‘ॲग्री यंग मॅन’ हे बिरुद जन्माला घालणारा ‘जंजीर’मधला डॅशिंग पोलिस अधिकारी विजय खन्ना, ‘हेरा-फेरी’तला भुरटा चोर विजय, दारूच्या नशेत “न मेमसाब आती है, ना मौत आती है, लेकीन जोहरा बहोत अच्छा गाती है ...” असे बरळत हृदयाच्या कप्प्यात साठलेला प्रेमाचा दर्द वेगळ्या प्रकारे व्यक्त करणारा ‘मुकद्दर का सिकंदर’ आणि ‘लावारिस’ मधून सर्वसामान्यांच्या ‘मेरे अंगने मे’ पोहोचलेला ‘हिरा’ अशी अमिताभची विविध रूपं १९७३ ते १९८१ या काळात प्रकाश मेहरांनी दाखविली होती. तोपर्यंत अमिताभच्या लोकप्रियतेची अभूतपूर्व लाट खूपच वरच्या स्तरावर स्थिरावली होती. १९८२ मध्ये प्रदर्शित ‘नमक हलाल’मधील अमिताभचा अर्जुनसिंग एका हरियाणवी खेडूत तरूणाच्या भूमिकेत पुढं येतो आणि आपले आडाखे पुन्हा एकदा चुकतात.
या चित्रपटात पूर्ण वेळ विनोदी भूमिकेची जबाबदारी सांभाळत असताना ओमप्रकाश आणि अमिताभ या ‘दद्दू’ आणि नातवाच्या जोडीनं धमाल वातावरण निर्माण केलं होतं. ओमप्रकाश हा मुरलेला कलाकार प्रकाश मेहरांच्या चित्रपटांमध्ये वेगळीच चमक घेऊन वावरत असे. ‘नमक हलाल’ या चित्रपटातलं अमिताभ आणि ओमप्रकाश या दोघातील एक-एक दृश्य म्हणजे अस्सल प्रेमाची, आपुलकीची आणि गावाकडच्या पद्धतीनं म्हणजे ग्रामीण भागातील जीव लावण्याची उदाहरणं होती.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सहा फुटाच्या वर उंची आणि पंचवीस वर्षांचा घोडा दाखविलेला बावळट अर्जुन ‘मण्णे णई जाणा, पैरो पर खडा होणे , मण्णे तो थारे संग रह्यणा है दद्दू’ असं लाडात येऊन आजोबास म्हणतो तेव्हा बेरक्या ओमप्रकाशनं केलेला मुद्राभिनय बघत रहावा असा आहे. विनोदाचा हरियाणवी लहेजा नायकानं वापरण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा. ‘आय कॅन वाक इंग्लिस, आय कॅन टाक इंग्लिस, आय कॅन लाफ इंग्लिस, बिकाज इंग्लिस इज अ वेरी फन्नी ल्यांग्वेज’ सारखी असंबद्ध बडबड अजूनही लोकप्रियता टिकवून आहे. याच प्रसंगात ‘इन नाईनटीन ट्वेंटी नाईन इन मेलबर्न सीटी व्हेन इंडिया वाज प्लेईंग ऑस्ट्रेलिया, विजय हजारे अँड विजय मर्चंट वेअर इन द क्रिज...’ हे हरियाणवी इंग्रजीतील समालोचन सुद्धा प्रचंड लोकप्रिय झालं होत.
हरियानातल्या एका खेड्यातून येऊन मुंबईच्या तारांकित हॉटेलच्या डान्स फ्लोअरवर ‘के पग घुंगरू बांध मीरा नाची थी’ चा सूर आळवणाऱ्या हरयानवी फेट्यातल्या अमिताभनं नृत्याचं अंग नसणारा मनुष्य नृत्य कशा प्रकारे करेल, त्याच अचूक दर्शन घडवलं होतं. शशी कपूर याचा अंगरक्षक बनून ‘नमक हलाली’ करता, करता ‘आज रपट जाये तो हमे ना उठय्यो’ ह्या गाण्यात मुंबईच्या रस्त्यावरील पावसाच्या पाण्यात स्मिता पाटीलने साकारलेल्या नायिकेला घुसळून काढणाऱ्या अमिताभची लोकप्रियता कुठल्याही फुटपट्टीच्या आवाक्यात राहिली नव्हती. परवीनबाबीसाठी आशा भोसले यांनी गायलेली आणि भप्पी लाहिरी यांनी संगीतबद्ध केलेली मादक डिस्को गाणीसुद्धा अमिताभच्या हरयानवी अर्जुन पुढं फिक्की ठरली होती.
ओमप्रकाश या म्हाताऱ्यानं चवचालपणाचा आणलेला आव आणि अमिताभने त्याची जिरविण्यासाठी लढवलेली क्लुप्ती सगळं कसं मनाला गुदगुल्या करून जाणार नर्मविनोदी प्रकरणं होत. ह्या चित्रपटाचा सर्वात मोठा वेगळेपणा म्हणजे पूर्ण तीन तासात नायक अमिताभ एकदाही आपल्या बोलण्यातला विनोदी, उपहासात्मक ढंग सोडत नाही. मग त्याचा संवाद प्रेयसी स्मिता पाटीलशी असो, मालक शशी कपूरशी असो, अथवा खलनायक रणजीतशी असो. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये सुद्धा तोच उपहासात्मक विनोदाचा बाज अमिताभनं कायम ठेवला होता. ‘लो, कल लो बात’ अस तो विविध प्रसंगी वेगवेगळ्या विनोदी पद्धतीने बोलतो, किंवा ‘अल्टिमेटली’ हा इंग्रजी शब्द वारंवार उच्चारतो तेव्हा प्रत्येक वेळी प्रेक्षकांमध्ये खसखस पिकते.
अमिताभने चित्रपटातल्या विनोदाची सूत्र हाती घेतली, तेव्हापासून विनोदी कालाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होत. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी ‘नमक हलाली’ करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीनं प्रेक्षकांना ‘और हम नाचे बिन घुंगरू के’ असा आनंद दिला होता. मनोरंजनाचा हा सिलसिला नंतरच्या ‘शराबी’ मध्ये अधिकच रंगला होता.
(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.