Balbharati Marathi Poem Controversy
बालभारतीच्या पुस्तकांवरून होणारे वाद ही गोष्ट नवी नाही. कधी छपाईवरून, कधी त्यातल्या साहित्यावरून, कधी पुस्तकांमध्ये असणाऱ्या चुकांवरून, चित्रांवरून असे अनेक वाद होत आलेले आहेत. आजच्या काळात याला समाजमाध्यमांची जोड मिळाल्यामुळे ते अधिक विस्तारतात, चर्चा होत राहते. आत्ता सुरू असलेला कवितेचा वादही याला अपवाद नाही.
मात्र या वादाच्या निमित्तानं पाठ्यपुस्तकांचा दर्जा काय असावा यावर अधिकाधिक चर्चा होणं आवश्यक आहे; आणि त्यातही आरंभिक वाचन-लेखन ही ज्या वयात अतिशय मूलभूत अशी बाब आहे तिथे अधिकच जागरूक असणं महत्त्वाचं आहे.
याचबरोबर आपल्याकडं अनेक भागांत पाठ्यपुस्तक हाच वाचनासाठी एक (मेव) महत्त्वाचा आधार आहे, तिथं तर पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीकडे अधिक विचारपूर्वक आपल्याला पाहावं लागेल. या निमित्तानंच काही मुद्द्यांचा विचार या लेखात करणार आहे. याला अर्थातच गेली अनेक वर्ष मी ग्रामीण, आदिवासी आणि शहरी भागातील मुलांसोबत करत असलेल्या कामाचा आधार आहे.
प्रदेशानुरूप रचना हवी
आत्ता सुरू असलेल्या वादाच्या अनुषंगाने आपण सुरुवात करू. पहिली-दुसरीच्या पातळीवर जिथं मुलं नुकतीच वाचन-लेखनाकडं वळत असतात, तिथं यासाठी निवड करताना अधिक सजग राहावं लागतं. यात दोन-तीन गोष्टी प्रामुख्यानं विचारात घ्याव्या लागतात. एक म्हणजे मुलांची सामाजिक पार्श्वभूमी.
ती महत्त्वाची अशासाठी, की मुलं ज्या भागामध्ये राहतात तिथली भाषा अर्थातच त्यांच्या कानावर पडत असते, त्या भाषेमधून ती काही प्रमाणात व्यवहार करत असतात, घरी बोलत असतात, मित्रांशी बोलत असतात, खेळताना ती भाषा वापरत असतात. अर्थातच ती परिसरातली भाषा त्यांच्या परिचयाची असते. त्यामुळे ती भाषा ही सुरुवातीची त्यांची शिकण्याची भाषा होणं जास्त सयुक्तिक ठरतं.
ही जर बाब आपण विचारात घेतली, तर पूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वसमावेशक असं एक पाठ्यपुस्तक असण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विविध भागातील मुलांसाठी पाठ्यपुस्तकांची रचना वेगळी असणे आवश्यक आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या भाषेपेक्षा मराठवाड्याची भाषा वेगळी आहे आणि विदर्भाची भाषा त्याहून वेगळी आहे. ‘राजू बंदराला गेला’ या वाक्याचा जो अर्थ कोकणातल्या मुलांना समजेल, त्यापेक्षा अगदीच वेगळा आणि विनोदी अर्थ विदर्भातील मुलं घेतील.
आपल्याला या दृष्टिकोनातून पाठ्यपुस्तकांचा विचार करायला लागेल आणि ती स्थानिक, म्हणजेच त्या त्या परिसरातल्या भाषेला सामावून घेणारी असावी लागतील. हळूहळू पाचवी-सहावीच्या टप्प्यावर सर्वसमावेशक पाठ्यपुस्तकाकडं जाता येईल. यातही महाराष्ट्राच्या सीमेलगत असणाऱ्या आदिवासी भागातली भाषा आणखी वेगळी आहे.
असं स्थानिक भाषेचा आधार घेत मुलांना आरंभिक वाचन-लेखनाकडं घेऊन जाणारे अनेक प्रयोग महाराष्ट्रात अनेक संस्थांनी केलेले आहेत आणि ते यशस्वी झालेले आहेत. पाठ्यपुस्तकाला समांतर आणि साहाय्यभूत ठरणारी अशी अनेक शैक्षणिक साधनं तयार झालेली आहेत, (आणि ती निश्चितपणे अधिक विद्यार्थिस्नेही आहेत !) त्यांच्या वापराने मुलं शिकती झालेली आहेत, अशा प्रकारची रचना पाठ्यपुस्तकांची व्हावी लागेल आणि हे करणं अवघड नाही.
मुलांची भाषा-शिक्षणाची नैसर्गिक रचना
दुसरं म्हणजे, मुलांची भाषा शिकण्याची नैसर्गिक अशी प्रक्रिया आहे. मुलांना पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी, बोलायला उद्युक्त करणारी रचना त्यांच्या भाषा विकासाला मदत करते. त्याचा विचार पाठ्यपुस्तक तयार करताना व्हायला हवा. तो अगदीच होत नाही असं मी म्हणणार नाही, गेल्या काही वर्षांतील पाठ्यपुस्तकं त्यानुसार बदललेलीही आहेत, पण तेवढेच पुरेसं नाही तो अधिक सखोलपणे व्हायला हवा आणि मुख्य म्हणजे तो शिकवण्याकडून शिकण्याकडं जाणारा असायला हवा.
परीक्षा, प्रश्नोत्तर लेखन इत्यादीला अवास्तव महत्त्व आपण देऊन ठेवलेलं आहे आणि नकळतपणे पाठ्यपुस्तकांचा विचार त्या आधारेच आपण करतो, तो बदलायला हवा. नाहीतर सगळ्यांचा उद्देश शेवटी परीक्षा हाच राहतो, त्याचं अवास्तव महत्त्व कमी करायला हवं. नाहीतर शिक्षकांचा शिकवण्याचा उद्देशही परीक्षेभोवतीच मर्यादित राहतो.
अर्थातच याही बाबतीतलं काम महाराष्ट्रात अनेक स्वयंसेवी संस्थांनी केलेलं आहे. त्याचा आधार अधिक घ्यायला हवा. ही जर मुलांची नैसर्गिक पद्धत लक्षात घेतली आणि त्या अनुषंगाने आरंभिक वाचन लेखनाची रचना केली, तर मुलं अधिक चांगल्या प्रकारे भाषा शिक्षण किंवा कोणत्याही विषयाचं शिक्षण घेऊ शकतील.
तिसरी बाब आहे ती म्हणजे मुलांबद्दल. आपल्या मनामध्ये असणाऱ्या अनेक समजुतींची. मुलं म्हणजे प्राणी-पक्ष्यांच्या गोष्टी, मुलांसाठी साहित्य म्हणजे चित्रं, अधिकाधिक यमकानुसारी रचना इत्यादी अनेक गोष्टी आपल्यामध्ये भिनलेल्या आहेत आणि त्यामुळं मुलांसाठीच साहित्य म्हटलं की ते याच प्रकारे तयार केलं जातं. मुलांना चित्र आवडतात हे खरंच. पण मुलं अनेक गोष्टी स्वतःच्या कल्पनेतून समजूनही घेत असतात.
फक्त शब्द त्यांच्या अधिक परिचयाचे लागतात; किंवा परिचयाचे नसले तरी प्रवाही लागतात. ( विंदा करंदीकर यांच्या बालकविता या दृष्टीने जरूर अभ्यासाव्या.) अनेक चमत्कृतीपूर्ण शब्दयोजना मुलं बोलताना करत असतात आणि तशा शब्दयोजना आपण त्यांच्याशी बोलताना, गोष्टी सांगताना केली तर ती त्यांना आवडते.
त्यातून मुले भाषेच्या अधिक जवळ जातात. त्यांना चित्रांची फारशी गरजच लागत नाही. मुलं कल्पनेतून त्या छान प्रकारे समजून घेतात. भाषेशी त्यांना खेळायचं असतं, हे जितकं त्यांना मिळेल तितकी त्यांची भाषेची ओढ वाढत जाते, त्यांची भाषा सुधारत जाते.
याच संदर्भात आणखी एक मुद्दा आहे तो भाषेच्या मोडतोडीचा. मुलं अशी मोडतोड करत असतात आणि मुलांसाठीच्या चांगल्या साहित्यातही अशी मोडतोड दिसते. खरं तर ती मोडतोड नसते तर त्या साहित्यकृतीच्या संदर्भात चपखल बसणारी ती भाषा असते. जी मुलांसाठी अधिक जवळची असते. मात्र याचा अर्थ यमकाला यमक जुळवणं असा नसतो.
सात वेळा घातला पेच, नऊ वेळा दिली हूल
अक्कड मिट्टी फक्कड मिट्टी, तुमचा पतंग झाला गुल
असं जेव्हा विंदा लिहितात, तेव्हा ती भाषेची मोडतोड वाटत नाही आणि मुलांना तर ती मनापासून आवडते.
अर्थात मी हे म्हणतोय याचा अर्थ त्याच कविता आज घ्याव्यात किंवा तेच ४०-५० वर्षांपूर्वीचं साहित्य आज घ्यावं असं अजिबात नाही. कारण तेव्हाची भाषा, शब्द वापरण्याची पद्धत आज पूर्णपणे बदललेली आहे. आजच्या काळात सुसंगत असे नवे साहित्यिक आपल्याला शोधावेच लागतील आणि नवं साहित्य मुलांसाठी निर्माण करावंच लागेल आणि ते अधिक जाणीवपूर्वक विचारपूर्वक आणि कसदार असावं लागेल. यासाठी बालभारतीनं पुढाकार घेऊन प्रयत्न करावे लागतील.
याला आणखी एक बाजू आहे. आज शहरी भागामध्ये मुलांसाठी अनेक प्रकारचं वाचन साहित्य उपलब्ध आहे. मात्र ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये शालेय पाठ्यपुस्तक हाच प्रामुख्यानं मुलांसाठी वाचण्यासाठीचा आधार आहे. त्यामुळं पाठ्यपुस्तकांचं महत्त्व तिथं अधिक आहे. पाठ्यपुस्तकं या सगळ्याचा विचार करून बनायला हवीत, त्यामध्ये हेही एक महत्त्वाचं कारण आहे.
आदिवासी भागातील मुलांना वाचता यायला लागल्यानंतर ही वाचनाची भूक भागण्यासाठी ते पुस्तकातील पानंच्या पानं वाचत राहतात, पुन्हा पुन्हा वाचतात हे मी स्वतः अनुभवलं आहे. इथे जर त्यांच्या हाती दर्जेदार पुस्तके मिळाली, तर ती अधिक आवडीनं वाचतील. समजून घेऊन वाचतील आणि कदाचित त्यातली काही निर्मितीकडेही वळतील.
बालभारतीचं काम मुलं अधिक चांगल्या प्रकारे शिकतील याच्यासाठीचं निर्भेळ आणि निःपक्षपाती साहित्य तयार करण्याचं आहे. मुलांचं शिकणं अधिक दर्जेदार व्हावं हा एकमेव उद्देश यामागं असायला हवा. पाठ्यपुस्तकं हे केवळ एका इयत्तेतून पुढच्या इयत्तेमध्ये जाण्यापुरतं नसून ते वाचन संस्कार करण्यासाठी आणि भाषा समृद्ध करण्यासाठी उपयुक्त असं साधन आहे, या दृष्टीनं त्याकडं पाहायला हवं. ते स्वातंत्र्य शासनानंही बालभारतीला द्यायलाच हवं; आणि बालभारतीतील लोकांनी ते हक्कानं मागूनही घ्यायला हवं.
(लेखक शिक्षण क्षेत्रातील विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.