मॅटिनीची शिदोरी ...

नव्या वर्षाच्या नव्या स्तंभातला हा माझा पहिला लेख. या वेळी संपादकांनी मला विषय दिलाय सिनेमा.
Dwarkanath Sanjhgiri writes new year 2023 film industrty actor matinee
Dwarkanath Sanjhgiri writes new year 2023 film industrty actor matineesakal
Updated on
Summary

नव्या वर्षाच्या नव्या स्तंभातला हा माझा पहिला लेख. या वेळी संपादकांनी मला विषय दिलाय सिनेमा.

नव्या वर्षाच्या नव्या स्तंभातला हा माझा पहिला लेख. या वेळी संपादकांनी मला विषय दिलाय सिनेमा. म्हटलं तर विषयाचा कॅनव्हास खूप मोठा; पण मला सांगितलंय की, वाचकांना जुन्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या,

नव्या पिढीला ज्ञात नसणाऱ्या चंदेरी आठवणींच्या दुनियेतून फिरवून आणायचं. ही दुनिया नुसती आठवली तरी माझ्या अंगावरून मोरपीस फिरतं. या खजिन्यातून माणकं काढून तुमच्या समोर ठेवायची, ही तर पर्वणीच.

सिनेमाचं बाळकडू मला लहानपणी कधीही मिळालं नाही. हल्ली ते लहानपणीच मिळतं. कारण सिनेमा पाहायला थिएटरमध्ये जावं लागत नाही. अगदी मोबाईल हे सगळं पुरवतो. त्यामुळे आजोबा झालेल्या माझ्या पिढीलासुद्धा नेमकी भूमी पेडणेकर कुठली आणि जॅकलीन फर्नांडिस कुठली, हा प्रश्न पडत नाही.

आमची नात ‘मुन्नी बदनाम हुई’वर काय सुंदर नाचते, हे आजचे आजोबा कौतुकाने सांगत असतात. असं कौतुक माझे आजोबा-आजीच काय, वडिलांकडूनही झालं नाही. सिनेमा पाहणं हे आमच्या घरच्या चांगल्या संस्कारांत मोडत नव्हतं.

शाळेत आम्हाला संत सखू, ‘टारझन’सारखे सिनेमा दाखवले जायचे; पण टारझन आणि त्याची प्रेयसी ‘जेन’चा रोमान्स नीट पाहणंही आमच्या नशिबात नव्हतं. त्या वेळी १६ एमएमची फिल्म प्रोजेक्टरवरून दाखवत.

टारझनमध्ये दोघांच्या चुंबनाचे काही प्रसंग असत; पण आमच्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ नये असं वाटून आम्हाला सिनेमा दाखवणारे ‘राऊत सर’ मध्ये हात धरत, त्यामुळे पडदा ब्लँक असे आणि ‘राऊत सर’ हातावर दोघांची चुंबनं पहात.

त्यांच्यावर त्याचा झालेला चांगला परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर दिसे. त्यातल्या त्यात त्या काळात मला आमच्या तीर्थरूपांनी जंगली सिनेमा दाखवला. चमकलात ? त्यांच्या मित्राने सांगितलं, ‘दीड रुपयात काश्मीर बघायचं असेल, तर मुलाला जंगली दाखव.’

मी काश्मीर डोळे भरून पाहिलं आणि काश्मिरी मुलगीसुद्धा. कित्येक दिवस माझा गैरसमज होता की, काश्मिरी मुली सायरा बानोसारख्या दिसतात. ही सर्व कसर मी कॉलेजात भरून काढली. तिथं मोकळेपणा मिळाला.

मिळणाऱ्या तुटपुंज्या पॉकेटमनीत मी उपासमार सहन करून सिनेमा पाहिले. देव, दिलीप, राज, मधुबाला, मीनाकुमारी, नर्गीस वगैरे माझी दैवतं तिथंच भेटली. वर्तमानपत्रातलं मॅटिनीचं पान खेळाच्या पानाइतकंच माझ्यासाठी महत्त्वाचं ठरलं. ते काळजीपूर्वक पाहिल्यानंतर माझा दिवसाचा कार्यक्रम ठरायचा.

देव आनंदचा ‘तीन देवीयाँ’ किंवा राज कपूरच्या ‘आवारा’पुढे फिजिक्स, केमिस्ट्रीचा तास मला नेहमीच क्षूद्र वाटला आणि आजही पश्र्चात्ताप करायची पाळी माझ्यावर आलेली नाही. माझ्या हृदयाच्या एका कप्प्यात देव आनंद, मधुबाला ही मंडळी आणि दुसऱ्या कप्प्यात वाडेकर, बोर्डे, गावसकर, विश्र्वनाथ आदी मंडळी गुण्यागोविंदाने रहात होती.

हे सिनेमे आणि क्रिकेटचं माझं आकर्षण कमी झालेलं नाही; पण आज मी सिनेमा पाहायला आटापिटा करत नाही. अमुक नट चांगला, तो वाईट, ती नटी सुंदर, ती सेक्सी अशी मुठी आवळून मी चर्चाही करत नाही.

पण, बिछान्यावर पाठ टेकण्यापूर्वी कुठल्या चॅनेलवर कुठला सिनेमा आहे हे आवर्जून पाहतो. मी संपूर्ण चित्रपट रोज पाहात नाही; पण चित्रपटाचं अंगाई गीत ऐकल्याशिवाय झोपत नाही.ज्याला विचारवंत पलायनवादी चित्रपट म्हणतात ते मला मनापासून आवडतात.

हिंदी चित्रपट पाहताना उन्हाळ्यात शर्ट काढून बसावं तसं मी मेंदू काढून बसलेला असतो. साईबाबांच्या डोळ्यांतून निघालेल्या ज्योतीतून निरूपा रॉयला पुन्हा दृष्टी कशी येते? किंवा मुलं हरवत असूनही जुळ्या मुलांचे आई-बाप मुलांना जत्रेला का घेऊन जातात? वगैरे प्रश्न मला पडत नाहीत.

मी कलात्मक चित्रपट पाहिले नाहीत असं नाही, भुवन शोम सिनेमाने कलात्मक सिनेमाचा हिंदीत पाया घातला, तो मला खूप आवडला होता. सत्यजित रे आणि मृणाल सेन यांना मी कुर्निसात ठोकला; पण त्यांच्या सिनेमाच्या वाटेला फक्त दोन वेळा गेलो.

श्‍याम बेनेगल मनापासून आवडला. १९७०च्या दशकात जो कलात्मक सिनेमाचा नवा स्रोत सुरू झाला त्यात नहालो; पण सणासुदीचं ते गंगास्नान होतं, रोजची अंघोळ व्यावसायिक सिनेमाने व्हायची.

राज कपूर, गुरुदत्तकडे कलात्मक सिनेमा व्यावसायिक सिनेमाच्या सजावटीत पेश करायची कुवत होती - बूट पॉलिश, जागते रहो, प्यासा, कागज के फूल, साहब बिवी और गुलाम आदी - ते मला जास्त भावले.

ही सिनेमाची हौस मॅटिनी सिनेमाने भागवली. वडिलांच्या शिस्तीमुळे लहानपणी चुकलेला सिनेमाचा अभ्यासक्रम मी कॉलेजात दोन वर्षांत संपवला. तो काळ १९६८-६९ चा. हे मॅटिनी मला थेट १९४८ पर्यंत घेऊन गेले.

पहिल्या पानावर मुख्य बातम्या, मग स्पोर्ट्स पेज वाचून झालं की नजर टाइम्सच्या मॅटिनी कॉलमवर पडायची. कॉलेजचं टाइम टेबल डोळ्यांसमोर यायचं आणि मनात आंदोलन सुरू व्हायचं - हिंदीचा तास बुडाला तर काय हरकत आहे? सायन्सला हिंदीचे मार्क्स कुठे धरतात? पण केमिस्ट्री बुडेल त्याचं काय....

- दुसरं अभ्यासू मन. नाहीतरी तो आगाशे बोअर करतो आणि देव आनंदचा पेइंग गेस्ट पुन्हा कधी लागेल देव जाणे... - उनाड मन. प्रत्येकवेळी उनाड मन जिंकायचं. त्या कॉलेजच्या पहिल्या दोन वर्षांत मी ऐंशी मॅटिनी आरामात पाहिले. पुढं इंजिनिअरिंगला गेल्यावर कमी झाले. नोकरी लागल्यानंतर तर फार कमी. पण सिनेमावर प्रेम कायम राहिलं.

त्या दोन वर्षांचा अभ्यासक्रम मला आजही पाठ आहे, त्यावर विसंबून मी सिनेमावर कार्यक्रम करतो, पुस्तकं लिहिली आणि हा स्तंभ लिहिणार. हा स्तंभ मघई पानासारखा करायची इच्छा आहे; तोंडात टाकलं की विविध आठवणी मनात विरघळवणारं आणि चव जिभेवर रेंगाळत राहणारं....

वडिलांनी मला सिनेमा दाखवले; पण गजगौरी, भक्त प्रल्हाद, राजा शिवाजी, टारझन, सिंहगड थाटाचे. त्यामुळे वर्गातली मुलं ‘गुमराह’ पाहून येऊन ‘खिचती आऊ मै, रूक न पाऊ मै,’ म्हणत सुनील दत्तला भेटायला येणाऱ्या ‘माला सिन्हा’बद्दल बोलत,

तेव्हा माझ्याकडे ‘सिंहगड’ सिनेमातल्या म्हाताऱ्या शेलारमामाच्या तलवारबाजीशिवाय सांगण्यासारखं काही नसे. त्याचा फायदा एवढाच झाला की, माझा इतिहास पक्का झाला. उदयभानू कुठल्या किल्ल्याचा किल्लेदार होता हे मला झोपेतही सांगता यायचं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()