सांघिक कामगिरीचं अजब रसायन

गुरुदत्त स्वतः नट असूनही त्याने दिग्दर्शन करताना, पटकथा ठरवताना कधी दुसऱ्याच्या भूमिकेवर अन्याय केला नाही. शक्य असूनही दिलीपकुमारप्रमाणे कॅमेरा आपल्यावर फिरत राहील हे पाहिलं नाही.
Guru Dutt
Guru DuttSakal
Updated on

‘प्यासा’ सिनेमातल्या हीरोची भूमिका गुरुदत्तने आधी दिलीपकुमारला दिली होती. त्याने ती नाकारली.

का नाकारली? त्यासाठी अनेक कारणं दिली जातात. एक म्हणजे दिलीपकुमारला दीड लाख हवे होते. गुरुदत्त एक लाख द्यायला तयार होता. दुसरं त्याला सिनेमात मधुबाला हवी होती. त्या वेळी त्याचं आणि मधुबालाचं प्रेमप्रकरण जोरात होतं. पण मग माला सिन्हाला त्याला काढावं लागलं असतं. गुरुदत्तची त्याला तयारी नव्हती. नवख्या अभिनेत्रीवर त्याचा चुकीचा परिणाम होईल असं त्याला वाटत होत.

असही म्हटलं जातं, की दिलीपकुमार त्या वेळी अनेक ट्रॅजेडी भूमिका करत होता. त्याचा त्याच्यावर मानसिक परिणाम झाला होता. त्याने एका मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेतला होता. दिलीपकुमारने मात्र त्याच्या पुस्तकात लिहिलं आहे, की पुढे प्यासाची भूमिका न केल्याची हुरहुर वाटली. गुरुदत्तने प्यासात रेहमानला एक महत्त्वाची पण खलनायक थाटाची भूमिका दिली. तोपर्यंत तो खलनायक झाला नव्हता. रेहमानने कारकीर्दीची सुरुवात देव आनंद बरोबर ‘हम एक हैं ’ सिनेमात हीरो म्हणून केली होती. पण त्याची कारकीर्द तशी बहरली नाही. एका पार्टीत तो गुरुदत्त याला भेटला. कारण गुरुदत्तसुद्धा त्या ‘हम एक हैं’ शी संबंधित होता. गुरुदत्तने सांगितलं, "भूमिका मी देतो. पण ते व्यक्तिमत्त्व खल वृत्तीचं आहे." त्याने रात्रभर विचार केला आणि मग तो तयार झाला. त्याचा निर्णय योग्य ठरला. तो यशस्वी खलनायक झाला.

गुरुदत्त स्वतः नट असूनही त्याने दिग्दर्शन करताना, पटकथा ठरवताना कधी दुसऱ्याच्या भूमिकेवर अन्याय केला नाही. शक्य असूनही दिलीपकुमारप्रमाणे कॅमेरा आपल्यावर फिरत राहील हे पाहिलं नाही. प्रत्येक भूमिका त्याने ठसठशीतपणे डेव्हलप केली. मग ती प्रेक्षकांना विरंगुळा देण्यासाठी निर्माण केलेली एखाद्या विनोदी पात्राची का असेना, आणि ते विनोदी पात्र जॉनी वॉकर असेल तर कधीच नाही.

किंबहुना जॉनी वॉकर हा गुरुदत्तचा वीक पॉइंट होता. जॉनी वॉकरला ''बाझी''च्या वेळी बलराज सहानी, देव आनंद, गुरुदत्तकडे घेऊन आला. जॉनी वॉकरचं खरं नाव बद्रुद्दीन. तो देव आनंद, गुरुदत्तच्या खोलीत भरपूर दारू प्यायल्याचा अभिनय करत शिरला आणि त्याने तमाशा केला. दोघंही वैतागले आणि म्हणाले, "ह्या माणसाला आधी बाहेर काढा" मग बलराज सहानी म्हणाला, ह्या माणसाने कधी दारूला स्पर्श केलेला नाही. तो अभिनय करत होता.

गुरुदत्तने त्याला ''बाझी''त ताबडतोब ब्रेक दिला. त्याला जॉनी वॉकर हे नाव दिलं. आणि नंतर तो जवळपास शेवटपर्यंत गुरुदत्त बरोबर राहिला. ''प्यासा''त गुरुदत्तने त्याला आधी त्याच्या मित्राची भूमिका दिली होती. पण त्या भूमिकेला खलनायकी छटा होत्या. त्या भूमिकेचं बरचसं शूटिंग झाल्यावर गुरुदत्तला जाणवलं, की लोकं जॉनी वॉकरला खलनायक म्हणून स्वीकारणार नाहीत.

कारण तोपर्यंत जॉनी वॉकर विनोदी नट म्हणून इंडस्ट्रीत मोठा झाला होता. म्हणून त्याने जॉनी वॉकरऐवजी शाम कपूरला घेतला. मग जॉनी वॉकरचं काय करायचं? त्यानी अब्रार अल्वींना सांगितलं, ‘‘तुम्ही जॉनी वॉकरसाठी एखादी भूमिका लिहा. आपण पुन्हा शूटिंग करू. अब्रार अल्वी त्यांच्या लाडक्या गुलाबो नावाच्या वेश्येकडे जायचे, तेव्हा त्यांनी वेश्यांच्या बकाल वस्तीत फिरणारे तेल मालिशवाले पाहिले होते.

त्यांनी सत्तार मालिशवाल्याची भूमिका जॉनी वॉकरसाठी लिहिली. साहिरने त्याच्यासाठी ‘चंपी तेलमालिश’ हे गाणं लिहिलं. साहिरने असं गाणं लिहिलं म्हणून नर्गिस त्याच्यावर चिडली. पण त्या गाण्यातही साहिरने साम्यवादाचा संदेश दिलाच आहे.

गुरुदत्तने प्यासात सहृदयता, सद् गुण, प्रेम ह्या गोष्टी क्रूसावर चढवल्या जातायत हे दाखवलं. गुरुदत्तला येशू ख्रिस्ताचं प्रचंड आकर्षण असावं. विशेषतः क्रूसावर लटकवलेल्या येशूचं. म्हणूनच तो वारंवार क्रूसावर चढवलेल्या येशूचं प्रतीक वापरतो. तुम्ही ''प्यासा'' आठवलात तर तुमच्या हे लक्षात येईल.

'जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला'' गाणं म्हणताना तो क्रूसावरच्या येशूचा फॉर्म घेतो. तेव्हा प्रेम क्रूसावर चढवलेलं दाखवतो. पुढे तो जीव द्यायला जाताना त्याला वाचवायला जाणारा भिकारी ट्रेनखाली मरतो, तेव्हा तो भिकारीही क्रूसाचा फॉर्म घेतो. तेव्हा निरपराधीत्व क्रूसावर चढतं. पुढे विजय मेल्याची बातमी ब्रेकफास्ट टेबलवर रेहमान खवचटपणे माला सिन्हाला वाचून दाखवतो तेव्हा ती डोळ्यासमोर ''लाइफ ''मॅगझिन धरते.

त्यावर येशूचा फोटो क्रूसावर लटकवलेला असतो. तेव्हा एक आयुष्यच क्रूसावर चढलेलं असतं. आणि शेवटी जला दो, जला दो’ हे गाणं म्हणतानाही तो पुन्हा क्रूसावर चढलेल्या येशूचा फॉर्म घेतो. येशू ख्रिस्ताचा एवढा चांगला वापर एखाद्या इंग्लिश चित्रपटानेही केला नसावा.

प्यासा सिनेमाच्या यशात जेवढा वाटा, दिग्दर्शक म्हणून गुरुदत्तचा होता, सर्व नट-नट्यांचा होता, तेवढाच वाटा अब्रार अल्वींचा होता. छायाचित्रकार व्ही. के. मूर्तींचा होता. तेवढाच बर्मनदादा आणि साहिरचा होता. साहिर बर्मनदादांच्या दोन बोटे वर होता. त्याच्या कवितेच्या पुस्तकातल्या दोन कविता थेट गाणी म्हणून घेतल्या गेल्या. त्यातल्या "जिन्हे नाझ है हिंद पर वो कहा हैं बद्दल मी मागच्या लेखात लिहिलेलं आहे.

आणि हो. आणखीन दोन नावं राहिली. महंमद रफी आणि गीता दत्त.

वेश्या असलेली वहिदा गुरुदत्तला पटवायला एक गाणं म्हणते,

"जाने क्या तूने कही,

जाने क्या मैने सुनी "

गुरुदत्त तिच्या मागे जातो कारण ती त्याची कविता असते. ते गाणं ऐकून जयकिशन वेडावला होता. किती तरी काळ ते गाणं तो गुणगुणत होता.

आज सजन मोहे अंग लगालो मध्ये मीराने तिचं कृष्णाबद्दलचं मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिक आकर्षण व्यक्त केलंय. ते फक्त गीताच करू शकते. गीताच्या आवाजात एकाच वेळी नशा, अगतिकता आणि दुःख होतं. तिचा आवाज गोड होता आणि नमकिनसुद्धा.

रफीने प्यासाची गाणी अजरामर केली. जिथे दर्द हवा तिथे दर्द, जिथे चीड हवी तिथे चीड, जिथे खालचा सूर तिथे खालचा सूर आणि जिथे टिपेला जाऊन आग ओकणं तिथे आग ओकलीये. दर्दभऱ्या रोमँटिक गीताला बर्मनदादांनी हेमंतकुमारचा आवाज वापरला आहे.

बर्मनदादांच्या सांगीतिकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट चित्रपटात प्यासा येतो. हा पलायनवादी रोमँटिक सिनेमा नाही. इथे मानवतावाद, जडवाद, नैराश्य, स्वार्थ, प्रेम वगैरे भावनामिश्रित प्रसंग आहेत. त्यामुळे संगीताला एका वेगळ्या उंचीची गरज होती. ती उंची बर्मनदादांनी पुरवली. उच्च दर्जाचं संगीत लोकप्रिय असतंच असं नाही. पण प्यासाचं संगीत उच्च दर्जाचं आहे आणि लोकप्रियसुद्धा आणि हो... चिरतरुणसुद्धा. शारीरिक प्रेमाच्या पुढे काही आहे. संगीत आहे. ह्याचं भान ज्यांना आहे, त्यांच्यासाठी हे संगीत चिरतरुण आहे. साहिरची गीतं ह्या ठिणग्या आहेत. मानवी स्वभावाच्या सर्व कंगोऱ्यांनी ते ओतप्रोत भरलंय.

खरं तर त्यातली दोन गाणी ही गाणी म्हणून लिहिलेली नव्हती. त्याने ऐन तारुण्यात ती लिहिलेली होती. तो डाव्या विचाराने भारलेला होता. फाळणीचे दिवस जवळ होते. साहिरचा धर्म, भांडवलशाही, जमीनदारी, राजेशाहीवर राग होता. तो त्याने कवितेत ओतला. इतर गाणी त्याने नव्याने लिहिली.

प्यासामधल्या विजयप्रमाणे सुरवातीला साहिरला प्रकाशकांचे उंबरठे झिजवावे लागले होते. त्याच्या कविता कुणी छापायला तयार नव्हतं. त्याचंही एका मुलीवर प्रेम होतं. तोही अव्हेरला गेला होता. थोडक्यात साहिरला प्यासाची कथा त्याची वाटली असावी. साहिरने प्रेम केलं तिचं नावं प्रेम चौधरी होतं. तिच्यावरच्या कविता त्याने बाजारात विकायला आणल्या होत्या. त्यात साहिर लिहितो.

मैंने जो गीत तेरे प्यारके खातिर लिखे

आज उन गितोंको बजारमें लाया हुँ

ज्या वेळी भवरा पायदळी तुडवला जातो, तेव्हा, गुरुदत्त गुणगुणत असतो

"ये फुलोके रस पिके मचलते हुवे भॅवरे

मै दू भी तो भी क्या दू

तुम्ही ए शोख नजारो

ले दे के मेरे पास कुछ ऑंसू कुछ है"

किंवा ती कॉलेजातील कविता

तंग आ चुके हैं कश्मकश से, जिंदगी से हम

ठुकरा न दे जहॉ को कही बेदिली से हम...

या ओळी साहिरच्या आहेत.

या सिनेमातील ‘जला दो जला दो’ हे गाणं गुरुदत्त ह्याला इतकं आवडायचं, की त्याने अब्रार रजेवर गेला असताना शूट केलं.

अब्रार म्हणाला "अरे, ते जमीनदार, जहागीरदार, राजे ह्या काळातलं आहे. आता लोकशाही आहे. आता शब्द बदलले पाहिजेत. ते शक्य नव्हतं. गुरुदत्तने ते रेहमानच्या संवादात बदल करून त्यात बसवलं. विजय आज जिवंत असता तर त्याला आपण सिंहासनावर बसवलं असतं. त्याच्या डोक्यावर मुकुट असता. असं वाक्य टाकलं.

ह्या सिनेमाची जाहिरात "A lyrical new high in film music" अशी केली गेली आणि जाहिरातीत साहिरचं नावं बर्मनदादांच्या वर आलं. २००९ मध्ये अनुराग कश्यपनं ‘गुलाल’ हा राजकारणावर आधारित सिनेमा काढला. त्याने त्या सिनेमाच्या सुरवातीलाच म्हटलंय, ‘हा सिनेमा साहिर लुधियानवीच्या ये मेहलो ये तख्तो ये ताजो की दुनिया या गाण्यावरून स्फूर्ती घेऊन तयार केलाय .

‘प्यासा’ अशारीतीनं अनेकांना स्फूर्ती देतो. काळ बदलला पण मूल्य बदलत नाहीत, म्हणून प्यासा चिरंजीव आहे.

(उत्तरार्ध)

(लेखक चित्रपट व क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक असून त्यांच्या या विषयांवरची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.