स्त्रीकडं माणूस म्हणून पाहणारा महामानव

christmas
christmas
Updated on

संत मॅथ्यूनं प्रभू येशूच्या वंशवेलीची विचारपूर्वक मांडणी केली आहे. पुरुषप्रधान समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान असतं. त्यांच्या नावांचा संदर्भही दिला जात नाही. अशा वेळी संत मॅथ्यूनं तामार, राहाब, बाथशिबा आणि रूथ या चार स्त्रियांचा वंशवेलीत नावासह उल्लेख केला असून, त्यांच्या संशयास्पद वर्तनाकडं त्यानं हेतुपुरस्सर काणाडोळा केला आहे. स्त्रीला एक व्यक्ती म्हणून मूल्य आहे, ही गोष्टच संत मॅथ्यूनं त्यातून अधोरेखित केली. समाज जरी या स्त्रियांकडं संशयी नजरेनं पाहत असला, तरी भाष्यकार मात्र त्यांच्याकडं सहृदयतेनं पाहतात. 
आजच्या (२५ डिसेंबर) नाताळनिमित्त हा विशेष लेख...


बायबलमध्ये आदिमानव आणि आदिस्त्री यांना समान मानलेलं आहे. त्यांना दिलेली आदाम (ॲडम) आणि हव्वा (इव्ह) ही विशेषनामं नसून, सामान्यनामं आहेत. ते पुरुषी व स्त्री समाजाचे प्रतिनिधी आहेत. मिथकथेतल्या या आदि दांपत्यानं ‘देवा’ची आज्ञा मोडली. देवानं निषिद्ध ठरवलेलं फळ आदि स्त्रीनं फोडलं, स्वत: खाल्लं व पतीलाही खायला दिलं. त्यामुळं ती दोघं देवाच्या कृपाप्रसादाला मुकली. ‘पाप’ करून आदि-मानवानं स्वत:चं अवमूल्यन करून घेतलं. तो आपली प्रतिष्ठा हरवून बसला. वास्तविक स्त्री-पुरुष या दोघांनी हा ‘गुन्हा’ केला होता. मात्र केवळ स्त्रीनं पुढाकार घेतला (कारण ती स्वतंत्र विचाराची होती?) म्हणून तिच्या माथी सगळ्या दोषांचं खापर फोडण्यात आलं आहे.

प्रत्यक्ष कथेमध्ये देवानं स्त्रीकडं व पुरुषाकडं स्पष्टीकरण मागितलं. मात्र, त्यांना दोष दिलेला नाही. उलट ‘स्त्री सैतानाचं डोकं ठेचील’ अशा शब्दांत तिचा गौरव केला आहे. आपल्या अपत्यांना फसवलं म्हणून देवानं सैतानाला शाप दिला व दोष दिला. असं असलं तरी इतिहासाच्या प्रवासात या ‘आद्य पापा’बद्दल पुरुषप्रधान समाजानं स्त्रीलाच जबाबदार धरलं आहे. 

सृजनाचं रहस्य स्त्रीच्या शरीराशी निगडित आहे. त्यासाठी निसर्गानं तिला मासिकधर्म दिला आहे. मासिक चक्राच्या अद्भुत व प्रसंगी अवघड प्रक्रियेद्वारे सृजनाला मोहोर फुटतो. प्रसंगी आपला जीव धोक्‍यात घालून स्त्री ही गर्भाला जन्म देत असते. प्रसववेदनेचं अग्निदिव्य पार करून ती बाळाला जन्म देते. त्याचं संगोपन करते. ज्या मासिकधर्मामुळे हे सगळं घडतं, त्याबद्दल विस्मयाची भावना बाळगण्याऐवजी घृणा व्यक्त केली जावी, स्त्रीला ‘अशुद्ध’ समजून तिला शासन केलं जावं हा पुरुषी कृतघ्नतेचा व क्रूरतेचा कळसच नव्हे काय? 

मातृत्व हा सजीवांना मिळालेला सगळ्यात महत्त्वाचा वर आहे. वंशसातत्याचं ते सुवर्णसूत्र आहे. ते नेहमीच पवित्र असतं. तरी पुरुषप्रधान संस्कृतीनं सभोवती काटेरी कुंपणं उभी केली आहेत. ‘औरस’, ‘अनौरस’ असे शब्द वापरून आपण सृजनाचा अवमान करत असतो, हे पितृसत्ताक समाजाच्या ध्यानात येत नाही का?

‘जगाचा इतिहास हा स्त्रीच्या छळाचा इतिहास आहे,’ असं म्हटलं जातं. असं असलं तरी हिब्रू संस्कृतीनं स्त्रीला मोठ्या प्रमाणात उजवं माप दिलेलं आढळतं. प्रभू येशू ख्रिस्त हा बायबलचा महानायक आहे. त्याच्या म्हणजेच ‘मसीहा’च्या आगमनासाठी ‘जुन्या करारा’चा अवघा अट्टहास होता. सगळ्यांच्या नजरा त्याच्या आगमनाकडं लागलेल्या होत्या. त्याच्या जन्माच्या कथांचं वर्णन ‘नव्या करारा’त करण्यात आलेलं आहे. संत लूक व संत मॅथ्यू यांनी प्रभू येशूच्या वंशवेलीचं वर्णन केलेलं आहे. संत लूकनं मरियाचा पती योसेफ (जोजफ) याच्यापासून सुरवात करून ती वेल ‘आदिमानव’ याच्यापर्यंत नेली आहे. तिच्यात एकाही स्त्रीचं नाव नाही. मॅथ्यूनं आब्राहामपासून प्रारंभ करून येशूची आई मारिया हिच्यापर्यंत वंशवेल नेली असून, या यादीत पुरुषांची ४५ नावं असून, स्त्रियांची पाच नावं आहेत. ती पुढीलप्रमाणे : तामार, राहाब, बाथशिबा (बाथशिबाचं रूथ व मारिया असं सरळ नाव न देता ‘उरियाची पत्नी’ असं म्हटलेलं आहे.) यापैकी पहिल्या चार स्त्रिया ‘जुन्या करारा’तल्या आहेत. मरिया ‘नव्या करारा’तली आहे. 

संशयास्पद चारित्र्य?
‘जुन्या करारा’मधली तामार, राहाब, बाथशिबा आणि रूथ यांच्या चारित्र्याबद्दल संशय व्यक्त केले गेले आहेत. तामार ही आब्राहामचा नातू ज्युडा (यहुदा) याचा ज्येष्ठ पुत्र एर याची कनानी समाजातली पत्नी. एर हा निपुत्रिक मरण पावला. ‘थोरला भाऊ निपुत्रिक मरण पावला तर त्याच्या भावानं आपल्या विधवा भावजयीशी लग्न करावं आणि त्याच्यापासून तिला होणारी संतती ही मृत भावाची समजावी,’ अशी इस्राईलमध्ये रीत होती. या इस्राईलमध्ये ‘द लॉ ऑफ लेव्हिएरेट’ असं म्हणत असत. तत्कालीन समाजरीतीनुसार ज्युडानं म्हणजे सासऱ्यानं तामारचं लग्न तिचा दीर ओनान याच्याशी लावून दिलं. त्याच्यापासून होणारा मुलगा एरचा वंशज समजला जाणार होता; त्यामुळं ओनाननं तामारला वीर्यदान करण्याचं टाळलं. ही गोष्ट ज्यू नीतिशास्त्राला धरून नव्हती. ओनानही निपुत्रिक वारला. ज्युडाचा तिसरा मुलगा शेला हा लग्नाचा झाला तरी वडील काहीच हालचाल करीनात. त्याला त्याचं लग्न तामारशी लावून द्यायचं नव्हतं. सासऱ्याची ही चाल तामारनं ओळखली. तिच्यावर सासऱ्यानं अन्याय केला होता.
तामारनं वेश्‍येचं सोंग घेतलं. ती बुरखा घालून ज्युडाच्या म्हणजे सासऱ्याच्या येण्या-जाण्याच्या वाटेवर बसली. ज्युडा तिथून जात असता त्यानं त्या बुरखाधारी स्त्रीला पाहिलं. ती आपली सून आहे, हे त्यानं ओळखलं नाही.

त्यानं तिला विचारलं : ‘‘माझ्याबरोबर येतेस का?’’
तिनं उत्तर दिलं : ‘‘मला काय देशील?’’
तो म्हणाला : ‘‘मी माझ्या कळपातलं एक कोकरू तुला पाठवून देईन.’’
ती म्हणाली : ‘‘ते येईपर्यंत तू काय जामीन ठेवशील?’’
त्यानं विचारलं : ‘‘तुला काय देऊ?’’
ती म्हणाली : ‘‘तुझी मुद्रिका, गोफ आणि हातातली काठी मला दे.’’

ज्युडानं त्या अटी मान्य केल्या. त्यांनी समागम केला. नंतर त्यानं दिलेल्या शब्दानुसार तिच्याकडं कोकरू पाठवून दिलं; परंतु नोकराला तिचा ठाव-पत्ता लागला नाही. तो हात हलवत परत आला. ज्युडा त्याला काही बोलला नाही. त्या संबंधातून तामारला गर्भ राहिला. विधवेला दिवस गेले आहेत, हे लोकांना समजलं, तेव्हा त्यांनी ज्युडाला ही बातमी सांगितली. तेव्हा ज्युडा म्हणाला : ‘‘तिला जाळून टाका.’’

त्यावर तिनं ज्युडाला निरोप पाठवला : ‘‘माझ्याकडं ज्या वस्तू आहेत, त्या ज्या पुरुषाच्या आहेत त्याच्यापासून मी गर्भवती आहे.’’ ज्युडानं येऊन पाहिलं तेव्हा तो लोकांना म्हणाला : ‘‘माझ्यापेक्षा ती अधिक नीतिमान आहे. माझंच चुकलं. मी आपल्या समाजरीतीनुसार माझ्या धाकट्या मुलाबरोबर तिचं लग्न लावून द्यायला हवं होतं.’’ त्यानंतर ज्युडानं तामारशी शरीरसंबंध ठेवला नाही. अशी ही तामारची कथा. येशूच्या वंशवेलीतले पेरेस व जेरह ते तामार-ज्युडा यांचे जुळे पुत्र होत. 
 

***
दुसरी स्त्री राहाब. ही वेश्‍या होती. मोझेसचा उत्तराधिकारी जोशुआ. तो वतनभूमीचा ताबा घेण्यासाठी इजिप्तहून आला होता. इस्राईलच्या वेशीवर त्याला राहाब या वेश्‍येचं घर लागतं. तिनं जोशुआच्या जासूदांना आसरा दिला व त्यांना गुप्त माहिती पुरवली. या तिच्या सत्कृत्याबद्दल जोशुआनं तिचं लग्न आपला हेर सल्मोन याच्याबरोबर लावून दिलं. त्यांना बोआज नावाचा मुलगा झाला. या बोआजचं पुढं रूथ नावाच्या मवाबी स्त्रीशी लग्न झालं. त्यांना ओबेद नावाचा मुलगा झाला. ओबेदला इशाय झाला. इशाय हा राजा दाविदचा बाप. राजा दाविद यानं बाथशिबा या सरदारपत्नीशी सूत जुळवलं व त्या संबंधातून बाथशिबा गर्भवती झाली. त्या बेअब्रूतून सुटका करून घेण्यासाठी दाविदनं कारस्थान रचून बाथशिबाचा पती उरिया याची हत्या घडवून आणली. त्यानंतर राजानं बाथशिबाशी रीतसर विवाह केला. त्यांना सालोमन हा पुत्र झाला. तो राजा दाविदचा उत्तराधिकारी झाला. त्यांच्या घराण्यात पुढम प्रभू येशूचा जन्म झाला. 

जनरीतीप्रमाणे प्रभू येशूच्या पूर्वसुरी असलेल्या तामार, राहाब, रूथ आणि बाथशिबा या स्त्रिया कलंकित होत्या. तामारला सासऱ्यापासून मुलं झाली. राहाब तर वेश्‍या म्हणून गणली गेली होती. रूथचं बोआजशी पुनर्विवाहाअगोदरचे वर्तन संशयास्पद होतं. सासूच्या सूचनेवरून विवाहापूर्वी तिनं आपल्या पतीच्या शय्येशेजारी रात्र काढली होती. बाथशिबाचे राजाबरोबर विवाहबाह्य संबंध होते. म्हणजे तिनं व्याभिचार केला होता. 
प्रभू येशूचा जन्म जनरीतीप्रमाणे झाला नाही. त्याची आई मरिया हिचा विवाह होण्याआधी तिला दैवी संकेतानुसार पुत्रगर्भ राहिला. या ‘गुन्ह्या’साठी यहुदी समाजात दगडानं ठेचून ठार मारण्याची शिक्षा होती. तरीही माता मरियानं आपल्या उदरातल्या गर्भाचं प्राणपणानं जतन केलं. समाजासाठी ती ‘कुमारी माता’ होती. समाजाला तो प्रकार मान्य नव्हता, तर प्रश्‍नांकित होता. एका धैर्यवान स्त्रीनं जननिंदेची पर्वा न करता आपल्या बाळाला जन्म दिला. तिच्यामुळं जगाला येशू नावाचा महात्मा लाभला. 

सर्वसमावेशकता

संत मॅथ्यूनं प्रभू येशूच्या वंशवेलीची विचारपूर्वक मांडणी केली आहे. पुरुषप्रधान समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान असतं. त्यांच्या नावांचा संदर्भही दिला जात नाही. अशा वेळी संत मॅथ्यूनं चार स्त्रियांच्या नावासह उल्लेख केला आहे. त्यांच्या संशयास्पद वर्तनाकडं त्यानं हेतुपुरस्सर काणाडोळा केला आहे. स्त्रीला एक व्यक्ती म्हणून मूल्य आहे, ही गोष्ट संत मॅथ्यूनं अधोरेखित केली आहे. समाज जरी या स्त्रियांकडं संशयी नजरेनं पाहत असला, तरी भाष्यकार मात्र त्यांच्याकडं सहृदयतेनं पाहतात. 

माणूस शंभर टक्के कधीच वाईट नसतो. काळ्याकुट्ट ढगाची चंदेरी किनार पाहण्यासाठी नजरही तितकीच शोधक असावी लागते. नजर पत्थरातून फुलं निर्माण करू शकते. ‘सर्वाभूती करुणा’ हे ‘नव्या करारा’चं क्रांतिकारी पाऊल होतं. पाप आणि पुण्य या निकषांच्या पलीकडं जाऊन माणसाकडं व विशेषत: स्त्रीकडं माणूस म्हणून पाहण्याची नजर ‘नव्या करारा’च्या महानायकानं दिली व तिचं संवर्धन त्याच्या शिष्यांनी केलं.

संत मॅथ्यूनं निवडलेल्या या सर्व स्त्रिया (माता मरिया वगळता) बिगर यहुदी म्हणजे परराष्ट्रीय होत्या. पारंपरिक यहुदी शिकवणुकीनुसार परराष्ट्रीय हे आध्यात्मिकदृष्ट्या दुय्यम दर्जाचे, पापी नागरिक होते. उलट यहुदी हे देवाचे लाडके, पुण्यवंत होते. ‘आपण तितके श्रेष्ठ, बाकीचे सगळे भ्रष्ट’ अशी यहुदी समाजाची आढ्यताखोर भूमिका होती. वर्णश्रेष्ठत्वाचं विष त्यांच्या अंगात भिनलेलं होतं. संत मॅथ्यूनं परराष्ट्रीय समाजातल्या प्रतिनिधींचा त्याही स्त्रिया आणि परत त्यातही संशयित समजल्या गेलेल्या स्त्रियांचा त्यांच्या नावानिशी वंशवेलीमध्ये सन्मानानं नामोल्लेख करून नव्या ख्रिस्ती धर्माचं सर्वसमावेशक धोरण स्पष्ट केलं. सोवळ्या-ओवळ्याचे, जातीपातीचे, श्रेष्ठ-कनिष्ठतेचे देव्हारे माजवून, काही समाजगटांना गावकुसाबाहेर ठेवल्यामुळे आपल्या धर्माची प्रगती न होता अधोगती होईल हे संत मॅथ्यूनं व पहिल्या ख्रिस्ती समाजानं ओळखलं. सगळ्यांना कवेत घेणारी क्रांतिकारी शिकवण प्रभू येशूनं दिली आणि उपेक्षितांसाठी उघडलं स्वर्गाचं दार. अशा या स्वागतशील धोरणामुळं जगभर; विशेषत: दीन-दलितांनी मोठ्या प्रमाणात प्रभू येशू ख्रिस्ताच्या अभिनव ‘मार्गा’चा अवलंब केला. 

येशूच्या पूर्वसुरींमधले सगळे पुरुष पावित्र्याचे पुतळे होते असं नाही. आब्राहामला श्रद्धेचा आदिपिता मानलं जातं. आपली पत्नी सारा हिच्यामुळं आपल्या जिवावर बेतेल असा प्रसंग निर्माण झाला असताना त्यानं सारा ही आपली बहीण आहे, असं सांगून बायकोला राजाच्या हवाली केलं! जेकबनं कारस्थान करून आपल्या भावाला फसवलं. दाविदनं व्यभिचार आणि मनुष्यहत्या असा दुहेरी गुन्हा केला. सॉलोमननं आत्महत्या केली. अहाज आणि मनस्से या राजांनी निरपराध्यांची हत्याकांडं केली. हे सगळे येशूचे पूर्वसुरी होते. या सगळ्यांचे पाय चिखलानं माखलेले होते. प्रत्येकाच्या जीवनाला अंधारी बाजू होती. असं असूनही त्यांच्या घराण्यात प्रभू येशूनं जन्म घेतला. याचा अर्थ असा की देव चिखलातूनही कमळं फुलवू शकतो...मातीतूनही मोती घडवू शकतो. 

घराण्याचा पूर्वेतिहास कलंकित असूनही येशूचं चारित्र्य धुतल्या तांदळापेक्षा स्वच्छ होतं. मानवी असणं म्हणजे स्खलनशील असणं असं समजलं जातं. मानवी असूनही स्खलनशीलतेवर विजय मिळवता येतो, (To err is human but not to err is also human) हे प्रभू येशूंनी दाखवून दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.