प्रभू येशूच्या जीवनाचा विचार करताना त्याच्या अंतर्मनातील भावभावनांबद्दल नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. तो देवपुत्र होता तरी तो आपल्यासारखाच हाडामांसांचा माणूसच होता.
प्रभू येशूच्या जीवनाचा विचार करताना त्याच्या अंतर्मनातील भावभावनांबद्दल नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. तो देवपुत्र होता तरी तो आपल्यासारखाच हाडामांसांचा माणूसच होता, त्यालाही आपल्या सारख्याच भावभावना होत्या. पावलापावलावर त्यालाही आतल्या भावनिक वादळांना सामोरे जावे लागत होते. प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवन म्हणजे एक संघर्षयात्रा होती. दीन-दुबळे, अनाथ, अपंग, कुष्ठरोगी, समाजातील या दुर्बल घटकांवर प्रभूने मातेसारखी माया केली; परंतु जे प्रस्थापित होते, धर्माचे ठेकेदार बनले होते त्यांच्या माथा प्रभू येशूने काठी हाणली. त्यांच्या विरोधाची त्याने पर्वा केली नाही. डिवचलेल्या नागासारखे ते फुत्कार टाकू लागले. हा संघर्ष अखंड चालू होता. दुसऱ्या बाजूला समाजातील दुर्बल घटकांसाठी प्रभूने स्वतःला झोकून दिले. भाकरी खाण्यासाठी देखील त्याला उसंत मिळत नव्हती. सेवा आणि संघर्ष हा येशूच्या जीवनाचा कार्यक्रम होता. अधून मधून तो एकांतात जाऊन रात्रीच्या रात्री ध्यानसाधना करीत असे. आपल्या पित्याशी हृदय संवाद साधीत असे.
एकदा प्रभू एकटेच होते. अचानक त्यांची भावसमाधी लागली. त्यांच्या शरीराच्या रंध्रारंध्रातून आनंदाच्या लहरी लहरू लागल्या आणि संत लूकने म्हटल्याप्रमाणे येशू आत्म्यात उल्हासला. ‘आनंदाच्या डोही आनंद तरंग'' अशी त्याची गत झाली. तो तन्मयी अवस्थेत पोहोचला. त्याचा अंतर्आत्मा उल्हासला. आनंद हा येशूचा स्थायीभाव झाला होता. नदीला जसे आतून झरे फुटतात तसे प्रभूच्या आत्म्यामधून आनंदाचे निर्झर वाहत होते. त्या अवस्थेत त्याने म्हटले, ‘हे परमेश्वरा, तू थोरामोठ्यांना नव्हे, तर बालकांना प्रसन्न होत असतो.''''
प्रभू येशूने परमआनंदाचा अनुभव घेतला. तो एक क्षण होता, त्या क्षणाने त्याच्या अवघ्या अस्तित्वाला अर्थ दिला. त्यामुळे सर्व प्रकारच्या संकटांना सामोरे जाण्यासाठी त्याला आत्मिक बळ मिळत गेले. वेदान्त तत्त्वज्ञानामध्ये परमसत्याचे वर्णन सत्, चित् आणि आनंद असे केलेले आहे. सत् म्हणजे असणे, अस्तित्व. चित् म्हणजे जाणीव-नेणिवेचा प्रांत आणि आनंद म्हणजे भावावस्था. येशूने हे सर्व अनुभवले. आनंद हा त्याचा कायमचा अनुभव होता. त्याला नक्कीच दु:ख-वेदना होत असत, परंतु प्रचंड वादळात माडाचे उंच झाड झोकांड्या खात असते, मात्र त्याची मुळे खोल पृथ्वीच्या गर्भापर्यंत पोहोचली असल्यामुळे ते उन्मळून पडत नाही. प्रभू येशूकडे असे प्रचंड आत्मिक बळ होते. त्यामुळे प्रसंगी त्याला अनेक प्रकारच्या भावभावनांना तोंड द्यावे लागले. तरी तो कधीही उन्मळून पडला नाही. तो लाखांचा पोशिंदा होता, त्याला उन्मळून कसे चालेल?
प्रभूने वेदना, दु:ख, मृत्यू हे सारे पहिले. त्याने डोळ्यांनी नव्हे तर काळजाने पहिले. वेदनाग्रस्तांबरोबर त्याची भावसमाधी लागत असे. ती केवळ अनुकंपा नव्हती, तर सहवेदना होती. आपण त्या व्यक्तीच्या जागी आहोत असे तो समजत असे. त्यांच्या वेदना दूर सारीत असे. मग तो भुकेचा प्रश्न असो, कुणाचा अकाली मृत्यू असो, किंवा आजारी रुग्णांचा, किंवा जखमी व्यक्तींचा असो, हे सर्व पाहून येशू शांत राहू शकत नव्हता. त्याला कळवला येत असे आणि तो त्यांच्या मदतीला धावत जात असे. त्यांची व्याधी, वेदना दूर करीत असे. बायबलमध्ये कळवळा हा शब्द वापरला आहे. माणसांच्या दु:खाचे वळ त्याच्या काळजावर उमटत असत. येशू केवळ समाजकार्य करीत नव्हता, तर तो इतरांची वेदना आपलीच आहे असे समजून कृती करीत होता. ''ऐसी कळवळ्याची रीती, करी लाभावीण प्रीती,'' असा तो कळवला होता.
प्रभू येशू ख्रिस्त परिपूर्ण देव होता आणि परिपूर्ण माणूस होता. हे दोन्ही स्वभाव प्रभू येशूमध्ये एकवटलेले होते, जसे दुधात पाणी एक व्हावे. येशूला परमआनंदाचा अनुभव आला. इतरांच्या वेदना पाहून त्याला त्यांचा कळवला आला. एक माणूस म्हणून त्याला वेदनेचा अनुभव आला. त्या वेदनेमुळे त्याचा अंतर्आत्मा व्यथित झाला. ही वेदना त्याची स्वत:ची होती असे नाही, तर इतरांची होती. ‘अवघ्या अभाग्यांचे अश्रू’ त्याच्या डोळ्यांतून वाहत होते. त्याच्यासाठी कधीच परदुःख शीतल नव्हते. इतरांचे दुःख त्याचे स्वतःचे होत असे. त्यामुळे तो विव्हळत असे. प्रसंगी तळमळत असे. आपला मित्र लाझरस मरण पावला आहे, हे समजताच येशूला दुःखाचा कढ आला आणि तो रडला. आपल्या सहृदाच्या मृत्यूमुळे आपल्यामध्ये काहीतरी मरत असते, कारण जसे झाडाची फांदी छाटली की संपूर्ण वृक्षाला शहारे येतात, तसे येशूचे होत असे. खूप प्रीती केली की त्या प्रीतीमध्ये भोगही असतात. येशूने लाझरसवर सात्त्विक प्रेम केले. त्यामुळे लाझरसच्या मृत्यूने तो विव्हळला आणि रडला. अश्रू ही मानवाला मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे. अश्रू हा आपल्या माणुसकीला आलेला गहिवर आहे.
येशूने लाझरसवर प्रेम केले तसे व्यापक समाजावरही केले. एकदा तो ऑलिव्हच्या टेकडीवर प्रार्थना करीत होता. त्याने सभोवार नजर टाकली. माणसं आपल्या संसारामध्ये गुंतलेली होती. आपल्या जीवनात श्रेयस आणि प्रेयस काय आहे? या जगण्यावर, या जीवनावर शतदा नव्हे, परंतु एकदातरी प्रेम का करावे? हा प्रश्न त्यांना भेडसावत नव्हता. त्याला जेरुसलेमचे मंदिर दिसत होते. मंदिराच्या प्रांगणात चाललेला भ्रष्टाचार तो उघड्या डोळ्यांनी पाहात होता. या लोकांनी कधी सत्याचा, सुंदराचा, मंगलाचा अनुभव येत असेल का? ‘बुडती जन, न देखवे डोळा’ अशी येशूची अवस्था होत असे. येशूने ऑलिव्ह टेकडीवरून प्रार्थना करीत असताना सभोवार नजर टाकली, माणसे ऐहिकामध्ये गुंतून पडली होती. आपले अंतिम हित कशात आहे हे त्यांना जाणवत नव्हते.
म्हणून प्रभू येशूच्या डोळ्यांमध्ये आसवे उभी राहिली आणि त्याने प्रार्थना केली, तो उद्गारला, ‘‘कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते, तसे मी तुम्हाला कवेत घेतले, तुम्हाला दिव्य ज्ञान दिले, पण तुम्ही त्याची पर्वा केली नाही. माझ्या प्रीतीला तुम्ही प्रतिसाद दिला नाही. तुमच्यासाठी अजून काय करायला हवे होते....?’’ त्याला दुःखाचा उमाळा आला आणि तो घळाघळा रडला. येशूच्या मानवतेचा तो आविष्कार होता. माणूस होणे म्हणजे माणसाच्या सगळ्या व्यथा-वेदना, आनंद-हर्ष, सुख-दुःख आपलेसे करणे. येशू पूर्णपणे मानवाच्या भावजीवनाशी समरस झाला. त्याने केवळ मानवी अवतार धारण केला नव्हता, तर चारचौघा माणसासारखा तो माणूस झाला. माणूस बनून त्याने आनंद आणि दुःख ह्यांचा परिपूर्ण अनुभव घेतला.
आपला अंतिम काळ अगदी समीप आला आहे याची जाणीव येशूला झाली, तेव्हा त्याने आपल्या मोजक्या शिष्यांना जवळ घेतले आणि तो प्रार्थना करण्यासाठी म्हणजे परमेश्वराशी हृदय संवाद साधण्यासाठी जेथसेमेनी बागेत गेला. ती त्याची नित्याची प्रार्थना करण्याची जागा होती. शिष्यांना एके ठिकाणी बसवून तो म्हणाला, ‘‘मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.’’ त्याने पीटर, जेम्स व जॉन ह्यांना सोबत घेतले. तो व्याकूळ व अस्वस्थ होऊ लागला. तो त्यांना म्हणाला, ‘‘माझ्या जिवाला मरणप्राय अतिखेद झाला आहे. तुम्ही येथे राहा व जागृत असा.’’ तो काहीसा पुढे गेला, भूमीवर पडला आणि त्याने प्रार्थना केली, ''''शक्य तर ही घटका माझ्यापासून टळून जावी... अब्बा बापा, तुला सर्व काही शक्य आहे. परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.’’ तो माघारी फिरला, पाहतो तर शिष्य घोरत आहेत. तो पिटरला म्हणाला, ‘‘झोपी गेलास काय ? तुला घटकाभरही जागृत राहवले नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे तरी देह अशक्त आहे.''
पुन्हा जाऊन तेच शब्द उच्चारून त्याने प्रार्थना केली. पुन्हा येऊन पाहतो तो ते झोपी गेले आहेत. त्यांचे डोळे जड झाले होते आणि काय उत्तर द्यावे हे त्यांचे त्यांना सुचेना. तिसऱ्या वेळेस येऊन तो त्यांना म्हणाला, ‘आता झोपा व विसावा घ्या. पुरे झाले. घटका आली आहे. मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ या. माझा विश्वासघात करणारा अगदी जवळ आहे.’
येशूच्या रूपाने देव माणूस झाला होता. तो कठीण प्रसंगी अगतिक झाला. आधार शोधू लागला. देवालादेखील माणसाच्या आधाराची गरज भासली. दुःखाचा डोंगर माणूस पेलू शकतो, परंतु कुणीतरी आपला माणूस आपल्याबरोबर आहे या विचाराने त्याचा खांदा हलका होऊ शकतो. ‘तदितर खग भेणे वेगळाले पळाले, कठीण समय येता कोण कामास येतो?’ असे कवीने म्हटले आहे. प्रभू येशू त्याही दुःखाच्या मांडवाखालून गेला. ज्याला त्याने आपल्या शिष्यमंडळात सामील केले, ज्याच्यावर त्याने मातेसारखा मायेचा वर्षाव केला, ज्याच्यावर त्याने पूर्णपणे विश्वास टाकला तो त्याच्या बारापैकी विश्वासातील गडी ज्युदास नागाप्रमाणे उलटला. हे घरातले दुःख कोणाला सांगायचे? येशू म्हणजे ‘सकल जनांचा आधारू'' तरी त्याला स्वतःला आधार शोधावा लागला. माणसाला सर्वांत मोठे दुःख एकटेपणाचे आणि एकाकीपणाचे असते. त्याचा नेहेमीचा आधार असलेला ‘अब्बा बापा’ ह्यानेदेखील डोळे बंद केले. आकाशाने दरवाजे लावून घ्यावेत, पृथ्वीने आधार नाकारावा अशी त्याची अवस्था झाली. अशावेळी आपल्या वैयक्तिक प्रार्थनेतून त्याला बळ मिळत गेले आणि त्याने स्वतःला सावरले. कठीण प्रसंगी आत्मबळ हाच आपला आधार असतो. आत उठणाऱ्या भावकल्होळाला आवरायचे तर जीवनात एकांतातल्या प्रार्थनेला पर्याय नाही. हेच प्रभू येशू आपल्याला दाखवून देतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.