून चुकलं की, एक दशकाहून जास्त काळ देवी माझ्याशी खेळत होती आणि मला माझ्या मूळ शोधापासून खूप दूर नेत होती. त्याहून वाईट गोष्ट म्हणजे, तिच्या या खेळात तिने मला मूर्ख बनवलं आणि मी भटकत गेलो. जे जे मागेन ते देवीने मला का दिलं, याचं उत्तर माझ्याकडे नाही. असं का घडावं याचं काहीच कारण दिसत नाही. मी एक सर्वसामान्य माणूस आहे. हे अघटित कसं घडलं, हे माझ्या कळण्याच्या पलीकडचं आहे. माझ्यात असा कोणताही वेगळा गुण नाही, बिलकूल नाही. जी अशा घटनेचं स्पष्टीकरण देऊ शकेल, तिची प्रार्थना करणारे हजारो आहेत; मग मलाच का निवडलं गेलं, याचं कसलंही स्पष्टीकरण माझ्याकडे नाही. हिंदू धर्मात याला ‘लीला’ अर्थात दैवी खेळ म्हणतात; ख्रिश्चन याला आपली योग्यता नसताना देवाकडून उत्स्फूर्तपणे मिळालेली देणगी म्हणतात आणि सूफी तिला ‘बरका’ - जी आपल्याला गुण नसताना लाभते - म्हणतात. तर, अशी आहे ही कथा. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की, ही एक साधी कथा आहे - खरं तर, एक वैयक्तिक कहाणी.. तिच्यात काही तर्कसंगती नाही, तिच्यात काही नाट्यदेखील नाही. मात्र एक आहे, ते सगळं प्रत्यक्ष घडलंय. बस्स. तुम्ही यावर विश्वास ठेवलाच पाहिजे असं काही नाही.
(सदराचे लेखक ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ, तसंच अर्थशास्त्र-इतिहास-राजकीय घडामोडी या विषयांचे अभ्यासक-संशोधक आहेत.)
अनुवाद : डॉ. रघुनाथ कडाकणे
(raghunathkadakane@gmail.com)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.