‘ही मिसड् द बस!’ इंग्लंडच्या राजकारणात दर चार ते पाच वर्षाला उच्चारलं जाणारं हे वाक्य. पार्श्वभूमी अशी, की इंग्लंडच्या राजकीय इतिहासात, पंतप्रधान बनायला निघालेल्या काहींचा, निवडणुकीत एक तर पराभव होणं किंवा खासदार होऊनही पंतप्रधानपद हुकलेली, अशी काही गमतीशीर उदाहरणं तिथं आहेत.
६० ते ७० च्या दशकात जेनकिन्स, क्रॉसलॅंड व हेली हे इंग्लंडच्या राजकारणातील तिघंही मातब्बर नेते. पंतप्रधानपदाला लागणारे बहुतांशी गुण या तिघांमध्ये होते. पण तिघंही व्यावहारिकदृष्ट्या शून्य असं म्हणावं लागेल. कारण तिघांनीही नेमकी एकाच वेळी संसदीय नेतृत्वपदाची निवडणूक लढविली. झालं भलतेच. तिघांचं भांडण-चौथ्याचा लाभ. हॅरोल्ड विल्सन निवडून आले. तिघांनी एकमेकांनाच संपविले.
ब्रिटिश पंतप्रधानांच्या राजकीय जीवनातील बारकावे, यश-अपयश यावर अँथोनी शेल्डन, पीटर वॅरिंग यांसारख्या लेखकांनी सूक्ष्म निरीक्षणाद्वारे आपल्या लिखाणातून यावर प्रकाश टाकला आहे. त्याहून विशेष म्हणजे, पंतप्रधानपदाची संधी येताच, डावपेचात कमी पडल्यामुळं म्हणा वा नेमकी जणू साडेसाती सुरू व्हावी आणि पद हुकावं अशी अवस्था झालेली काहींची उदाहरणं स्टिव्ह रिचर्ड्स यांनी त्यांच्या लेखनातून टिपली आहेत.
इंग्लंडच्या संसदेमध्ये १९८३ मध्ये प्रथम निवडून येऊन सुद्धा पुढील जवळपास ३० वर्षे मंत्री अथवा विरोधी पक्षनेता न झाल्यामुळं सभागृहात पहिल्या रांगेत कधीही जागा न मिळालेले जेरेमी कोरबायन कायम शेवटच्या रांगेत बसण्यामध्ये समाधानी राहिले. अचानक २०१५ मध्ये पत्रिकेतील सर्व त्रासदायक ग्रह भाग्यात आल्यामुळं म्हणा, पक्षनेतेपदाची निवडणूक कोरबायन यांनी अनपेक्षितरीत्या जिंकली आणि पहिली रांग पटकावली.
जणू सतत नापास होणारा मुलगा अचानक पहिला आला. मात्र अवघ्या काही महिन्यांतच, पक्षात एकवाक्यता निर्माण करणं, विरोधकांबाबत आक्रमकता दाखविणं, यांसारखे प्रमुख नेत्याकडं असावे लागणारे गुण कोरबायन यांच्यामध्ये कमी पडत आहेत की काय अशी शंका स्वपक्षीय खासदारांना येऊ लागली.
२०१७ मध्ये तर कोरबायन यांच्यामुळं मजूर पक्षाचा पराभव होणार, अशी भाकितं राजकीय पंडित वर्तवू लागले. पण आश्चर्याची बाब म्हणजे घडलं उलटंच, हुजूर पक्षाचंच बहुमत घसरत काठावर आलं. अगदी लंडनमधील श्रीमंत वस्त्यांमधूनही मजूर पक्षानं मुसंडी मारली. कोरबायन यांनी पक्ष अंतर्गत व बाहेरील विरोधकांना हादराच दिला.
भावी पंतप्रधान म्हणून लोक कोरबायन यांच्याकडं पाहू लागले. इंग्लडच्या संसदीय पद्धतीतील विरोधी पक्षातील एक महत्त्वाची प्रथा म्हणजे ‘छाया मंत्रिमंडळ’ (शॅडो कॅबिनेट) स्थापन करायला कोरबायन यांनी सुरवातही केली. मात्र यामध्ये सामील होण्याला बहुतांशी पुरुष खासदारांनी नकार दिला तर अनेक महिला खासदारांनी असमर्थता व्यक्त केली. शेवटी मित्र पक्षाच्या सदस्यांना त्यांनी यात घेण्यास सुरवात केली. परिणामी स्वपक्षीय खासदारांची त्यांनी नाराजी ओढवून घेतली.
दरम्यान, तीन घटना अशा घडल्या, की ज्यामुळं कोरबायन यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. पहिली घटना, सीरियावर हल्ला करण्याची परवानगी देण्याऱ्या ठरावास पाठिंबा देण्याची विनंती सत्ताधारी हुजूर पक्षानं मजूर पक्षाकडं केली असता कोरबायन यांनी त्यास विरोध केला.
याउलट त्यांच्या छाया मंत्रिमंडळातील परराष्ट्रमंत्री हिलरी बेन यांनी तर ठरावास पाठिंबा देणारं भाषण सभागृहातच देऊन कहर केला. पक्षांतर्गत दुफळी सभागृहात उघड झाली. बेन यांना वगळा म्हणून स्वपक्षीय खासदारांनी कोरबायन यांच्यावर दबाव आणला. पण ते धारिष्ट्य कोरबायन यांनी अखेरपर्यंत दाखवलं नाही.
दुसरी घटना म्हणजे इस्रायल विरुद्ध पॅलेस्टिनियन यांच्यात त्या वेळी सुरू असलेल्या संघर्षाच्या वेळी खासदार नाझ शाह यांनी आख्ख्या इस्रायल देशाचंच अमेरिकेत पुनर्वसन करा, अशा आशयाचं वक्तव्य करताच इंग्लंडमध्ये मोठं वादळ उठलं होतं. लंडनचे माजी महापौर केन लिविंगस्टोन यांनी तर शाह यांची उघड पाठराखण करत आगीत तेल ओतलं होतं.
या दोघांनाही पक्षातून निलंबित करा म्हणून कोरबायन यांच्यावर प्रचंड दबाव आला असतानाही त्यांनी चालढकल केली. परिणामी विरोधी नेत्यांनी कोरबायन व हमास नेते यांच्या काही वर्षांपूर्वी झालेल्या भेटीचा गौप्यस्फोटच केला. तिसरी घटना म्हणजे, इंग्लडमध्ये स्थायिक झालेल्या एका रशियन गुप्तहेरास व त्याच्या मुलीस विशिष्ट द्रव्याद्वारे मारण्याचा जो प्रयत्न झाला, त्यामागे रशियाचा हात असल्याचा अमेरिकेच्या संशयास पुष्टी देण्यास कोरबायन यांनी शब्द आखडते घेतले होते. पंतप्रधान व्हायला निघालेल्या नेत्यांमध्ये साधी धमकही नाही, असा संदेश या साऱ्यातून गेला आणि कोरबायन यांच्या पीछेहाटीला सुरवात झाली.
आपल्या भूमिकेशी कायम ठाम रहाणाऱ्या कोरबायन यांनी राजकीय कारकीर्दीच्या शेवटच्या भागात मात्र ब्रेक्झीट असो वा सीरियावरील हल्ला असो, भूमिका बदलायला सुरवात केली. पंतप्रधान जॉन्सन यांनी जेव्हा सार्वत्रिक निवडणूक अचानक घेण्याची परवानगी सभागृहास मागितली, तेव्हा विरोधी पक्ष नेते असलेल्या कोरबायन यांनी त्यांस मंजुरी दिली ही त्यांची सर्वांत मोठी राजकीय चूक ठरली. कारण हुजूर पक्षाने ती निवडणूक भारी बहुमतांनी जिंकली.
संसदीय कारकीर्दीची सुरवात, पंतप्रधानपद हुकलेल्या कोरबायन यांनी सभागृहातील ज्या शेवटच्या रांगेतून केली त्याच रांगेत त्यांना अखेरीस बसावे लागले ही खरी शोकांतिका म्हणावी लागेल.
क्लेन क्लार्क
पराभूत झालो तरी चालेल पण संसदीय नेतृत्वपदाची निवडणूक ही प्रत्येक वेळी लढवायचीच अशी मानसिकता राजकारण्यांची असू तरी शकते का ? इंग्लंडमध्ये मात्र, हुजूर पक्षाचे नेते, केंद्रात अनेक वर्षे मंत्रिपद भूषविणारे क्लेन क्लार्क यांनी जणू असा पणच केला होता. आपल्या संपूर्ण संसदीय कारकीर्दीत क्लार्क यांनी तब्बल तीन वेळा नेतृत्वपदाची ही निवडणूक लढविली आणि तीनही वेळा हार पत्करली. वैशिष्ट म्हणजे ते कधीही नाउमेद झाले नाहीत. विनोद म्हणजे प्रत्येक पराभवांनंतर त्यांची सहानुभूती वाढतच जायची.
थॅचर आणि मेजर या दोघांच्या मंत्रिमंडळात क्लार्क यांनी चार वेगवेगळी खाती सांभाळली. आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी विविध योजनांत आमूलाग्र बदल केले की ज्याचे दूरगामी परिणाम झाले. इंग्लंडची आरोग्य क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारी राष्ट्रीय आरोग्य योजना (एन एच एस) आणली. प्रसंगी टीका तर कधी प्रशंसा त्यांच्या वाटेला आली.
डॉक्टरांनी शिफारस केलेल्या इस्पितळातच रुग्णांनी जायच्या ऐवजी, उलट रुग्णांना इस्पितळ निवडायचा अधिकार देणारा बदलही त्यांनी केला. यामुळे छोट्या कार्यक्षम इस्पितळांनाही आर्थिक मदत पोहोचू लागली. दुष्परिणाम हा झाला, की डॉक्टरांच्या संघटनेने सरकारशी संघर्ष सुरू केला. क्लार्क यांच्या निवासस्थानाबाहेर दररोज निदर्शने होऊ लागली.
मग थॅचर यांनी खातेबदल करीत क्लार्क यांना शिक्षणमंत्री केले. पारंपरिक शिक्षण पद्धती पुन्हा आणत, शाळांवरील स्थानिक महापालिकेचे वर्चस्व संपुष्टात आणले. अर्थमंत्री बनताच सार्वजनिक सेवांवरील सरकारी खर्च कमी केल्यास स्थानिक सेवा संस्था स्वबळावर आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हा सिद्धांत मांडत यामधील सरकारच्या सहभागाबाबतीत अनेक सुधारणा घडविल्या.
जनतेत लोकप्रिय होऊ लागलेले क्लार्क नकळत सरकारच्या आर्थिक धोरणाबाबतचे प्रमुख वक्ते झाले. २००५ साली हॉवर्ड यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेली नेतृत्वपदाची निवडणूक पुन्हा त्यांनी लढविली. डेव्हिस व कॅमरॉन या दोन डेविड यांच्याशी त्यांचा सामना होता. कृपा करून युरोपियन समूहाबाबतची तुमची भूमिका यावर निवडणूक संपेस्तोपर्यंत तरी गप्प राहा, असा सल्ला समर्थकांनी दिला.
म्हणतात ना जित्याची खोड..., तारतम्य न बाळगल्यामुळं, उत्साहाच्या भरात नको तिथं नको ते वक्तव्य केल्यामुळं अखेरीस शब्द मागं घेण्याची नामुष्की क्लार्क यांनी ओढवून घेतली. परिणामी नेतृत्वपदाच्या शर्यतीत क्लार्क यांनाच मागं टाकण्याचे पाऊल स्वपक्षीयांनी उचललं. सहस्रचंद्रदर्शनाचा आयुष्यातील टप्पा गाठताच, दररोज रात्री चंद्रप्रकाशात जॅझ संगीत ऐकत क्लार्क यांनी उर्वरित आयुष्य घालवले.
एड मिलीबंड
इंग्लडच्या राजकारणात केंद्रीय मंत्रिमंडळात एकत्र राहिलेले, सुरवातीला, दो हंस का जोडा म्हणून प्रसिद्धी पावलेले पण कालांतरानं एकमेकांत विळ्या-भोपळ्याचे नाते अशी अवस्था झालेले मिलीबंड बंधू म्हणजेच डेव्हिड आणि एड. वास्तविक तत्कालीन अर्थमंत्र्यांचे एड सल्लागार. २०१५ मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना, सत्तेवर आल्यास गॅस व वीजदर गोठवू अशी मोठी घोषणा एड यांनी केली खरी पण हे कसे घडविणार हे मतदारांपुढे मांडण्यात ते सपशेल फसले. आमूलाग्र बदलाच्या विचारसरणीचे एड आणि मवाळ, जुन्या विचारांची प्रसारमाध्यमं यांच्यातील दरी वाढत गेली.
आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत एड यांनी स्वतःला झोकून दिल्याचे चित्र कधीच उभे राहिले नाही. किंबहुना त्यांची अर्धवेळ राजकारणी अशीच प्रतिमा होऊ लागली होती. यामागचे एक कारण म्हणजे, मधेच काही महिने ते अमेरिकेतील हार्वर्ड या प्रसिद्ध विद्यापीठात शिकवायला जायचे.
२०१५ च्या सार्वत्रिक निवडणूक निकालाच्या दिवशी सकाळी, आपणच आता पंतप्रधान बनणार या भावनेतून शपथविधीचा मुहूर्त काढायला आणि मंत्रिमंडळाची यादी बनवायला एड यांनी सुरवातही केली. पण झाले भलतेच. हुजूर पक्षच विजयी झाला. रात्रीपर्यंत सर्व निकाल येताच पक्षाचा झालेला दारुण पराभव पाहून एड अक्षरशः ओक्साबोक्शी रडले म्हणे.
बार्बरा कॅसल
उत्तर लंडनमधून १९३७ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून येणाऱ्या, तदनंतर डाव्या विचारसरणीच्या ‘ट्रीबून’ मासिकाच्या पत्रकार बनलेल्या बार्बरा कॅसल या १९४५ मध्ये ब्लॅकबर्न मतदारसंघातून संसदेवर निवडून येणाऱ्या सर्वांत तरुण खासदार ठरल्या. आयुष्यात दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी आलेल्या बार्बरा यांनी, विरोधी पक्षाच्या खासदार म्हणून १३ वर्षांच्या वनवासांनंतर सत्तेत येताच आपल्या तडफदार शैलीची झलक दाखविण्यास सुरवात केली.
परिवहनमंत्री बनताच वाहनांसाठी त्यांनी राष्ट्रीय वेग मर्यादा निश्चित केली. पाठोपाठ ‘तळिराम’ चालकांसाठी श्वासोच्छवास चाचणी घेण्याचा अधिकार पोलिसांना दिला. एवढ्यावरच न थांबता, कामगारमंत्री म्हणून महिलांना पुरुषांपेक्षा कमी पगार पद्धत रद्द करीत समान पगार कायदा आणत एक पुरोगामी पाऊल टाकले.
हा कालखंड मात्र कामगारांच्या सातत्यानं होणाऱ्या अकाली संपांमुळे इंग्लंडला खडतर ठरू लागला होता. अशा वेळी नेत्याऐवजी कामगारांना मतदानाद्वारे संप करायचा की नाही हे ठरविण्याचा अधिकार देणारे व त्याच वेळी घटनाबाह्य संपामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला देणारा कायदाही त्यांनी आणला.
एकीकडं अशा धाडसी निर्णयामुळं लोकप्रियतेचं शिखर गाठू लागलेल्या बार्बरा यांच्या विरोधात पक्ष आणि सरकार, दोन्हीमध्ये सुप्त धुसफुस सुरू झाली. वेग मर्यादांमुळं वाहन क्षेत्रातील उद्योगपती, श्वासोच्छवास चाचणीमुळे तरुण वर्ग तर महिलांना सम पगार यामुळं अहंकारी पुरुष वर्ग, साऱ्यांची त्यांनी नकळत नाराजी ओढवली.
परिणामी १९७६ मध्ये पक्ष नेतृत्वाच्या निवडणुकीत सर्व पुरुषांनी एकत्र येत, अशा होतकरू व महत्त्वाकांक्षी महिलेची, पंतप्रधान होण्याची संधी पद्धतशीरपणे घालविली. युरोपिअन समूहातून इंग्लंडने बाहेर पडावे यासाठी त्यांनी जोरदार मोहीम आखली. पण दुर्दैवाने ही भूमिका घेणाऱ्या सर्वांचाच पराभव झाला.
नियतीचा खेळ किती विचित्र असतो. १९८० मध्ये विल्सन यांनी राजीनामा दिल्यामुळं नशिबाने पुन्हा एकदा त्यांना पंतप्रधान बनण्याची संधी समोर आणली. पण नेमकी या वेळी त्यांची संसद सदस्यपणाची मुदतच संपली. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी अखेरचे भाषण केले. सत्तेवर आलेल्या स्वपक्षीय सरकारला निवृत्तिधारकांच्या वेतनाबाबत सहानुभूती दाखवा, एवढे आवाहन करण्यापलीकडे त्यांना सांगण्याजोगे काहीही उरले नव्हते. योगायोगाने राजकारणातली निवृत्तीही त्यांनी त्यानंतर जाहीर केली.
निल किन्नोक
परखड भूमिकेमुळे स्वतःभोवती कायम वादळ निर्माण करणार व्यक्तिमत्त्व इंग्लडच्या राजकारणात जर कुठलं झालं असेल, तर ते म्हणजे निल किन्नोक. स्वतःच्या मजूर पक्षानं बदलत्या परिस्थितीनुसार वेळोवेळी धोरण व भूमिकेत काहीसा बदल करत राहावं असा सातत्यानं आग्रह धरत, वेळप्रसंगी सभागृहात स्वपक्षाच्या विरुद्ध मतदान करण्यासही न कचरणारे अशीही किन्नोक यांची ओळख होती. असं असूनही तब्ब्ल नऊ वर्ष ते संसदेत विरोधी पक्षनेते राहिले, ते सुद्धा थॅचरबाई पंतप्रधान असताना.
विरोधी पक्षनेता म्हणून एकदा आयुष्यातील सर्वांत मोठ्या अवघड प्रश्नाला किन्नोक यांना सामोरं जावे लागले. खाण कामगार युनियनचे अध्यक्ष आर्थर स्कारगील यांनी संप पुकारला. संप करणाऱ्यांच्या मागण्या किन्नोक यांना पटत नव्हत्या. संपाला विरोध म्हणजे थॅचर सरकारला जणू पाठिंबाच, असा अर्थ लोकांनी काढला असता.
किन्नोक यांची ‘अवघड जागी दुखणं’ अशी अवस्था झाली. कारण स्वतः किन्नोक मूळचे एका खाण कामगार कुटुंबातले. शिवाय त्यांचा मतदारसंघही बहुतांशी खाण कामगारांचा. कमकुवत व संदिग्ध असे किन्नोक यांना संबोधत, प्रसार माध्यमांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. सर्वातून किन्नोक टिकले खरे पण त्यांच्या प्रतिमेस मात्र तडा गेला.
एक जमाना वैचारिक गोंधळात गुरफटलेल्या मजूर पक्षास किन्नोक यांनी नव्या विचारांनी आधुनिक स्वरूप दिलं. ९२ च्या निवडणुकात हुजूर पक्षाचं प्रचंड बहुमत संपुष्टात आणलं. यापूर्वी झालेल्या इतर अनेक विरोधी पक्षनेत्यांच्या तुलनेत परिणामकारक सुधारणा घडविल्या.
यामुळे लोकप्रियतेच्या भरतीवर स्वार झालेले आणि पंतप्रधान म्हणून ज्यांच्याकडे एकेकाळी पहिले जात होते, त्या निल किन्नोक यांची खाण कामगार प्रश्नावर करावी लागलेली तारेवरची कसरत, स्वतत्त्वाशी तडजोड न करता वेळ पडल्यास वेळप्रसंगी सर्वांशी संघर्ष, प्रसार माध्यमांनी जाणूनबुजून निर्माण केलेली कमकुवत-नाजूक अशी प्रतिमा, या साऱ्या बाबी त्यांच्या लोकप्रियतेच्या ओहोटीस कारणीभूत ठरल्या.
बुडत्याचा पाय खोलात
राजकीय नेत्यांच्या प्रत्येक पावलाकडं लोकांचं क्षणाक्षणाला लक्ष असतं. पाऊल जर कधी चुकलं तर आयुष्यभर कसा त्रास होतो याचं एक प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे, पत्नीसोबत समुद्रकाठी चालत असताना किन्नोक एकदा वाळूवर घसरून पडले. नेमका याचा त्या वेळी कुणीतरी फोटो काढला. ''नाजूक'' व्यक्तिमत्त्व म्हणून किन्नोक यांना हिणवण्यासाठी पुढे विरोधकांनी या फोटोचा कायम वापर केला.
९२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुतांशी ‘एक्झिट पोल’नी मजूर पक्षाला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात घडलं उलटेच. सर्व अंदाज चुकले. मजूर पक्षाचा पराभव झाला. नौदलात बुडत्या जहाजासोबत कप्तानला जलसमाधी घेण्याची प्रथा आहे. पक्षाच्या पराभवांनंतर निल किन्नोक यांना अखेरीस राजकीय समाधी घ्यावी लागली.
कोरबायन, क्लार्क, मिलीबंड, किन्नोक व कॅसल - सर्वांच्या नशिबात पंतप्रधानपद ‘ सो नियर येट सो नॉट नियर’ असे राहिले !
(लेखक कॉंग्रेसचे माजी आमदार असून प्रवक्ते असून वास्तुरचनाकार आहेत. )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.