सरस्वतीपुत्र!

राम शेवाळकर यांना जाऊन या ३ मे रोजी १५ वर्षे होतील; पण आजही त्यांची तितकीच उणीव भासते, तितकंच पोरकं वाटतं, यातच या व्यक्तींचं जिवंतपण कायम राहत असावं.
Literary ram shevalkar
Literary ram shevalkarsakal
Updated on

- भाग्यश्री पेठकर

प्रसिद्ध वक्ते आणि साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांचा आज जन्मदिवस. वक्तृत्व, विद्वत्ता, पांडित्य आणि या साऱ्यांच्या जोडीला असलेली कमालीची विनयशीलता, निरलसता या गुण समुच्चयाबरोबरच माणूसपण जपणाऱ्या या सरस्वतीपुत्राच्या काही आठवणींना उजाळा...

राम शेवाळकर यांना जाऊन या ३ मे रोजी १५ वर्षे होतील; पण आजही त्यांची तितकीच उणीव भासते, तितकंच पोरकं वाटतं, यातच या व्यक्तींचं जिवंतपण कायम राहत असावं. म्हणूनच मग अशा व्यक्तींच्या मागे दिवंगत वगैरेसुद्धा लावावंसं वाटत नाही. शरीराने साथ दिली असती आणि आज शेवाळकर हयात असते, तर नव्वदीपार असते आणि काम करीत राहिले असते, लिहीत राहिले असते, महाराष्ट्रभर व्याख्याने देत राहिले असते. कारण त्यांचा मेंदू आणि स्मरणशक्ती तशीच अगदी शेवटपर्यंत - अठ्ठ्याहत्तराव्या वर्षीदेखील अत्यंत तल्लख होती.

वक्ता दशसहस्रेषु राम शेवाळकर माणसांचा माणूस होते. युवक-तरुणांसोबतच ते अनेकांचे आधारस्तंभ होते. अडलेल्या-नडलेल्यांचे ते पालक होते. त्यांनी त्यांच्या अवघ्या आयुष्यात सामान्यातल्या सामान्य माणसाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं. त्यांच्या घरी माणसांचा कायम राबता असायचा. तिथे जाती-धर्माला थारा नव्हता, नाही. त्यात त्यांचं प्रचंड आदरातिथ्य! काही खाल्ल्याशिवाय कोणालाच परत जाऊ देत नसत.

नागपुरात आलेले नाट्य अभिनेते, गायक, वादक, कोणत्याही क्षेत्रातली बडी हस्ती त्यांच्या घरी येऊन गेल्याशिवाय आणि पाहुणचार घेतल्याशिवाय परतत नव्हती. हृदयनाथ मंगेशकर नागपूर-विदर्भात आले की मुक्कामी शेवाळकरांकडेच असायचे. अजूनही आले की येतात.

अगदी दीड-दोन वर्षांचे असतानाच मातृत्वाला पोरके झालेले राम शेवाळकर मातृहृदयी होते. त्यांच्या घराण्यातच कीर्तन परंपरा चालून आलेली असल्याने वडील - भाऊसाहेब शेवाळकरदेखील कीर्तनानिमित्त फिरस्तीवर असायचे. त्यामुळे त्यांचा भावंडांसकट सांभाळ त्यांच्या आजीने केला. राम शेवाळकर अत्यंत हळवे, संवेदनशील होते.

अश्रू त्यांच्या डोळ्यांच्या कडांशीच स्थिरावलेले असायचे. कोणाचं दुःख ऐकलं, बघितलं की लगेच त्यांच्या डोळ्यात पाणी तरळायचं. एखाद्या आप्त-स्वकियांच्या निधनाची बातमी त्यांना थेट सांगता येत नसे. विजयाताई ती त्यांना अत्यंत मजोगतीने सांगत.

राम शेवाळकरांच्या शेवटच्या काळात मी त्यांच्यासोबत काम केलं. तेव्हा हे प्रकर्षाने जाणवायचं की, माणसं उगाच मोठी होत नसतात. एखाद्या ध्यासातून, साधनेतून त्यांनी त्यांच्या आयुष्याला आकार दिलेला असतो. ही माणसं कृतिशील असतात. अशी माणसं दुर्मिळ असतात आणि म्हणूनच ती मौल्यवानही असतात.

संस्कृत आणि मराठी भाषेवर प्रभुत्व, प्रचंड व्यासंग, अभ्यासू वृत्ती या साऱ्यांची प्रचीती त्यांच्या वक्तृत्वातून, लेखनातून त्यांच्या रसिकांना नेहमीच येत राहिली आहे. कीर्तनाची परंपरा घराण्यातच असल्याने या ज्ञानतपस्वीच्या व्याख्यानांच्या विवेचनामध्ये सहज-सुलभता असे. अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला ती कळत असे. त्यांच्या ओघवत्या भाषेमुळे रसिकांना त्यांच्या व्याख्यानांनी भुरळ पडली.

रामायण, महाभारतासारख्या आर्ष महाकाव्यांमधल्या व्यक्तिरेखांसह महाभारतातील स्त्रीशक्ती ते ज्ञानेश्वरांचा प्रतिभाविलास भाग १ आणि २, ज्ञानेश्वरांचा नारायणीधर्म, ज्ञानेश्वरांचा चिद्विलासवाद, पसायदान अशा कितीतरी ध्वनिफिती अभ्यासपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या आहेत. इतकं विद्वत्ताप्रचुर व्यक्तिमत्त्व त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात किती निरहंकार, किती निरलस, किती विनयशील होतं, हे त्यांना जाणणारी प्रत्येक व्यक्ती म्हणेल.

एकदा आमचं लेखन सुरू होतं. एक तरुण अचानक केबिनमध्ये येऊन उभा राहिला. म्हणाला, ‘मला ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्यांबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे.’ शेवाळकरांनी तितक्याच शांतपणे त्याला पुढ्यात बसवलं. त्याला हवं ते समजावून सांगितलं. जवळपास पाऊण तास ते बोलत होते. नंतर तो युवक निघून गेला. मी त्यांना विचारलं, ‘कोण होता तो? त्याने त्याच्या येण्याची पूर्वसूचना तुम्हाला देऊन ठेवली होती का?’ त्यावर मंदसं स्मित करत ते म्हणाले, ‘मला माहीत नाही कोण होता तो.’ आपण कुठवर आलो होतो, असं न विचारता त्यांचं पुढचं डिक्टेशन सुरूही झालं होतं...

राम शेवाळकर कोणालाही प्रस्तावना देतात, असं म्हणणारेही होते. याबद्दल एकदा सहज त्यांना विचारलं असता ते म्हणाले, ‘एखाद्या माणसात सुप्त असा एखादा गुण असतोच. नेमका तो गुण हेरून त्याला त्याची जाणीव करून दिली तर त्याच्या आयुष्याला वेगळी पालवी फुटू शकते.’ दुसऱ्यांच्या आनंदाची इतक्या बारकाईने विचार करणाऱ्यांची गणना संतमहात्म्यांमध्ये करावी अशी आहे.

राम शेवाळकर आणि आशुतोष शेवाळकर या पिता-पुत्राचं प्रेमही अनोखं होतं - आहे. नागपुरात दक्षिण अंबाझरी मार्गावर आशुतोष यांनी अत्यंत सुबक असं घर बांधलं. राम शेवाळकरांना पायऱ्या चढताना त्रास व्हायचा, त्यामुळे त्यांनी ते घर जमिनीला समांतर बांधलं.

वरच्या मजल्यावर एक सुंदर ग्रंथालय (त्यात हजारो पुस्तकं आहेत), राम शेवाळकरांसाठी स्वतंत्र अभ्यासिका, भेटायला येणाऱ्यांना बसण्यासाठी व्यवस्था - असं प्रशस्त दालन त्यांनी आपल्या पित्यासाठी बांधलं. त्यांना लेखनात-वाचनात व्यत्यय येऊ नये म्हणून खास व्हिजिटिंग स्लिप्स बनवून घेतल्या होत्या. तिथे एकाला अपॉईंटही केलं. उद्देश इतकाच, की आलेली व्यक्ती त्यावर आपलं नाव लिहील, ते त्यांना आत नेऊन दाखवायचं आणि त्यांना वेळ द्यायची; पण हे सगळं अयशस्वी ठरलं.

त्या स्लिप्सचे गठ्ठे तसेच पडलेले राहिले. भेटायला येणाऱ्याला परवानगीची गरज का भासावी, असा राम शेवाळकरांचा प्रश्न असायचा. माणसांना असं ताटकळत बसवण्याचा त्यांचा पिंडही नव्हता. माणूस आधी महत्त्वाचा. थेट कोणी आत येण्याने अनेकदा त्यांचा वेळही जायचा; पण कोणाला दुखवायचं नाही, हा त्यांचा स्वभावविशेष!

मी एकदा राम शेवाळकरांना विचारलं की, ‘नकार न देता येणं हे वैगुण्य आहे की वैशिष्ट्य?’ त्यावर त्यांनी त्वरित उत्तर दिलं, ‘माणसं तोडून टाकायला थोडासाही अवधी लागत नाही; पण हीच माणसं जोडून ठेवायला आयुष्य खर्ची घालावं लागतं.’ या गोष्टीचा प्रत्यय ‘न भूतो न भविष्यति’ अशा त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी आला. जिकडे नजर टाकावी तिकडे दुतर्फा नुसती माणसंच माणसं! त्यात सर्वच स्तरातील, वर्ग, धर्माची आणि विविध वैचारिक पृष्ठभूमीची माणसं सहभागी होती. राम शेवाळकरांवर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच दैनिकांमध्ये अग्रलेख आले. नंतर पंधरा दिवस सतत कुठे ना कुठे त्यांच्यावर लेख येत राहिले.

अनेक जण त्यांना मिळालेल्या पदांमुळे, प्रसिद्धीमुळे, थोड्याशाही कीर्तीमुळे अहंकाराचा अंगरखा अंगावर मिरवतच सतत वावरत असतात. अशी माणसं आजूबाजूला अनुभवली असताना राम शेवाळकर यांच्या निरहंकार आणि निर्वैर वृत्तीचं दर्शन अक्षरशः अचंबित करणारं होतं. होताहोतपर्यंत सगळ्यांचं भलं व्हावं, ही त्यांची संतत्वाची वृत्ती समाजाला आश्वस्त करणारी होती. म्हणूनच १९९४ मध्ये गोव्याला भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राम शेवाळकरांची बिनविरोध निवड झाली.

वयाने शेवाळकरांपेक्षा लहान; पण कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांनी वाकून नमस्कार करणं हे मी अनेकदा अनुभवलं आहे. सार्वजनिक जीवनात शेवाळकरांशी उद्दामपणा करणाऱ्यांनाही त्यांनी त्यांच्या क्षमाशील वृत्तीने निर्विष केल्याचं पाहिलं आहे. एका कवीला आजारपण उद्‍भवल्यानंतर त्याला आर्थिक मदत म्हणून शेवाळकरांनी त्यांच्या पुस्तकांच्या प्रती कितीतरी हजारांमध्ये विकत घेतल्या.

मग अशी पुस्तकं ते त्यांना भेटायला येणाऱ्यांना भेट स्वरूपात देत. उक्तीपेक्षा कृतीवर त्यांचा भर होता. समाजकार्यात त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असा हिरिरीने सहभाग राहिला आहे. वणीला प्राध्यापक असताना सायकलवर ते कॉलेजला जायचे. कितीतरी ठिकाणी जे वाहन मिळेल त्याने - मग तो ट्रक का असेना - त्यात बसून ते व्याख्यानांच्या दौऱ्यांवर गेले आहेत. नंतर मुलाने देऊ केलेल्या गाडीतही फिरले; पण त्याने त्यांच्या वागण्यात कधीच फरक पडला नाही.

संस्कृतमध्ये पांडित्य, मराठी व्याकरणाचा गाढा अभ्यास (मराठी व्याकरणावर त्यांचं पुस्तक प्रकाशित आहे), महाकवी भास यांच्या नाट्यावर आधारित अग्निमित्र, याशिवाय अभिजात शाकुंतल, भासाची नाटके, प्रतिज्ञायौगंधरायण, स्वप्नवासवदत्ता, कालिदासाची यक्षसृष्टी, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, चारुदत्त आणि शूद्रकृत मृच्छकटिक, त्रिवेणी हे संस्कृतमधून मराठीतलं अनुवादित साहित्य, याशिवाय व्यक्तिचित्रणं, कवितासंग्रह या ललित लेखनासह चरित्रात्मक ग्रंथ इत्यादी अशी त्यांची दीड शतकाच्या वर ग्रंथसंपदा आहे.

राम शेवाळकरांनी लिहिलेल्या ‘पाणियावरी मकरी’ या आत्मचरित्राचं प्रकाशन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात झालं.

शेवाळकरांनी त्यांच्या पुस्तकांच्या रॉयल्टीविषयी कधीच प्रकाशकांना विचारणा केली नाही की कधी व्याख्यानांच्या मानधनावर चर्चा केली नाही. पैशांचा मोह त्यांना नव्हता. इतरांकडून काही घेण्यापेक्षा आपल्याजवळचं इतरांना मुक्त हस्ताने वाटून देणाऱ्यांमधले ते होते. देशातच काय अगदी विदेशातसुद्धा राम शेवाळकरांची व्याख्याने झाली, ती गाजली.

त्यांच्या वक्तृत्वाने रसिकांना भुरळ पाडली होती. शेवाळकरांच्या मृत्यूच्या दोन-तीन महिने आधीपर्यंत ते व्याख्यानासाठी जात राहिले. आजही त्यांच्या व्याख्यानांच्या ध्वनिफिती नियमित ऐकणारी माणसं आहेत. आपल्याजवळचं ज्ञान, आनंद इतरांना वाटत राहणं, हे त्यांच्या जगण्याचं ध्येय होतं, तोच त्यांचा स्थायिभाव होता.

राम शेवाळकर कधीही कोणत्याही ‘इझम’मध्ये अडकले नाहीत. समन्वयवादाचीच त्यांची कायम भूमिका राहिली आहे. विनोबांच्या विचारांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. शेवाळकर स्वभावाने मृदू असले, तरी तत्त्वाला मुरड न घालणारे असल्याने भूमिका घ्यायची वेळ आल्यानंतर वेळप्रसंगी ती त्यांनी अनेकदा कठोरपणे घेतलीदेखील आहे. डॉ. आनंद यादव यांना त्यांनी अशीच भूमिका घेत पाठिंबा दिला होता.

राम शेवाळकर यांनी मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र राष्ट्रभाषा, विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, साहित्य अकादमी, महाराष्ट्र साहित्य परिषद, नाट्य परीक्षण मंडळ, संतपीठ सल्लागार समिती, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा कितीतरी महत्त्वाच्या साहित्यिक, सामाजिक संस्थांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष अशी महत्त्वाची पदं भूषवत महत्त्वाची कामगिरी केली.

त्या संस्थांमध्ये जीव तोडून कामाचं योगदान दिलं. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष असताना ही संस्था त्यांनी विदर्भाच्या तळागाळापर्यंत पोहोचवली. ते एक चालतंफिरतं विद्यापीठ होते. अनेक जणांचं शब्दांचे अर्थ विचारण्याचं, संदर्भ विचारण्याचं हे एक हक्काचं ठिकाण होतं. राम शेवाळकरांचा पत्रव्यवहार खूप व्यापक होता. मोठमोठ्या साहित्यिकांशी, व्यक्तींशी झालेला पत्रव्यवहार फाईल्समध्ये आजही तसाच व्यवस्थित आहे.

राम शेवाळकरांना ‘मॅन ऑफ दी इयर’ हा अमेरिकेचा पुरस्कार, समाजभूषण, विदर्भ भूषण यांसारखे अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले; पण ‘महाराष्ट्र भूषण’ अगदी ‘पद्मश्री’ देण्याइतकं त्यांचं कार्यकर्तृत्व असताना शासनाने त्याबाबतच कृपणता दाखवली, असं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचं म्हणणं आहे.

आयुष्य इतकं डोळसपणे जगलेल्या माणसाला मृत्यूचीही चाहूल लागत असावी का? कारण ते अलौकिकत्व शेवाळकरांमध्ये होतं. थोडं मागे वळून बघताना हे धागे जुळले जातात... आचार्यकुलाचं हस्तांतरण, बापूजी अणे यांचं पोस्टाचं तिकीट निघावं यासाठी केलेला आटापिटा, जायच्या आदल्या दिवसापर्यंत राम शेवाळकरांनी काम केलं. अगदी शेवटच्या दिवशी रा. तु. गेडाम यांच्या पुस्तकाची प्रस्तावना सांगून पूर्ण केली.

त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या प्रशस्त अशा ग्रंथालयात फेरी मारत ‘खूप वाचायचं राहून गेलं आहे, अजून एक जन्म हवा,’ असं म्हणत सगळ्या पुस्तकांवर मायेने नजर फिरवली... आजच्या या कठीण काळात राम शेवाळकरांसारखी माणसं हयात असायला हवी होती, असं पदोपदी प्रकर्षाने वाटत राहतं!

pethkar.bhagyashree3@gmail.com

(लेखिका मराठी वाङ्‌मयाच्या अभ्यासक असून, प्रचार्य राम शेवाळकर यांच्या लेखनिक म्हणून त्यांनी काम केले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()