कॉफी विथ जेसन गिलेस्पी

अ‍ॅडलेड ओव्हलच्या रिव्हर साइड कॉफी हाउसमध्ये जेसन गिलेस्पीबरोबर कॉफी घेत घेत ह्या ट्रिपमध्ये मी गप्पा मारेन असं मला वाटलं नव्हतं.
jason gillespie cricket player
jason gillespie cricket playersakal
Updated on
Summary

अ‍ॅडलेड ओव्हलच्या रिव्हर साइड कॉफी हाउसमध्ये जेसन गिलेस्पीबरोबर कॉफी घेत घेत ह्या ट्रिपमध्ये मी गप्पा मारेन असं मला वाटलं नव्हतं.

अ‍ॅडलेड ओव्हलच्या रिव्हर साइड कॉफी हाउसमध्ये जेसन गिलेस्पीबरोबर कॉफी घेत घेत ह्या ट्रिपमध्ये मी गप्पा मारेन असं मला वाटलं नव्हतं. खरंतर ऑस्ट्रेलियात, मुलाकडे आल्यावर, क्रिकेटला मी मनाच्या ओसरीवर ठेवलं. कधीतरी दरवाजा उघडून मी ओसरीवर जायचो. आयपीएल अंतिम सामना, लॉर्डस् टेस्ट हे काही क्षण सोडले, तर मी फारसा ओसरीवर आलोच नाही.

माझा मित्र मकरंद वायंगणकर म्हणाला, ‘जेसनला भेटायचं आहे?’ तेव्हा मला कळलं, जेसन गिलेस्पी अ‍ॅडलेडमध्ये राहतो. कारण दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळणारे बरेच खेळाडू आता सिडनीत राहतात. उदा. चॅपेल बंधू वगैरे. मकरंदच्या एका मेसेजने काम केलं. ही काही मुलाखत नाही, ठरवून घेतलेली. तो आता प्रशिक्षक आहे, त्यामुळे त्याबद्दलच मी बोललो. त्याच्या क्रिकेटमधल्या वैयक्तिक गोष्टी मी बाजूला ठेवल्या. उदा. त्याने नाइट वॉचमन म्हणून येऊन बांगलादेशविरुद्ध द्विशतक ठोकलं होतं. तो स्वतःबद्दल कमी बोलतो.

कोचिंगच्या दृष्टिकोनातून जास्त गप्पा झाल्या. मैदानाच्या बाजूने, वळणं घेत टॉरेन्स नदी जाते. तशा या गप्पा वेगवेगळी वळणं घेत गेल्या. माझ्याबरोबर माझा इथला एक मित्र सदानंद मोरे होता. जेसनला पाहिलं, की त्याची उंची डोळ्यांत भरते. माझं डोकं त्याच्या खांद्याच्या किंचित वर होतं. वय वाढल्याच्या खुणा त्याच्या शरीरयष्टीवर जाणवत नाहीत, ती अजून तो खेळायचा तशाच यष्टीसारखी आहे.

केस आणि दाढी खऱ्या वयाची चुगली करतात. तीन व्यक्तींबरोबर उभं राहून बोलताना मला माझं शारीरिक बुटकेपण जाणवलं आहे. एक - जोएल गार्नर, दुसरा अमिताभ आणि तिसरा जेसन.

सचिन त्याला खेळायचा तेव्हा नक्की सचिनला त्याचा हात साइट स्क्रीनवरून येतोय असं वाटत असेल. सुनील, सचिन वगैरेंच्या मोठेपणाचं प्रतिबिंब तुम्हाला गार्नर, जेसन वगैरेंच्या उंचीत सापडतं. मला एक किस्सा आठवतोय. २००१ची मुंबई कसोटी. शेवटचं षटक जेसन टाकत होता. पहिल्या चेंडूवर मोंगिया बाद झाला. तो नव्हता बाद. पंचाने बाद द्यायच्या आत तो बाहेर पडला, त्यामुळे त्या वेळी प्रचंड वाद झाला होता. सचिनला ते शेवटचे ५ चेंडू खेळावे लागले. तो खेळला, दुसऱ्या दिवशी त्याने अप्रतिम अर्धशतक ठोकलं. पण ते पाच चेडू पाच तोफेचे गोळे होते.

जेसनला ते आठवत होतं.

तो म्हणाला, ‘ती टेस्ट आम्ही जिंकली; पण पुढच्या दोन जिंकून तुम्ही धक्का दिला. कलकत्ता कसोटी लक्ष्मण द्रविडने आमच्याकडून ओढून घेतली.’

माझा त्याच्या उंचीचा अंदाज एका इंचाने चुकला. मी त्याला म्हटलं, ‘‘तुझी उंची, ६’५’इंच?’

तो म्हणाला, ‘६’६’!’

त्याने आणखी धक्का दिला.त्याची दोन्ही मुलं उंच आहेत, लहान आहेत. पण तो म्हणतो, ‘एक सहा फूट नऊ इंच होईल.’

एक वेगवान गोलंदाज आहे, दुसरा बास्केटबॉल खेळतो. अगदी उंचीला साजेसे खेळ. तो वेगन (vegan) आहे. मांसाहार नाही, दुधाचे पदार्थ नाही आणि चामड्याचा वापर नाही. २०१४ नंतर तो वेगन झाला. ऑस्ट्रेलियन असून त्याला डेअरी फार्मिंगचा तिटकारा आहे. केवळ पोट क्रिकेटवर आहे म्हणून तो चामड्याचा चेंडू हातात घेतो. त्याला चेंडू चामड्यापासून तयार करणं आवडत नाही. चामड्याच्या वापरापासून तो दूर राहतो. चामड्याचं जॅकेट नाही, घड्याळाचा चामडी पट्टा नाही आणि सुटावर चामड्याचे बूट नाहीत. ऑस्ट्रेलियन संस्कृतीत वाढून वेगन होणं सोपं नाही. दूध, चीझ, लोण्याचा तो देश. तो म्हणतो, ‘‘मूठभर चणे उत्तम प्रोटिन्स देत असताना, कशाला हवंय चिकन?’’

(अरे पण जीभ कशी मानते? ती चणे आणि चिकन एका तागडीत मोजू शकते का?)

हायलाईट...

तो ऑस्ट्रेलियाचा पहिला अ‍ॅबॉरिजिन (आदिवासी) खेळाडू असं गुगल सांगतं. अर्थात, त्याबद्दल त्याला मी काही विचारलं नाही. वडिलांच्या बाजूने त्याचं ऑस्ट्रेलियन आदिवासी जमातीशी नातं आहे. त्याची आई ग्रीक. तो ‘सन ऑफ लॉर्ड’ सिनेमातल्या ख्रिस्ताची भूमिका करणाऱ्या दिओगो मॉर्गडासारखा दिसतो. पण कुठल्याही कोनातून अबॅरिजीन तो वाटत नाही. मैदानावरच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची आक्रमकता स्टँडमध्येसुद्धा जाणवते, ती जेसनच्या बाबतीतही जाणवायची; पण बोलतानाचा, वागण्यातला त्याचा साधेपणा अचंबित करतो. तो येशू ख्रिस्तांप्रमाणे शांत वाटतो. एक बरं असतं, ऑस्ट्रेलियात मोठा क्रिकेटपटू, अगदी पंतप्रधान, मुख्यमंत्री, नट ही मंडळीदेखील सामान्य माणसासारखी वागतात. माझ्याबरोबर असलेल्या मित्राने, सदानंद मोरे याने त्याला आठवण सांगितली, की वूलवर्थ या सुपर मार्केटमध्ये त्याला पेमेंट करायच्या रांगेत त्याने प्रथम पाहिलं होतं.

जेसन त्याला पटकन म्हणाला, ‘तू कुठे राहतोस?’

तो म्हणाला, ‘फर्लजवळ.’

जेसन म्हणाला, ‘हो, मी खेळताना तिथं राहायचो.’

साधी मध्यमवर्गीय वस्ती आहे.

तिथं बाजारहाट, मुलांना शाळेत सोडणं कुणाला चुकलेलं नाही, क्रिकेटपटूंनाही नाही. ऑस्ट्रेलियात निवडणुका होत्या. त्यांचे आता माजी झालेले पंतप्रधान रस्त्याच्या एका कॉर्नरवर निवडणुकीची सभा घेत होते. एका घराच्या हिरवळीवर उभं राहून ते बोलत होते. त्या घराच्या मालकाने त्यांना सांगितलं, ‘‘गवताबाहेर उभं रहा. मला गवत कापायचं आहे.’’ ते निमूट गवताबाहेर गेले. आपल्याकडे नगरसेवकाला तरी आपण असं सांगू शकतो का? कदाचित म्हणून मैदानावर वेगळे वाटणारे खेळाडू बाहेर आपल्यासारखे सामान्य वाटतात. तिथली सिस्टीम त्यांना सामान्य ठेवते. तो जेव्हा क्रिकेट, कोचिंगबद्दल बोलायला लागला, तेव्हा त्याची ज्ञानगंगा वाहायला लागली. तो म्हणाला, ‘‘भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजी सर्वोत्तम खेळतात, त्यामुळे ते तंत्र आम्ही आमच्या मुलांना शिकवतो. त्यांचे व्हिडिओज आम्ही दाखवतो आणि ते बॅकफूटवर कसं खेळतात त्याचं निरीक्षण करायला सांगतो.’’

मी त्याला म्हटलं, ‘‘पण पूर्वी नील हार्वे, चॅपेल, रेडपाथ वगैरे क्रिझच्या बाहेर जाऊन खेळायचे. त्या फूटवर्कने आम्ही मंत्रमुग्ध झालेलो आहोत. अजून नर्तकीसारखं चपळ पदलालित्य दाखवत क्रिझबाहेर नाचत येणारा इयान चॅपेल डोळ्यांसमोर आहे.’’

पण जेसन म्हणतो, ‘‘बरोबर तेच तंत्र आम्ही बदललं. इथे ऑस्ट्रेलियात चेंडू वळत नाही, त्यामुळे पुढे जाऊन चेडूला भिडणं वगैरे ठीक आहे. तुमच्याकडे चेंडू वळतो, तुमचे फलंदाज हे वळणारे चेंडू बॅकफूटवर खूप उत्तम खेळतात, ते शिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे. दुसरं म्हणजे ऑफ स्पिनर म्हटला की, त्याला स्पिनबरोबर चेंडू ऑनला वळवणं हे आमच्याकडे ठरून गेलं होतं. आम्ही पाहिलं की, भारतीय फलंदाज ज्या दिशेने चेंडू येतो, त्या दिशेला आरामात खेळतात.’’

‘पण हे स्पिनच्या विरुद्ध दिशेला खेळणं होत नाही का, Against the spin?’

‘थोडं असेल; पण त्याच दिशेला मारून धावा काढणं अधिक फायदेशीर होतं.’

मी म्हटलं, ‘सोबर्सला एकदा विचारण्यात आलं की, तू फिरकी गोलंदाजाला पुढे जाऊन का खेळला नाहीस? सोबर्स म्हणाला होता, ‘why should I go to the ball, I will deal with it when it comes to me’ ’’

जेसन म्हणाला, ‘सर गारफिल्ड सोबर्स एकदम बरोबर बोलले.

ऑस्ट्रेलियन परंपरेच्या हे बरोबर उलट आहे.’

मी म्हटलं, ‘एकेकाळी गोलंदाजी टाकताना गोलंदाज साइड ऑन पाहिजे असं म्हटलं जायचं. मुळात क्रिकेट हा साइड ऑन खेळ आहे.’

तो म्हणाला, ‘इतर गोष्टींप्रमाणे कोचिंगसुद्धा बदलत्या काळात बदलत जातं. गोलंदाजांच्या पाठीवर कमीतकमी दबाव येईल ह्या पद्धतीने शिकवलं जातं. प्रत्येक फलंदाजाला एकच तंत्र उपयुक्त नाही. सचिन, द्रविड, लक्ष्मण आणि सेहवाग, ह्यांची खेळायची पद्धत वेगवेगळी होती ना? पण ते व्यक्तिगत स्तरावर यशस्वी झाले. त्यातल्या प्रत्येकाला एक विशिष्ट गोष्ट कशी योग्य ठरेल? त्यामुळे आम्ही नैसर्गिक गोष्टी तशाच ठेवून त्यांच्यात बदल करतो.

न्यूझीलंडचा विल्यमसन ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, त्याचं अनुकरण मी फलंदाजांना करायला सांगतो. त्याचं मूलभूत तंत्र उत्तम आहे. फलंदाजीतील मूलभूत गोष्टी प्रत्येकाकडे हव्यात. त्या आहेत, असं आम्ही पाहतो.’

‘मला २०१५ ला मेलबोर्नला मार्टिन क्रो त्याच्या मरणापूर्वी भेटला होता. तो म्हणाला होता, ‘विल्यमसन न्यूझीलंडचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे.’ मी म्हटलं, मला मार्टिन जास्त मोठा वाटतो.’

जेसन म्हणाला, ‘‘तो मोठा होता; पण तो वेगळा काळ होता. माझ्या मते विल्यमसन सर्वोत्कृष्ट आहे.’

जेसन परखडपणे म्हणाला, ‘कोचिंग त्याच्या रक्तात आहे. निवृत्तीनंतर त्याने वेगवेगळ्या देशांत कोचिंग केलं. झिम्बाब्वे, पापुआन्युगिनीज, यॉर्क शायर... तो जवळ जवळ इंग्लंडचा कोच झाला होता. त्याचं नाव होतं संभाव्य उमेदवारांत. आता तो दक्षिण ऑस्ट्रेलियाचा कोच आहे.’ आयपीएलमध्ये त्याने पंजाब संघाचं कोचिंग केलं. तो भारताच्या प्रेमात आहे. ते प्रेम त्याने भारतीय माणूस समोर आहे म्हणून दाखवलं नाही. माझ्या मित्राने त्याला अॅडलेडच्या गणपतीला यायचं आमंत्रण दिलं, तेव्हा त्याने तोंडदेखलं हो म्हटलं नाही. त्याने त्यात रस दाखवला. एका एमा नावाच्या महिलेची ओळख करून दिली आणि म्हणाला, ‘ती दक्षिण ऑस्ट्रेलियन क्रिकेटचं पब्लिक रिलेशन सांभाळते, तिला ब्रोशर दे आणि तिला कार्यक्रमाबद्दल सांग.’ तो म्हणतो, ‘आयपीएलने भारतीय क्रिकेट बदललं. पूर्वी ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेत खेळताना भारतीय संघ एवढा आत्मविश्वासाने फर्फुरलेला नसायचा. आयपीएलमध्ये जगभरातल्या खेळाडूंबरोबर खेळून त्यांना जबर आत्मविश्वास आलाय.’

मी म्हटलं, ‘पण आयपीएल खेळाडूंची महत्त्वाकांक्षा कमी करत नाही का? त्यांच्या लेखी कसोटी क्रिकेटचं महत्त्व कमी झालं नाही का?’

तो म्हणतो, ‘तुला मला जे कसोटी क्रिकेटबद्दल वाटतं, ते त्यांना वाटणार नाही. कमी कामात मोठा मोबदला कुणाला नकोय! आज ऑस्ट्रेलियात सुताराला जर मेहनतीच्या कामाला वर्षाला ५० हजार डॉलर्स मिळत असतील आणि त्याला २ लाख डॉलरमध्ये साधं काम दिलं, तर तो आवडीने स्वीकारेल. जास्त पैसे कमी मोबदल्यात कुणाला नको आहेत?’

अर्थात तो म्हणाला, ‘आजची मुलं कमी मेहनत घेत नाहीत. एकेका वेळेला एक हजार नॉक्स बॉलिंग मशिन समोर घेतात. त्यांच्या स्टॅमिनाचा विचार करा.’

‘क्रिकेट सतत बदलतंय. विव्ह रिचर्डस् याचा काय दरारा होता! त्याचा वन डेचा स्ट्राइक रेट ९० च्या आसपास आहे, किंवा सचिनचा ८६.६५. अगदी गिलख्रिस्टसारख्या गोलंदाजी उद्‍ध्वस्त करणाऱ्या फलंदाजाचा ९५ वगैरे. बेव्हनला आपण बेस्ट फिनिशर मानायचो, त्याचा रेट आहे ७४ आणि आजचे फलंदाज पाहा, बटलर जवळजवळ ११९, मॅक्सवेल १२२, अंड्रे रसेल १३० वगैरे. पूर्ण ॲप्रोच बदलला आहे, त्याचा परिणाम कसोटीवर दिसतो.’

जेसन मला बदलत्या काळाबरोबर पुढे जाणारा वाटला. त्याचं कोचिंगसुद्धा तसंच. काही माणसं भूतकाळात रेंगाळतात, त्यांना ते आवडतं. मी स्वतः भूतकाळात काही वेळा रमतो. जेसनला बदलत जाणारं क्रिकेट तेवढंच प्यारं आहे, त्याचं तत्त्वज्ञान ह्या उक्तीप्रमाणे आहे,

'Past is the place of Reference not Residence'

त्याची कोचिंगची वेळ झाल्यावर उठला.

मी त्याला म्हटलं, ‘मला नातीने तुझी स्वाक्षरी घेऊन यायला सांगितलं आहे.’

त्याने पटकन माझ्या हातातला कागद घेतला, तिचं नाव विचारलं, चार प्रेमळ शब्द वापरले आणि मग स्वाक्षरी केली. आमची स्वरा खूष झाली. एक नवा जेसन त्याने तयार केलेला मला पाहायला आवडेल. तो उत्तम आक्रमक वेगवान गोलंदाज होता. उंचीमुळे मिळणारा बाऊन्स ऑकवर्ड होता. अचूक तर होताच. केवळ मॅग्रा, वॉर्न, ब्रेट लीवर फोकस जास्त होता. आमची फोटोची हौस अगदी पाहिजे तिथं येऊन त्याने भागवली आणि तो ऑस्ट्रेलियन मुलांचं भवितव्य घडवायला निघून गेला. पुढल्या वेळी त्याचं कोचिंग पाहायची माझी इच्छा तो पूर्ण करणार आहे.

(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार असून, त्यांनी काही पुस्तकंही लिहिली आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()