झाडाखाली ध्यानस्थ बसला तो सिद्धार्थ होता आणि ज्यानं डोळे उघडले ते बुद्ध होते. सिद्धार्थ अंधारात बसला; बुद्ध प्रकाशात जागे झाले. इतिहास सांगतो, शारीरिकदृष्ट्या भानावर असले तरी बुद्ध आतल्या आनंदाच्या समुद्रात पार बुडून गेले होते आणि अनंत काळ तिथं राहण्यासाठी मुक्त होते; पण तसं घडायचं नव्हतं.
काल रात्री तो राजवाड्यातून बाहेर पडला. एकही शब्द न बोलता. मागं वळून न पाहता. कदाचित् त्याला वाटलं असणार की अंधारात प्रकाश शोधण्यासाठी त्याला इच्छा, भीती, भ्रम आणि विरोधाभास यांचं जंगल पार करावं लागेल.
यासाठीच तो महालातून बाहेर पडला का? दंतकथा अशी आहे की, कधीतरी मध्यरात्री त्यानं आपल्या निद्रिस्त कुटुंबाचा मूक निरोप घेतला आणि राजवाड्यातून तो हळूच बाहेर पडला. त्याच्या मनात भीती होती की, जर ते झोपेतून जागे झाले तर त्यांना सोडून तो जाऊ शकणार नाही. ते काहीही असो, तो निघून गेला ही वस्तुस्थिती आहे.
तो पूर्वेच्या दिशेनं निघाला - सारथी चन्नासोबत. अनोमा नदीच्या काठावर थांबला. अंगावरची राजवस्त्रं उतरवली, फाटक्या चिंध्या गुंडाळल्या आणि सारथ्याला म्हणाला : ‘‘इथून पुढं मला एकट्यालाच जायला हवं.’’ आणि, तो गेला.
तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याच्यासाठी सूर्य उगवला; मात्र, यशोधरेसाठी रात्र संपलीच नाही. चन्ना राजवाड्यात परतल्यानंतर, राजपुत्रानं काढून दिलेली राजवस्त्रं त्यानं तिच्या हातात दिली तेव्हा काय झालं माहीत नाही. दुःखाच्या ओझ्याखाली ती दबली गेली का?
आपण अचानक त्यागल्या गेलोय या भावनेनं ती कोसळली का? तिच्या डोळ्यांतले अश्रू रात्री जन्मलेल्या बाळासाठी होते की आयुष्यभर साथसोबत केल्यानंतरदेखील राजमहालाचा त्याग करताना पतीनं आपल्याला ‘सोबत चल’ म्हटलं नाही म्हणून होते?
तिचा विलाप आणि तुटणाऱ्या काळजाचा आवाज शब्दांत टिपताना राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त लिहितात:
सखि, वे मुझ से कहकर जाते
कह, तो क्या मुझ को वे अपनी
पथ-बाधा ही पाते?
मुझ को बहुत उन्हों ने माना
फिर भी क्या पूरा पहचाना?
सखि, वे मुझ से कहकर जाते।
इकडे तो स्वतःशी झुंजत होता आणि तिकडे ती आपल्या दु:खाशी. सहा वर्ष तो झुंजत राहिला. त्या काळात सगळ्या आध्यात्मिक पद्धती आणि तपस्यांचं त्यानं आचरण केलं...पण व्यर्थ.
शेवटी निराश होऊन गयानगरीजवळ एका बोधिवृक्षाखाली तो ध्यानस्थ बसला आणि आता प्राण तरी जाईल किंवा दुःखाच्या पलीकडे जाण्याचा मार्ग तरी मी शोधून काढीन असा दृढनिश्चय त्यानं केला. असं म्हणतात की, ध्यानस्थ झाल्यानंतर तो अशा एका खोल अवस्थेपर्यंत पोहोचला जिथं इंद्रियांची दारं बंद होतात आणि आतली एकाग्रता अखंडपणे वाहत राहते.
नेमकं तेव्हाच ‘प्रलोभन’ आणि स्वार्थी भावनांचं मूर्तरूप - जे जीवाला नश्वर शरीराशी बांधून ठेवतं - असलेल्या ‘मार’ यानं वासना, भय, क्रोध, शंका, आसक्ती आणि कीर्तीच्या लालसेचं सैन्य त्याला त्याच्या मार्गापासून परावृत्त करण्यासाठी पाठवलं; पण तो अचल राहिला... भूकंपानं न डगमगणाऱ्या पर्वताप्रमाणे. आणि, आपला आंतरिक प्रवास त्यानं सुरूच ठेवला.
शाश्वत आणि अशाश्वत यांना भेदणाऱ्या सीमेवर तो जेव्हा पोहोचला तेव्हा त्या गहन शांततेत - जिथं विचार थांबतात, जिथं सारे भेद आणि द्वैतं नाहीशी होतात - तो हरवून गेला. त्या अवस्थेत तो रात्रभर तल्लीन राहिला आणि ‘मार’ तात्पुरता पराभव पत्करून मागं फिरला.
उत्कटतेच्या लहरींवर विहरत असताना संसाराच्या आणि दुःखाच्या जंजाळात अडकून पडलेल्या जीवांची अंधूक आठवण त्यांच्या चित्तात उमटली. त्यांना उमगलं की अत्युच्च अनुभवाचा वैयक्तिक पल्ला त्यांनी गाठलाय; पण मुक्तीच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी इतरांना साह्य करण्याचं ध्येय अजून गाठलेलं नाही.
आणि त्याच क्षणी ‘मार’ आपली शेवटची चाल खेळत बुद्धांना म्हणाला : ‘तू निर्वाणापर्यंत पोहोचलास आणि तुला दिव्य दृष्टी प्राप्त झाली हे कबूल...परंतू संसाराच्या कचाट्यात अडकलेल्यांना ते दिसू शकणार नाही. कारण, त्यांचे डोळे धुळीने झाकोळले गेले आहेत. त्यांना फक्त सुख, सत्ता आणि स्वार्थ यांचीच लालसा आहे. म्हणून, सत्य हेच आहे की, तू जरी मागं फिरून त्यांच्याकडे गेलास तरी तुझं कुणीही ऐकणार नाही.’
असं म्हणतात की, बराच काळ बुद्धांनी शांतपणे आपल्या ध्येयाच्या अशक्यतेचा विचार केला. त्यांच्या लक्षात आलं की ‘प्रेम प्रेमाला जन्म देतं.’ आणि ‘हिंसेनं हिंसा वाढते’ असं ते सांगू लागले तर कुणी त्यांचं ऐकणार नाही.
सत्याला आपल्या जीवनाचा आधार बनवण्यासाठी आवश्यक तो त्याग करण्यास कितीजण तयार होतील? कार्य कठीण होतं. मार्ग स्वप्नभंगानं आणि अपयशानं भरलेला होता; पण अशक्य नव्हता. अशक्य ते शक्य करण्यासाठी आणि त्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावण्यासाठी ते तयार झाले. आणि, ‘मारा’ला कमालीच्या कोमल स्वरात म्हणाले : ‘मान्य आहे, सर्वांच्या डोळ्यांत
धूळ भरलीय; परंतु काहींच्या डोळ्यांत मात्र तिचा थर विरळ आहे. बाकी काही असो, प्रत्येकाला आपल्या दुःखाचा अंत हा हवाच असतो. जे ऐकतील त्यांना मी ‘धर्म’ शिकवीन. आणि, जे अनुसरण करतील ते मुक्त होतील. शेवटी ‘मार’ झुकला आणि निघून गेला.
बुद्धांचं समाजात परत येणं हा एक निर्णायक क्षण होता. अशा एका दुर्मिळ घटनांपैकी ती एक घटना होती, जेव्हा दैवी शक्ती नश्वर जगात प्रवेश करते आणि त्याचं रूपच पालटून टाकते. बुद्धांच्या व्यक्तिमत्त्वाच्या तेजानं दिपून लोक त्यांच्याभोवती जमू लागले आणि ते कुणी देव किंवा देवदूत आहेत का, असं विचारू लागले. त्यांचं उत्तर एकच होतं: ‘मी देवही नाही; देवदूतही नाही. मी जागा आहे...मी सजग आहे.’
यशोधरेनं सात वर्षं वाट पाहिली. एके दिवशी ते परतले. परंपरेनुसार एखादा माणूस संसाराचा त्याग करतो तेव्हा त्याचा भूतकाळ नाहीसा होतो आणि तो माणूस एक नवीनच व्यक्ती बनतो. मग पुन्हा तो आपल्या घरी परतत नाही; पण बुद्ध परतले. परतीची आशा नसतानादेखील सात वर्षं यशोधरा वाट पाहत राहिली होती. दरम्यान, तिच्या कुशीतला लहानगा राहुल मोठा झाला होता.
एके दिवशी दासी धावत आल्या : ‘एक जागृत पुरुष आपल्या अनुयायांसह कपिलवस्तूला येत आहे. तो ज्या तऱ्हेनं धर्म शिकवतो तसा कुणीही यापूर्वी शिकवलेला नाही आणि काहीजण तर म्हणतात की, तो दुसरा कुणीही नसून पूर्वाश्रमीचा सिद्धार्थच आहे.’
दुसऱ्या दिवशी सकाळी रस्त्यावरच्या गोंधळानं यशोधरा जागी झाली. गच्चीतून तिच्या दासींनी केशरी रंगातील अनुयायांच्या जथ्याच्या अग्रभागी असलेल्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाकडे बोट दाखवलं आणि त्याचा आशीर्वाद घेण्याची विनंती केली. तिनं नकार दिला आणि बुद्धांकडे बोट दाखवत ती आपला मुलगा राहुल याला म्हणाली : ‘ते तुझे वडील आहेत...जा, आणि त्यांच्याकडे तुझा वारसाहक्क माग.’
आख्यायिका अशी आहे की, जेव्हा राहुलनं तसं केलं तेव्हा बुद्धांनी राहुलला वरती उचललं, त्याचे भरजरी कपडे काढून भिक्षूचे कपडे त्याला नेसवले. आणि, अशा रीतीनं राहुल हा बुद्धांच्या शिष्यांमध्ये समाविष्ट होण्याची परवानगी मिळालेला पहिला आणि एकमेव मुलगा ठरला.
दरम्यान, यशोधरेनं परत जावं म्हणून तिच्यावर दबाव आणला गेला. कारण, बुद्धांनी संसाराचा त्याग केल्यानंतर ते आपल्या पूर्वायुष्यात जाऊ शकत नव्हते...पण तिनं नकार दिला.
परंपरा काय आहे माहीत नाही,’ ती उद्गारली : ‘पण माझ्या प्रेमाला काही मोल असेल तर तेच माझ्याकडे येतील.’ असं ती बोलत असतानाच तिच्या दालनाकडे येणाऱ्या पायऱ्यांवर पावलांचा आवाज झाला. राजा शुद्धोदन आणि त्यांच्या मागून बुद्ध दारात उभे ठाकले. यशोधरा गुडघ्यांवर वाकली.
‘तू निघून गेल्यापासून तिनंही सगळ्या गोष्टींचा त्याग केला आहे,’ असं शुद्धोदन राजानं बुद्धांना सांगितलं बुद्धांनी यशोधरेला उठवलं आणि तिच्या डोळ्यांत बघत ते म्हणाले : ‘मी तुला ‘मार्ग’ दाखवीन आणि तुझं प्रेम एक दिवस सबंध जगाला आपल्या कवेत घेईल.’
यामुळे प्रोत्साहित होऊन, यशोधरा आणि प्रजापती - बुद्धांची मानलेली माता - आणि राजवाड्यातील इतर अनेक स्त्रियांना, सेवक आनंद याच्यामार्फत, त्यांच्या समुदायात समाविष्ट होण्यासाठी परवानगी मागण्यात आली. बुद्धांनी दोनदा नकार दिला.
यशोधरा आणि प्रजापतीसाठी हे पुरेसं नव्हतं. त्यांनी जीवनातील वरवरचं समाधान पाहिलं होतं आणि निर्वाणाच्या ध्येयासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करण्याची त्यांची इच्छा होती; त्यांनी मुंडण केलं आणि राजवाड्यापासून असंख्य मैल चालत, जिथं बुद्धांचा तळ होता तिथं, त्या पोहोचल्या आणि बुद्धांचे सेवक आनंद याला भेटल्या. त्यानं त्यांची भक्ती जाणली आणि बुद्धांना विचारलं : ‘निर्वाण फक्त पुरुषांसाठीच आहे का? मोहपाश तोडण्याची आणि स्वतःच्या पलीकडे जाण्याची क्षमता फक्त पुरुषांतच असते का?’
शिष्याला काय म्हणायचंय ते गुरूंनी ओळखलं आणि ते म्हणाले : ‘कुणी माझ्या मार्गावर चालण्याची इच्छा बाळगत असेल तर त्या व्यक्तीचा मार्ग रोखणं चुकीचं आहे. प्रत्येकाला आपलं ध्येय गाठण्यासाठी मुभा असली पाहिजे.’
आणि, अशा रीतीनं बुद्धसंप्रदायातील पहिल्या भिक्षुणी म्हणून त्यांना दीक्षा दिली गेली आणि संघाच्या त्या दोन शाखा मिळून जगातला पहिला मठसमुदाय बनला. असं मानलं जातं की, बुद्धांची माता प्रजापतीदेखील प्रबुद्ध झाली आणि यशोधरा तिच्या शहाणिवेबद्दल ओळखली जाऊ लागली आणि तिनं अरिहंतत्व प्राप्त केलं.
ताक
जन्मानं हिंदू नसतो तर मी बौद्ध धर्म स्वीकारला असता. खरं तर, एकाग्रतेसाठी आणि शांततेसाठी काही काळ मी ‘झेन’ या जपानी प्रकाराच्या नियमांचं पालन केलंय. बुद्धांनी जे शिकवलं त्यातलं मला भावलं ते कमालीचं साधेपण.
दैवी कृपेचं वचन देणाऱ्या कर्मकांडाच्या आणि मध्यस्थांच्या युगात, बुद्धांनी सांगितलं की, दुसऱ्याच्या वेदना जाणण्याची क्षमता हाच परिपूर्णतेचा मार्ग आहे. आणि मुक्ती ही तपस्येत वा आत्मनाशात नसून संपूर्ण अंत:करणापासून इतरांपर्यंत पोहोचण्यात ती आहे.
सुरुवातीला मला बुद्धांचा राग यायचा. यशोधरेला एवढ्या वेदना देणारा माणूस नायक कसा काय होऊ शकतो? माझ्या मनात असा आंतर्विरोध निर्माण झाला होता की, माणसाच्या दु:खाचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्या बुद्धांना आदर्श मानलं जातं ते स्वतःच्याच घरात इतक्या क्लेशाला जन्म कसा देऊ शकतात?
समतोल साधून ते सगळ्या गोष्टी वेगळ्या रीतीनं हाताळू शकले नसते का? माझ्या भावना यशोधरेच्या बाजूच्या असल्यामुळे मी बुद्धांना दूर लोटलं होतं. ते तिला का बरं सांगू शकले नसतील?
आणि म्हणून, मैथिलीशरण यांच्या ओळी माझ्या मनावर नेहमीच गारुड करत राहतील...
सखि, वे मुझ से कहकर जाते
कह, तो क्या मुझ को वे अपनी पथ-बाधा ही पाते?
सखि, वे मुझ से कहकर जाते।
पण शेवटी यशोधरेनंच स्वतःच्या बाजूनं बोलायला हवं. याबाबतीत बौद्ध साहित्य काही बोलत नाही; पण माझा असा विश्वास आहे की, परंपरा मोडून बुद्धांनी तिला भेटण्यासाठी येणं आणि तिचा मठात समावेश होणं यात एक संकेत आहे – दुःखाचं उदात्तीकरण नव्हे तर, त्यांचा जीवनसंदेश आत्मसात करणं, जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या सुख-दु:खाचा मनस्वी स्वीकार करणं, आणि त्या दोहोंपासून समान अंतरावरच्या बिंदूपर्यंत पोहोचणं, जिथं सारं विश्व अगाध अशा शांततेत विरघळून जातं.
गम और ख़ुशी में फर्क ना महसूस हो जहा,
मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया...
अनुवाद: डॉ. रघुनाथ कडाकणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.