श्रीमंतांच्या चकचकीत दु:खाचं प्रदर्शन करून सामान्य प्रेक्षकांना त्यांच्या वास्तविक दु:खाचा विसर पाडायला लावणाऱ्या नव्वदच्या दशकातील करण जोहरच्या यशस्वी प्रयोगाचं मूळ सापडतं ते यश चोप्रांच्या १९७६ मध्ये प्रदर्शित ‘कभी कभी’ या चित्रपटात. अमिताभच्या ‘जंजीर’, ‘मजबूर’, ‘दिवार’, ‘शोले’ ने भारलेल्या वातावरणात ॲक्शन नावालाही नसलेला चित्रपट लगेच आणणं आणि त्यात अर्धा चित्रपट अमिताभला वयस्कर भूमिकेत दाखविण्याची जोखीम यश चोप्रांनी स्वीकारली होती. पडद्यावर अमिताभचा दमदार प्रवेश आणि त्यानंतरचं त्याचं दमदार आयुष्यच बघण्याची चटक लागलेला प्रेक्षक यश चोप्रांच्या या तरल, काव्यमय, कादंबरीसदृश कलाकृतीवरसुद्धा फिदा झाला होता.
साहीर लुधियानवींच्या तरल भाव असलेल्या कविताना खय्यामनं अवीट गोडीच्या चालींचा साज चढवला आणि बाकीचं काम केल अमिताभ बच्चननं. ‘आनंद’ चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये अमिताभनं ‘‘मौत तू एक कविता है...मिलेगी मुझको’’ ही गुलजारांची कविता त्याच्या खर्जातल्या आवाजात म्हटली होती. तिच्या पुढे जाऊन अमिताभ ‘कभी कभी’ मध्ये स्वत:च कवी होऊन बसला आणि ‘कभी कभी मेरे दिलमे खयाल आता है की, जिंदगी तेरी जुल्फो की नर्म छाव मे गुजरने पाती तो शादाब हो भी सकती थी...” ही साहीरची नज्म म्हणून त्यानं रसिकांच्या मनातील विरह-भावना जागृत केल्या.
मुकेशच्या आवाजातील ‘मै पल दो पल का शायर हूँ ’ या अमिताभच्या स्टेजवरील संयमशील गायनानं चित्रपटाची सुरुवात होते. “तुम्हारी आंखे जब देखती है तो एक रिश्ता कायम कर लेती है” या वाक्यातील नाजूक भावना कायम ठेवत यश चोप्रा आपणास राखी-अमिताभसोबत काश्मीरची सैर घडवून आणतात. चित्रपटाची काव्यात्मक लय लागल्यासरशी काश्मीरच्या गुलाबी वातावरणात मुकेश आणि लताच्या आवाजात ‘कभी कभी मेरे दिलमे...’ ची तान उमटते. त्या काळातील सामाजिक मर्यादांनी घेरलेल्या दिवसात, काश्मीरमधील धुंद वातावरणात अमिताभ राखीचं प्रेम पडद्यावर अंमळ जास्तच घट्ट दिसलं होत. दोन मधूर गाणी आणि काही कविता सादर झाल्यावर परस्पर सहमतीनं, सौहार्दपूर्ण वातावरणात त्या दोघांचा आजच्या भाषेत ‘ब्रेकअप’ होतो.
आई वडिलांनी त्यांच्या प्रेमाला नाकारलेली मंजुरी पडद्यावर दिसतही नाही. ही दोघच एकमेकांना परस्पर सहमतीने “हमे कोई हक नही पोहचता की हम अपनी खुशी के लिये अपने माँ-बाप के अरमानो का गला घोट दे’ असं स्पष्टीकरण देत वेगळे होतात. हे सगळं फिल्मी वाटत असलं तरी सत्तरच्या दशकातील सामाजिक परिस्थितीत हा फॉर्म्यूला लोकांनी डोक्यावर घेतला होता. अमिताभने साकारलेला विरह यातनांनी जर्जर असा कवी त्याच्या ‘अँग्री यंग मॅन’ इतकाच प्रेक्षकांनी स्वीकारला. ‘कभी कभी’ सारखा तरल भावनांनी परिपूर्ण चित्रपट देखील सुवर्ण महोत्सवी ठरला.
चित्रपटात हाणामारी अथवा गुन्हेगारीची दृश्य नसली तरी काही दृश्यात बच्चनच्या अँग्री यंग मॅन ची झलक मात्र कविराज नक्कीच दाखवून गेले होते. स्त्री-पुरूष संबंधांमध्ये आता आलेली मोकळीक तेव्हा मुळीच नव्हती. प्रेम या शब्दाला जोडून प्रत्येक वेळी एक बंड उभं कराव लागायचं. जे तसं करण्यास कचरले त्यांच्या नशिबी ‘कभी कभी’ प्रमाणे मनातल्या मनात झुरणे येत असे. सागर सरहदी यांनी त्या काळी प्रेमात पडलेल्यांची ही व्यथा ह्या पटकथेत हुबेहूब दाखवली होती.
अमिताभ-राखीच्या असफल प्रेमामुळे पुढे त्यांच्या दुसऱ्या पिढीला म्हणजेच ॠषी कपूर आणि नीतू सिंगला त्याचे कसे परिणाम भोगावे लागतात ते उत्तरार्धात पुढे येते. शेवट गोड झाला असला तरी अमिताभचे शशीकपूर, राखी, वहिदा रेहमान ह्यांचे सोबत तणावाचे प्रसंग आणि साधे पण प्रभावी संवाद मजा आणतात. सगळ्यात वरताण ठरते ते अमिताभचे स्वत:च्या स्वरातील कविता वाचन. “अब ये आलम है की तू नही, तेरा गम, तेरी जुस्तजू भी नही, गुजर रही है कुछ इस तरहा से जिंदगी, जैसे इसे किसीके सहारे की आरजू भी नही....” चित्रपटात प्रेमभंग अमिताभचा झाला आणि प्रेमभंगाच्या दु:खात जणू पूर्ण भारत बुडला होता. प्रेमभंग झालेल्या नायकाची चक्क प्रेक्षकांना भूरळच पडली. त्यानंतर लगेच १९७८ मध्ये पुन्हा दिशा बदलवत यश चोप्रांनी ‘त्रिशूल’ चित्रपटात डॅशिंग अमिताभ सादर केला होता.
(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.