उत्क्रांतीचे तत्व

स्वतःला शोधण्याच्या प्रवासाला निघालेल्या माणूस नावाच्या प्राण्याला धड आहे, हात आहेत, पाय आहेत. गर्वाने फुलवता येईल अशी छाती आणि तोरा मिरवण्यासाठी लागणाऱ्या पीळदार मिशाही आहेत. कान, नाक, डोळेही आहेत; मात्र स्वत्वाचा शोध घेण्यासाठी लागणारी दृष्टी नाही.
उत्क्रांतीचे तत्व
उत्क्रांतीचे तत्व sakla
Updated on

अंतर्नाद

राहुल गडपाले,rahulgadpale@gmail.com

स्वतःला शोधण्याच्या प्रवासाला निघालेल्या माणूस नावाच्या प्राण्याला धड आहे, हात आहेत, पाय आहेत. गर्वाने फुलवता येईल अशी छाती आणि तोरा मिरवण्यासाठी लागणाऱ्या पीळदार मिशाही आहेत. कान, नाक, डोळेही आहेत; मात्र स्वत्वाचा शोध घेण्यासाठी लागणारी दृष्टी नाही. गगनभेदी घोषणा देण्यासाठी लागणारा फर्रेदार घसा आणि जीभ आहे; मात्र त्या घोषणांचा विचार करण्यासाठी लागणारी बुद्धी नाही. त्याचा मेंदू विकसित झाला. त्यामुळे त्याला जाणिवांचे आपलेपण अनुभवता आले. आता नावाला आपल्याकडे जाणिवा आहेत; पण त्यातले आपलेपण हरवले आहे. हे आपलेपण शोधायला हवे...

उत्क्रांतीचे तत्त्व समजून घ्यायला हवे. त्याची आणि आपल्या आजच्या जीवनशैलीची सांगड घालायला हवी. अंतर्नादच्या माध्यमातून ती आपण आपल्या आतल्या आवाजाला घातलेली साद असेल. स्वतःला शोधण्याच्या प्रवासाची सुरुवात असेल. या प्रवासात आपल्याला आपले स्वत्व गवसले तर आपल्याला अंमळ जास्तच काही गवसल्यासारखे वाटेल. तसे झाले नाही तर ती उजळणी समजू हवी तर; पण आता याची खरी गरज आहे.

बलाढ्य, माझा देश महाशक्ती, मी अमूक, मी तमुक... मी म्हणजे सर्व काही. या ‘मी’भोवतीच आपले राजकारण, समाजकारण, अर्थकारण घिरट्या घालते. या ‘मी’चा पसारा एवढा मोठा आहे, की त्यापुढे अवघे विश्व छोटे पडू लागते. आपण सामोरे जात असलेल्या कुठल्याही समस्येचे मूळ जाणून घ्यायचा प्रयत्न करा. त्याचे उत्तर ‘मी’ या एकसुरी आणि वलयांकित कोषाभोवतीच येऊन थांबते. आपल्या विचारांची गती या उत्तराजवळ नुसती विश्रांतीच घेत नाही तर ती तेथे अडखळते, थांबतेसुद्धा. कारण आपले प्रश्नही आपल्याभोवतीच गुंता करत असतात. आपल्यालाच आपल्या प्रश्चचिन्हात अडकवत असतात. त्या प्रश्नांपुढे आपण निःशब्द होतो. विचारांच्या कक्षा आकुंचन पावतात, आत ओढल्या जातात. त्याला तरणोपाय नसतो; कारण ‘मी’मध्ये असलेल्या स्वत्वाचा शोध कुणालाच घ्यायचा नसतो. मुळात आपण कोण आहोत, या प्रश्नाचे मूळ उत्तर शोधण्यापासून सुरू झालेला आपला जाणिवांचा प्रवासच आता भरकटलाय.

त्या प्रवासाला निघालेल्या माणूस नावाच्या प्राण्याला धड आहे, हात आहेत, पाय आहेत. गर्वाने फुलवता येईल अशी छाती आणि तोरा मिरवण्यासाठी लागणाऱ्या पीळदार मिशाही आहेत. कान, नाक, डोळेही आहेत; मात्र स्वत्वाचा शोध घेण्यासाठी लागणारी दृष्टी नाही. गगनभेदी घोषणा देण्यासाठी लागणारा फर्रेदार घसा आणि जीभ आहे; मात्र त्या घोषणांचा विचार करण्यासाठी लागणारी बुद्धी नाही. या सृष्टीची रचना होत असताना माणूस हा असा एकमेव जीव विकसित झाला ज्याला विचार करता येतो. त्या विकसित होण्याच्या प्रवासात त्याला खस्ता खाव्या लागल्या त्याच मुळात त्याच्या मेंदूच्या विकासासाठी. त्याचा मेंदू विकसित झाला. त्यामुळे त्याला जाणिवांचे आपलेपण अनुभवता आले. आता नावाला आपल्याकडे जाणिवा आहेत; पण त्यातले आपलेपण हरवले आहे. त्यामुळेच आपल्या मुळात शिरून आपले अस्तित्व समजून घेण्यासाठी धडपड करण्याची खरी गरज आहे. त्यासाठी मानवाच्या संचिताचा अभ्यास करायला हवा. मुळात मनुष्यप्राणी विकसित होण्याचे टप्पे, त्यासाठीची नैसर्गिक, भौगोलिक परिस्थिती आदींचाही विचार करायला हवा. त्यासाठी आपल्या जन्माच्या खोलात शिरायला पाहिजे. आपला जन्म आणि मृत्यू यांचा केवळ घटना म्हणून विचार न करता त्यातील बारकावे आणि सृष्टीने आपल्याला इतर कुठल्याही प्राण्याला दिली नाही, ती विचार करण्याची शक्ती का दिली असावी, याचाही विचार करायला हवा; मात्र तसे करण्याऐवजी हल्ली आपले आकार, उकार आणि त्यातून उद्‍भवलेले विकार स्वमग्न झालेले दिसतात. दिशाहीन होण्यासाठी आज आपल्याकडे अनेक संसाधने आहेत. ही संसाधने आपल्याला दिशा देण्याचे कामही करतातच; पण त्यातून आपण दिशाहीनच अधिक होताना दिसतोय. माणसाला चांगल्याची जाण आहे. कारण त्याला जाणीव आहे; मात्र तसे असले तरी त्याला नकारात्मक गोष्टींचीच लागण अधिक वेगाने होते हेदेखील नाकारून चालणार नाही. आपणच विकसित केलेली मानवी मूल्ये आता केवळ इहलोकापुरती उरल्यासारखी परिस्थिती आहे. त्यातून आपल्याला मार्ग काढता येणे शक्य आहे; मात्र स्वकेंद्रित झालेल्या आपल्या अहंकारी बाण्याने आपल्याभोवती एक निराळाच फास आवळलेला दिसतो. त्यात आपण आहोत; मात्र आपल्यातील जाणिवांना ‘ग’ची बाधा झालेली दिसते. त्यातून बाहेर पडायचे असेल, तर या फंद्यातून मोकळा श्वास घ्यायला हवा. त्यासाठी आपल्या अस्तित्वाची आपल्याला सफर घडायला हवी.

ज्याला आपण उत्क्रांतीचे तत्त्व म्हणजेच Theory of Evolution असे म्हणतो ते समजून घ्यायला हवे. त्याची आणि आपल्या आजच्या जीवनशैलीची सांगड घालायला हवी. अंतर्नादच्या माध्यमातून ती आपण आपल्या आतल्या आवाजाला घातलेली साद असेल. स्वतःला शोधण्याच्या प्रवासाची सुरुवात असेल. या प्रवासात आपल्याला आपले स्वत्व गवसले तर आपल्याला अंमळ जास्तच काही गवसल्यासारखे वाटेल. तसे झाले नाही तर ती उजळणी समजू हवी तर; पण आता याची खरी गरज आहे.

आज आपण स्वतःभोवतीच गिरकी घेतोय. मी म्हणजे विश्व आणि मी म्हणजेच विश्वशिरोमणी, अशी आपली भावना आहे. मी आणि माझ्या दिमतीला असतील ते माझे, अशी नवी भाऊबंदकी आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. वरवर ‘वसुधैव कुटुंबकम्’च्या बाता मारायच्या आणि स्वतःच्याच कवटीतल्या महालात ‘मी’ नावाच्या सिंहासनावर जाऊन आरूढ व्हायचे, बाकी सबकुछ झूठ, अशी आपली तऱ्हा. आपली ही स्वमग्नतेची सहल (हल्ली त्याला इगो ट्रीप असे म्हणतात) अगदी सोप्या भाषेत कुणी नोंदवून ठेवली असले तर ती केशवसुतांनी. ‘या विश्वाचा विस्तार केवढा... ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा’ या एका ओळीत केशवसुतांनी केवढा तो गर्भार्थ सांगून टाकलाय. कुण्या मोठ्या ज्ञानी, वैज्ञानिकांनाही जमले नसते इतके हे मनुष्यप्राण्याचे तंतोतंत वर्णन या एका ओळीत आहे; पण सांगून समजेल तो मनुष्य कुठला! हातच्या कंकणाला आरसा कशाला, असे आपण म्हणतो; पण समोर घडते तेच दिसत नाही; तेव्हा जे दिसतच नाही ते दाखवणार कसे? त्यातही दाखवण्यापेक्षा जाणवण्यातल्या अडचणीच जरा जास्त आहेत. कारण या मनुष्यप्राण्याच्या जाणिवा बोथट व्हायला लागल्या आहेत. मेंदूच्या विकासातून जाणिवेचा परिपोस त्याने विकसित केला खरा; पण आता त्यालाच अर्धांगवायूचा झटका आला आहे. किंबहुना मानवी जाणिवाच कोमात गेल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे या मानवी जाणिवांच्या शोधासाठी का होईना, स्वतःला आरसा दाखवण्याची खरेच गरज आहे. त्यासाठी नुसते माणसाच्या जन्म-मृत्यूचे कोडे सोडवून चालणार नाही, तर त्यासाठी आपल्या अस्तित्वाची आपल्याला स्वतःलाच जाणीव करून घ्यावी लागेल.तेव्हा कुठे जगण्याचा सोस कळायला लागेल. विश्वबंधुत्व समजायला लागेल.

मनुष्यप्राण्याने आजवर त्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. आकाश-पाताळ एक केले आणि स्वतःचे जगणे सुकर करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी जुळवून आणल्या. परिस्थितीशी जुळवून घेणे हाच आपला मूळ स्वभावगुण आहे. नव्हे, अशाच जुळवून घेण्याच्या सवयीतूनच आपला जन्म होऊ शकला आहे. आपल्या या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या गुणालाच ‘उत्क्रांतीचे तत्त्व’ असे म्हटले जाते. आपले शरीर एका विशिष्ट प्रकारच्या संरचनेपासून तयार झाले आहे. डीएनए असे त्या संरचनेचे नाव आहे. आपल्या प्रत्येक पेशीच्या गाभ्यात डीएनए नावाच्या रसायनाचे रेणू असतात. ही रचना प्रत्येक व्यक्तीची खास अशा स्वरूपाची असते. आईच्या शरीरातील एक अर्धपेशी बापाच्या शरीरातील अर्धपेशीला स्वतःमध्ये सामावून घेते. त्यातून नवा डीएनए तयार होतो. दोघांच्या डीएनएमधला कोणता अर्धा डीएनए दुसऱ्या डीएनएमध्ये मिसळतो यावर मात्र कुणाचे नियंत्रण नसते. हे सर्व काही स्वैरपणे ठरते; पण एकाच कुटुंबातील दोन प्रकारच्या जीवांमध्ये साम्य असते. हे साम्य असले तरीही ते तंतोतंत सारखे मात्र कधीच असत नाही. म्हणजेच काय, तर मनुष्यप्राण्याचा जन्मदेखील एका विशिष्ट परिस्थितीतील जुळवून घेण्याशी संबंधित आहे. आज मात्र विकसित प्रक्रियेत माणसाला त्याच्या आजूबाजूच्या लोकांशी जुळवून घेता येत नाही. तो रंगांवरून, प्रदेशांवरून, भाषेवरून, खानपानाच्या सवयीवरून माणसांचे गट करतो. एकमेकांचा वैरी होतो. अशा परिस्थितीतून मनुष्यप्राण्याला बाहेर काढायचे असेल, तर त्याला त्याच्या शरीरातील डीएनए किती निरपेक्ष आहे, हे समजायला हवे. त्यासाठी त्याला त्याच्या भाषेत समजेल, असे ज्ञानरंजन द्यावे लागेल. या सदराच्या माध्यमातून आपण ते रसग्रहण करण्याचा निश्चित प्रयत्न करू.

अजूनही कुणाला विश्वाचे वय नेमके ठरवता आलेले नाही; पण साधारण १३.८ अब्ज वर्षांपूर्वी महास्फोट झाला, असे मानले जाते. ४.८ ते ५ अब्ज वर्षांपूर्वी सूर्याचा जन्म झाला आणि पृथ्वी घडली सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी. पहिले सजीव जन्माला आले साधारण ३.८ अब्ज वर्षांपूर्वी. आज पृथ्वीवर अनेक प्रकारचे जीव आहेत. साधारण पाहिले तर ही संख्या जवळपास २० लाखांच्या घरात आहे. या सर्व प्रकारच्या जीवांना स्पीसीज (Species) असे म्हणतात आणि यातला एक प्रकार म्हणजे माणूस होमो सेपियन्स (Homo Sapiens). ही एवढी महाकाय पृथ्वी, त्याहीपेक्षा मोठे ब्रह्मांड, त्यातले तारकापुंज, लाखो चकाकणारे तारे, त्यात अनेक ग्रह, त्या ग्रहांमधला एक ग्रह म्हणजे पृथ्वी. त्यातही कितीतरी लाखो जीवांमधला एक जीव म्हणजे माणूस; पण त्याला त्याचे केवढे ते कौतुक. तो स्वतःच्याच कौतुकात रममाण आहे. त्याला आपण त्या २० लाख जीवांपैकी एक आहोत, याची कदाचित जाणीव नसावी. ती जेव्हा त्याला होईल तेव्हा त्याला स्वतःच्या अस्तित्वाचीही जाणीव होत जाईल आणि तो आपल्या स्वमग्नतेच्या साच्यातून बाहेर यायला लागेल.

एक इंग्रजी बडबडगीत आहे... ‘सॉलोमन ग्रंडी, बॉर्न ऑन मंडे’ असे त्याचे नाव. या गीतातला नायक सोमवारी जन्माला येतो. मंगळवारी शाळेत जातो. बुधवारी त्याचे लग्न लागते. गुरुवारी त्याला मुले होतात आणि याच क्रमाने तो आजारी पडतो. मृत्यू पावतो. त्याला दफन केले जाते आणि रविवारी त्याच्या आयुष्याचा सारा खेळच खलास होतो. जगण्याच्या स्मृतिमंजुषेत कुणीतरी जपून ठेवावे, असे सर्वसामान्य माणसापाशी काय सापडणार... जन्म, शिक्षण, नोकरी, लग्न, मुले, त्याचे शिक्षण, आजार आणि मग मृत्यू हीच त्याच्या जीवनाची सप्तपदी असते. इतके सरळ, साधे आणि सोपे आयुष्य; पण राजकारण, अर्थकारण, समाज नावाची व्यवस्था, युद्ध, जमिनींचे वाद, हेवेदावे या साऱ्यांमध्ये आपण ते कितीतरी क्लिष्ट करून टाकतो. आपला हा संघर्ष बहुधा सत्ताकारणासाठी असतो. तुमचा त्याच्याशी थेट संबंध असो अथवा नसो, आपण कळत-नकळत त्याभोवती अडकत जातो, त्या प्रक्रियेचा एक भाग होतो. जगात काही ठिकाणी नुकतीच युद्धाची काळी छाया पडली. काही देश आजही याच भीतीच्या दडपणाखाली जगताहेत. कुठे आर्थिक संकटाचा सामना सुरू आहे, कुठे दहशतवादाची समस्या आहे; तर कुठे पर्यावरणीय समस्येने डोके वर काढले आहे. काही नैसर्गिक संकटे सोडली, तर इतर सर्व संकटे, समस्या या आपल्या मानवनिर्मित आहेत. त्या आपण खुद्द आपल्या हाताने चितारल्या आहेत. माणूस नावाच्या प्राण्याने आपल्या जगण्यातून आणि आपल्या स्वार्थी हव्यासातूनच यातील बहुतेक अडचणी निर्माण करून ठेवल्या आहेत. त्यातून मार्ग निघू शकत नाही, असे नाही; पण त्यासाठीचा विचार करण्याची कुणाची तयारी नाही. जेव्हा माणसाची स्वतःबद्दलची जाणीव विकसित झाली, तेव्हा त्याला स्वतःसोबतच इतरांच्याही अस्तित्वाची काळजी होती. त्याला इतर प्राणिमात्रांबद्दल आस्था होती. आता ती आस्था स्वकेंद्रित झालेली दिसते. आपल्यासारखेच कुणीतरी तारकापुंजातील कुठल्यातरी कोपऱ्यात बसलेले असेल, या विचाराने त्याने ब्रह्मांडातही हाक मारली. कारण पृथ्वीबाहेर कुठेतरी आपल्यासारखे बुद्धिमान जीव आहेत, अशी त्याला आशा वाटत होती. १६ नोव्हेंबर १९७४ रोजी आरेसीबो या अमेरिकन वेधशाळेतून एक रेडिओ संदेश दूरच्या तारकापुंजाकडे पाठविण्यात आला. मानवाने अनंतात मारलेली ही हाक होती. कुणी आहे का तिकडे? आम्ही इथे आहोत. ही स्वतःला मारलेली हाक आहे. त्याचा शोध आपण थेट ब्रह्मांडात घ्यायला तयार होतो आणि शेजारच्या राष्ट्रावर अणुबॉम्ब टाकण्याची तयारी करतो. आपल्या वागण्यात हा विरोधाभास का आहे? स्वतःचा शोध घ्यायचा असेल, तर नीट डोळे उघडे ठेवून शोधायला काय हरकत आहे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.