‘गर्भ’श्रीमंत!

महाराष्ट्रातील सातपुड्याच्या खासकरून धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पायथ्याकडील प्रदेशात आपले आदिवासी बांधव राहतात.
Rupali chakankar
Rupali chakankarsakal
Updated on

दिवस होता शुक्रवार, १५ नोव्हेंबर २०१९. धुळे जिल्ह्याचा दौरा. महाराष्ट्रातील सातपुड्याच्या खासकरून धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पायथ्याकडील प्रदेशात आपले आदिवासी बांधव राहतात. हा समाज महाराष्ट्रात विखुरलेला असून, भौगोलिक परिसर, पर्यावरण व अवतीभवतीच्या इतर समाजासोबतच्या समन्वयामुळे त्यांच्यात काही प्रमाणात विविधता दिसते; पण अजूनही परंपरेशी अजोड नाते त्यांनी आपल्या बोलीभाषांत, पेहरावात टिकवून ठेवले आहे.

आदिवासी समाज हा विविध सण उत्सव साजरे करतो. लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने होतो. त्यात कोणताच बडेजावपणा नसतो. नवरा मुलगा मुलीच्या घरच्यांना हुंडा देतो. ही रक्कम संबंधितांची आर्थिक स्थिती पाहून समाजातील ज्येष्ठ लोकांनी ठरवून दिलेली असते. त्याच्यापेक्षा जास्त रक्कम वधुपित्याला घेता येत नाही. हुंडा वरपक्ष वधूला देत असल्याने हुंडाबळी अथवा स्त्रीभ्रूण हत्या असे प्रकार अत्यंत कमी प्रमाणात होतात. प्रवासादरम्यान गाडीत हे सर्व आमचे सहकारी संदीप बेडसे अभिमानाने सांगत होते. कुतूहल वाटले आणि डोळ्यासमोर उभे राहिले ते पुरुषसत्ताक चित्र. सत्तेच्या खेळात सत्ताधारी पुरुष सत्ताहीन स्त्रियांच्या शरीराचं बाजारीकरण करतात आणि आपण सारे ‘Men will be men’ म्हणत कौतुकाने पाहत त्यांच्या या कृतीला ‘मूक संमती’च देतो. ‘Men will be men’ स्ट्रॅटजी वापरून एखादा परफ्यूम विकला जाईलही, पण समाज म्हणून आपण सारे एका दरीत ढकलले जात असतो.

अनेकांच्या आतल्या पुरुषसत्तेने लावलेली विषारी मर्दानगी सिद्ध करण्याची स्पर्धा जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत या पुरुषांमधला ‘माणूस’ आपल्याला हेरता येणार नाही. स्त्री म्हणून जरी ती जन्माला आली तरी ती ‘दुबळी’ म्हणून घडवली जाते. तसाच पुरुषही जन्मत नाही तर तो पुरुषार्थ घडवला जातो, तेही आपल्या सामाजिककरणातून. आपल्यालाच आपला प्रत्येक विचार, प्रत्येक कृती आणि प्रत्येक शब्द विवेकाच्या फूटपट्टीवर तपासून घ्यावा लागेल. कबीर म्हणतात तसं, ‘बोये पेड बबूल का, आम कहाँ से पाये?’

हा सगळा विचार मनात सुरू असतानाच अचानक गाडी थांबली आणि गलका कानी आला. ‘‘ताई, ओ ताई.’’ भानावर आले आणि गाडीतून उतरले. पाड्याच्या वेशीवर तीनशे - चारशे महिला भगिनी पारंपरिक वेषात डोक्यावर घागरी, हातात घुंगराच्या काठ्या घेऊन उभ्या होत्या. पायावर पाणी घालत औक्षण करून, पारंपरिक नृत्य करत त्यांनी माझे स्वागत केले. त्यांच्या या आपुलकीने भारावून गेले. थोडं चालून पाड्यामध्ये आलो तोपर्यंत दिवस मावळतीला निघाला होता. सगळ्या छप्परांच्या घराबाहेर उंबरावर दिवा लावला होता. पाड्यात मध्यभागी असणाऱ्या पारावर मी बसले. माझ्या आजूबाजूनी या सगळ्या भगिनी गोलाकार बसल्या. त्यानंतर पुरुष बसले. त्यांच्यातील एका प्रमुख महिलेने माझे आदिवासी भाषेत स्वागत केले. खांद्यावर लुगडं घालून व मण्यांची माळ देऊन सत्कार केला. त्यांची भाषा समजत नव्हती; पण एक महिला पाड्याची प्रमुख असते व ती सांगेल याप्रमाणे हा समाज ऐकतो, हे पाहून त्या महिलांविषयीचा माझा अभिमान दुणावला.

बाजूलाच तिथे सर्व आयाबायांची लगबग चालू होती. लहान मुलं गडबड-गोंधळ करत होते. काही वयस्कर महिला आदिवासींच्या भाषेत गाणे म्हणत होत्या. तेवढ्यात माझ्या मांडीवर एका आज्जीने एक लहान बाळ आणून दिले. क्षणभर मला काय करावे सुचेना, कारण प्रत्येकाची संस्कृती वेगवेगळी असते. मी संदीपजींकडे पाहून हातानेच ‘‘काय?’’ म्हणून खुणवले. त्यांनी मला लांबूनच दबक्या आवाजात सांगितले, ‘‘ताई बाळाचे नाव ठेवायचे आहे.’’ मी विचारलं, ‘‘काय ठेवायचं? मुलगा आहे की मुलगी?’’ तेव्हा सर्व जल्लोष करून म्हणाले. ‘‘पुराय, पुराय.’’ मी कुतूहलाने चहुकडे पाहिले अन् सर्व हसले. सहकाऱ्यांपैकी एक जण म्हणाले, ‘‘ताई पुराय म्हणजे मुलगी.’’

मी त्या बाळाकडे पाहून मनातल्या मनात म्हटलं... अगं किती नशीबवान आहेस तू, इथे जन्माला आलीस... नाहीतर बाहेर सुशिक्षित शहरी भागात तुला जन्माला यायच्या आधीच खूप यातना सहन कराव्या लागल्या असत्या. कदाचित या समाजाला पुस्तकी ज्ञान कमी असेल, पण समाजभान लाख पटीने आहे. अशा या आदिवासी बांधवांमध्ये जन्म घेतलास तू... आणि त्या बाळाने चुळबुळ करत माझ्या हाताचे बोट आणखीन घट्ट पकडले.

आज्जीने मला ‘हिरण्या’ नाव बाळाच्या कानात घेण्यास सांगितले. बाळाच्या कानाजवळ जाऊन हिरण्या नाव घेताच सर्वांनी टाळ्या वाजवत जल्लोष करत ‘हिरण्या... हिरण्या’चा गजर केला. मला संदीपजींनी सांगितले, ‘‘इथे पाड्यावर मुलीचा जन्म झाल्यावर तीन दिवस जन्माचा सोहळा चालतो.

दिवाळी, दसऱ्यापेक्षा खूप आनंदात ते तिच्या जन्माचे स्वागत करतात. जन्माच्या पहिल्या दिवशी घराला आंब्याचे तोरण बांधून घर सजवले जाते. दुसऱ्या दिवशी पाहुणेरावळे बोलावून रानभाज्यांची मेजवानी देऊन बाळाचे नाव ठेवले जाते, अन् तिसऱ्या दिवशी पारंपरिक पोशाख घालून वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक नृत्य केले जाते.’’

एवढं सगळं ऐकून डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले अन् शिक्षणाने, पैशाने कमी असलेला पण विचाराने समृद्ध असलेला हा आदिवासी समाज मला ‘गर्भश्रीमंत’ वाटला. अन् लागलीच माझ्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला ‘‘अरे खरे सुशिक्षित कोण? जे मोठमोठ्या टॉवरमध्ये आपले ऑफिस थाटून बसलेले, घरी मात्र मुलगाच पाहिजे हा अट्टहास करणारे की हे आदिवासी?’’

समाजात स्वतःला प्रतिष्ठित म्हणून घेणारे, घरी मात्र मुलींनंतर मुलगाच पाहिजे म्हणून आपल्या पत्नीला त्रास देणारे की हे आदिवासी? वंशाला वारसदार हवा म्हणून कित्येक मुलींची गर्भातच हत्या करणारा पांढरपेशा समाज की, हा आदिवासी समाज? यात कोण नेमकं सुशिक्षित?

माझ्या आतून माझा आवाज आला आणि उत्तर आले... भलेही दुनिया मेट्रो सिटी होत चालली आहे, ५जी नेटवर्क सुरू होत आहे, रस्त्यावर इलेक्ट्रिक गाड्या धावत आहेत, माणूस हजारो मैल एकमेकांच्या लांब असला तरी या नेटवर्कच्या दुनियेत तो एकमेकांशी संवाद साधत आहे. उदात्तीकरण, शहरीकरण अशा मोठमोठ्या गप्पा मारत आहे; पण या सर्वांपासून अजूनही लांब असणाऱ्या या माझ्या आदिवासी बांधवांकडे पाहिल्यानंतर, अरे आपण अजूनही तंत्रज्ञानाने गगनभरारी घेतली असली, तरी वैचारिकतेने ‘शून्या’तच आहोत, याची खात्री पटली.

आम्ही सुशिक्षित झालो; पण ‘शिक्षित’ व्हायचेच राहून गेलो, ही खंत मनामध्ये बोचते आहे. कारण ग्रामीण वाड्या-वस्त्यांपेक्षा, आदिवासी पाड्यांपेक्षा, स्वतःला उच्चभ्रू समजणाऱ्या शहरी भागात मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.

म्हणून प्रत्येक मातृत्वाने आपल्या आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला म्हणून आपण हे जग पाहिले याची जाणीव ठेवून गर्भातील लेकीसाठी आणि तिला हे जग पाहू देण्यासाठी समाजाशी जिद्दीने लढा दिला पाहिजे कारण..

तूच तुझी जिजाऊ, तूच तुझी सावित्री,

तूच तुझी अहिल्या अन् तूच तुझी झाशीची राणी,

हे जग आणखीन सुंदर बनवण्यासाठी,

घे रूप हे फिरूनी..

राज्यभर अनेक ठिकाणी दौरे केले, वेगवेगळ्या भागात विविधतेने नटलेली संस्कृती पाहिली. लहानपणापासून पुस्तकात वाचलेला आदिवासी समाज जवळून पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक होते. अशातच धुळे-नंदुरबारचा दौरा मनामध्ये घर करून राहिला आणि लक्षात राहिला मी अनुभवलेला ‘गर्भश्रीमंत’ आदिवासी समाज.

(लेखिका महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.