सार्थ मैत्रीची गाणी आणि उत्कट अभिनयही...

‘याराना’ या दोन मित्रांच्या कहाणीत दुसरा मित्र अमजद खान झाला होता. राजेश रोशनचे सुमधुर आणि सुपर हिट संगीत ही या चित्रपटाची अमिताभशिवाय असलेली दुसरी प्रमुख बाजू होती.
Yaarana
YaaranaSakal
Updated on

अमिताब बच्चन आणि राकेशकुमार यांची भागीदारी चार चित्रपटांपुरती होती. १९७६ चा ‘खून पसिना’ आणि नंतर १९७९ मध्ये मिस्टर नटवरलाल, १९८० चा ‘दो और दो पाच’, आणि १९८१ मध्ये याराना. यापैकी ‘खून पसीना’ एक ॲक्शन पट होता, ‘दो और दो पांच’ अमिताभ आणि शशी कपूर यांच्यातल्या मजेदार कुरघोड्यांची गंमत होती आणि ‘याराना’ एक संगीतमय मनोरंजन होत.

‘याराना’ या दोन मित्रांच्या कहाणीत दुसरा मित्र अमजद खान झाला होता. राजेश रोशनचे सुमधुर आणि सुपर हिट संगीत ही या चित्रपटाची अमिताभशिवाय असलेली दुसरी प्रमुख बाजू होती. किशोरकुमारच्या आवाजातली पाच गाणी कमाल होती.

शहरात जाऊन मोठा व्यावसायिक झालेला अमजद खान अमिताभच्या भेटीला गावी जातो आणि तिथे आपल्या खेडूत मित्राच्या गळ्यातली जादू त्याला कळून येते. नाराज होऊन शहराकडे निघालेल्या आपल्या जिवलग मित्राला थांबवण्यासाठी अमिताभ महादेवाला साकडं घालतो.

किशोरकुमारच्या आवाजातील ‘भोले ओ भोले’ हे गाणं जितक्या ठेक्यात बसवलं गेलं त्याच्यापेक्षा काकणभर अधिक ठेक्यात त्यावर अमिताभने भोले-नृत्य केलं होतं. कोरस नाही, पार्श्वभूमीला नाचणारे कलाकार नाही की कसलं नेपथ्य नाही. गाव शिवारातील महादेवाच्या भव्य मूर्तीसमोर नाचणारा पायजमा कुर्त्यातील अमिताभ या गाण्यात प्रेक्षकांना ताल धरायला लावतो.

आमच्यासारखी महादेवाचं माहात्म्य माहीत नसलेली अभक्त मंडळी जिथे या गाण्यावर डोलली होती, तिथे इतर देवभोळ्या महादेवभक्तांची हालत काय झाली असेल ते त्यांनाच माहीत. पण गाण्याची लोकप्रियता त्याची साक्ष देऊन गेली.

क्या होगा फिर तेरा गौरी जो रुठ जाये

शंकर तेरे माथे का चंदा जो छूट जाये

डम,डम,डम डमरू ना बाजे

बम,बम,बम फिर तू ना नाचे

या ओळींमध्ये ‘डम,डम,डम डमरू’ हे शब्द उच्चारताना गळ्यात गुंडाळलेला पांढरा गमछां उजव्या हातात गोळा करून, हात सरळ आकाशाकडे धरून महादेवाचे डमरू वाजवल्यासारखा जो आविर्भाव अमिताभने व्यक्त केला आहे, तो बघितला की गाणी आणि नृत्य ही हिंदी सिनेमाची महत्त्वाची अंग का आहेत ते कळून येते. महादेवाची भोळी भक्ती, मित्र नाराज होऊन जात असल्याचे दुःख आणि त्याला थांबविण्यासाठी चाललेला आकांत व्यक्त करण्यात अमिताभ यशस्वी ठरला होता. किशोरकुमारच्या आवाजाची धार या गाण्याला कैलासात घेउन गेली होती, आणि अमिताभच्या नृत्याभिनयामुळे कैलास धरणीवर उतरला होता.

याच गाण्याचं दु:खद रूप सिनेमाच्या दुसऱ्या भागात धिम्या चालीत येतं. अपघातात मित्राच्या लहानग्या मुलाची गेलेली वाचा परत आणण्यासाठी हा प्रयोग केला जातो. अत्यंत आकर्षक काळा पँट, पांढरा कोट, बो अशा डिसेंट पेहरावात ह्या वेळी अमिताभ एक सुप्रसिद्ध पॉप सिंगर असतो. एकच गाणं, एकच ट्यून पण पहिलं संपूर्ण गावखेड्याच्या वातावरणातील महादेवाच्या मूर्तीसमोरील खेडुतावर चित्रित झालेलं आणि सुमारे चाळीस मिनिटांच्या अंतराने त्याच खेडूताचा ‘जेंटलमन’ झाल्यानंतर त्याच्यावर चित्रित झालेल. दोघांच्याही प्रामाणिकतेवर प्रेक्षकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचं बळ होत अमिताभच्या अदाकारीत. असे स्वप्नवत विरोधाभास जिवंत करून त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडणारी ताकद ज्यांच्या अस्तित्वात आहे त्यांनाच सुपर स्टार म्हणावे काय ?

नीतू सिंग प्रेम व्यक्त करते तेव्हा ‘छू कर मेरे मन को’ अशा नाजूक, हळुवार गाण्यात व्यक्त झालेला अमिताभ असो, की मित्राप्रती आभार व्यक्त करणार ‘तेरे जैसा यार कहां’ हे गाण असो, प्रत्येक गाण्यातील भावना प्रेक्षकापर्यंत स्पष्ट पोहोचते. कोलकातामधल्या भव्य नेताजी इनडोअर स्टेडियम मध्ये एकूण तीन गाणी चित्रित झाली होती त्यातील ‘सारा जमाना हसीनो का दिवाना’ यात अमिताभने अंगावर झळाळती रोशणाई मिरवून धमाल उडविली होती.

मोहम्मद रफीच्या खणखणीत आवाजात ‘बिशन चाचा कुछ गाओ’ हे सुरेल गाण अमजद खान वर चित्रित झालं होतं. उर्वरित चित्रपटात अमिताभ स्टाईलची अनेक विनोदी दृश्य होती त्यातील ‘कच्चा पापड, पक्का पापड’ उच्चारण्याचा गमतीदार सिक्वेन्स हिट झाला होता. पण या सर्वांच्या वर होते दोन वेगवेगळ्या मूड मधील ‘भोले ओ भोले’ ह्या गाण्याचे मार्मिक सादरीकरण. सर्वसाधारण मनोरंजनात्मक सिनेमा असलेला ‘याराना’ लक्षात राहतो तो सुमधुर गीतांना पडद्यावर जिवंत करण्याऱ्या अमिताभच्या अप्रतिम सादरीकरणासाठी...

(सदराचे लेखक अमिताभच्या चित्रपटाचे अभ्यासक आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.