मनभावन श्रावण

आजच्या या बदलत्या युगात सण, उत्सवाच्या निमित्तानं माणसं जोडून ठेवणारा दुवा आहे श्रावण.
श्रावण
श्रावणsakal
Updated on

मन, निसर्ग आणि संस्कृती याचं एक समीकरण आहे. सण, उत्सव म्हणजे केवळ वैयक्तिक मोक्ष साधना नव्हे तर एकमेकातील नाते संबंध जोडणारं, वृद्धिंगत करणारं, एक भावनिक पण वैविध्य पद्धतीने जपणारं ते माध्यम आहे. आजच्या या बदलत्या युगात सण, उत्सवाच्या निमित्तानं माणसं जोडून ठेवणारा दुवा आहे श्रावण.

आला श्रावण श्रावण, धुंद पावसाच्या सरी

चंदेरी किरणांची माया, हर्षुन हिरवळ लाजती सारी

उन्हामागून पावसाचा लपंडाव सुरु झाला की धरतीच्या कणाकणातून चैतन्य पाझरू लागतं आणि निसर्गाचं मादक रूप उभं राहतं. श्रावणातला पाऊस मनाला उभारी देतो अन पुन्हा पुन्हा चैतन्याची आस मनात निर्माण करतो. श्रावण म्हणजे आनंदोत्सव. निसर्गाला डोहाळे लागतात ते बरसरणाऱ्या सरींच्या स्पर्शाचे. संपूर्ण सृष्टीत दाटलेली हिरवळ हर्षून जाते आणि आनंदानं पक्षी त्यावर विहार करतात. हिरवळीच्या संगतीत होणारा पक्षांचा किलबिलाट आणि कोकिळेचं आवर्जून हाक देणं, बांध बंधाऱ्यांनी ओसंडून वाहणं म्हणजे श्रावणाची आरास होणं. सृष्टीतला हा बदल खूप मोहक वाटतो. कधी प्राजक्ताचा भरगच्च पडलेला सडा तर कधी जाईजुईचा मंद गंध आणि दरवळणारा मातीचा सुगंध.

श्रावण
मनमोराचा पिसारा : एकतेचं बाळकडू

वसुंधरेचं बहरणं म्हणजे श्रावण, सणाचं आगमन म्हणजे श्रावण, नात्यांचा ओलावा म्हणजे श्रावण आणि धरतीचं न्हाऊन निघणं म्हणजेही श्रावण. शब्दातून देखील हा श्रावण झर झर झरतो आणि मनाला वेड लावून जातो. नखशिखांत नटलेला आणि सदैव बहरलेला हा श्रावण इंद्रधनूची जेव्हा उधळण करतो तेव्हा साऱ्या आसमंताला प्रीतीचा रंग चढतो आणि हे रूप न्याहाळायला जणू अंबर धरतीच्या भेटीला येतो. सरींना अलगद अंगावर झेलून टवटवीत होणारी विविध रंगी फुले मनसोक्त बागडतात तेव्हा तो नजारा विलोभनीय अनुभूती देतो. आभाळ दाटून आलेलं असतं. काळ्या मेघांनी दाटी केलेली असते.

श्रावण
मनमोराचा पिसारा : लेबल्‍स

कधीतरी ऐन उत्सवाच्या वेळी या सरी पाहुण्यासारख्या येतात आणि हल्ला करून हळूच निघूनही जातात पण तरीही कुठला रुसवा नसतो. कारण या श्रावणानेच तर आम्हाला बांधून ठेवलेलं असतं. जग कितीही बदलू द्या पण ऋतूचं येणं आणि जाणं तसंच राहील आणि नव्या-जुन्याची सांगड घालत परंपरेची कास धरत राहील. श्रावणाच्या या सरींबरोबर मनाच्या कोंदणातील भाव व्यक्त होण्याचा हा वारसाही असाच सुरु राहील आणि पुन्हा पुन्हा त्या सरींच्या आठवांचा वेध घेत राहील.

प्रा. कीर्ती काळमेघ वनकर, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.