वसाहत अश्मयुगीन मानवाची

नेवासा म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी. इथंच ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाची निर्मिती झाली. या घटनेची साक्ष असलेला ‘पैस खांब’ आजही भाविकांच्या मनात श्रद्धेची ज्योत अखंडपणानं चेतवत उभा आहे.
existence of first human being in maharashtra was Nevasa is famous for archaeological site
existence of first human being in maharashtra was Nevasa is famous for archaeological site Sakal
Updated on

- केतन पुरी

नेवासा म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी. इथंच ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाची निर्मिती झाली. या घटनेची साक्ष असलेला ‘पैस खांब’ आजही भाविकांच्या मनात श्रद्धेची ज्योत अखंडपणानं चेतवत उभा आहे. नेवासा पवित्र स्थळ आहे. गावात असणारी दुसरी आकर्षक धार्मिक वास्तू म्हणजे मोहिनीराज मंदिर.

पण, फार कमी लोकांना माहीत आहे, की महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या सर्वांत पहिल्या मानवाचं अस्तित्व या गावात होतं. नेवासा अश्मयुगीन मानवाच्या वसाहतीचं ठिकाण आणि अतिशय महत्त्वाचं पुरातत्त्वीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

भारतीय पुरातत्त्वचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. ह. धी. सांकलिया यांना एका प्रश्नाची उकल होत नव्हती. भारतात अनेक ठिकाणी पुरातत्त्वीय स्थळांचे शोध लागत होते, शास्त्रीय दृष्टिकोनातून या ठिकाणांचं उत्खनन होत होतं.

उत्तर तसेच दक्षिण भारतात आदिमानवाच्या पाऊलखुणा आढळत होत्या. पण महाराष्ट्रात मात्र अशा ठिकाणाचा शोध सुरूच होता. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशसारख्या ठिकाणी आदिमानवाच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झाले होते.

पण, रामायण काळापासून कायम चर्चेत राहिलेला भाग, मात्र आदिमानव तिथं राहत होता का, याविषयी इतिहास अनभिज्ञ होता. महाराष्ट्र या नावाचा सर्वांत पुरातन लिखित स्वरूपातील उल्लेख सापडतो उत्तर कर्नाटकाच्या ऐहोळे गावात, तिथल्या मेगुती मंदिरावर असलेल्या शिलालेखात.

त्याआधीपासून महाराष्ट्रात मानवी वस्ती होती. पण त्या मानवाच्या अस्तित्वाचं स्वरूप काय होतं, याविषयी अभ्यासक निरनिराळे तर्क लावत, अंदाज बांधत असत. नेवासा गावापासून काही किलोमीटरवर वाहणाऱ्या चिरकी ओढ्याच्या काठी पांढरीचं टेकाड असल्याची बातमी समजली. हा चिरकी ओढा प्रवरा नदीला जाऊन मिळतो.

पुरातत्त्व संशोधकांचा एक समूह त्या जागी गेला. तिथं जमिनीवर आढळणाऱ्या काही पुरावषेशांचा अभ्यास करून उत्खनन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयामुळं दख्खनच्या इतिहासाचं संपूर्ण स्वरूप बदललं.

या ठिकाणी डॉ. सांकलिया सरांच्या मार्गदर्शनाखाली १९५० ते ६० या दशकात शास्त्रीय पद्धतीनं उत्खनन करण्यात आलं आणि महाराष्ट्रातील आद्य मानवाच्या खुणा हाताशी लागल्या. आद्य पुराश्मयुगातील मानवाच्या अस्तित्वाचे धागेदोरे सापडले.

त्यामध्ये काही दगडी हत्यारं सापडली. दगडी हत्यारं बनवण्यासाठी लागणारा सर्वांत उत्तम प्रकारचा दगड म्हणजे गारगोटी. उत्तर भारतात तो विपुल प्रमाणात उपलब्ध होता. त्यापासून दगडी हत्यारे तयार करणं, त्यांना आकार देणं, वापर व्यवस्थित होईल अशी धार तयार करणं या दगडावर सोपं जाई. महाराष्ट्रात सर्वत्र बेसाल्ट.

त्याला धार लावणं किंवा त्यापासून दगडी हत्यार बनवणं, हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य न होणारी गोष्ट होती. पण त्या वेळेच्या मानवाला दगडांचं उत्तम ज्ञान होतं. जमिनीतून निघालेला लाव्हारस थंड झाल्यावर त्याच्या भिंती बनत असत. त्यांना आपण डाईक असं म्हणतो. हे आकारानं लांब, पसरट पण चपटे असत. त्यामुळं त्यांचा वापर करून महाराष्ट्रातल्या अश्मयुगीन मानवानं दगडी हत्यारं केली.

नेवासा इथं उत्खनन करण्यात आलं, तेव्हा या डाईक पासून बनवलेली बरीच हत्यारं उपलब्ध झाली. भारतात मानवाचं अस्तित्व लाखो वर्षांपासून आहे. त्या वेळेचा मानव हा दगडी हत्यारं तयार करत असे. त्यांच्या साहाय्यानं तो तोडणं, कापणं, भोसकणं, तुकडे करणं, छिद्र पाडणं यांसारख्या गोष्टी करत असे.

नेवासा इथं तशाच स्वरूपाची हत्यारं सापडली. दगडी हत्यारांना घडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रावरून आणि त्यांच्या आकारावरून त्या त्या काळाचं वर्गीकरण करण्यात आलं आहे. नेवासा येथे सापडलेल्या दगडी हत्यारांवरून महाराष्ट्रात अस्तित्वात असणारा पहिला मानव हा आद्य पुराश्मयुगीन काळातील आहे, हे सिद्ध झालं.

चिरकी ओढ्याकाठी झालेल्या या उत्खननानं महाराष्ट्राचा इतिहास लाखो वर्षे मागं गेला आणि सोबतच, अनेक नवीन पुरातत्त्वीय स्थळांचा शोध घेण्याचे प्रयत्न जोरात सुरू झाले. पण या पहिल्या मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे उपलब्ध झाले असले,

तरीही त्याची शरीररचना कशी असावी याविषयी उत्तर देण्यासाठी एकही मानवी सांगाडा सापडला नाही. उत्खनन केल्यामुळं या जागेचा आदिमानव ते मध्ययुगीन कालखंडपर्यंतचा नेवासा पर्यायानं महाराष्ट्राचा इतिहास पुरातत्त्वीय संशोधनाच्या आधारे मांडणं सोपं गेलं.

आद्य पुराश्म, मध्य पुराश्म, नवाश्म यांसारख्या मानवी विकासाच्या टप्प्यांचा शोध या उत्खननातून लागला. पुढं, १९६०-७० मध्येही या ठिकाणी उत्खनन करण्यात आलं. अश्मयुगीन काळातील दगडी हत्यारं,

मानव शेती करू लागला त्या काळातील खापराची भांडी, चूल, धान्य साठवण्यासाठी तयार करण्यात आलेली मोठमोठाली भांडी, मणी, बांगड्या, तांब्यापासून बनवण्यात आलेल्या वस्तू यांसारख्या अनेक मौल्यवान वस्तू प्राप्त झाल्या.

महाराष्ट्रात शेती होऊ लागली, तेव्हा मानव एका जागी स्थिर झाला. त्याचं दैनंदिन आयुष्य एकाच जागेभोवती फिरू लागलं. त्या वेळेस झालेल्या दफनांमुळं आपल्याला त्या शेती करणाऱ्या आद्य शेतकऱ्यांचे मानवी सांगाडे उपलब्ध झाले आहेत.

पण, त्याच्याही आधी वास्तव्य करणाऱ्या या आद्य मानवाचे मात्र पुरावे नेवासा इथून मिळाले नाहीत. वातावरणातील बदल आणि पाण्याची कमी-जास्त प्रमाणात असणारी उपलब्धता, नैसर्गिक संकटे यामुळे आद्य पुराश्मयुगीन काळानंतर ही जागा ओस पडली असावी. पण नंतर इथे मध्य पुराश्मयुगीन काळातील मानवाचे अस्तित्व आढळते.

पुढं शेती करणारा मानव, त्याच्यानंतर प्राचीन, पूर्व मध्ययुगीन ते मध्ययुगीन कालखंडातील मानवाच्या खुणा एकसलग आढळतात. नेवासासारख्या ठिकाणी एवढ्या मानवी संस्कृतीच्या पाऊलखुणा आढळल्यानं महाराष्ट्राचा मानवी अस्तित्वाचा आद्य ते सद्यःस्थितीपर्यंतचा इतिहास एकसलगपणे समजून घेण्यास फार मदत होते.

आज हे स्थळ चिरकी नाला किंवा चिरकी नेवासा या नावानं पुरातत्त्वीय स्थळांच्या यादीत प्रसिद्ध आहे. डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागात असणाऱ्या संग्रहालयात डॉ. ह. धी. सांकलिया सरांनी केलेल्या उत्खननाची व त्याच्या स्थरांची प्रतिकृती उभी केली आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या आद्य मानवाच्या वस्तींपैकी नेवासा हे महत्त्वाचे स्थळ म्हणून आजही आपले महत्त्व टिकवून आहे.

(लेखक हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.