पियानो आणि हिंदी चित्रपट

हिंदी चित्रपटांत आणि हिंदी संगीतात अनेक वाद्यांचा वापर केला जातो. पण त्यात सर्वांत श्रीमंत आणि सर्वांत देखणं वाद्य कुठलं वापरलं गेलं असेल तर ते 'पियानो'.
Piano
Pianosakal
Updated on

हिंदी चित्रपटांत आणि हिंदी संगीतात अनेक वाद्यांचा वापर केला जातो. पण त्यात सर्वांत श्रीमंत आणि सर्वांत देखणं वाद्य कुठलं वापरलं गेलं असेल तर ते 'पियानो'. हिंदी चित्रपटांत काही वेळेस या वाद्यानं कॅरॅक्टरचं रूप घेतलंय. विशेषतः १९५० ते १९७० या दोन दशकांत ''पियानो''चा वापर हिंदी चित्रपटांत खूप केला गेलाय. आजही हिंदी चित्रपटांत तो अधूनमधून दिसतो. अलिकडे आलेल्या ‘अंदाधुंद’ चित्रपटाचा नायक ‘पियानिस्ट’ होता.

‘पियानो’ जगात सतराव्या शतकात आला. इटलीच्या बारटोलोमिओ ख्रिस्तोफोरीने त्याला जन्म दिला. मोझार्ट, बेथोव्हेनने तो वापरला आणि लोकप्रिय केला. भारतात तो युरोपिअन वसाहतदारांबरोबर आला असावा. डाॅक्टर अशोक रानडे या संगीताच्या गाढ्या अभ्यासकाच्या पुस्तकात उल्लेख सापडतो, की ''पियानो'' हिंदी सिनेमात मूकपटापासून होता. पडद्याच्या बाजूला काही वादक बसवत, ते संगीत वाजवत. पंकज मलिक त्या वेळी पियानो वाजवत.

१९३६ मध्ये पार्श्वगायक नव्हते. त्या वेळी नायक-नायिकेच्या बाजूला वादक बसवत आणि नायक-नायिका स्वतः गाणं गात. १९३६ मध्ये ‘पुजारा’ नावाच्या सिनेमासाठी अनिल विश्वास संगीत देत होते. गाणं होतं, "मेरे मंदिर में आओ" नायक-नायिका झाडाच्या फांदीवर बसले होते. गाणारे उंचीवर म्हटल्यावर वाद्यही उंचीवर होती. पियानो ढिगाऱ्यावर ठेवला होता. गाणं ध्वनिमुद्रित झालं आणि तो ढिगाऱ्यावर ठेवलेला पियानो कोसळला आणि शहीद झाला.

पियानो प्रथम पडद्यावर दिसला ''बसंत'' या सिनेमात. मग १९४६ मध्ये नूरजहाँने ''अनमोल घडी'' सिनेमात पियानोवर बसून गाणं म्हटलं. मग १९४९ मध्ये ''अंदाज'' आला. त्यातली पाच गाणी पियानोवर होती. पियानो तेथून लोकप्रिय झाला.

'अंदाज' मधल्या पियानोवरच्या गाण्यांमुळं माझं पियानोबद्दलचं आकर्षण वाढलं. या सिनेमाची अनेक वैशिष्ट्ये होती. एकतर दिलीप-राज-नर्गिस एकत्र होते आणि तांत्रिकदृष्ट्या हाॅलिवूडच्या जवळ जाणारा सिनेमा होता. पियानो हे या सिनेमातलं चौथं कॅरॅक्टर होतं.

तीन श्रीमंत तरुण प्रेमात असतात. तरुणी महालसदृश घरात राहते. नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं. पण श्रीमंतांवर ब्रिटिश संस्कृतीचा प्रभाव होता. त्यामुळे घराच्या वैभवाला पूरक असा पियानो ठेवला गेला असावा. या सिनेमात पियानोवर चारही मूडची गाणी म्हटली गेली आहेत. चारही गाणी दिलीपकुमार म्हणतो. तो नर्गिसच्या प्रेमात पडल्यावर 'हम आज काही दिल खो बैठे' म्हणतो.

तिला प्रेमाची स्वप्न दाखवताना 'तू कहे अगर जीवनभर' म्हणतो. प्रेमात बिब्बा घालायला राज कपूर आला हे समजल्यावर 'टूटे ना दिल टूटेना' म्हणतो आणि आदर्श प्रेमाचा काळ असल्यामुळे नर्गिस राज कपूरचा हात धरून गेल्यावर म्हणतो 'झुम झुमके नाचो आज'. चार वेगवेगळे मुड्स दिलीपकुमार पियानोच्या सुरातून व्यक्त करतो.

हिंदी सिनेमात पियानो दाखवताना तो नेहमी उघडलेला असतो. काठीच्या आधारावर ते लीड उभं राहतं. त्यामुळे एक त्रिकोण तयार होतो. दिग्दर्शक नेहमी या त्रिकोणाचा उपयोग करतो. त्या त्रिकोणाच्या फ्रेममधून वाजवणारा नट किंवा नटी जिच्या किंवा ज्याच्यासाठी वाजवलं जातंय ती व्यक्ती किंवा जमलेल्या माणसांच्या चेहऱ्यावरचे हावभाव दाखवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ह्या त्रिकोणात बोलके चेहरे शोभतात, पुतळे नाहीत.

या त्रिकोणामुळे चेहऱ्यावरील हावभाव उठून दिसतात. त्या त्रिकोणाचा वापर केला गेलेला नाही आणि 'लीड' उघडलेलं नाही अशी गाणी फार क्वचित. चटकन आठवणारं गाणं म्हणजे ''हम आज कही दिल खो बैठे'' ह्या गाण्यात त्रिकोणाची गरज नाही. कारण नर्गिस एकटीच आहे आणि ती पियानोवर रेलते. दुसरं गाणं 'चले थे साथ मिलकर' सुरवात पियानोवर आणि मग पियानो सोडून तिची जवळीक सुरू होते.

'हम प्यार में जलने वालोंको' ह्या गाण्यात नायिका गीता बाली पियानोवर बसून विरहाचे सूर एकटीच आळवते पण तरीही तो त्रिकोण उघडलेला आहे. आवाज फुलण्यासाठी तो उघडा ठेवला जात असे. ह्या गाण्यात त्रिकोणाचा वापर एकदाच केलाय. मग गीता बाली पियानोवर चक्क डोकं टेकवून गाते. पण प्रत्यक्षात वाजवताना दिसत नाही. पण पियानो गाण्यात वाजतो. तो हरवत नाही कारण मदन मोहन ह्या संगीतकाराने ठेका त्या मूडला साजेसा ठेवलाय. त्यामुळे पियानोचे सूर नीट ऐकायला येतात.

हिंदी सिनेमात काही गाणी अशी असतात, की श्रीमंतांचा प्रशस्त दिवाणखाना असतो. तिथे मस्तपैकी रॉयल पियानो ठेवलेला असतो. गाणं पियानोवर सुरू होतं आणि मग पियानो विसरला जातो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ''भाई भाई ' सिनेमात असलेलं 'ऐ दिलं मुझे बता दे' हे गीता दत्तचं आनंदी गाणं. त्यात शामा पियानोवर गाणं सुरू करते. मग पियानो विसरते आणि अशोककुमारची आठवण काढत नाचते. ह्या गाण्याचा भर शामाच्या नाचावर आहे. कारण ती उत्तम नर्तकी होती असं म्हणतात. तिचे पाय सुंदर होते. त्यामुळे काही वेळा वैजयंतीमाला नाचताना पाय शामाचे दाखवत.

लाजवंती चित्रपटात एक लाजवाब गाणं आहे.

'कोई आया धडकन कहती हैं '' या गाण्याची सुरवात पियानोवर होते. मग हळूच बलराज सहानी नर्गिसचा प्रौढ रोमान्स सुरू होतो. अशावेळी इतर वाद्यांचे सूर पियानोच्या सुरात मिसळून जातात. ‘सुजाता’मधलं ‘बचपन के दिन भी क्या दिन थे’ हे गाणं ऐकले आहे? गीता दत्त आणि आशा भोसले या दोघींनी ते गाणं गायलं आहे.

शशिकला पियनोवर गाणं सुरू करते. मग उठून फिरते, नाचते, ‘उडते फिरते तितली बनके’असं म्हणते. पण हे सोलापूरचे फुलपाखरू कडवं संपत आलं की पियानोजवळ येते. पुन्हा पियानो वाजवते. त्या वेळी पियानोचे गोड सूर पुन्हा ऐकायला येतात. इतर वाद्यांत मिसळून जात नाहीत. पियानोच्या गाण्याची काही वैशिष्ट्य आहेत. विशेषतः ड्रेस कोड. नायक गाऊ देत किंवा नायिका. त्यांचा ड्रेस स्मार्ट आणि फॉर्मल असतो. जवळजवळ १९७० पर्यंत नायक पियानोवर बसून गाताना सुटात असायचा. नायक मध्यमवर्गीय असो किंवा गरीब... सूट हवाच.

त्याला पियानो वाजवायचं ज्ञान उपजत असायचं. पियानोचं वातावरण श्रीमंती असायचं. मोठं घर, मोठा हॉल किंवा क्लब. बरेचदा पार्टी सीन असायचा. त्यामुळे माणसं सुद्धा चांगल्या कपड्यात असायची. मग पियानो वाजवणारा नायक शर्ट-पँटमध्ये कसा असेल. एक गाणं आहे, पियानोवरच. 'चांदी की दीवार ना तोडी' त्यात मनमोहन हा खलनायक पियानो वाजवतो. गातो नायक जितेंद्र. जितेंद्र बंद कोटात असतो. पण खलनायक सुटात. का?

कारण तो पियानोवर बसतो. 'तीन देवियाँ' सिनेमात देव आनंद बसने फिरतो. वाद्यांच्या दुकानात नोकरी करतो. पियानो दुरुस्त करायला गिऱ्हाइकाकडे जातो, पण पार्टीत पियानोवर ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत’ हे गाणं म्हणताना मात्र कडक सुटात असतो. हा सिनेमा साधारण १९६५ चा आहे. तेव्हा मध्यमवर्गीय माणूस सूट फक्त एकदाच शिवत असे. स्वतःच्या लग्नात. तो सुद्धा बहुतेक वेळा सासऱ्याच्या खर्चाने. पण हिंदी सिनेमात हीरो मात्र गरीब असो वा मध्यमवर्गीय, पियानो सुटात वाजवत असे. काही अपवाद होते.

उदा. कठपुतली सिनेमात बलराज सहानी हा हीरो पियानो शर्ट-पँट मध्ये वाजवतो. ते गाणं पण ग्रेट आहे. 'मंजिल वही है प्यार की राही बदल गये' पण त्यामागे एक कारण आहे. बलराज वैजयंतीमालाकडून पियानोवर नाचाची रिहर्सल करून घेत असतो. सिनेमात पियानो जेव्हा जेव्हा व्हिजुअल ट्रीट म्हणून वाजवला दाखवला आहे, तेव्हा तो ग्रँड पियानो दाखवला आहे.

पियानो वेगवेगळे असतात. जवळपास त्यात १७ प्रकार आहेत. पण महत्त्वाचे ३ प्रकार. ग्रँड, अप्राइट आणि डिजिटल.

जुन्या सिनेमात डिजिटल नव्हते. अप्राइट् सुद्धा फार कमी दिसतात. पूर्वी ख्रिश्चन लोकांच्या घरात अप्राइट पियानो असे.

तुम्हाला मिस मेरी सिनेमात असलेलं ‘ये मर्द बडे बेदर्द बडे’ गाणं आठवतं ? त्या वेळी जो पियानो आहे तो अप्राइट पियानो. अर्थात ग्रँड पियानोची श्रीमंती त्याला नाही. ग्रँड पियानो श्रीमंती दाखवण्यासाठीच वापरतात. मी मध्यंतरी एका आलिशान घराचे होर्डिंग्ज पाहिलं. त्यावर पियानो वाजणारी मुलगी दाखवली होती. श्रीमंतीचं ते लक्षण दाखवण्याचा प्रयत्न होता. आलिशान घरात पियानो असणं हा त्या घराचा अलंकार आहे. हिंदी सिनेमात हा अलंकार श्रीमंत घरात नेहमी दिसायचा.

त्यामुळे एखादं गाणं ठरलेलं. तुम्ही 'बहारे फिर भी आयेंगी' सिनेमा पाहिलाय? धर्मेंद्र ज्या वृत्तपत्राचा पत्रकार असतो, ते माला सिन्हाचं असतं. तो जेव्हा माला सिन्हाकडे येतो, तेव्हा त्याला समजतं, की ज्या तनुजावर त्याचं प्रेम असतं ती माला सिन्हाची बहीण असते. पण माला सिन्हा सुद्धा धर्मेंद्रवर प्रेम करत असते. तो पियानोवर एक गाणं म्हणतो. दोघींनाही वाटतं तो आपल्यासाठी गातोय. किती नशीबवान माणूस !

एका बाजूला नुकतीच उमलू लागलेली कळी दुसऱ्या बाजूला टवटवीत गुलाब. धर्मेंद्र हँडसम दिसतो म्हणणं हे अंडर स्टेटमेंट आहे. तो सुटात असतो. त्याला गोणपाटाचा सूट सुद्धा चांगला दिसला असता. फक्त पियानो वाजवताना तो पियानो वाजवतो आहे की मांडी खाजवतो आहे हे कळत नाही आणि गाणं काय आहे? ‘आपके हसीन रूप पे आज नया नूर है ’पण, हिंदी सिनेमाच्या पडद्यावर किती नायक किंवा नायिका पियानो बरोबर वाजवतात?

म्हणजे सूर आणि फिरणारी बोटं किंवा ॲक्शन बरोबर असते का? ‘मैं दिल हूँ एक अरमान भरा’ गाण्यात सुरवातीच्या नोट्स राज कपूरने बरोबर वाजवल्या आहेत. राज कपूरला अनेक वाद्य उत्तम वाजवता येत होती. ‘मधुबन मे राधिका नाचे रे’ या गाण्यासाठी दिलीपकुमारने सतार शिकण्यासाठी शिकवणी ठेवली होती. देव आनंदला पियानो खूप आवडायचा. त्याने पियानो विकत घेतला. काही काळ शिकवणी ठेवली. पण पुढे त्याला वेळ मिळाला नाही.

मात्र पियानोवर फिरणारी बोटं आणि सूर याचं नातं नेहमीच जुळतं असं नाही. त्यामुळे बऱ्याचदा पियानो वाजवणाऱ्या नायक-नायिकेचा चेहरा एकदा दाखवला जातो, नंतर कधी पियानोवर फिरणारी बोटं. पण ती नायक-नायिकेची असतातच असं नाही. काही वेळा कॅमेरा चेहऱ्यावरून बोटावर येतो तेव्हा पटतं की ती बोटं त्यांचीच आहेत. कदाचित त्या शॉट पुरती ती रिहर्सल केलेली असू शकते. अलिकडे पडद्यावर पियानोचा वापर कमी झालाय. पण नट-नट्या पियानो शिकतात.

श्रद्धा कपूर ‘रॉक ऑन२’ सिनेमात फरहान अख्तरबरोबर काम करत होती. त्यात तिची भूमिका बँड मेंबरची आहे. त्यात तिला पियानो वाजवावा लागणार होता. त्यासाठी १३-१४ तास पियानो वर सराव करायची. सुष्मिता सेन पियानो वाजवत असे. तिने पियानोवर १८ वर्षांपूर्वी ट्युन तयार केली होती. तिने ती पियानोवर वाजवली आणि तिच्या दोन मुलींबरोबर तो व्हिडिओ अपलोड केला. फरहान अख्तर या वाद्यप्रेमी नटाला पियानो वाजवायला आवडतो. आमिर खान पियानो वाजवतो.

आलिया भटने कथक आणि पियानो शिकायला अभिनयातून रजा घेतली. ‘अंदाधुंद’ सिनेमाच्या वेळी आयुष्मान खुराना यानं अक्षय वर्मा या लॉस एंजलिसमधल्या पियानोवादकाकडून दोन महिने धडे घेतले. ऋषी कपूरचं ‘बडे दिलवाले’ सिनेमात असलेलं किशोरकुमारने गायलेलं ‘जीवन के दिन छोटे सही हम हैं बडे दिलवाले’ गाणं पाहा. तो पियानो परफेक्ट वाजवतो आहे. तो पियानो शिकला होता. बरेच नट-नट्या अभिनयासाठी खूप खोलात जातात.

(पूर्वार्ध)

(लेखक क्रीडा आणि चित्रपट या क्षेत्रांचे अभ्यासक आहेत. या विषयांवर त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()