आर. डी बर्मन ऊर्फ पंचम हा बाप से बेटा सवाई होता की नाही हे मला ठाऊक नाही. माझ्या मते बाप तो बाप! पण बापाला अभिमान वाटावा असा हा मुलगा नक्की होता. नव्या पिढीतल्या एका मुलानं फिरायला निघालेल्या एसडींकडे पाहून जेव्हा ‘हे आरडी बर्मनचे वडील’ असं म्हटलं, तेव्हा बर्मनदादांना सुद्धा आनंद झाला.
जेव्हा पंचमनं ठरवलं की आपण स्वतंत्रपणे संगीत द्यायचं, त्या वेळी त्यांनी वडिलांना सांगितलं, की मला तुमच्यापेक्षा वेगळ्या मार्गाने जायचंय. बर्मनदादा त्याला म्हणाले, ‘तुला जर ऱ्हिदमच्या मार्गानं जायचं असेल, तर सी रामचंद्र यांचा आदर्श ठेव.’ बर्मनदादा यांना सी. रामचंद्र यांच्याबद्दल खूप आदर होता. किंबहुना बर्मनदादा ज्या वेळेला हिंदी चित्रपटसृष्टीत आले, त्या वेळी त्यांना ऑर्केस्ट्राची अरेंजमेंट कशी करावी याच ज्ञान नव्हतं.
त्या वेळी त्यांना सी. रामचंद्र यांनी मदत केली होती. पंचमनं बर्मनदादांचा असिस्टंट म्हणून सुरुवात कधीच केली होती. ‘ऐ मेरी टोपी पलट के आ’ या देव आनंदच्या फन्टुश चित्रपटातलं गाणं पंचमनं तयार केलं असं म्हटलं जायचं. ‘नौ दो ग्यारह’ या सिनेमाच्या गाण्याची आशा भोसले ह्यांची रिहर्सल त्यानंच केली होती, असंही मी वाचलंय. पंचमला स्वतंत्र संगीतकार म्हणून पहिला सिनेमा मेहमूदनं दिला. त्या सिनेमाचं नाव होतं, 'छोटे नवाब.'
त्याआधी प्यासाला सहायक संगीतकार म्हणून पंचमची कामगिरी पाहिल्यावर त्यावर गुरुदत्त खूश होता. गुरुदत्तने नंतर पंचमला ‘राज’ हा सिनेमा ऑफर केला. पण तो सिनेमा अर्धवटच राहिला. पंचम त्या वेळेला फक्त १९ वर्षाचा होता.
मुंबईत फातीमादेवी हायस्कूलमध्ये मेहमूदनं ‘छोटे नवाब’ नावाचा एकपात्री प्रयोग केला होता. त्यावर आधारित तो सिनेमा होता. त्यात मेहमूदनं हीरो म्हणून पदार्पण केलं. त्यानं आरडीला ब्रेक का दिला? एकतर संगीताचं खानदानी रक्त त्याच्या धमन्यातून वाहत होतं आणि दुसरं म्हणजे बॉम्बे टॉकिजपासून मेहमूद आणि पंचम हे दोस्त होते. दोघंही एकत्र कार रॅलींना जायचे. आरडी मेहमूदच्या कारमधून जाताना त्याची बोटं सतत ताल धरून असत.
एसडी बर्मन यांनी छोटे नवाबला संगीत द्यायला नकार दिला होता म्हणून मेहमूद पंचमकडं गेला. या सिनेमाला माफक यश मिळालं तरीही पुढचा सिनेमा पंचमला त्यानं दिला. या सिनेमासाठी स्वतः बर्मनदादांनी लताला फोन लावला. घरी जेवायला बोलावलं. दोघांमधला पाच वर्षांचा दुरावा संपवला. त्यातली लताची दोन गाणी गाजली, १ घर आजा, घिर आये, बदरा सावरिया २ मतवाली आखोंवाली त्यानं पुढचा सिनेमाही पंचमला दिला. तो सिनेमा होता ‘भूत बंगला’. त्याचं संगीत प्रचंड गाजलं आणि त्या दोघांची दोस्तीसुद्धा.
मेहमूदनं पंचमला ‘भूत बंगला’ सिनेमात एक भूमिका सुद्धा दिली. मेहमूदचं म्हणणं होतं, की ‘तो सर्वोत्कृष्ट विनोदी नट झाला असता’ पण पंचमला त्यात रस नव्हता. त्यातली, जागो सोने वालो..., प्यार करता जा..., आओ ट्विस्ट करे... ही गाणी तुफान लोकप्रिय झाली. त्यात काहीतरी हटके होतं. पण पंचम ऊर्फ आर डी बर्मन हे नाव दुमदुमलं ‘तीसरी मंज़िल’नंतर. त्या सिनेमात आधी हीरो देव आनंद होता.
नासिर हुसेन आणि त्याच्यात काहीतरी वाद झाले आणि देव आनंदनं सिनेमा सोडला. मग शम्मी कपूर हीरो म्हणून आला. त्या काळात शम्मी कपूरला शंकर जयकिशन किंवा ओपी नय्यर हे संगीतकार म्हणून हवे असत. पण नासिर हुसेनने ऐकलं नाही. तो आरडी बर्मनवर ठाम होता पण शम्मी कपूरचं मतही महत्त्वाचं होतं. त्यामुळं शम्मीनं आरडी बर्मन याला ऑडिशनसाठी बोलावलं. त्यासाठी जयकिशननं शम्मीकडे आरडीसाठी रदबदली केली.
आरडीनं त्याला, ‘देव तारा मत्तालो ओईना’ ह्या नेपाळी गाण्याच्या दोन ओळी ऐकवल्या. शम्मीनं पुढच्या दोन ओळी स्वतः म्हटल्या आणि म्हणाला, ‘मी हे गाणं जयकिशन ह्याला देणार. पुढची चाल ऐकवं.’ पंचम रूमच्या बाहेर आला. तो घाबरला होता. त्यानं सिगरेटचे दोन झुरके मारले आणि मग ‘ओ मेरे सोना रे सोना, आजा आजा, ओ हसीना झुल्फोवाली’’ च्या चाली ऐकवल्या. शम्मी तिथल्या तिथं नाचायला लागला. त्यानं पंचमला सांगितलं, ‘तू पास, तू माझा संगीतकार.’
आरडीला जयकिशननं सांगितलं, ‘असं संगीत तयार कर की लोकं म्हणाले पाहिजेत, हां भाई, बापका बेटा है.’ वडिलांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं आरडीनं ठरवलं. त्यानं ऑर्केस्ट्रामधल्या ब्रास सेक्शनला महत्त्व दिलं. त्याचा परिणाम आपण ‘ओ हसीना’ मध्ये ऐकतो. त्या गाण्यासाठी ८० वादक होते. त्यात ४० व्हायोलिन. तीसरी मंज़िल हा आरडीसाठी लँडमार्क सिनेमा होता.
त्यातलं ‘आजा आजा मैं हू प्यार तेरा’ हे त्याचं अत्यंत आवडतं गाणं. या गाण्यांमध्ये ७७ सेकंदांचा जो प्रील्युड आहे, त्यामध्ये प्रचंड वेगानं तीन वेळा वाजणारी १४ सेकंदांची लीड गिटार हे या गाण्याचं वैशिष्ट्य होतं. दिलीप नाईक या वादकानं गिटार वाजवली होती. आशाताईंच्या कार्यक्रमात कुणाला गिटार वाजवायची असेल, तर परीक्षा म्हणून हा लीड गिटारचा पीस वाजवायला सांगितला जायचा. या गाण्यात काय नाही? अद्भूत गिटार आहे.
ताल धरायला लावणारा ऱ्हिदम आहे. झिंग आणणारी आवर्तनं आहेत आणि पूर्ण कपडे घालून आशा पारेखने असा सेक्सी डान्स केलाय, की साधूने हातातलं कमंडलू फेकून नाचायला सुरुवात केली असती. शम्मी कपूर म्हणाला, ‘‘ हे गाणं ट्रेण्ड सेटर होणार.’ आशा भोसलेंनी रेकॉर्डिंग करण्यापूर्वी या गाण्यासाठी लतादीदींकडून मार्गदर्शन घेतलं होतं. सुरुवातीला रफीला हे गाणं जमत नव्हतं. त्याने कष्ट करून ते जमवलं. तिसऱ्या टेकमध्ये ते गाणं ओके झालं.
त्याच सुमारास नासिर हुसेन यांचा ‘बहारों के सपने’ हा सिनेमा आला. स्वातंत्र्य लढ्यातील एक सेनानी अब्दुल कलाम आझाद हे त्यांचे मामा. कदाचित तिथून असेल पण हिंसेपेक्षा अहिंसेचं गांधीवादी तत्त्वज्ञान त्यांना प्रिय होतं. त्यांनी ते या सिनेमात वापरलं. या सिनेमाची सर्वच गाणी चांगली होती. पण ती वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तयार केली आहेत असं वाटतं.
पण "चुनरी संभाल गोरी उडी चली जाये रे" हे गाणं आरडीचा स्पर्श असलेलं गाणं वाटतं. त्याचा जो ताल आहे तो आरडी पद्धतीचा आहे. जवळजवळ ९० सेकंदांचं पूर्व संगीत किंवा प्रील्युड या गाण्याला आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ढोल वाजवून ठेक्याचे अफलातून प्रकार केले आहेत.
१९६९ मध्ये देव आनंद, पंचमबरोबर उषा उत्थपचं गाणं ऐकायला गेला. तिचा आवाज ऐकून कार्यक्रमानंतर देव आनंदनं तिला ‘हरे रामा हरे कृष्णा’साठी गायची ऑफर दिली. त्या वेळी उषा २१ वर्षाची होती. ‘दम मारो दम’च्या तालमी सुरू झाल्या, तेव्हा ते गाणं उषा उत्थप आणि लता गाणार होत्या. अचानक काय जादू झाली देव जाणे. ते गाणं आशाचं झालं. त्या गाण्यात मादकता आणण्यासाठी आणि बेधुंदपण ओतण्यासाठी आशा भोसले आली.
वेगवेगळ्या व्हर्जन आणि तुकड्यात हे गाणं सिनेमात वापरलं गेलय. झीनत अमान या गाण्यासाठी जन्माला आल्यासारखी वाटली. आशानं गाण्याचं सोन केलं. आरडीनं या गाण्यापासून टेक ऑफ घेतला. त्यानं हिंदी सिनेसंगीताचं आकाश व्यापलं. आशा भोसले हे एक वेगळं साम्राज्य झालं.
आरडी हा क्रांतिकारी संगीतकार होता. जी क्रांती सी. रामचंद्र यांनी १९५० च्या उंबरठ्यावर केली, ती त्यानं १९७० मध्ये केली. त्यानं हिंदी चित्रपट संगीताचा बाज बदलला. त्यात वेगळेपण आणलं. ती पश्चिमात्य संगीताची नक्कल नव्हती. तिथून घेतलेली स्फूर्ती होती. त्याला स्वतःच व्यक्तिमत्त्व होतं.
आरडीच्या संगीताचा शास्त्रीय पाया सुद्धा मजबूत होता. तो ऱ्हिदमच्या प्रेमात असला, तरी मेलडीची साथ त्यानं सोडली नाही. आशा भोसले यांच्या यशात जेवढा वाटा, ओपीचा आहे, तेवढाच, आरडीचा आहे.
‘‘ रैना बीती जाये’’ हे गाणं ऐकून सज्जादसारखा संगीतकार, जो कौतुक करण्याच्या बाबतीत अत्यंत कंजूस होता, तो म्हणाला, ‘ऐसा लगता है की हर एक सूर खिले मारकर गाड दिया हैं.’
पावसाळा आला की मला ‘चिंगारी कोई भडके’ हे गाणं आठवतं. हे निव्वळ पावसाचं गाणं नाही. पण त्यातल्या दोन ओळी पावसाची रोमँटिक वातावरण निर्माण करण्याची ताकद दाखवतात. 'चिंगारी कोई भडके तो सावन उसे बुझाये सावन जो अगन लगाये उसे कौन बुझाये."
मूलतः गाणं ग्रेट आहे. 'ही आपली आवडती संगीतरचना आहे,' असं हेमंतकुमार सांगत.
या गाण्याची आणखीन एक खासियत आहे. या गाण्याची सुरुवात गिटारवरून एका मायनर कॉर्डनी केली आहे. ती गाण्याला मेलडी देते. ती सुंदर कॉर्ड गाणंभर पुन्हा पुन्हा भेटते. ती कॉर्ड कशी तयार झाली ठाऊक आहे?
भानू गुप्ता हे वादक एक म्युझिक सेशन आटपत असताना, त्यांनी सहज ओपन थर्ड स्ट्रिंगची एक शार्प मायनर कॉर्ड वाजवली. त्यातून वेगळा आवाज आला. तिथले लोक हसले. पण आरडीला त्यातून वेगळे संगीत ऐकायला आलं. त्यानं ती चुकीची कॉर्ड त्याला पुन्हा पुन्हा वाजवायला सांगितली. त्यानं ती कॉर्ड "चिंगारी कोई भडके" मध्ये वापरली. तो जीनियस होता.
त्यानं जुन्या रस्त्यांना नवी वळणं दिली. एक उदाहरण देतो.
"ये जो मोहब्बत है" हे कटी पतंग मधलं गाणं तुम्ही ऐकलंय ना? पूर्वी हिंदी सिनेमातला नायक प्रेमभंग झाल्यावर अक्षरशः नियम असल्याप्रमाणं मद्य घ्यायला लागायचा. दुःखी वाटण्यासाठी दाढीचे खुंट वाढवायचा. मेकअप करून डोळ्याखाली काळी वर्तुळ तयार करायचा. पण या गाण्यात राजेश खन्ना मस्त जॅकेट घालून एका टेबलापासून दुसऱ्या टेबलापर्यंत हेलकावे खात फिरत असतो. तो प्रेमभंग साजरा करतोय असं वाटतं. त्यात विव्हळणं नाही.
वॉल्ट्सचा थिरकता ठेका आहे. व्हायोलिनच्या खोल हार्मनीबरोबर गिटारचे सळसळते स्वर आहेत. सत्यजित रेंना हिंदी सिनेमाच्या संगीताबद्दल फारसं प्रेम नव्हतं. पण तरीही त्यांनी सोनार केल्ला या कथेत संदर्भ म्हणून ''ये जो मोहबात है'' या गाण्याचा उपयोग केला होता.
आरडीला कुठल्या आवाजाचं कधी आकर्षण वाटेल हे सांगता येत नसे. मला सांगा, बॅटरी डाउन झाल्यावर कार सुरू करण्याचा आवाज तुम्ही किती वेळा ऐकलाय? तुमच्याकडे गाडी असेल तर पूर्वी अनेकदा. कारण अलीकडच्या गाड्या फारसं स्टार्टिंग ट्रबल देत नाहीत. कुठं घाईत जाताना बंद गाडीचा असा आवाज कानाला फारसा गोड लागत नाही. पण पंचमनं एकदा तो ऐकला आणि त्यांनं केरसी लॉर्डला सांगितलं, ‘मला हा आवाज पाहिजे.’ केरसी लॉर्ड म्हणाले, "कसा काढणार? तोंडाने काढू?’
पंचम त्यांना म्हणाला, 'तो आवाज कसा काढायचा ते तू बघ. रेकॉर्डिंगला सात दिवस आहेत.'
केरसीनं हा आवाज मिनी मूग सिंथसायझर वर काढला. हे तीन सप्तकांचं वाद्य. हा आवाज आरडीनं 'हम किसीसे कम नही' सिनेमातल्या "ये लडका हाय अल्ला' या गाण्यात इंट्रोच्या ट्यूनमध्ये वापरला.
मोहम्मद रफीची या सिनेमात चार गाणी होती. किशोरकुमार नावाच्या झंझावातात या सिनेमामुळं रफी थकला. ‘क्या हुआ तेरा वादा’ या गाण्यासाठी सुषमा श्रेष्ठला फिल्म फेअर अवॉर्ड आणि नॅशनल अवॉर्ड मिळालं. ह्या मेलडीला भूपेंद्रची गिटार आणि उत्तमसिंहाच्या फिडेलची चांगली साथ मिळाली.गंमत म्हणजे या गाण्याची धून आरडीला फिर कब मिलोगी या सिनेमाच्या "तुम हमसे रुठे हो" या गाण्याच्या प्रील्युडमधून स्फुरली. या गाण्याला अपार लोकप्रियता मिळाली.
आरडीच्या ऋषी कपूर आणि नीतू सिंग या जोडीने साकार केलेल्या एका गाण्याने आम्हाला त्या काळात नवा मंत्र दिला. तो मंत्र होता, 'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो" ऋषी साधारण आमच्या वयोगटातला. त्यामुळे तो खराखुरा कॉलेज कुमार वाटायचा. आम्हीही कॉलेजमधलेच. त्या काळात इतर काही नट आणि नट्या कॉलेजला जाताना दाखवले जात. पण एकंदरीत त्यांच्याकडं पाहिल्यानंतर ते कॉलेजकुमार आहेत असं कधीच वाटलं नाही.
किंवा जर असतील तर त्या कॉलेजमध्ये प्रौढ साक्षरता वर्ग सुरू असावेत असं वाटायचं. ऋषी कपूरची जी रोमँटिक तरुण हीरोची प्रतिमा आमच्या पिढीच्या मनात रुजली, त्याला आरडीच्या तरुण संगीतानं फार मोठा हातभार लावला. जसा शम्मी कपूरचा धसमुसळेपणा शंकर जयकिशनच्या संगीतानं फुलवला, तसं आरडीनं ऋषी कपूरच्या बाबतीत केलं.आरडी हा दिग्दर्शकाला सतत सतावणारा माणूस होता.
सिच्युएशन काय आहे? हिरोची काय ॲक्शन असणार? वगैरे गोष्टींचा विचार करून तो संगीत तयार करायचा. आणखीन एक किस्सा सांगतो.
भूपेंद्र एकदा मित्रांबरोबर मुंबईत स्ट्रॅड बुक स्टॉलजवळच्या वाद्यांच्या दुकानात गेला आणि तिथे त्यांनी सुनील कौशिकच्या सांगण्यावरून ट्वेल्व स्ट्रिंग (Twelve String) गिटार घेतली. तिचा उपयोग आरडीने ''चुरा लिया है तुमने जो दिलको'' या गाण्यात केला. गाण्याच्या प्रील्युड मध्ये ग्लासांच्या खणखणाटाबरोबर ही गिटार किती सुंदर वाजते.
आरडी हा संगीताच्या वातावरणात जन्माला आल्यामुळं आवाजाचा सेन्स, आवाजाचं वेड तो आईच्या पोटातूनच घेऊन आला. ज्या काळात इलेक्ट्रॉनिक वाद्य आजच्या काळाएवढी विकसित झालेली नव्हती, त्या काळात त्यांनी विविध आवाज काढले. त्यातल्या इनोव्हेशनच्या एका कडेलोटाबद्दल मी सांगतो. रणधीर कपूर एकदा आरडीकडे गेला.
आरडी त्या वेळी काय करत असेल? तो आणि त्याचे सहायक अर्ध्या भरलेल्या बियरच्या बाटल्यांमध्ये फुंकर मारत होते. रणधीर कपूरच काय पण कुठल्याही कपूरला बियरची बाटली ही फक्त पिण्यासाठीच असते असंच माहिती असावं. पण त्यातून काही वेगळ्या गोष्टी घडू शकतात याची त्यांना कल्पना नसावी. एके काळी नवरात्रीत घागरी फुंकण्याची प्रथा होती. काही वेळेला एखाद्या स्त्रीच्या अंगात आलं, की ती घागर फुंकायची.
पण बिअरच्या बाटल्या फुंकण्याचे दृश्य कोणी पाहिलं नव्हतं. पण रणधीरला काय कल्पना, की आरडीच्या अंगात संगीत संचारलं होतं! आरडीने त्याला सांगितलं, मी एक नवीन आवाज तयार करतोय. त्याने तो आवाज तयार केला. त्या बाटल्यांमधली उरलेली बियर रणधीर कपूरनं संपवली असावी, असा माझा कयास आहे. त्या बाटल्यांतून तयार झालेला आवाज आपल्याला "मेहबूबा ओ मेहबूबा" या शोलेच्या गाण्याच्या सुरुवातीला ऐकायला मिळतो.
रेकॉर्डिंगच्या वेळेला तो आवाज स्टुडिओत तयार केला गेला. तो तयार केला बासू चटर्जीनं. त्याला मांदलची साथ होती आणि पाठोपाठ रबाब आणि उर्दू ढोलकचा ठेका होता. उर्दू ढोलक म्हणजे ढोलक उलटा ठेवून ढोलकचा बाया वाजवणे. या गाण्याचा मुखडा रुसोसच्या "से यु लव्ह मी" या गाण्यावरून घेतला होता. रमेश सिप्पी आणि त्याची बायको गीता ह्यांनी हे गाणं लंडनमध्ये ऐकलं होतं. त्यांना ते प्रचंड आवडलं.
त्याने ते आरडीला दिलं आणि त्याला सांगितलं, ह्या धर्तीवर गाणं तयार कर. मेहबूबा मेहबूबा हे गाणं त्या धर्तीवर तयार केलं गेलंय. त्याचा एक गाजलेला सिनेमा म्हणजे ''कारवाँ''. संगीताच्या बाबतीत लोकसंगीत, जाझ, स्लूज आणि पूर्व युरोपिअन भूमीतून फिरवून आणणारा हा प्रवास होता.
एका मोठ्या घराण्याची वारसदार आपला जीव वाचवण्यासाठी जिप्सींच्या कबिल्यात आश्रय घेते. अशी त्याची कथा आहे. त्यामुळे त्यात लोकसंगीतावर आधारित गाणी होती.
उदाहरणार्थ, "चढती जवानी मेरी चाल मस्तानी" आणि त्यात "पिया तू अब तो आजा" यासारखे कॅब्रे ढंगाचं गाणं होतं. ते आशा आणि पंचमचं द्वंद्व गीत होतं. आरडीच्या काही हॉट गाण्यात या गाण्याचा समावेश करता येईल. त्यातली हेलनची देहबोली अत्यंत आसक्तीची देहबोली होती. चरणजित सिंह यांची बेस गिटार आणि बर्जी लॉर्ड यांचा वायब्रो फोनने गाण्याची सुरुवात होते. मग पियानो कीजंच्या साहाय्याने बारा ठोके पडतात. तिथून गाणं वेग घेतं. केरसी लॉर्ड यांचा की बोर्ड आणि जॉर्ज फर्नांडिस यांचा ट्रंपेट या वाद्यांच्या साहाय्यानं गाणं मनाचा ठाव घेतं.
आरडीचे कान किती तीक्ष्ण होते आणि अँटेनाप्रमाणे कुठले कुठले आवाज ते आत्मसात करत असत याची अनेक उदाहरणे आहेत. त्यातलं आणखीन एक सांगतो. पंचमच्या घरी एक मोलकरीण लादीवरचे डाग घालवण्यासाठी वृत्तपत्राचा कागद घासत होती. त्यातून जो आवाज निघत होता त्याकडे पंचमचं लक्ष होतं. त्याने मोलकरणीला तो आवाज काढत राहायला सांगितलं.
तो आवाज त्याने आपल्या डोक्यात साठवून ठेवला आणि मग खोल या बंगाली चर्मवाद्यावर ॲल्युमिनियम फॉइल घासून तो आवाज स्टुडिओत तयार करण्यात आला आणि तो कुठे वापरला असेल? तर ज्वेल थीफमधल्या "होटो पे ऐसी बात मैं दबाके चली आयी" गाण्याच्या वेळी सुदर्शन अधिकारी यांनी तो आवाज काढला.
आरडी अर्थातच पुस्तकाचा विषय. त्याला लेखात सामावण्याचा प्रयत्न करणं म्हणजे समुद्राचा तलाव करण्याचा निष्फळ प्रयत्न झाला. पण हा या वर्षातला आणि माझ्या या स्तंभातला शेवटचा लेख. तुमच्याशी फिल्मी गप्पा मारताना, किस्से एखाद्या चुइंगमसारखे चघळताना खूप मजा आली. अनेक वाचकांना या गप्पा आवडल्या आणि त्यांची पसंती त्यांनी मला फोनद्वारे, ई-मेल द्वारे कळवली.
त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. दैनिक सकाळनं मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. हा स्तंभ इथं संपला, तरी, तुम्ही वाचक आणि माझं नातं राहीलच. हे नववर्ष तुम्हाला सुखाचं, आनंदाचं आणि भरपूर वाचनाचं जावो.
(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.