मानाचा मुजरा...मनापासून

राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्तानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी शंभर व्याख्यानांचा उपक्रम हा त्याचाच भाग होता.
rajshri shahu maharaj
rajshri shahu maharajSakal
Updated on
Summary

राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्तानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी शंभर व्याख्यानांचा उपक्रम हा त्याचाच भाग होता.

राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्तानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी शंभर व्याख्यानांचा उपक्रम हा त्याचाच भाग होता. ‘छत्रपती शिवाजी विद्यापीठा’त शाहूमहाराजांवर व्याख्यान देऊन मी घरी आलो आणि पाहतो तर आमचे आजोबा आणि शाहूमहाराज दिवाणखान्यात बोलत बसलेले. ते समकालीन होते आणि एकमेकांना चांगले ओळखत होते; पण महाराजांनी आमच्या घरी येऊन गप्पा मारत बसणं हे अविश्वसनीय होतं.

इतक्यात महाराज माझ्याकडं पाहून हसले आणि म्हणाले : ‘ये. बस.’

काय करावं सुचत नसल्यानं मी बसलो; पण मी झोपेत आहे, जागा आहे की माझं भानच हरपलंय असा मला प्रश्न पडला होता.

आजोबांना उद्देशून महाराज म्हणाले : ‘पाटीलसाहेब, तुमच्या नातवाच्या भाषणाला आम्ही हजर होतो. आमच्या जीवनाचा त्यानं जो पट उलगडला तो योग्य वाटतो तुम्हाला?’

‘योग्यच आहे, महाराज,’ आजोबा उत्तरले : ‘नाहीतर उलगडा करणार तरी कसा? एक युवक सरदार घराण्यात जन्माला येतो, कोल्हापूर संस्थानच्या गादीवर बसतो आणि सारा राजेशाही थाटमाट-ऐशोआराम बाजूला सारून गोरगरीब जनतेचं दुःख नाहीसं करण्यासाठी स्वतःला झोकून देतो याचा अर्थ कसा लावायचा? यशवंतचं म्हणणं आहे की, वंशपरंपरागत स्वभाव, कौटुंबिक जडणघडण आणि स्टीवर्ट फ्रेजर यांच्याकडून मिळालेलं प्रशिक्षण अशा गोष्टींच्या आधारे केलेलं स्पष्टीकरण आपल्या कार्यामागच्या समर्पणाची पूर्णपणे उकल करू शकत नाही. वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर पसरलेला भेदाभेद, विषमता आणि शोषण यांच्या विरोधात आपण जो लढा दिला त्याचं स्पष्टीकरण या रीतीनं करता येत नाही. हो ना भैया?’

‘हो,’’ मी म्हणालो.

‘ते ठीक आहे,’’ छत्रपती म्हणाले : ‘पण आमच्या बाबतीतला हा प्रश्न तुम्हाला का बरं पडला?’

मी सावधपणे शब्द जुळवत म्हटलं : ‘महाराज, हे आपल्याला आवडणार नाही कदाचित; पण खरं म्हणजे आजोबा म्हणाले तसं मला ते ‘कारण’ जाणून घ्यायचं होतं. इतर राजांप्रमाणे दरबारी सोपस्कार आणि फावल्या वेळात शिकार वगैरे करण्यात वेळ घालवायचा सोडून आपण ‘ॲक्टिव्हिस्ट’ कसे झालात?’

‘काय म्हणालास?’ महाराजांनी विचारलं.

समाजातील अनिष्ट गोष्टींना विरोध करणारे आपण पहिलेच राजे नव्हतात. आपल्या आधी तसे पुष्कळ होऊन गेलेत. सम्राट अशोक, पर्शियाचा सायरस, रोमचा राजा मार्कस ऑरिलियस, जपानचा मेजी, ओटमन साम्राज्याचा पहिला सुलेमान...असे अनेक राजे आपल्या प्रजेशी घट्ट जोडले गेलेले होते; पण आपण सागरात मीठ विरघळून एक होऊन जावं तसे जनतेशी एकरूप झालेले राजे होतात. त्यामुळे अद्वितीय ठरलात.’’

‘ही अतिशयोक्ती वाटतेय,’’ महाराज म्हणाले.

‘नाही, महाराज. तोंडपूजा करणं हे आमच्या घराण्याच्या रक्तात नाहीय. आपल्यातील मानवी गुणांमुळे आपण वेगळे ठरता असं नव्हे; तसे गुण इतर अनेकांमध्ये होते; पण ज्या रीतीनं, ज्या प्रमाणात आणि ज्या निष्ठेनं आपण मानवतेच्या मर्यादा रुंदावल्या तसं पूर्वी झालं नव्हतं. राजा आणि जनता यांच्यामधली भेदरेषाच आपण पुसून टाकली.’

‘शब्द छान आहेत,’’ महाराज म्हणाले : ‘‘पण, तू हे कशाच्या आधारावर बोलतोस?’

‘मी म्हणत नाही, महाराज. आपले समकालीन असणारे माझे आजोबा म्हणतात. ‘माझ्या आठवणी’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलंय की, लहान मुलं, प्रेमानं आणि आपुलकीनं आपल्याला ‘बाबा’ म्हणायची. मुलांनी निरागसपणे आपल्याला ‘बाबा’ म्हणून हाक मारणं यापेक्षा निर्मळ स्तुती काय असू शकते?’

ते हसले. त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसली.

‘महाराज, आपल्याला समजून घेणं सोपं नाही. अनेक वाटांनी आपण जी वाटचाल केली ती भल्याभल्यांना जमली नाही. शिक्षण, दलितमुक्ती, बहुजनांचा उद्धार, स्त्रीशिक्षण...म्हणून आजचे अभ्यासक सरधोपट पद्धतीनं आपल्या कामाची नुसती जंत्री करण्याचा खटाटोप करतात. आपल्या योगदानाचं परिपूर्ण आकलन करण्याची जोखीम ते घेत नाहीत.’

‘तुझं म्हणणं कितपत बरोबर आहे मला सांगता येणार नाही; पण माझ्या कामाची जर ते गणती करत असतील तर त्यात गैर काय?’ महाराज म्हणाले. ‘त्यात गैर असं काही नाही महाराज. परीक्षेतली उत्तरं लिहिण्यासाठी त्याचा उपयोग होईल; पण आपल्या कार्यामागचा उद्देश आणि हेतू समजून घ्यायला त्याचा वापर करता येत नाही.’

‘यशवंत, तू मनोवैज्ञानिक विश्लेषणपद्धतीवर जास्तच भर देत आहेस

असं नाही वाटत का तुला? मी एक साधा माणूस होतो. त्या काळच्या सरदार घराण्यात जन्मलो-वाढलो. जशी दिशा मिळत गेली तशी वाटचाल करत गेलो इतकंच.’

‘क्षमा असावी, महाराज. आपण आपल्या कार्याविषयी केलेलं हे विधान चुकीचं आहे. आपण साचेबद्ध अशा सरदार घराण्याचे फलित नव्हतात. तसं असतं तर आपला आणि खालच्या जातीत जन्मलेल्या सर्वांचा जीवनप्रवास फार निराळा असता,’’ मी म्हणालो.

‘आम्ही इतरांपेक्षा वेगळे कुणीतरी होतो की नाही हे माहीत नाही, यशवंतराव... पण एवढं मात्र खरं की, लहानपणापासूनच आजूबाजूच्या वातावरणाच्या बाबतीत आम्ही संवेदनशील होतो.

वाढत्या वयाबरोबर आम्हाला कळून चुकलं की, इथली सामाजिक आणि राजकीय व्यवस्था मुळात विषमतेवर आधारलेली आहे. एका पातळीवर आम्ही छत्रपती होतो; सत्ता-संपत्तीचं वलय आमच्या भोवती होतं; पण दुसऱ्या पातळीवरती मात्र एकीकडे ब्रिटिशांनी आणि दुसरीकडे समाजातील संकुचित वृत्तीच्या लोकांनी तयार केलेल्या रूढी-परंपरांनी वेढले गेलो होतो. एकदा शिकारीवरून परतत असताना आमच्या ध्यानात आलं की, भलेही आपण छत्रपती असलो तरी आपल्या जनतेपैकी बहुतांश लोक गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, मजूर, मेंढपाळ आहेत. संस्थानाच्या राज्य कारभाराविषयी आपलं मत मांडायचं तर त्यांना काही वावच नाही. विचार करत गेलो तितकी एक गोष्ट स्पष्ट होत गेली...

त्या काळी विषमता समाजात सगळीकडे पसरलेली होती. जन्माच्या आधारावर माणसं वेगवेगळ्या जातींत विभागली गेलेली होती. उत्पन्नाच्या आधारावर गरीब आणि श्रीमंत अशी दरी निर्माण झालेली होती. समाजाच्या प्रवाहात काहीजण सामावलेले होते, तर काही त्यापासून दूर फेकले गेले होते. लिंगाच्या आधारावर स्त्री आणि पुरुष असा भेद केला जात होता. सर्व अधिकार पुरुषांना होते; स्त्रियांना मात्र कोणतेही अधिकार नव्हते. माझ्या गुरूंना याबद्दल विचारलं तर ते म्हणाले, ‘देवानं सर्वांना समान म्हणूनच जन्माला घातलेलं असतं.’ मात्र, डोळ्यांसमोर जे दिसत होतं ते विषमतेनं भरलेलं वास्तव होतं. यामुळे आम्ही अस्वस्थ होतो. यावर उपाय काय, हे सुचत नव्हतं; पण हे पुढं चालू राहता कामा नये असं आम्ही ठरवलं’’

मधेच मी म्हणालो : ‘‘क्षमा करा महाराज...पण आपण स्नान करत असताना दरबारी पुजाऱ्यानं क्षत्रियांसाठी असणारे वैदिक पद्धतीचे विधी करण्याऐवजी शूद्रांसाठीचे पुराणोक्त पद्धतीचे विधी करून फसवण्याचा प्रयत्न केला तेव्हाच आपल्याला ‘बहुजनांच्या मुक्तीचा मार्ग’ दिसला का? तत्कालीन समाजातील विषमता आणि पिळवणूक, आपली संवेदनशील वृत्ती, प्रशिक्षकाकडून मिळालेला वैचारिक ढाचा या सगळ्या गोष्टी म्हणजे पुढं होऊ घातलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या यज्ञासाठीच्या समिधा होत्या. आपल्यावर गुदरलेल्या कटू प्रसंगामुळे त्या प्रज्ज्वलित झाल्या आणि संस्थानातील मूक, असहाय जनतेचा आपण हयातभर कैवार घेतला...’’

‘असेल,’’ ते म्हणाले.

‘महाराज, मी हे सहज म्हणायचं म्हणून म्हणत नाहीय. त्याला ऐतिहासिक पुरावे आहेत. सभोवतीच्या परिस्थितीनं अस्वस्थ झालेल्या काही संवेदनशील आणि कनवाळू व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या एखाद्या कटू प्रसंगाला त्यांनी दिलेल्या व्यापक प्रतिक्रियांतून मोठी सामाजिक उलथापालथ झालेली आहे. उदाहरणार्थ : दक्षिण आफ्रिकेत असताना रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून गांधीजींना फलाटावर खाली ढकलून देणं... ॲटलांटामध्ये मार्टिन ल्यूथर किंग यांचा बसप्रवास...क्रीमियामधल्या दवाखान्यात दक्षतापूर्वक एकटीनं सेवा करणाऱ्या फ्लोरेन्स नाईंटिंगेल...हे सगळे प्रसंग जीवनाला कलाटणी देणारे ठरले, त्यांनी इतिहासावर आपला ठसा उमटवला.’

‘हो,’’ महाराज म्हणाले : ‘ते वेदोक्तप्रकरण फार वेदनादायी होतं यात शंका नाही,’ असं म्हणून ते थांबले...

‘आपल्याला काय म्हणायचं आहे ते मी बोलू का, महाराज? कुणाही व्यक्तीवर राग न काढता आपण आपलं वैयक्तिक दुःख सर्व शोषितांच्या आणि वंचितांच्या दुःखात विलीन करून टाकलं,’ महाराजांनी नजर रोखून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले : ‘तू तुझ्या आजोबांसारखाच आहेस. तू म्हणतोस तसं वास्तवात असायला हवं होतं.’

मी माझा मुद्दा सोडायला तयार नव्हतो.

‘थोरांना आपल्या थोरपणाची जाणीव नसते, महाराज,’ असं मी म्हणाल्यावर ते हसले आणि ‘‘निघायला हवं’ म्हणून उठले.

‘एक शेवटचं विचारू, महाराज?’ त्यांनी मान डोलवली.

‘आपण जे काही साध्य केलं त्यात सर्वात समाधान देणारी आणि स्वतःचा अभिमान वाटणारी गोष्ट कोणती?’

ते क्षणभर विचारात पडले आणि म्हणाले : ‘तसं पाहिलं तर केलेलं प्रत्येक कार्य समाधान देणारं होतं...एकच एक सांगणं कठीण आहे...आणि मग आपलंच म्हणणं खोडत ते नि:संकोचपणे आणि प्रांजळपणे म्हणाले : ‘समाजातील उपेक्षित, शोषित आणि वंचित घटकांसाठी जे काही थोडंफार करू शकलो त्यातच आयुष्याचं सार्थक झालं असं वाटतं.’

मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो...भारावलेपणानं, आदरानं.

दोन दशकांपूर्वी एका व्याख्यानासाठी मला इंग्लंडच्या रीडिंग विद्यापीठानं बोलावलं होतं. ‘सकारात्मक कृती-कार्यक्रम आणि त्याचा भारतीय जातिव्यवस्थेवरील प्रभाव’ असा विषय होता. व्याख्यानाच्या आदल्या रात्री जेवण झाल्यावर मी काढलेल्या नोंदी चाळत होतो. तेव्हा माझी थोरली मुलगी आभा जवळ येऊन बसली. केम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण पूर्ण करून ती नुकतीच परतली होती.

‘लेक्चरची तयारी कुठवर आलीय?’ तिनं विचारलं.

‘चाललीय,’ मी म्हटलं : ‘मी अशी मांडणी करणार आहे की, जात हा भारतीय समाजाला लागलेला एक कलंक आहे आणि समाजाची मानसिकता बदलण्यासाठी चळवळ उभी करण्याची गरज आहे.’

नंतर इतर बऱ्याच गोष्टींवर आम्ही बोललो.

अचानकपणे तिनं विचारलं : ‘बाबा, मी एका दलित मुलाशी लग्न केलं तर तुम्हाला चालेल का?’

काळ थबकला.

‘हे बघ, बाळ. तू मला ओळखतेस ना? कर. जरूर कर. माझी हरकत असणार नाही. तुझं सुख महत्त्वाचं. जातबीत सगळं भंपक आहे...’ असं सगळं मला तिला सांगायचं होतं; पण माझ्या तोंडून अवाक्षरही बाहेर पडलं नाही. ते शब्द घशातल्या घशातच अडकून राहिले. हे माझं तेव्हाचं वास्तव होतं. आपल्यापैकी पुष्कळ लोकांचं आजसुद्धा हेच वास्तव आहे.

मात्र, शाहूमहाराजांचं तसं नव्हतं. मी ज्या गोष्टींमुळे अडखळलो त्याच गोष्टींनी महाराजांना प्रवृत्त केलं. कार्ल मार्क्सप्रमाणं महाराजही या निष्कर्षाला पोहोचले होते की, आजवर विचारवंतांनी समाजाला समजून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी मुद्दा समाजाला समजून घेण्याचा नाही...समाज बदलण्याचा आहे. म्हणून महाराजांनी सामाजिक आणि कायदेविषयक सुधारणांच्या दिशेनं निष्ठापूर्वक पहिलं पाऊल उचललं.

अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या आपल्या राजवटीत शाहूमहाराजांनी सामाजिक आणि कायदेविषयक मूलभूत सुधारणा केल्या. त्या सुधारणांचा वंचितांच्या आणि शोषितांच्या जीवनावर दूरगामी परिणाम झाला. जातिभेद कमी करण्यासाठी, अस्पृश्यतानिवारणासाठी आणि सर्वसामान्य बहुजनांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या उपाययोजना खुद्द त्यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक जोमानं कार्यान्वित झाल्या. समाजपरिवर्तनाची ही धुरा त्यांनी जोतिबा फुले यांच्याकडून घेतली आणि पुढं ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सोपवली. या प्रक्रियेत दबलेल्या अनेक सामाजिक शक्तींना त्यांनी मुक्त केलं, ज्या त्यांच्या संस्थानाच्या सीमा ओलांडून, देशाच्या संसदेच्या पवित्र परिसरात जाऊन पोहोचल्या.

थोरा-मोठ्यांना जेव्हा सर्वसामान्य लोकांच्या हृदयात स्थान मिळतं तेव्हा ते देशाच्या धमन्यांतून वाहणाऱ्या रक्ताशी एकजीव होऊन जातात. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या बाबतीतली कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या भेटीची ती सुप्रसिद्ध दंतकथा सांगितली जाते. त्या स्त्रीला पाहून महाराज म्हणाले की, त्यांना आपल्या मातुःश्रींची आठवण झाली. तेव्हा ती तरुण स्त्री उत्तरादाखल असं म्हणाली म्हणे :

बडी मुश्किल से हम समझे,

हमे वो क्या समझते है

जो अच्छे है,

वो हर इन्सान को अच्छा ही समझते है

शाहूमहाराजांनादेखील या ओळी तंतोतंत लागू होतात. कारण, त्यांनी आपल्या कार्यातून हे दाखवून दिलं की, राजेशाहीपेक्षा मानवता महान असते.

(अनुवाद : डॉ. रघुनाथ कडाकणे)

raghunathkadakane@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()