संगीताचा कान महत्त्वाचा...

संगीतात काहीतरी असामान्य करणाऱ्याला संगीताचा कान असणं फार महत्त्वाचं असतं.
Music Directors
Music DirectorsSakal
Updated on
Summary

संगीतात काहीतरी असामान्य करणाऱ्याला संगीताचा कान असणं फार महत्त्वाचं असतं.

संगीतात काहीतरी असामान्य करणाऱ्याला संगीताचा कान असणं फार महत्त्वाचं असतं. पण, काही मंडळींचे कान अतितीक्ष्ण असतात, अशी मी तुम्हाला उदाहरणं देऊ शकतो. म्हणजे इथे नेमकं काय हवंय ते त्यांना कळतं आणि ते यशस्वी करून दाखवतात. राज कपूरला संगीताचा फक्त कानच नव्हता, तर तो नैसर्गिक संगीतकार होता. लतादीदीसुद्धा म्हणायच्या की, राज कपूरच्या सिनेमाचा संगीतकार कुणीही असो; खरा संगीतकार राज कपूरच असतो. तो कथा ऐकता ऐकता लेखकाला थांबवायचा. त्याची नजर एका वेगळ्याच गोष्टीवर रोखलेली असायची. तो लेखकाला थांबवून म्हणायचा, ही गाण्याची योग्य जागा आहे आणि तिथे गाणं त्याला थेट दिसायचं.

राज कपूरने जेव्हा शंकर - जयकिशनला ‘जिस देश मे गंगा बहती है’ची कथा सुनावली त्यावेळेला ते दोघे म्हणाले, ‘या सिनेमात आमचं काय काम आहे? यात गाणी कुठून येणार?’ राज कपूर म्हणाला, ‘ती गोष्ट माझ्यावर सोडा’ आणि राज कपूरने योग्य सिच्युएशन्स गाण्यासाठी टाकली; पण त्या सिनेमाचं संगीतसुद्धा प्रचंड गाजलं. या माणसाचा संगीताचा कान किती मोठा होता त्याची दोन उदाहरणं तुम्हाला मी देतो. एक उदाहरण याच ‘जिस देश मे गंगा बहती है’ सिनेमातल्या गाण्याचं आहे. त्यात ‘अब लौट चले’ हे गाणं आहे आणि ते गाणं क्लायमॅक्सला आहे.

राज कपूर डाकूंना पोलिसांना शरण जायला सांगतो आणि ते जातात. जयप्रकाश नारायण यांनी डाकूंच्या पुनर्वसनाचं जे काम केलं, त्यावर आधारित ती कथा होती. हा प्रसंग परिणामकारक होण्यासाठी, राज कपूरने मुकेशच्या आवाजात गाणं टाकलं.

त्यासाठी ८० व्हायोलिन, १२ चेलो, ४ डब्बल बास, २ मेंडोलिन, २ पूर्ण इंडियन ऱ्हिदम, २ सतार, ६ साइड ऱ्हिदम, १० ट्रम्पेट्स एवढी वाद्यं वापरली. गाणं भन्नाट झालं, तरी राजचं समाधान झालं नाही. त्याने थेट मध्यरात्री लताला रेकॉर्डिंगसाठी बोलावलं आणि तिचे आलाप टाकले. ते आलाप किती महान आहेत आणि त्याचा परिणाम गाण्यावर आणि क्लायमॅक्सवर काय झालाय, ते गाणं ऐकलं की कळेल.

अशीच एक करामत एकदा ‘बॉबी’च्या वेळी राज कपूरने केली. ‘बॉबी’मध्ये गाणं आहे, ‘हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए’ या गाण्यात एका कडव्यानंतर, ‘ओ हो’ असं लताच्या आवाजात टाकायला लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्यांना सांगितलं. लक्ष्मीकांत म्हणाला, ‘‘असं इथे टाकता येणार नाही, त्यासाठी ट्यून बदलावी लागेल.’’ राज कपूर म्हणाला, ‘‘ट्यून चांगली आहे, ती बदलू नका; पण इथे लताला ‘ओ हो’ असा आलाप टाकायला सांगा.’’ लक्ष्मीकांत पेचात पडले. त्यांना काय करावं सुचेना. शेवटी लता मंगेशकर असं म्हणाल्या की, ‘राज कपूरला सांगा की तू गाऊन दाखव’ आणि राज कपूरने चक्क गाऊन दाखवलं. त्या क्षणी लक्ष्मीकांतने राज कपूरचे पाय धरले आणि सांगितलं, ‘आमच्यापेक्षा तुमचं ज्ञान मोठं आहे.’

हिंदी सिनेमात अशी अनेक बाप माणसं होती. खूप उदाहरणं देऊ शकतो; पण दोन-चार देतो. एस. डी. बर्मन यांचं उदाहरण देतो. गुरुदत्त यांच्या ‘जाल’ सिनेमाला ते संगीत देत होते. त्या वेळी एक तरुण गायक गुरुदत्तकडे गाणं मागायला आला. त्याचं नाव होतं राज खोसला. त्यांनी एस. डी. बर्मन यांना सांगितलं की या मुलाला एक विशिष्ट गाणं द्या. बर्मन दादांनी त्याचा आवाज ऐकला आणि त्याला सांगितलं की, ‘गायक म्हणून तू काही मोठा होऊ शकणार नाहीस, जा दुसरा काहीतरी उद्योग शोध.’ गुरुदत्त यांनी त्याला आपला साहाय्यक दिग्दर्शक म्हणून ठेवलं. पुढे तो मोठा दिग्दर्शक झाला; पण बर्मन दादा म्हणाले त्याप्रमाणे मोठा गायक कधी होऊ शकला नाही.

मग गुरुदत्तने दादांना सांगितलं की, ते गाणं तुम्ही तलत मेहमूदकडून गाऊन घ्या. तलत मेहमूद हा त्यावेळचा सर्वांत लोकप्रिय गायक होता. त्याचं स्थान असं होतं की, ज्या वेळेला एखादा सिने कलाकारांचा कार्यक्रम व्हायचा, त्यावेळेला लता मंगेशकर आधी गायच्या आणि मग तलत गायचा. बर्मन दादा म्हणाले, ‘‘मी हे गाणं हेमंत कुमारकडून गाऊन घेणार आहे.’ हेमंत कुमार हा बंगाली सिनेमात त्या वेळेला चांगला गायक असला, तरी हिंदीत त्याने एकही सोलो गाणं म्हटलं नव्हतं.

एखाददोन द्वंद्व गीतं तो हिंदीत गायला होता. गुरुदत्त दादांकडे बघतच बसला; पण त्याने दादांना विरोध केला नाही. ते गाणं होतं, ‘ये रात ये चांदनी फिर यहाँ काय गायलं हेमंत कुमारने! कदाचित तलतनेही चांगलं गायलं असतं; पण त्या वेळी अनोळखी हेमंत कुमारचा चॉईस किती उत्तम ठरला.

बर्मन दादांचे चिरंजीवही काही कमी नव्हते. त्यांचे कान सतत वेगवेगळं संगीत साध्यासाध्या आवाजातून शोधायचे. मला सांगा, बॅटरी डाउन झाल्यावर गाडी सुरू करण्याचा आवाज आपण किती वेळा ऐकलाय? गाडी बंद पडल्यावर असा आवाज कानाला गोड लागत नाही; पण पंचमने एकदा ऐकला. तो त्याला आवडला. त्याने केरसी लॉर्डला सांगितलं, ‘मला असा आवाज हवाय.’ केरसी लॉर्ड म्हणाला, ‘कसा काढणार? तोंडाने काढू?’ पंचम म्हणाला, ‘कसं करायचं ते तू ठरव. रेकॉर्डिंगसाठी सात दिवस आहेत.’ केरसीपण बाप. त्याने तो आवाज मिनी मूग सिंथेसायझरवर काढला. हे तीन सप्तकांतलं वाद्य आहे. हा आवाज पंचमने ‘हम किसीसे कम नही’ या सिनेमातल्या ‘ये लडका है अल्ला’ या गाण्यात इंट्रोच्या संगीतात वापरला.

पंचमचा आणखी एक किस्सा किस्सा ऐका. रणधीर कपूर एकदा पंचमकडे गेला. आर्डी काय करत असेल? तो आणि त्याचे साहाय्यक, अर्ध्या भरलेल्या बिअरच्या बाटल्यांमध्ये फुंका मारत होते. रणधीरला कळेना काय चाललंय! तो अस्सल कपूर, त्याला बिअरच्या बाटलीचा एकच उपयोग ठाऊक. बरं, अंगात आलं की घागरी फुंकतात, बिअरच्या बाटल्या नव्हे. पण त्याला काय माहीत की पंचमच्या अंगात संगीत आलं होतं. पंचम त्याला म्हणाला, ‘मी एक नवा आवाज तयार करतोय.’ हा बाटलीतून तयार झालेला आवाज तुम्हाला, ‘मेहबूबा ओ मेहबूबा’ गाण्याच्या सुरुवातीला ऐकू येईल. माझ्या संगीताच्या कार्यक्रमात एका वादकाने तो हुबेहूब काढला होता. रेकॉर्डिंगच्या वेळी तो स्टुडिओत तयार केला.

सलिल चौधरी तर आजोबाच, आशा भोसले त्यांना भेटल्यावर चमत्कार को नमस्कार म्हणायची. लता त्यांच्यासाठी कॉयरमध्येसुद्धा गायची. ‘ऐ दिल कहाँ तेरी मंजिल’ या ‘माया’मधल्या गाण्यातल्या कॉयरमध्ये लता गायली आहे. एकदा ‘काबुलीवाला’च्या ‘ए मेरे प्यारे वतन’ या गाण्याला रबाबची गरज होती. रबाब वाजवणाराही आला होता; पण सतत रिहर्सल सुरू असल्याने तो बसून होता. सलिलदांना काय वाटलं देव जाणे. ते उठले आणि त्यांनी बिमल रॉयना सांगितलं की, ‘रबाबवादकाचे पैसे देऊन टाका.’ त्यांनीही काहीही प्रश्न विचारला नाही. ‘जर गरज नव्हती तर कशाला बोलावलं,’ असा प्रश्नसुद्धा विचारला नाही आणि मग रबाबच्या तुकड्याची वेळ आली. त्यांनी सरोदवादकाला सांगितलं, ‘तुझी सरोद मला दे’ आणि त्यांनी तो तुकडा सरोदवर वाजवला. वाद्य त्यांचा हात लागला की त्यांना हवं तसं बोलत असे.

आणखी एक किस्सा ऐका, म्हणजे माणसाची प्रतिभा कळेल. एका गाण्याच्या वेळी ॲक्कॉर्डियन वादकाच्या दोन पट्ट्या (keys) वाजत नव्हत्या. तो नर्व्हस होता. सलिलदांना कळलं. त्यांनी तिथल्या तिथे तो तुकडा बदलला, नवीन तयार केला आणि अशा रीतीने की, त्या दोन पट्ट्या वाजवाव्या लागणार नाहीत. उगाच नाही मन्ना डे त्यांना रवींद्रनाथ टागोरनंतरचा श्रेष्ठ संगीतकार मानायचा. ही जिनियस मंडळी, वरून येताना वेगळाच कान घेऊन येतात. म्हणून त्यांनी आपलं आयुष्य समृद्ध केलं.

(लेखक चित्रपट व क्रीडाक्षेत्राचे अभ्यासक आहेत. या दोन्ही विषयांवर त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.