Bishan Singh Bedi : वयाच्या 50 व्या वर्षी त्याने स्टीव्ह वॉची विकेट काढली, असा बेदी पुन्हा होणे नाही

भारतीय क्रिकेट संघातला एकेकाळचा गाजलेला फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदीने परवाच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली. त्याच्या वाढदिवसाच्या समारंभाला कपिलदेवने त्याला व्हील चेअरवरून आणलं.
Bishan Singh Bedi
Bishan Singh Bediesakal
Updated on

भारताचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बेदी यांना भारताच्या फिरकी गोलंदाजीचे आर्किटेक्ट म्हणून संबोधले जात होते. ज्येष्ठ क्रीडा समिक्षक द्वारकानाथ संझगिरी यांनी त्यांच्या पंचाहत्तरी निमित्त लिहीलेला होता आज पुन्हा त्या आठवणींना उजाळा....

भारतीय क्रिकेट संघातला एकेकाळचा गाजलेला फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदीने परवाच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली. त्याच्या वाढदिवसाच्या समारंभाला कपिलदेवने त्याला व्हील चेअरवरून आणलं. एका लिजंन्डने दुसऱ्या लिजंन्डला समारंभाला आणताना पाहताना आनंद झाला. पण जेंव्हा एक डोळा हसत होता तेंव्हा दुसरा अश्रूंनी डबडबला होता. एका महान गोलंदाजाला व्हील चेअरवर बसलेलं पाहवलं नाही. जो आरामात दिवसभर गोलंदाजी टाकायचा तो दोन पावलं स्वतःच्या पायाने चालू शकत नाही ही गोष्टच मनाला खटकली.

असं काही पाहिलं की नियतीच्या क्रूरतेचा राग येतो. अबेबे बिकीला ऑलिंपिकमध्ये दोनदा मॅरेथॉन जिंकला. ज्या पायांनी त्याला गोल्ड मेडल दिलं ते पाय नंतर व्हीलचेअरवर कायम विसावले. तलत मेहमूद माझा आवडता गायक. त्याच्या मधाळ आवाजावर मी लुब्ध होतो. मी तीन चार वेळा त्याला भेटलो आहे. शेवटी भेटलो तेंव्हा त्याचा आवाज गेला होता. तो खुणेने बोलत होता. गायकाचा आवाज जाणं यापलीकडे काय दुर्दैव असतं ? बेदीच्या बाबतीतही मला तेच वाटलं.

बेदीची अॅक्शन निव्वळ काव्य होतं. क्रिकेटमध्ये फक्त फलंदाजी प्रेक्षणीय नसते. गोलंदाजीसुद्धा असतें. रमाकांत देसाईचा रनअप पाहताना पापणी मिटू नये असं वाटायचं.

ऑस्ट्रेलियाच्या मेकन्झीला गोलंदाजी टाकताना पाहणं हा सौंदर्याचा अनुभव होता. वेस हॉल किंवा माल्कम मार्शललां धडधडत येताना पाहताना अंगावरचे केस उभे रहायचे. बेदीची अॅक्शन अशी होती की गोलंदाजी टाकणं हे जगातलं सोपं आणि कमी कष्टाचं काम वाटायचं.

अगदी आपल्या घरगड्यालाही सांगावं ‘‘ जा, ती धुणी सोड आणि गोलंदाजी टाकून ये’’ एकदा मी ब्रेब्रॉनवर ईस्टस्टॅन्ड मध्ये बसून कसोटी पहात होतो. माझ्यापुढे एक मुलगी एका मुलाबरोबर बसली होती. इंग्लिश फलंदाज बेदीला आदराने खेळतांना पाहून तिने मित्राला विचारले, ‘‘ तो बेदी इतकी हळू बोलिंग टाकतोय तरी त्याला ते मारत नाहीत. अबीद अली जोरजोरात टाकत होता तरी त्याला मारत होते.’’ मी जोरात हसलो. तिने मागे वळून पाहिलं. मी म्हटलं, ‘‘ अमीन सयानी बोलताना मला वाटतं, बोलणं किती सोपं आहे ! स्टेज वर उभं राहिल्यावर कळतं.’’

Bishan Singh Bedi
Bishan Singh Bedi : भारताचे दिग्गज माजी खेळाडू बिशन सिंग बेदी यांचे निधन

जिम लेकरसारखा महान गोलंदाज म्हणतो, ‘‘ माझी स्वर्गाची व्याख्या एकच. एका बाजूने लिंन्डवॉलने गोलंदाजी टाकणे दुसऱ्या बाजूने बेदीने.’’ सुनील गावसकर म्हणतो, ‘‘ वासिम अक्रम येईपर्यंत बेदी हाच मी पाहिलेला सर्वोत्तम डावखुरा गोलंदाज होता. आता बेदी सर्वोत्तम डावखुरा फिरकीं गोलंदाज आहे "

मी विनू मंकड यांना पाहिलं नाही. वासू परांजपे अणि ती पिढी विनूला बेदीपेक्षा काकणभर जास्त मोठा मानते, पण मला सुनिलचं मत पटतं. मी तरं म्हणेन त्यानंतर एकही डावखुरा फिरकी गोलंदाज बेदीच्या मैलभर परिघातही फिरकला नाही. बेदी हे डावखुऱ्या फिरकीच्या कलेचं दुसरं नाव होतं. उत्तम नैसर्गिक अॅक्शन, चेंडूला दिलेली फसवी उंची, अणि अचानक मगरीसारखा झडप घेणारा आर्मर. त्याच्या घेतलेल्या बळीमागे आखणी असायची. बुद्धीची चमक असायची.

आमच्या राजू भारतनने एकदा म्हटलं होतं ते खरं होतं. ‘‘Chandra spins before he thinks, Bedi thinks before he spins ". एखाद्या निष्णात कोळ्यासारखं तो जाळं विणायचा अणि मग ते तो फेकायचा. त्यात भले भले अडकत. तो चेंडू हवेत क्षणभर थांबवण्याचा चमत्कार करतो अशी दंतकथा तयार झाली होती. उंची दिलेला चेंडू भसकन खाली यायचा (dip), अणि काहीवेळा फलंदाजाला वाटायचं तो चेंडूपर्यंत पोहचलाय पण चेंडू अलीकडूनच भीषण हसायचा. त्याचा आर्मर तर पाण्यात दबा धरून बसलेल्या भुकेल्या मगरी सारखा होता. झपकन यायचा अणि फलंदाजाचा पाय पकडायचा किंवा स्टंप.

मुरली कार्तिक, बेदीचा लाडका शिष्य. तो एक बेदीचा किस्सा सांगतो. १९९६ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात आला होता. बेदी नुकताच ‘आय सी यू’ मधून घरी आला होता. पण तो नेटवर आला. त्याने स्टीव्ह वॉ ला गोलंदाजी टाकायला सुरवात केली अणि त्याने कार्तिकला सांगितलं, ‘‘ पंधराव्या चेंडूवर याला पायाचित करतो.’’ सुरवातीला स्टिव्हने त्याला ठोकायला सुरवात केली. बेदी कार्तिकला म्हणाला, ‘मला एकाच बाजूला मारतोय हेच समाधान आहे. याचा अर्थ माझी सिम योग्य जागी पडतेय’’ आणि मग तो पंधरावा चेंडू आर्मरच्या रूपात आला. स्टिव्ह कट करायला गेला अणि त्याची बॅट खाली यायच्या आत तो त्याच्या पॅडवर बसला. पन्नासाव्या वर्षी त्याने स्टिव्हची विकेट काढली होती.

त्याच्या खांद्यात प्रचंड ताकद होती. सचिन म्हणतो," त्यांचा आर्म स्पीड जबरदस्त होता. त्यामुळे नुसत्या हाताने ते आम्हाला फिल्डिंग प्रॅक्टिस देत " बेदीने गोलंदाजी नेहमी आक्रमकपणे टाकली. धावा रोखणं हे त्याचं ध्येय नसायचं. विकेट काढणं हेच ध्येय. त्यासाठी तो धावा द्यायला तयार असे. तरी बळीमागे त्याने तब्बल ४.२ निर्धाव षटक टाकली आहेत, त्याच्यापुढे फक्त लान्स गिब्ज आहे. त्याने बळीमागे ४.२४ षटकं निर्धावं टाकली. आज डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांना पहिल्या चेंडूपासून डिप पॉइंट ठेवताना पाहिल्यावर बेदी आठवतो.

Bishan Singh Bedi
Babar Azam : संघापासून बाबरला केलं वेगळ; पाकिस्तान संघात लागलं भांडण; हाणामारीपर्यंत पोहचलं प्रकरण?

आयुष्यात त्याने फार क्वचित तिथे क्षेत्ररक्षक ठेवला असावा. त्याने पॉइंट मधून चौकार दिले की समजायचं भीषण आर्मरची ही तयारी आहे. बेदीने जगभर बळी घेतले. इंग्लंड - न्यूझीलंडच्यां हिरव्या खेळपट्टयांवर विकेट्स काढल्या अणि ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजच्यां टणक खेळपट्टंयावर.! फक्त पाकिस्तानात आपल्या सर्वच फिरकीं गोलंदाजांची ससेहोलपट झाली. झहीर अब्बासने अशी फलंदाजी केली की जणू तो भारतीय फिरकी गोलंदाजाना लहानपणापासून खेळतोय. पण बेदी म्हणजे फक्त डावखुरी फिरकीं गोलंदाजी नव्हे.

ते बंडखोर व्यक्तिमत्व होतं. मुंबई संघाबद्दल त्याला आदर होता अणि खुन्नस सुद्धा. मुंबईला अणि पश्चिम विभागाला हरवता येतं हे त्याने दिल्ली अणि उत्तरेला शिकवलं.

डिप्लोमसी हा शब्द त्याच्या शब्दकोशात नाही. त्याला वाटलं चूक, की तो प्रहार करतो. मग समोरच्या माणसाचं आडनाव गावसकर असो, मोदी किंवा जेटली. गावसकरबद्दल बोलताना त्याने एकदा त्याला, "Destructive influence" असं म्हटलं होतं. त्याच बेदीने एकेकाळी पहिल्या मुलाचं नाव सुनीलबद्दलच्या प्रेमाने ‘गावस इंदरसिंग’ ठेवलं होतं. मुरलीधरनला, ‘चकर’ त्याने आयुष्यभर म्हटलं, पण हरभजन सरदार म्हणून त्यालाही सोडलं नाही. तो चेंडू फेकतो हा आरोप त्याने त्याचं हिरीरीने केला. फक्त मुरलीबद्दल बोलताना तो जास्त कडवट होता. तो म्हणाला, ‘‘ त्याने हजार बळी घेतले तरी ते माझ्या नजरेत ते रन आऊट असतील.’’

गंम्मत म्हणजे ज्यावेळी इंग्लंडच्या लीव्हरचं वॅसलीन प्रकरण बाहेर आलं त्यावेळी खुन्नस म्हणून इंग्लंडमध्ये बेदी चेंडू फेकतो असा आरोप झाला. बेदी चेंडू फेकत असेल तर जगात कुणीही न फेकता गोलंदाजी टाकत नाही असं मी म्हणेन. दिल्लीच्या स्टेडियमला जेटली यांचं नाव दिलं तेंव्हा पहिली तोफ बेदीने डागली. बेदी फक्त आकाशातल्या देवाला मानतो. मानवाने तयार केलेल्या देवांना नाही. मैदानावर त्याने अनेक वादग्रस्त निर्णय घेतले. एकदा विंडिजमध्ये शरीरवेधी गोलंदाजीने दोन भारतीय फलंदाज फुटल्यावर त्याने कसोटीत डाव घोषित केला. पाकिस्तानमध्ये एका ‘वन डे’मध्ये जिंकायला १४ चेंडूत २३ धावा भारताला हव्या होत्या. आठ बळी हातात होते. सर्फराजने तीन बंपर टाकले. बेदीने मॅच सोडून दिली. निषेध म्हणून.

वन डे अणि ‘टी - ट्वेन्टी’ चा त्याला तिटकारा आहे. ‘टी - ट्वेन्टी’ पाहताना त्याचा श्वास कोंडतो असं तो म्हणतो. ‘टी - ट्वेन्टी’ला तो क्रिकेटचं गलिच्छ रूप मानतो. छोटी मैदानं, बदललेल्या बॅट, यामुळे अस्सल फिरकी गोलंदाजीची कला लुप्त होतेय असं तो म्हणतो. त्यात तथ्य आहेच.

पण त्यामुळे फिरकी गोलंदाजांना आपले डावपेच बदलावे लागले. त्यामुळे होतं काय की नव्या गोलंदाजाचा मोठेपणा ठरवताना आम्ही एका पारड्यात बेदी आधीच टाकलेला असतो, त्यामुळे त्याचं पारड नेहमी खालीच राहत. आम्ही नशीबवान आम्ही बेदी पाहून घेतला. आता पुन्हा बेदी होणं नाही.

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व साहित्यिक आहेत. )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()