क्रिकेटच्या इतिहासात पहिला डे-नाईट आंतरराष्ट्रीय सामना २७ नोव्हेंबर १९७९ ला ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज या संघांमध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राउंड वर खेळविण्यात आला.
क्रिकेट या खेळाला आज ग्लॅमर, पैसा, यश व समाजमान्यता मिळाली आहे. ''खेळाडूंना करारबद्ध करून रंगीत कपड्यांत डे-नाईट सामने खेळविणे'' आता नवीन गोष्ट राहिली नाही. पण क्रिकेटमध्ये गोष्टी नेहमीच अशा नव्हत्या.
रंगीत कपडे, डे-नाईट सामने, खेळाडूंना करारबद्ध करणे या गोष्टींना एक मोठा इतिहास आहे. भारतीय संघाने सर्वात पहिल्यांदा रंगीत जर्सी ही १९८५ मध्ये ‘बेन्सन अँड हेजेस’ वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी घातली.
रंगीत कपड्यांमध्ये क्रिकेट विश्वचषक होण्यासाठी १९९२ ची वाट पहावी लागली. त्याआधी एकदिवसीय क्रिकेट सामने सुद्धा पांढऱ्या कपड्यांमध्येच होत असत. आता कुठे एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून एकदिवसीय सामने हे पूर्णपणे रंगीत कपड्यांमध्ये खेळले जाऊ लागले.
क्रिकेटच्या इतिहासात पहिला डे-नाईट आंतरराष्ट्रीय सामना २७ नोव्हेंबर १९७९ ला ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज या संघांमध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राउंड वर खेळविण्यात आला. ऑस्ट्रेलिया नंतर डे-नाईट आंतरराष्ट्रीय सामना भारताने २८ सप्टेंबर, १९८४ रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियम, न्यू दिल्ली या फुटबॉल मैदानावर आयोजित केला होता.
"या फ्रेंचायसी क्रिकेट स्पर्धा परंपरागत होणाऱ्या देशांतर्गत क्रिकेट सामन्यांच्या रचनेला कशा घातक ठरत आहेत" यावर चर्चा होत असतात. पण खेळाडूंना करारबद्ध करून खेळविण्यात येणारे सामने व त्यामुळे क्रिकेटच्या परंपरागत रचनेला निर्माण झालेला संभाव्य धोका हे पहिल्यांदाच घडतेय असे नाही.
क्रिकेटचे हे आधुनिक रूप सर्वात पहिल्यांदा आजपासून तब्बल ४६ वर्षांपूर्वी १९७७ मध्ये सुरू झालेल्या ''वर्ल्ड सिरीज क्रिकेट'' या एका बंडखोर स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते. जगभरातील ‘स्टार’ क्रिकेटपटूंचा समावेश असलेली पण आज इतिहास जमा झालेली ''वर्ल्ड सीरिज क्रिकेट'' स्पर्धा काय होती, हा प्रश्न आजच्या पिढीतील क्रिकेप्रेमींना पडू शकतो.
तर या स्पर्धेबद्दल अधिक जाणून घेऊया. या वादग्रस्त क्रिकेट स्पर्धेचा निर्माता केरी पॅकर होता. ही व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा ऑस्ट्रेलियन व्यावसायिक केरी पॅकर व त्याचे ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजन नेटवर्क ‘नाइन नेटवर्क (चॅनल नाईन)'' यांनी आयोजित केली होती. १९७४ मध्ये आपले वडील ''सर फ्रँक'' यांच्या निधनानंतर, केरी पॅकरने चॅनल नाइनचे नियंत्रण स्वीकारले होते.
त्या काळात नेटवर्क नाइनचे रेटिंग सतत कमी होत होते. त्यावर तोडगा म्हणून पॅकरने आक्रमक रणनीती वापरत आपला मोर्चा स्पोर्ट्स प्रोग्रामिंगकडे वळवला. पॅकरला विविध खेळांमध्ये रस होता. सर्वप्रथम त्याने ऑस्ट्रेलियन ओपन गोल्फ स्पर्धेचे हक्क मिळविले. या स्पर्धेच्या आयोजनासाठी आवश्यक असणारे सिडनीतील ऑस्ट्रेलियन गोल्फ क्लबचे मैदान सुधारण्यासाठी त्याने लाखो डॉलर्स खर्च केले.
सत्तरच्या दशकाच्या मध्यात क्रिकेटची लोकप्रियता पुन्हा डोकं वर काढू लागली होती. त्याचा फायदा घेण्यासाठी १९७६ मध्ये पॅकरने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डकडे (एसीबी) ऑस्ट्रेलियाच्या घरच्या कसोटी सामन्यांच्या टेलिव्हिजनचे अधिकार मागितले.
त्यासाठी त्याने मागील ब्रॉडकास्टरच्या करारापेक्षा आठ पट जास्त (१५ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स) इतकी रक्कम देऊ केली. पण बोर्डने ती ऑफर नाकारत सरकारी अनुदानित असलेल्या ''ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कंपनी (एबीसी)'' सोबत पुढील तीन वर्षांचा करार केवळ २ लाख १० हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्समध्ये केला.
ज्या काळात व्यावसायिक नेटवर्कने खेळाच्या प्रक्षेपणात फारसा रस दाखवला नाही, तेव्हा एबीसीने या खेळाचे प्रसारण केले होते, असे बोर्डचे म्हणणे होते. त्यामुळे नेटवर्क नाईनला डावलत बॉर्डने एबीसीसोबत करार केला.
त्यानंतर चॅनल नाइनवर काहीतरी क्रिकेट मिळवण्याचा निश्चय करून पॅकरने १९७७ मध्ये होणार्या ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड दौर्याचे प्रक्षेपण करण्यासाठी इंग्लंडच्या ''टेस्ट अँड काउंटी क्रिकेट बोर्डाला (टीसीसीबी)'' ऑफर दिली.
पण त्यातही ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डने अडचण निर्माण केली. त्यामुळे त्याने ताबडतोब मूळ ऑफरची किंमत दुप्पट केली आणि प्रक्षेपणाचे हक्क मिळविले. पण ही बोली जिंकण्यात बोर्डामुळे झालेली गुंतागुंत व मागील वेळी बोर्डने केलेले डावपेच त्याच्या खूप जिव्हारी लागले. त्यामुळे त्याने एसीबीला धडा शिकविण्यासाठी स्वतःच एक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला.
पॅकरच्या या बदल्याच्या भावनेतूनच ''वर्ल्ड क्रिकेट सिरीजचा'' जन्म झाला. त्यावेळी पॅकरने माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडू रिची बेनॉडला स्वतःचा सल्लागार म्हणून नेमून एक धडाकेबाज खेळी केली. बेनॉडचा खेळातील अनुभव, क्रिकेटविश्वातील स्थान व त्याच्या पत्रकारितेच्या पार्श्वभूमीमुळे पॅकरला या खेळाच्या राजकारणातून मार्ग काढण्यास बरीच मदत झाली.
१९७७ च्या सुरुवातीला वर्ल्ड क्रिकेट सिरीजसाठी पॅकरने खेळाडूंना करारबध्द करण्यास सुरुवात केली. यामध्ये पॅकरला वेस्ट ऑस्ट्रेलियन व्यावसायिक जॉन कॉर्नेल आणि ऑस्टिन रॉबर्टसन यांनी मदत केली. हे दोघेही मालिकेच्या सुरुवातीच्या सेटअपमध्ये व प्रशासनात गुंतलेले होते. रॉबर्टसनने या आधी डेनिस लिली सारख्या अनेक हाय-प्रोफाइल ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचे व्यवस्थापन केले होते, तर कॉर्नेल हा प्रसिद्ध अभिनेता व कॉमेडियन पॉल होगनचा व्यवसाय व्यवस्थापक होता.
वर्ल्ड सिरीज क्रिकेटसाठी सुरुवातीला अलीकडेच निवृत्त झालेले ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार इयान चॅपेलला करारबद्ध करण्यात पॅकर यशस्वी झाले. त्यानंतर पॅकरने इंग्लंडचा कर्णधार टोनी ग्रेगला फक्त करारबद्ध केले नाही, तर जगभरातील अनेक खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी त्याला एजंट म्हणून नेमले.
त्यावेळच्या आघाडीच्या ऑस्ट्रेलियन, इंग्लिश, पाकिस्तानी, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिजच्या खेळाडूंशी गुप्तपणे करार करण्यात केरी पॅकरला यश आले. त्यात वेस्ट इंडिजचे क्लाईव्ह लॉईड, व्हिव्हियन रिचर्ड्स, गॉर्डन ग्रिनीज, ज्योएल गार्नर, अँडी रॉबर्ट्स, कॉलिन क्रॉफ्ट, मायकेल होल्डिंग, ऑस्ट्रेलियाचे ग्रेग चॅपेल, डेनिस लिली, रे ब्राईट, गॅरी गिल्मूर, डेव्हिड हुक, पाकिस्तानचा इम्रान खान आणि दक्षिण आफ्रिकेचे बॅरी रिचर्ड्स आदी महान क्रिकेटपटूंचा समावेश होता.
मे १९७७ मध्ये ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आला, तोपर्यंत संघातील सतरापैकी तेरा सदस्यांना पॅकरने करारबद्ध केले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डची डोकेदुखी बरीच वाढली होती. पण आता हा वाद फक्त पॅकर विरुद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डपुरता मर्यादित राहिला नव्हता.
सुरुवातीला ऑस्ट्रेलियन देशांतर्गत समस्या म्हणून ओळखल्या जाणार्या या वादात आता आयसीसीने उडी घेतली. पॅकरच्या सामन्यांना प्रथम श्रेणीचा दर्जा दिला जाणार नाही आणि त्यात सहभागी खेळाडूंना कसोटी सामने आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून बंदी घातली जाईल, असा निर्णय आयसीसीने घेतला.
त्यावेळी या प्रकरणात कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे पॅकर सामन्यासाठी ''टेस्ट मॅच (कसोटी सामना)'' या शब्दाचा वापर करू शकला नाही. त्यामुळे पाच दिवसीय सामन्यांचे नाव ''सुपरटेस्ट'' झाले. त्याचरोबर तो क्रिकेटचे अधिकृत नियम वापरू शकला नाही, कारण त्या नियमांवर मेरीलेबोन क्रिकेट क्लबचे (एमसीसी) कॉपीराइट होते.
त्यामुळे पॅकरचे सल्लागार रिची बेनॉड यांनी मालिकेसाठी नियम आणि खेळण्याच्या अटी लिहिण्याचे काम केले. वर्ल्ड सिरीज क्रिकेटचे सर्व सामने पारंपारिक क्रिकेट स्थळांच्या बाहेर खेळवावे लागणार होते.
त्यामुळे पॅकरने सामान्यांसाठी दोन ऑस्ट्रेलियन फुटबॉल स्टेडियम (मेलबर्नमधील व्हिफेल पार्क आणि ॲडलेडमधील फुटबॉल पार्क), तसेच पर्थचे ग्लॉसेस्टर पार्क आणि सिडनीचे मूर पार्क शोग्राउंड भाड्याने घेतले. पण या मैदानांवर खेळपट्ट्या नव्हत्या. या ठिकाणी इतक्या कमी वेळेत योग्य दर्जाच्या गवताच्या खेळपट्ट्या तयार करणेही अशक्य मानले जात होते.
त्यामुळे पॅकरने यावर उपाय म्हणून ''ड्रॉप-इन'' खेळपट्ट्यांची संकल्पना मांडणारे क्युरेटर जॉन माले यांना नियुक्त केले. मैदानावर लागणाऱ्या खेळपट्ट्या मैदानाबाहेर हॉटहाऊसमध्ये बनवल्या गेल्या व नंतर क्रेनच्या सहाय्याने खेळण्याच्या पृष्ठभागावर टाकण्यात (ड्रॉप इन) आल्या. सर्व अडथळ्यांवर मात करत २ डिसेंबर, १९७७ रोजी व्हीएफएल पार्क येथे ऑस्ट्रेलिया इलेव्हन आणि वेस्ट इंडिज इलेव्हन यांच्यातील पहिल्या सुपरटेस्टला सुरुवात झाली.
या सामन्यात क्रिकेटचा दर्जा उत्कृष्ट होता, परंतु प्रेक्षकांची गर्दी कमी होती. पण नंतर डे-नाईट क्रिकेट सामने, रंगीत जर्सी, दिग्गज खेळाडूंचा सहभाग यामुळे ही सिरीज मोठ्या संख्येने प्रेक्षकांना आपल्याकडे वळविण्यात यशस्वी ठरली. वर्ल्ड सीरिज क्रिकेटमधील क्रिकेटपटूंना रंगीत गणवेश देण्यात आला.
त्यामुळे प्रेक्षकांना क्रिकेटचे ‘रंगीत’ रूप प्रथमच पाहायला मिळाले. पॅकर्स यांच्या डे-नाईट क्रिकेटला त्यावेळी प्रेक्षकांनी इतका प्रतिसाद दिला होता की स्टेडियमच्या बाहेर तिकिटांसाठी प्रेक्षकांची खूप गर्दी व्हायची. तसेच टीव्हीवरती सर्वाधिक प्रमाणात या क्रिकेटचे सामने पाहिले जात होते. पॅकरला चॅनेल नाईन द्वारे आपली सीरिज जगभरात पोहोचवता आली.
आधी फलंदाज मैदानावर संरक्षण उपकरण वापरत नसत. पण या सीरिजमध्ये आक्रमक भेदक गोलंदाजीपासून संरक्षण करण्यासाठी फलंदाज हेल्मेटचा वापर करू लागले. क्रिकेटमधून उपजीविका करण्यासाठी खेळाडूंना पुरेसे मानधन याद्वारे मिळू लागले. खेळाडू फिटनेसकडे अधिक लक्ष देऊ लागले. जगभरातील क्रिकेट चाहत्यांना केरी पॅकरचा हा प्रयोग नक्कीच भावला.
नव्वदीच्या दशकापर्यंत अनेक महान क्रिकेटपटू होऊन गेले, पण सद्यस्थितीप्रमाणे अगदी थोड्या कालावधीत ते लखपती, करोडपती बनत नव्हते. कारण क्रिकेटमध्ये त्यावेळी तितका पैसा नव्हता. क्रिकेट बोर्डही श्रीमंत नव्हती. त्यामुळे मानधनावरून क्रिकेटपटू आणि बोर्डामध्ये नेहमीच वाद होत असत.
केरी पॅकरने मात्र तत्कालीन क्रिकेटपटूंना दामदुप्पट पैसे मोजताना आपल्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये खेळण्यास भाग पाडले. क्रिकटचे प्रसिद्ध समालोचक जॉन आर्लोट यांनी या सिरीजला धारेवर धरत ‘पॅकर्स सर्कस’ असे नाव दिले होते.
विक्रमादित्य सुनील गावस्कर आणि बिशनसिंग बेदी यांनी पॅकरच्या छुप्या करारावर सह्या केल्या, अशा अफवा उठल्या होत्या. मात्र ‘पॅकर सर्कस’च्या मोहजालात भारताचे कोणतेच क्रिकेटपटू फसले नाहीत. भारताचे सर्व क्रिकेटपटू वर्ल्ड सिरीज क्रिकेटपासून दूर राहिले.
श्रीमंत पॅकरशी स्पर्धा करण्याची ताकद आणि कुवत त्यावेळी कुठल्याच क्रिकेट बोर्डात नव्हती. त्यामुळे इंग्लंडसह ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान बोर्डाला आपापल्या स्टार क्रिकेटपटूंना रोखता आले नाही.
१९७९ पर्यंत वर्ल्ड सिरीज क्रिकेटमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड (एसीबी) आर्थिक अडचणीत सापडले होते. दोन हंगामात न्यू साउथ वेल्स आणि व्हिक्टोरिया या दोन मोठ्या क्रिकेट संघटनांचे एकत्रित पाच लाख डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झाले होते.
केरी पॅकरला देखील या स्पर्धेच्या आयोजनांमध्ये आर्थिक झळ बसत होती. त्यामुळे त्या वर्षी पॅकरने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष बॉब पॅरिश यांच्यासोबत अनेक बैठका घेऊन समेट घडवून आणला. त्यामुळे पॅकर विरुद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डमध्ये (एसीबी) चालू असलेल्या युद्धाला पूर्णविराम लागला.
या बैठकींदरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या भवितव्याबाबत करार केला गेला, ज्यात एक आश्चर्याची गोष्ट घडली. अखेर या कराराद्वारे पॅकरच्या चॅनल नाइनने ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे प्रसारण करण्याचे हक्क जिंकले.
व त्यासोबतच त्याच्या पीबीएल मार्केटिंग या नवीन कंपनीला ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे प्रमोशन आणि मार्केटिंग करण्यासाठी दहा वर्षांचा करार मंजूर करण्यात आला. पण एसीबीच्या या आत्मसमर्पणामुळे इंग्लिश क्रिकेट बोर्ड व आयसीसी नाराज झाले. कारण त्यांच्या मते त्यांनी एसीबी अडचणीत असताना त्यांना आर्थिक आणि नैतिक पाठबळ पुरविले होते, पण आता तेच पॅकरला विकले गेले होते.
वर्ल्ड सीरिज क्रिकेटमध्ये अनेक प्रमुख क्रिकेटपटू खेळल्यामुळे व त्यांना त्यांच्या देशाच्या बोर्डने बंदी घातल्यामुळे प्रत्येक संघ कमकुवत झाला होता. त्यामुळे ही सीरिज संपुष्टात आल्यानंतर बोर्डनी आपला हेका सोडत ‘स्टार’ क्रिकेटपटूंना पुन्हा सामावून घेतले.
‘पॅकर सर्कस’मुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वादग्रस्त मालिकेची नोंद झाली खरी पण मूळ क्रिकेटचा साचा न बदलता पारंपरिक क्रिकेटचे स्वरूप बदलता येऊ शकते, असा विचारही पुढे आला. आयपीएलपूर्वी झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसने २००७ मध्ये आयोजित केलेल्या वादग्रस्त इंडियन क्रिकेट लीगवेळी (आयसीएल) केरी पॅकरची आठवण झाली होती. मात्र सद्यस्थितीत पॅकरसारखी हिंमत करण्याचे धाडस कुणामध्येच नाही, हे ही तितकेच खरे.
केरी पॅकर आणि त्याच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेट या अनोख्या प्रयोगामुळे तत्कालीन प्रस्थापित क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीला मोठा हादरा बसला खरा, पण पॅकरच्या त्या धाडसी प्रयोगामुळे क्रिकेटमध्ये पैशाची गंगाच अवतरली!
या प्रयोगामुळे क्रिकेटला नवे रूप देण्याची कल्पना पुढे आली व क्रिकेटचे व्यावसायिकीकरण होण्यास मदत झाली. क्रिकेट हे एक मोठे मार्केट आहे व या खेळात प्रचंड पैसा आहे, हे जगाला कळून चुकले. केरी पॅकर नसता तर क्रिकेटचे बदललेले रूप इतक्या लवकर नक्कीच पाहता आले नसते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.