काही वाटा, काही वळणं

ही गोष्ट सांगावी की नको, मला कळत नाहीय. बाप आणि लेक या दोघांमधला हा खासगी संवाद आहे. तो माझा मित्र होता आणि त्याची मुलगी ऑक्सफर्डमध्ये प्राध्यापक होती.
Village School
Village SchoolSakal
Updated on
Summary

ही गोष्ट सांगावी की नको, मला कळत नाहीय. बाप आणि लेक या दोघांमधला हा खासगी संवाद आहे. तो माझा मित्र होता आणि त्याची मुलगी ऑक्सफर्डमध्ये प्राध्यापक होती.

ही गोष्ट सांगावी की नको, मला कळत नाहीय. बाप आणि लेक या दोघांमधला हा खासगी संवाद आहे. तो माझा मित्र होता आणि त्याची मुलगी ऑक्सफर्डमध्ये प्राध्यापक होती. दोघांच्या परस्परविरोधी विचारांमुळे त्यांच्या आयुष्यात मोठं धर्मसंकट निर्माण झालं होतं आणि मध्यस्थी करून मी त्यातून मार्ग काढावा असा त्यांचा आग्रह होता. मी नकार दिला. मीही मानवी दोषांनी युक्त असल्यानं मी मूल्यमापन करायला जात नाही. म्हणून फक्त घडलेली हकीकत सांगतो. त्यावर तुम्हाला तुमचं ‘मत’ बनवायचं असेल तर बनवू शकता.

आम्ही शाळेत एकत्र होतो. तो राजस्थानच्या ठाकूर कुटुंबातला. त्याचा त्याच्या भागात दबदबा होता आणि जमीनदार घराण्याची ‘हवा’ डोक्यात; परंतु ‘मेयो कॉलेज’नं आमच्यासारखंच त्यालाही ‘जमिनी’वर आणलं. विद्यार्थी म्हणून तो सुमार होता; पण उत्कृष्ट वादविवादपटू आणि विश्वासू मित्र. शाळा संपली आणि आमचे मार्ग वेगळे झाले.

सुरुवातीला तो घरची शेती कसू लागला. नंतर तो राजकारणात शिरला आणि काम करत पक्षात वरच्या पदावर पोहोचला. मी रिझर्व्ह बँकेत रुजू झालो आणि त्याच्याप्रमाणेच वरच्या पदांवर जात राहिलो.अधूनमधून भेटायचो. एकमेकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो आणि सुरुवातीला नियमितपणे परस्परांना नव्या वर्षाच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा द्यायचो. मुलं मोठी झाली आणि आपापल्या मार्गानं पुढं गेली. माझ्या मुली सामाजिक संस्थांत गुंतल्या. त्याची मुलं घरच्या व्यवसायात अर्थात् राजकारणात गेली; पण त्याची लाडकी मुलगी - आरती - मात्र ऑक्सफर्डला गेली. उत्तम यश मिळवलं, प्राध्यापक झाली आणि तिकडेच स्थायिक झाली.

एकाच शाळेत असूनही, आमची विचारसरणी वेगवेगळी होती. मी कर्मठ, तर तो व्यावहारिक. आर्थिक स्थितीसुद्धा भिन्न. मी आणि उषा पगारावर आणि बँकेच्या कर्जावर गुजराण करत होतो, तर त्याची ‘शानो-शौकत’ दुसऱ्या टोकाची. दृष्टिकोन भिन्न असले तरी आमचं जमत होतं. गप्पा, जेवणखाण करत आम्ही एकमेकांच्या सहवासाचा आनंद घ्यायचो. सभोवतालच्या घडामोडींची चांगली जाण आणि राजकारणाचा वेध घेण्याची त्याच्यात क्षमता होती. मित्रमंडळी आणि खबऱ्यांचं मोठं जाळं होतं आणि विरोधकांपेक्षा तो नेहमी एक पाऊल पुढं असायचा. त्याच्याकडून मी खूप काही शिकलो. नव्वदच्या दशकात माझी बदली दिल्लीला झाली.

कामाच्या निमित्तानं तोही राजधानीत यायचा. तिथं असला की जेवायला नाही तर कॉफी प्यायला हमखास आम्ही भेटायचो. अशाच एका भेटीत तो म्हणाला : ‘‘येत्या निवडणुकीत जिंकण्याची आमच्या पक्षाची शक्यता दिसत नाही.’’ पक्षाच्या विचारसरणीच्या बाबतीत तो ‘तटस्थ’ होता आणि विरोधी बाकावर बसण्याची त्याची इच्छा नव्हती. म्हणून पक्षांतर करून तो निवडून आला आणि महत्त्वाच्या खात्याचा मंत्री झाला. त्याच्या पक्षनिष्ठेबद्दल मीडियात गदारोळ माजला; पण काही काळानं तो शांत होईल हे त्याला माहीत होतं. तसंच झालं.

त्याच दरम्यान आरतीनं त्याला फोन करून सांगितलं, ‘मला तुमच्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत. सिंगापूरची कॉन्फरन्स आटोपून परत जाताना काही दिवस मी तुमच्यासोबत राहीन.’ त्याला खूप आनंद झाला आणि त्यानं जंगलातल्या एका रिसॉर्टमध्ये व्यवस्था केली. त्या रात्री घरी जाताना तो जाम खुशीत होता. त्यानंतर बरेच दिवस आमची भेट झाली नाही.

काही आठवड्यांनी त्याचा फोन आला : ‘रात्री जेवायला घरी ये’ मी ‘नाही’ म्हणालो तर त्यानं आग्रह धरला. मी गेलो. तो कुठल्या तरी विचारात हरवलेला होता. ‘काय झालंय?’ मी विचारलं.

माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून त्यानं मला विचारलं : ‘‘यशवंत, माझ्याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे, एक राजकारणी म्हणून?’

‘यशस्वी’ मी म्हणालो.

‘आणि माणूस म्हणून?’

‘आमच्यासारखाच.’

‘माझी सगळी संपत्ती ‘व्हाईट’ नाही हे तर तू जाणतोसच; पण त्यामुळे मी अनैतिक ठरतो का? तुझ्या दृष्टीनं, मी अप्रामाणिक, लाच खाणारा, विचारांवर श्रद्धा नसणारा, खुर्चीसाठी पक्ष बदलणारा वाटतो का?’

‘अरे, थांब थांब. काय झालंय?’ मी म्हणालो.

‘तुला जाणून घ्यायचंय? ऐक.’

तो सांगू लागला : ‘‘आरती आल्यावर आम्ही बांधवगडला गेलो. पूर्वी ती इकडे यायची; पण मोकळ्या मनानं बोलायची नाही. कारण विचारलं तर नीट सांगायची नाही. आता इतक्या वर्षांनंतर तिला पहिल्यांदाच काही तरी बोलायचं होतं. मग आम्ही बसलो बोलायला.

‘या सहलीसाठी खूप खर्च झाला असेल ना?’ तिनं विचारलं. ‘फार काही नाही’ मी उत्तर दिलं.

थोडा वेळ ती शांत राहिली आणि म्हणाली : ‘डॅड, आपण किती श्रीमंत आहोत?’

‘दारिद्र्यरेषेच्या खाली नक्कीच नाही!’ मी हसून म्हणालो.

‘चेष्टा नको. मला सरळ सांगाल का?’ ती.

तिनं हे अशा सुरात तिनं विचारलं की, खरी परिस्थिती मी तिच्यासमोर उघड केली. ती पुन्हा थोडा वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली : ‘आपण सधन शेतकरी आहोत हे मला माहीत होतं; पण तुम्ही जो आकडा सांगताय त्यावरूनच कळतंय की, ते घामाचे पैसे नाहीत. मला आधीपासूनच तसं वाटत होतं; परंतु वस्तुस्थितीला तोंड देण्याचं धाडस होत नव्हतं. म्हणूनच इतक्या वर्षांत इकडे यायचं आणि तुमच्याशी बोलायचं टाळत होते. आता कळतंय की आपण दुसऱ्याच्या पैशावर मोठे झालोय, आपल्या नव्हे.’

मी शांतपणे ऐकत होतो.

‘भ्रष्टाचार हे मूल्यहीन माणसाचं एक अंग झालं; पण फक्त आपलाच ‘आनंद’ - मग त्याची व्याख्या कुणी कशी का करेना - आपल्या विचारांच्या केंद्रस्थानी असेल तर माणूस म्हणून तुमची अवनती होत नाही का? दुसऱ्याची संपत्ती तुम्ही आपल्या खिशात घालत असाल आणि सामाजिक हितापेक्षा स्वतःच्या फायद्यासाठी कुणाशीही हातमिळवणी करत असाल तर माणूस म्हणून तुम्ही पोकळच ठरता ना? मागच्या वेळी तुम्ही वेगळ्या पक्षातल्या लोकांबरोबर होता आणि आता वेगळ्या. आपल्या पक्षाच्या ध्येय-धोरणांच्या बाबतीत तुम्ही निराश झालात म्हणून तुम्ही पक्ष बदलला की तुमच्यासाठी सत्ता जास्त महत्त्वाची होती? प्रामाणिकपणे सांगा, आज तुम्हाला मिळालेलं हे पद म्हणजे तुम्ही केलेल्या विश्वासघाताचंच बक्षीस आहे ना?’

आरती मर्यादेच्या पलीकडे जात होती; पण शांत राहणं शहाणपणाचं होतं.

‘आरती, मी थकलोय. गुड नाईट’

‘का गुडनाईट? का बरं? स्वतःला आरशात बघण्याची आणि आरशात जो कुणी दिसतोय ते ‘तुम्ही’ नाही आहात हे मान्य करण्याची भीती वाटतेय?

तुमच्यासारखा एक नावाजलेला राजकारणी म्हणजे एक मुखवटा आहे. चकचकीत कपडे आणि सभ्यपणाची शाल पांघरलेला? मागच्या वेळेला मी इकडे आले तेव्हा तुम्ही, आपल्या पहिल्या पिढीच्या नेत्यांनी केलेल्या त्यागाविषयी भरभरून बोलत होता आणि आता तर वेगळीच नावं तुमच्या तोंडी आहेत.

मी लहान असताना शाळेच्या गॅदरिंगला तुम्ही आला होतात. तेव्हा, ‘भेदाभेद विसरून चांगले भारतीय म्हणून आपण एक झालं पाहिजे,’ असं म्हणाला होतात आणि आता ‘धर्माच्या आधारावर एकत्र झालं पाहिजे,’ असं आपल्या समर्थकांना सांगताय? मला सांगा, तुम्ही खरे कोणते? अखंड भारताविषयी बोलणारे की आता माझ्याशी बोलण्याची तयारी नसणारे?’ कदाचित वाईन घेतल्यामुळे असेल किंवा अशा रीतीनं माझ्याशी बोलण्याची कुणी हिंमत न केल्यामुळं असेल, मी भडकलो.

‘जरा शहाणी हो, आरती. जग तुझ्या ‘ऑक्सफर्ड’पेक्षा खूप मोठ्ठं आहे आणि तुला वाटतं त्याहून वास्तव फार कठीण असतं. तुला आठवतंय, तुझ्या लहानपणी आपला गाव आणि आजूबाजूचा भाग कसा होता? काय होतं तिथं? काही नाही. दुःख आणि दारिद्र्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं तिथं. शाळा सहा मैलांवर होती. दवाखाना तालुक्याला होता. बायकांचे तर नुसते हाल होते. ‘चूल आणि मूल’ यातच बिचाऱ्या पिचून गेल्या होत्या. तुझ्या लहानपणी गावाकडे असंच होतं ना? आज तिकडे जा आणि बघ तुझ्या डोळ्यांनी. रस्ते, घराघरात वीज, नळाचं पाणी, वाऱ्यावर डोलणारी गव्हाची शेतं...मुख्य म्हणजे, शाळेला जाणारी मुलं-मुली...शाळेतच आहार घेणारी आणि भरल्या पोटी भविष्याचं स्वप्न पाहणारी.

गेल्या वर्षी आपल्या भागातली एक आदिवासी मुलगी आयएएस झाली. तुझ्यासाठी ती मोठी गोष्ट नसेल; पण समाजाच्या दृष्टीनं ती खूप मोठी झेप आहे, अगदी नील आर्मस्ट्राँगनं चंद्रावर जाण्यापेक्षाही मोठी. आणि एवढं सगळं कसं घडलं? आपोआप? हे घडलं; कारण, त्यासाठी मी आणि तुझ्या भावांनी मिळून कष्ट उपसले. ते कुणी बघत नाही. त्याची कुणाला किंमत नाही. ते सगळं गृहीतच धरलं जातं. त्याचाच भाग म्हणून काही पैसे आमच्या बँकखात्यात जमा झाले. तू म्हणू शकतेस की, तो आकडा मोठा होता आणि वाममार्गानं आलेला तो पैसा होता; पण त्यातला काही भाग तरी आम्ही केलेल्या मेहनतीचा ‘परतावा’ होता हे मान्य कर. दुसऱ्या कुणीही - अगदी ज्यांच्याकडे ढिगानं ‘पांढरा’ पैसा पडून होता त्यांनीही - आपल्या भागाचा विकास व्हावा म्हणून काडीचीही हालचाल केली नाही.

‘तुम्हाला सत्तेची हाव आहे, तुमची निष्ठा अढळ नाही,’ असे आरोप तू माझ्यावर करतेस...कबूल; पण हाती सत्ता नसेल तर फार तर तू मोर्चे काढू शकतेस, बदल घडवू शकत नाहीस, हे लक्षात ठेव. सारखी पार्टी बदलल्यामुळं मी जर भ्रष्ट झालोय असं तुला वाटत असेल तर माझ्या मतदारसंघातल्या लोकांना जाऊन विचार, माझं कोणतं रूप त्यांना आवडतं -आधीचं नीतिवान नेत्याचं की आताच्या राजकारण्याचं, ज्याच्यामुळे आपल्या भागातल्या पोरापोरींसाठी सैनिकी शाळा आणि आयटीआय येणार आहे. आणि, धर्मावर आधारित आपल्या ओळखीबद्दल म्हणत असशील तर मग हा प्रश्न तू आपल्या देशाच्या जनतेलाच विचार, जिनं या गोष्टीला मान्यता दिलीय.

बहुमताविषयी तुला काही अडचण असेल तर तो तुझा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यासाठी तू मला दोषी धरू नकोस. आणि, आता माझा शेवटचा प्रश्न : ‘मला सांग, जबाबदार नागरिक, आदर्श राजकारणी आणि भ्रष्टाचारमुक्त लोकशाही इतिहासात आजवर कधी अस्तित्वात आलीय का? कधीच नाही. कारण, प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे, विचारसरणी वेगळी आहे. समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळूचा प्रत्येक कण वेगळा असतो तसं. त्यामुळे ‘आदर्श समाज’ तुला फक्त प्लेटोच्या ‘रिपब्लिक’मध्येच दिसेल, खऱ्या जगात नाही. म्हणून तुला जो काही विचार करायचा आहे तो तू कर; पण हस्तिदंती मनोऱ्यात बसून आम्हाला धडे देऊ नकोस.’ जेवणाचं बोलावणं आलं. गप्पांचा विषय बदलला. आमच्या एका वर्गमित्राला कॅन्सरचं निदान झाल्यामुळे त्याला कशी मदत करता येईल यावर आम्ही बोलू लागलो.’’

ती इंग्लंडला परत गेली आणि तो आपल्या मतदारसंघात गेला...गोष्टी तिथंच संपल्या असत्या तर बाप-लेकीमधले वैचारिक मतभेद म्हणून सोडून देता आले असते. थोडे गंभीर असले तरी आज ना उद्या काळाच्या ओघात मिटले असते. दरम्यान, माझी बदली मुंबईला झाली. आमच्या भेटी कमी झाल्या. काही महिन्यांनी माझ्या स्वीय सहायिकेनं एक ‘विदेशी’ पत्र माझ्या हातात दिलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं. त्यात लिहिलं होतं :

‘प्रिय काका,

कृपया या पत्रासोबत जोडलेला डीडी माझ्या बाबांना द्याल का? ही रक्कम त्यांच्या मतदारसंघातल्या कोणत्यातरी चांगल्या कामासाठी खर्च करायला सांगा. मी भारतात असताना आपल्याबरोबर थोडा वेळ घालवायला मला आवडलं असतं; पण ते होऊ शकलं नाही. जर कधी इंग्लंडला येणार असाल तर मला नक्की कळवा. तुमचा पाहुणचार करायला मला आवडेल.’

- आरती

मी ते पैसे त्याला देऊन टाकले. मग मला कळलं की, तिच्या शिक्षणासाठी आणि इतर खर्चापोटी वडिलांनी दिलेले पैसे तिनं परत केले होते. दुःख झालं. सन २००६ मध्ये ‘नाबार्ड’च्या कामानिमित्त बस्तरच्या दुर्गम भागात मला जावं लागलं होतं. तिथं शाळा काढण्यासाठी अर्थसाह्य मिळावं म्हणून आमच्याकडे प्रस्ताव आले होते. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तशी एक शाळा दुर्गम भागात असूनही तिथं चांगलं शिक्षण दिलं जातंय. मी त्या शाळेला भेट दिली. तसं पाहिलं तर, चिखलमातीच्या काही वास्तू तिथं उभ्या केलेल्या होत्या; पण मनाला भावणारं असं काहीतरी त्यात होतं. काही अंतरावर असलेल्या बाकड्यावर मी बसलो.

घंटा वाजली. तशी बरीच मुलं एकमेकांना ढकलत, हसत-खिदळत बाहेर आली. आणि त्यांच्यामागून आरती! आम्हा दोघांपैकी कोण जास्त चकित झालं ठाऊक नाही; पण मला पाहताच ती धावत आली आणि मिठी मारली.

‘काका इकडे कसे आलात तुम्ही?’ तिनं विचारलं.

तिथं बराच वेळ बसून आम्ही गप्पा मारल्या. तिच्या मनात कसलीही कटुता उरली नव्ह. होती ती फक्त खंत.

‘आमचं मनोमीलन होऊ शकणार नाही हे कळल्यावर तिकडे परत जायचं नाही असं ठरवूनच मी दूर निघून आले; पण वास्तव जग हे ‘सत्य’ आणि ‘न्याय’ यांवर चालत नाही हा त्यांचा मुद्दा बरोबर होता. तेवढी गोष्ट मी मान्य केली. मात्र, वास्तव किंवा त्याविषयीची मनुष्याची दृष्टी बदलता येत नाही, हे मला मान्य नव्हतं. माणसामध्ये स्वार्थीपणा आणि बळकावण्याची वृत्ती आहे; पण माणूस तेवढाच नाही. तसं असतं तर जग कधीच संपलं असतं. माणसातले सगळे दोष आणि कमतरतांच्या पलीकडेही तो आहे. वडिलांचे विचार स्वीकारले असते तर माझाच मनुष्यत्वावरचा विश्वास संपला असता. त्याला माझी तयारी नव्हती, म्हणून इथं आले. वास्तव जगात माझ्या विचारांची पडताळणी करायला हा एक प्रयोग आहे; पण काहीही झालं तर मी प्रयत्न सोडणार नाही.’

मी जायला निघालो. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते.

‘काका,’ ती म्हणाली :

आता है तूफान तो आने दे, कश्ती का खुदा खुद हाफिज है

मुश्किल तो नही इन मौजों मैं, बहता हुआ साहिल आ जाए।

(तुफान येणार असेल तर येऊ दे. होडी बुडेल की तरेल याची चिंता नको. शक्यता आहे की, देव तिचं रक्षण करेल आणि किनाऱ्यालाच तिच्या जवळ आणेल.)

‘नक्कीच,’’ मी म्हणालो : ‘सुखी राहा. देव तुझ्या पाठीशी आहे. आत्ता आणि नेहमीच.’

(सदराचे लेखक ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ, तसंच अर्थशास्त्र-इतिहास-राजकीय घडामोडी या विषयांचे अभ्यासक-संशोधक आहेत.)

(अनुवाद: डॉ. रघुनाथ कडाकणे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()