यश : दोन व्याख्या, एक वाट

‘आयुष्यात सर्वात जास्त काय हवंय?’ या प्रश्नावर ते एकसुरात म्हणाले होते : ‘सत्ता, प्रसिद्धी, पैसा आणि यश’!
education job board-meeting of Britannia Power fame money and success
education job board-meeting of Britannia Power fame money and successsakal
Updated on
Summary

‘आयुष्यात सर्वात जास्त काय हवंय?’ या प्रश्नावर ते एकसुरात म्हणाले होते : ‘सत्ता, प्रसिद्धी, पैसा आणि यश’!

कोकणातल्या दुर्गम भागातल्या एका कॉलेजच्या प्राचार्यांनी भेटीचं निमंत्रण दिलं. मित्र असल्यानं नाही म्हणू शकलो नाही. पहाटे तीनला उठलो, दीडशे किलोमीटर प्रवास करून तिथं पोहोचलो. शिक्षकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि दुपारचं जेवण टाळून संध्याकाळी ‘ब्रिटानिया’च्या बोर्ड-मीटिंगला उपस्थित राहण्यासाठी परत निघालो. खरं तर थकवा जाणवायला पाहिजे होता; पण थकलो नव्हतो. अस्वस्थ झालो होतो. विद्यार्थ्यांच्या संवादानं अस्वस्थ झालो होतो.

‘आयुष्यात सर्वात जास्त काय हवंय?’ या प्रश्नावर ते एकसुरात म्हणाले होते : ‘सत्ता, प्रसिद्धी, पैसा आणि यश’!

तुम्ही म्हणाल, त्यात काय नवल?

नॉर्मल उत्तर आहे. हे माहीत असूनही मी अस्वस्थ होतो - त्यांच्या आकांक्षेमुळे नव्हे; पण ज्या आवेगानं आणि उतावीळपणानं ही आकांक्षा व्यक्त करण्यात आली होती, त्यामुळे. असं भासत होतं की, यश हेच जीवनाचं एकमेव ध्येय आहे.

असं दिसत होतं की, यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ते इतके आसुसलेले आहेत की त्या प्रक्रियेत वाटेल ती किंमत मोजावी लागो किंवा कुणालाही इजा होवो, त्याची त्यांना क्षिती नसावी.

या प्रश्नोत्तरांनी मला केम्ब्रिज विद्यापीठात १९६७ मध्ये प्रोफेसर एडमंड लीच यांनी दिलेल्या ‘रीथ मेमोरिअल लेक्चर’ची आठवण झाली. ते म्हणाले होते : ‘जे शिक्षण केवळ वैयक्तिक कामगिरीवर जोर देतं ते सामाजिक बदलाच्या समस्यांना प्रभावीपणे तोंड देऊ शकतील असे संतुलित नागरिक निर्माण करू शकत नाही; ते फक्त प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करण्याचं एकमेव उद्दिष्ट ठेवणारे निर्बुद्ध लढवय्ये निर्माण करतं.’

...गाडी घाट चढू लागली. परतीचा प्रवास करताना मान्सूनच्या सौंदर्यानं मन मोहून गेलं...जादू आत्म्यापर्यंत पोहोचली. अदृश्य पंखांनी तरंगणारं धुकं आणि रिमझिम पावसानं गाडीला अलगद घेरलं. ती गाढ शांतता कानात साठवण्यासाठी मी गाडी थांबवली.

साठच्या दशकात शिक्षण ही जास्तकरून उच्चवर्गीयांसाठीची गोष्ट होती; निदान मोठ्या महाविद्यालयांत तरी. तिथं प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांचं घर हे संपन्न आणि पालक हे व्यापक संबंध असणारे असत.

‘नोकरी मिळवणं’ हे तेव्हादेखील उद्दिष्ट असायचं; पण आजच्यासारखा जीवन-मरणाचा प्रश्न नव्हता तो. त्या काळात निरनिराळ्या विषयांचा वेध, वाचन, चर्चा, आकलन यांवर भर असायचा; पण तेव्हाचा काळ वेगळा, आजचा वेगळा.

जीवघेण्या स्पर्धेच्या या वातावरणात, प्रसारमाध्यमांनी उभ्या केलेल्या भडक स्वप्नांमुळे प्रेरित झालेल्या, बेताच्या परिस्थितीतून आलेल्या मुलांच्या बाबतीत बरोबर-चूक ठरवणारा मी कोण? आजची मुलं नाव आणि प्रसिद्धी मिळवण्याचे सोपे मार्ग शोधत असतील किंवा त्यासाठी मूल्यांशी तडजोड करत असतील तर त्यांचं वर्तन योग्य की अयोग्य हे ठरवणारा मी कोण?

स्वतःची अशी समजूत घालून, डोंगरांचं सुखद दृश्य आणि धुकं - पाऊस यांचा लपंडाव पाहत मी थोडा वेळ शांत बसलो. मनाला झालेला डंख उतरला. विचार रेंगाळतच राहिला. वेळ होत होती म्हणून घराकडे निघालो.

या तरुणांच्या बोलण्यात इतका ठामपणा कशामुळे आला असेल? सत्ता असली की इतरांवर नियंत्रण मिळवता येतं, प्रभाव गाजवता येतो म्हणून? संपत्ती असेल तर हवं ते समाधान त्वरित मिळवता येतं म्हणून?

सत्तेमुळे बदलला नाही असा कुणीच नाही; बहुतेकजण अनैतिक वर्तणुकीला बळी पडतात. सत्ता भोगूनही नम्र आणि प्रामाणिक राहिलेले फारच थोडे...आणि संपत्तीबद्दल सांगायचं तर, तिच्यामुळे ‘ऐशो-आराम’ मिळतो; पण आनंद आणि समाधान??

गणिताच्या भाषेतच बोलायचं झालं तर, दहा बाय दहाच्या खोलीतून सुरुवात करून एखाद्या सर्वसामान्य माणसाची राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याची शक्यता किती? आपल्या लोकसंख्येच्या मानानं दशांशाच्या १३६ व्या स्थानाच्या आसपास.

याचा अर्थ असा की, आपल्यातले काहीजण सोडले तर बहुतेकांना सर्वसाधारण आणि रटाळ आयुष्य जगण्याचा - आणि त्याची भरपाई म्हणून ‘व्यक्तिमत्त्वविकासा’ची किंवा सामर्थ्यवानांची ‘चरित्रं’ वाचून अप्रत्यक्ष समाधान मिळवण्याचा - शाप आहे का?

की ज्याला आपण यश समजतो त्यात तर काही गल्लत नाही ना?

बऱ्याच वर्षांपूर्वी मी कपिल कपूर नावाच्या एका तरुण डॉक्टरलाभेटलो होतो. रुग्णांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच त्याच्यासाठी यश होतं. तो हुशार होता आणि त्यामुळेच मुंबईतल्या सर्वोत्कृष्ट डॉक्टरांच्या हाताखाली काम करण्याची त्याला संधी मिळाली होती.

त्या डॉक्टरांनी याला ज्ञान आणि कौशल्य तर शिकवलंच; पण त्याबरोबरच ‘आनंदामुळे यश मिळतं, यशामुळे आनंद नव्हे,’ हा दृढ विश्वासही त्याच्यात निर्माण केला होता. तो विश्वास आणि डोळ्यांत एक चमक घेऊन कपिल ऐंशीच्या दशकात उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेला आणि नंतर त्यानं तिथंच नोकरी पत्करली; पण तिथंही - याबाबतीत अल्पसंख्य असूनही - तो त्याच्या विश्वासावर ठाम होता.

कर्मचारी त्याचा आदर करायचे...रुग्ण प्रेम करायचे...आणि कुटुंबीय निराश व्हायचे; पण तो डगमगला नाही. रूढार्थानं त्याच्या इतर काही सहकाऱ्यांनी अधिक लक्षणीय कामगिरी केली की नाही मला माहीत नाही; परंतु तसं जरी झालं असतं तरीसुद्धा त्यानं त्याचा त्रास करून घेतला नसता.

अचूक निदान, नामांकित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत आपल्या संशोधनाचे निष्कर्ष छापणं, लोकांच्या वेदना आणि दुःख कमी करणं - वैयक्तिक त्रासाची पर्वा न करता - या सगळ्यातला थरार अनुभवणं हेच त्याला ‘बक्षीस’ वाटत असे. याहून अधिक त्याची अपेक्षा नव्हती. आणि कदाचित, त्यामुळेच देव अथवा जो कुणी या विश्वाची काळजी घेतो, त्यानं यश त्याच्या दारात आणून उभं केलं.

घाट चढून वरती आल्यावर थकायला झालं होतं. चहा हवा होता म्हणून एका टपरीजवळ थांबलो. हवेतला गारवा आणि पावसाची हलकीशी रिमझिम अशा वातावरणात गरमागरम बटाटेवडा आणि वाफाळता चहा पिताना मस्त वाटलं.

डोक्यातले विचार चालूच होते.

‘यशाची व्याख्या कोण कशी करतो यावरच सगळं ठरत असतं,’ मी स्वतःशीच म्हणालो. खूप वर्षांपूर्वी दिल्लीत रिझर्व्ह बँकेचा प्रादेशिक संचालक असताना स्थानिक संचालक मंडळाचा सचिव म्हणून माझ्यावर जबाबदारी होती.

भारत सरकारचे तेव्हाचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. अब्दुल कलाम हे अध्यक्ष होते. एका नियोजित बैठकीची माहिती देण्यासाठी मी एकदा त्यांच्या घरी गेलो. ब्रीफिंग संपल्यावर मी निरोप घ्यायला लागलो; परंतु त्यांनी आग्रह केला की ‘छान, फिल्टर कॉफी घेऊ.’

पुन्हा बसलो तेव्हा मी त्यांना विचारलं : ‘‘आपल्या देखरेखीखाली सुरू असलेलं मिसाईलनिर्मितीचं कार्य ‘सार्वजनिक हिता’चं आहे का?’’

प्रश्न धाडसाचा होता.

ते शांत राहिले; चिडले नाहीत. थोड्या वेळानं म्हणाले :‘‘मला माहीत नाही, थोरात. मात्र, फार पूर्वी असं काहीतरी घडलं, ज्यानं मला खूप समाधान मिळालं. तुम्ही जाणताच, मी गरीब परिस्थितीतून आलो आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी, माझ्या गावातील काही लोक ‘एम्स’मधील कार्डिॲक विभागातील तज्ज्ञांची भेट मिळवून द्यावी म्हणून माझ्याकडे आले होते. शक्य होतं ते मी केलं; पण ते पुरेसं नव्हतं.

रुग्णाला स्टेंटची गरज असल्याचं रिपोर्टवरून लक्षात आलं. त्या काळात स्टेंट आयात केले जात असल्यानं ते महाग होते आणि अशा कुटुंबाना परवडणारे नव्हते. मी मदत देऊ केली; पण त्यांनी फक्त औषधोपचार करायचं ठरवलं आणि गावी परतले. नंतर कळलं की, त्या रुग्णाचं निधन झालं. त्या घटनेचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला.

कदाचित्, अपराधीपणाची भावना कमी व्हावी म्हणून मी मिसाईल-संशोधनाचं काम बाजूला ठेवून वेळ काढला, स्वदेशी स्टेंट-प्रोटोटाइपवर काम केलं, त्याचे निष्कर्ष संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले आणि माझ्या नेहमीच्या कामावर परतलो. कालांतरानं विमानतळावर एक बाई भेटली. स्वतःची ओळख करून देत मला म्हणाली : ‘तुम्ही माझ्या हृदयात आहात!’

मी गोंधळलो. मग तिनंच खुलासा केला की स्वदेशी स्टेंट - ज्यावर मी थोडंफार काम केलं होतं - ते विकसित करून तिच्या हृदयात बसवण्यात आलं आहे. खूप समाधान वाटलं.

तुमच्या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही. मिसाईल बनवणं हे माझं काम आहे आणि शक्य तितक्या उत्कृष्टपणे मी ते करतो; परंतु उत्कृष्टता म्हणजे पूर्ती नव्हे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ असं उद्दिष्ट साध्य करणं ही खरी कामगिरी.

घाट ओलांडून पुढं जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उसाची हिरवीगार शेती लागली...

डॉ. कलामांनी सांगितलेल्या गोष्टीवर चिंतन करत असताना एक ध्यानात आलं - डॉ. कलाम आणि डॉ कपूर, दोघांचीही यशाची कल्पना स्पष्ट होती. त्यांच्यासाठी यश म्हणजे इतरांच्या कल्याणासाठी आणि आनंदासाठी हातभार लावणं; पण ते दोघं झाले अपवाद.

आपल्यापैकी बहुतेक लोक इतक्या उच्च हेतूनं प्रेरित नसतात. आपले हेतू संमिश्र असतात - काही नि:स्वार्थी, काही स्वार्थी. आपण हाडा-मांसाची साधी माणसं आहोत. थोड्याफार प्रमाणात का असेना, आपल्याला प्रत्येक गोष्ट हवी असते - थोडी सामाजिक प्रतिष्ठा,

बऱ्यापैकी बँकबॅलन्स, सुंदर घर, देखणा पती किंवा आकर्षक पत्नी आणि प्रेमळ मुलं...अशा लोकांसाठी यश ही एक मध्यम उद्दिष्टांची गोळाबेरीजच असते. आश्चर्य म्हणजे, कमी-जास्त प्रमाणात बहुतेकजण ते साध्य करतात. त्यांना माहीत असतं की, पाहिजे ते सगळंच मिळणं शक्य नाही. म्हणून पदरी पडेल त्यात ते आनंद मानतात; पण जे अशा लोकांपेक्षा निराळे असतात - ज्यांना आयुष्यात ‘बिग बँग’ हवा असतो, त्यांचं काय?

अशांना ‘माधवी’ होण्याशिवाय पर्याय नाही!

आज भेटलेल्या तरुणांमध्ये माधवीच्या मार्गानं जाण्याची धमक आहे का हा मला प्रश्न पडला... मुंबईला जाणाऱ्या कनेक्टिंग फ्लाइटची मी अॅमस्टरडॅम विमानतळावर वाट पाहत असताना मला माधवी भेटली.

डिपार्चर लाउंजमध्ये पुस्तक वाचत असताना ती माझ्याकडे मदतीसाठी आली. मी चकित झालो. कदाचित मी तिच्याच वर्णाचा ‘निरुपद्रवी’ वाटणारा वृद्ध होतो म्हणून असेल. कारण काही असो, ती भारतीय वाटत होती आणि पाश्चिमात्य पोशाखात असली तरी छोट्या शहरातून आली असावी असं तिच्याकडे बघून वाटत होतं.

तिच्या तिकिटाचा काहीतरी घोळ झाला होता आणि काउंटरवरची बाई ऐकत नव्हती. तिची समस्या सोडवण्यात माझ्या वयाचा उपयोग झाला. प्रश्न सुटला. मी पुन्हा पुस्तकाकडे वळलो. ती जवळ येऊन बसली. कुतूहलापेक्षा सभ्यपणा म्हणून मी विचारलं : ‘‘तू अॅमस्टरडॅमला कशी काय आलीस?’’

‘‘काम,’’ ती म्हणाली. तिनं सांगितल्यानुसार, ती एका प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत होती आणि जर्मन शस्त्रास्त्र-उद्योगातल्या सॉफ्टवेअरशी संबंधित तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी टीम लीडर म्हणून तिला इकडं पाठण्यात आलं होतं.

‘‘काम संपलं, आता घरी चाललेय,’’ ती म्हणाली.

‘‘घर कुठंय?’’ मी विचारलं.

‘‘महाराष्ट्र, इचलकरंजी.’’ ती उद्गारली.

‘‘काय योगायोग! मी कोल्हापूरचा - म्हणजे आपण शेजारी,’’ मी म्हणालो.

प्रदेशामुळं आम्ही एकत्र आलो. तिच्यासाठी मी कॉफी आणली. आम्ही गप्पा मारल्या. ती हुशार वाटली...आत्मविश्वासपूर्णही.

‘आयआयटी’त शिकली असावी, माझ्या मनात आलं.

‘‘कुठं शिकलीस?’’ मी विचारलं.

‘‘नगरपालिकेच्या शाळेत, बागेतल्या दिव्याच्या उजेडात,’’ न संकोचता तिनं उत्तर दिलं.

‘‘आणि तुझे आई-वडील?’’ अडखळतच मी विचारलं.

‘‘वडील बांधकाम-कामगार आणि आई मोलकरीण. मी पण ते काम केलंय,’’ भावना, विद्रोह आणि अभिमानानं तिचा आवाज थरथरत होता. तेवढ्यात तिच्या फ्लाईटची घोषणा झाली आणि सामान उचलून ती निघू लागली.

‘‘बेस्ट लक, माधवी...’’ मी म्हणालो.

तिनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली : ‘‘डॉ. थोरात, नशिबावर किंवा नियतीवर माझा विश्वास नाही; प्रयत्नावर आहे. मला फक्त माझ्यासाठीच नव्हे तर, सर्व बांधकामकामगारांच्या आणि मोलकरणींच्या मुलांसाठी चांगलं भविष्य हवं आहे - हे

साध्य करण्यासाठी आयुष्यानं सर्व दरवाजे उघडेपर्यंत मी प्रयत्न करत राहीन; आणि तसं झालं नाही तर, स्वतः दरवाजे उभे करून ते स्वतःच उघडेन! खात्री बाळगा.’’

असं म्हणून बॅग खांद्याला लटकवून ती निघून गेली...वास्तवावर आत्म्यानं मिळवलेल्या विजयाचा सुगंध मागं ठेवून.

गाडी पोर्चमध्ये पोहोचली तसा माझा मूडही बदलला. आपण इतके निराश का झालो होतो याचं आश्चर्य वाटलं. जर एखाद्या ‘मोलकरणी’ची मुलगी आकांक्षेच्या उंच शिखरावर पोहोचू शकते, तर इतर कुणीही नक्कीच पोहोचू शकेल.

बोर्ड-मीटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी कॉम्प्युटर सुरू केला, तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सर्व तरुणांचे चेहरे नजरेसमोर तरळले...तरुण चेहरे, सुंदर चेहरे. या विश्वात आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी उत्सुक असलेले चेहरे.

अचानक वाटून गेलं की, त्यांना यश मिळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांना यश मिळवून देण्यात मी स्वत: समर्थ नसल्यानं छताकडे पाहत म्हणालो : ‘‘बाबा रे, तू जो कुणी असशील आणि जिथं कुठं असशील, आज भेटलेल्या त्या तरुणांना जे हवं ते त्यांना मिळवून दे आणि यशासोबत शहाणपणही दे त्यांना.

सरतेशेवटी त्यांना कळो की, यशातून मिळणारं नाव, कीर्ती किंवा संपत्ती या नश्वर गोष्टी आहेत. वास्तविक, स्वत:विरुद्ध लढणं, स्वतःच्या कमकुवतपणावर मात करणं, मोहांवर विजय मिळवणं आणि प्रतिकूल परिस्थितीतदेखील स्वतःची मूल्यं आणि धारणा ढळू न देणं याच गोष्टी अमूल्य आहेत.

...आणि देवा, जर जास्त त्रासाचं नसेल तर, त्यांच्यावर दया कर आणि शाश्वत विजय मिळवण्यासाठी चिरंतन प्रयत्न करण्याची त्यांना संधी दे.’

नशेमन-बर-नशेमन इस तरह तामीर करता जा के बिजली भी गिरते गिरते बेजार हो जाए (तू बाग फुलवत फुलवत जा...ही बाग तू अशी काही फुलव की, वीज कोसळली तरी, तिनं बागेची नासधूस केली तरी...तरी, एक क्षण असाही येईल की, कोसळून कोसळून त्या विजेलाही थकून शांत व्हावंच लागेल!)

(अनुवाद: डॉ. रघुनाथ कडाकणे) raghunathkadakane@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.