इंग्लंडमधील वृत्तपत्रांचा अन्वयार्थ

गेल्या काही महिन्यांत इंग्लंडमधील अनेक वर्तमानपत्रांनी आपली आवृत्ती फक्त ऑनलाईन ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे अनेक नवी छापील वर्तमानपत्रे बाजारात आली.
newspapers in england
newspapers in englandsakal
Updated on

- वैभव वाळुंज

गेल्या काही महिन्यांत इंग्लंडमधील अनेक वर्तमानपत्रांनी आपली आवृत्ती फक्त ऑनलाईन ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे अनेक नवी छापील वर्तमानपत्रे बाजारात आली. भारतात जशी जाती व्यवस्था वेगवेगळ्या तऱ्हेने, नावांनी आणि ओळखींनी आजमावण्याची कु-चलाखी लोकांच्या अंगवळणी पडली आहे, त्याच चालीवर इंग्लंडमध्ये व्यक्तीची वर्गीय प्रस्तर आणि राजकीय सामाजिक-जाणीव चाचपण्याची किल्ली ही तुम्ही वाचत असलेल्या वृत्तपत्रावरून ठरते.

एवढेच नाही; तर अगदी राजकीय पातळीवर नेतेमंडळी, मंत्रिगणही टीका करताना ही वृत्तपत्रे वाचणारी माणसेच असे काही बोलू शकतात किंवा या या वृत्तपत्राच्या पानावर माझी बातमी झळकणे हे माझे स्वप्न आहे, असं सांगत त्यांच्यावर आपली मालकी दाखवत असतात. महत्त्वाचे म्हणजे, वृत्तपत्रेही आपण निष्पक्ष असल्याचे दाखवण्यापेक्षा प्रत्येक निवडणुकीत उघडपणे एखाद्या पक्षाच्या समर्थनात किंवा विरोधात उभे राहतात.

दरवेळेला त्यांनी निवडलेला पक्ष हा एकच असेल असे नाही; परंतु त्याचा जाहीरनामा व कामगिरीनुसार वृत्तपत्राचे संपादक व पत्रकार हा निर्णय घेत असतात. म्हणूनच ब्रिटनमध्ये घडलेली कोणतीही बातमी तुम्हाला नेमकी समजून घ्यायची असेल, तर दोन-तीन वृत्तपत्रे चाळावी लागतात. कारण प्रत्येक पेपरात एकाच घटनेचे अवलोकन पूर्णतः वेगवेगळ्या धर्तीवर केलेले असते.

कधी कधी या बातम्या अगदी ओळखू येण्याच्या पलीकडे बदलून गेलेल्या असतात. म्हणूनच दुसऱ्या बाजूच्या वृत्तपत्र वाचणाऱ्यांकडे उचित नजरेने पाहणे हा रोजच्या जीवनाचा सामान्य भाग आहे. गार्डियन, टेलिग्राफ आणि द डेली मेल ही वृत्तपत्रे उघडपणे वेगवेगळ्या पक्षांच्या किंवा त्यांच्या धोरणांच्या समर्थनार्थ उभी राहतात. अर्थातच ही त्या पक्षांची मुखपत्रे नसतात किंवा या समर्थनासाठी कोणताही आर्थिक व्यवहार गरजेचा नसतो.

म्हणूनच या निवडणुकीत एका पक्षासाठी उभे राहणारे वृत्तपत्र पाच वर्षांतील त्या पक्षाचा कारभार बघून त्यांच्याच विरोधात उभे राहू शकते. अनेकदा ही वृत्तपत्रे एकापेक्षा अधिक पक्षांसाठीही उभी राहतात किंवा एकाच पक्षाच्या विरोधात बोलून इतर सर्व पक्षांना समर्थन देतात. अनेक वृत्तपत्रांनी तर एखाद्या पक्षाचे मुखपत्र असल्यापासून ते त्या पक्षाचा पुरेपूर विरोध करण्यापर्यंत मजल मारली आहे.

वृत्तपत्रांच्या विरुद्ध अपील करण्याची, त्यांच्या टीकेला बाजूला सारण्याची अथवा उत्तराऐवजी धमकी देण्याची किंवा त्रागा करण्याची मुभा सार्वजनिक जीवनात सरकारी व्यक्तींना क्वचितच मिळते. अशा भूमिका घेऊनही इथली वृत्तपत्रे विश्वासार्हता गमावत नाहीत, तर फक्त राजकीय परिक्षेत्रामध्ये होणाऱ्या वाद-प्रतिवादाला दैनंदिन अवकाश मिळवून देतात. म्हणूनच एकाच वृत्तपत्राचे वाचक दोन वेगवेगळ्या पक्षांना मतदान करू शकतात किंवा अगदी विरोधी पक्षाचा पेपर वाचणारी व्यक्तीदेखील सत्ताधाऱ्यांना समर्थन देऊ शकते.

एकेकाळी मजूर पक्षाचे कट्टर समर्थक असणाऱ्या एका वृत्तपत्राने आपल्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेत १९९२ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये हुजूर पक्षाला समर्थन दिले होते आणि निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ‘आमच्या पेपरांनी निवडणूक जिंकली’ असा मथळा चालवला होता. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये राजकारण्यांविरोधात प्रचंड टीकात्मक भाषेचा वापर केलेला असतो आणि त्यांची वर्णने अतिशय क्रूर पद्धतीने छापलेली असतात.

इंग्लंडचे राजकारण हे आपला स्वाभिमान नाकावर घेऊन चालणाऱ्या लोकांसाठी मुळीच बनलेले नाही, असे म्हणतात ते योग्यच आहे. पंतप्रधानांचा उल्लेख कोबी असा करण्यापर्यंत ही टीका येऊ शकते. राजकारण्यांना याचा मान राखावा लागत असला, तरी त्याची खिल्ली उडवणारे त्यांचे वाचक असतात. म्हणूनच खऱ्या अर्थाने वृत्तपत्रांच्या एकूण व्यवहारांवर वाचकांचा प्रचंड मोठा प्रभाव दिसून येतो.

रोज वर्तमानपत्र वाचणारे अनेक वाचक आपापल्या आवडीच्या वृत्तपत्रांना यथेच्छ नावे ठेवत असतात. म्हणूनच डेली मेल वाचणाऱ्यांना ‘तुम्ही कोणते वृत्तपत्र वाचता’ असे विचारल्यानंतर बरेचदा ते डेली फेल असे उत्तर देतील. टेलिग्राफविषयी तुमचे काय मत आहे, असे एखाद्या डाव्या विचारसरणीच्या व्यक्तीला विचारल्यानंतर ‘असा कोणताही पेपर मला माहिती नाही; पण टोरीग्राफ नावाचं वृत्तपत्र रोचक आहे’ असं ते म्हणतील.

आपल्या स्पेलिंगमध्ये होणाऱ्या चुकांसाठी गार्डियन या वृत्तपत्राला वाचकांनी त्याचे स्पेलिंग बदलून ग्राऊनियाड नाव ठेवलं होतं आणि ही वाचकांची पत्रे सर्रास संपादकांच्या पत्रांशेजारी छापून येत. कितीही गंभीर मुद्दा असला, तरी त्याकडे विनोदपूर्ण दृष्टीने खोचक कटाक्ष टाकत गरजेच्या ठिकाणीच आक्रमक पवित्रा घेणे ही खासी ब्रिटिश पद्धत पत्रकारितेतही रुळली आहे. पडद्यामागून सूत्र चालवण्याची किंवा ढोंगीपणा करण्याची पिवळी पत्रकारिता ब्रिटनच्या इतिहासात दिसत असली, तरी आताच्या घडीला ते करण्याची कुठलीही गरज राहिलेले नाही, असेच चित्र दिसून येते.

येत्या वर्षात होणाऱ्या निवडणुकीच्या हातघाईमध्ये विविध वृत्तपत्रे कोणती भूमिका घेतील, याकडे लोकांचे लक्ष लागलेले आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या भूमिका या हळूहळू तयार होताना दिसून येत आहेत. हुजूर सरकारविरोधात प्रचंड जनरोष सुरू असताना आता या पक्षाला समर्थन देणारी द टेलिग्राफसारखी वृत्तपत्रे आपली भूमिका बदलतात का, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.