Biopic
BiopicSakal

बायोपिकच्या ‘मिस कास्टिंग’ची कथा

बायोपिक तयार करत असताना अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे फक्त दिसणेच नाही तर एक ग्रेस आणि सौंदर्यही लक्षात घेतले पाहिजे.
Published on
Summary

बायोपिक तयार करत असताना अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे फक्त दिसणेच नाही तर एक ग्रेस आणि सौंदर्यही लक्षात घेतले पाहिजे.

- गिरीश वानखेडे girishwankhede101@gmail.com

बायोपिक तयार करत असताना अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे फक्त दिसणेच नाही तर एक ग्रेस आणि सौंदर्यही लक्षात घेतले पाहिजे. बायोपिक नेहमी जे जसे घडले ते तसे दाखवणारा असावा, अशी प्रेक्षकांची अपेक्षा असते; अन्यथा ते चित्रपट प्रेक्षकांकडून नाकारले जातात, कधीकधी निषेध मोर्चेही निघतात.

नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या जीवनाशी संबंधित मोठ्या बजेटच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची दणक्यात घोषणा करण्यात आली. यात अभिनेता अक्षयकुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेबरोबरच एका नव्या विवादाची सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. उत्तर प्रदेशातील वासिम कुरेशी या चित्रपटाचे निर्माते आहेत. सुमारे १०० कोटी रुपयांचे बजेट असलेला हा चित्रपट मराठी, हिंदी, तेलुगू आणि तमीळ भाषेत एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. याचे चित्रीकरण ६ डिसेंबरपासून सुरू झाले असून, यातला अक्षयकुमारचा ‘फर्स्ट लूक’ बाहेर येताच लोकांकडून त्याच्याविरोधात ट्रोलिंग सुरू झाले आहे.

अक्षयकुमार शिवाजी महाराजांची भूमिका करण्यासाठी अनुरूप आहे असे वाटण्याची कारणे अलाहिदा; पण त्याच्या चित्रपटांचा आढावा घेतला तर एक गोष्ट लक्षात येते, की अलिकडच्या काळात प्रदर्शित झालेल्या आठ चित्रपटांपैकी केवळ ‘सूर्यवंशी’वगळता एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तग धरू शकला नाही (रामसेतू, सम्राट पृथ्वीराज चौहान, बच्चन पांडे, बेल बॉटम). ओटीटीवरचे अतरंगी रे, कठपुतली लक्ष्मी हेदेखील अपयशी ठरले. त्यामुळे कदचित शिवाजी महाराजांना शरण जाऊन त्याद्वारे एक हिट चित्रपट मिळवण्याचा त्याचा बेत असावा.

अक्षयकुमार सध्या आपल्या विनोदी नटाच्या इमेजमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे पृथ्वीराज चौहानमध्येही तो सम्राट वाटलाच नव्हता. अशा मिस कास्टिंगच्या चुकीमुळे केवळ बॉलीवूडच नाही, तर हॉलीवूडमध्येही अनेक मोठे चित्रपट जोरात आपटले आहेत. ऑलिव्हर स्टोन याने वॉर्नर ब्रदर्सच्या सोबतीने अलेक्झांडर द ग्रेट या चित्रपटाची निर्मिती करताना अलेक्झांडरच्या भूमिकेसाठी कॉलिन फॅरल याची निवड केली. अलेक्झांडर हा जगज्जेता बनण्यासाठी निघालेला महान ग्रीक योद्धा होता. या भूमिकेत कॉलिन फॅरल या आयरिश वंशाच्या नटाची निवड करण्यात आली जो आधीच आपल्या व्यक्तिगत आयुष्यात दारू पिण्यासाठी, मारामारी करण्यासाठी कुप्रसिद्ध होता. त्यामुळे आयरिश ॲक्सेंटमध्ये बोलणारा अलेक्झांडर प्रेक्षकांना रुचला नाही. हा मोठ्या बजेटचा प्रकल्प अपयशात विरून गेला. याशिवाय ग्रिक वकिलांनी आपल्या देशाच्या इतिहासाबरोबर छेडछाड केली म्हणून दावा ठोकला, तो वेगळाच.

सॅल्व्हेडोर डाली हा प्रसिद्ध चित्रकार होता. (त्याच्या मिशीच्या स्टाईलवरूनच मनी हाइस्टचा मुखवटा तयार करण्यात आला आहे.) २००९ मध्ये लिटील ॲशेस नावाने डालीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता रॉबर्ट पॅटीनसन. रॉबर्टने ट्वीलाईट सागा केल्यामुळे तो यंग हार्ट थ्रोब बनलेला होता. त्यामुळे प्रेक्षकांनी त्याला डाली म्हणून स्वीकारले नाही. सध्या अर्बन मिथ्स नावाची एक सीरिज येऊ घातली आहे.

यामध्ये सॅल्व्हेडोर डालीची भूमिका डेव्हिड सुचेट करत आहे. डेव्हिड हर्क्युल पायरेटचीही भूमिका करतो. यात त्याच्या आणि सॅल्व्हेडोरत्या मिशीत साम्य आहे म्हणून कदाचित प्रेक्षक त्याला डालीच्या रूपात स्वीकारायला तयार होतील. दोन ऑस्कर जिंकणाऱ्या एलिझाबेथ टेलरचा बायोपिक ‘लिझ ॲन्ड डिक’मध्ये तिच्या भूमिकेसाठी लिंडसे लोहानला निवडण्यात आले. दोघींचेही व्यक्तिगत आयुष्य अडथळ्यांनी भरलेले असले, तरीही लिंडसेला एलिझाबेथच्या भूमिकेशी एकरूप होता आले नाही आणि ही भूमिका अगदीच तकलादू ठरली. म्हणून बायोपिक तयार करत असताना अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे फक्त दिसणेच नाही, तर एक ग्रेस आणि सौंदर्यही लक्षात घेतले पाहिजे. २०११ मध्ये एफबीआयचे प्रमुख जे ॲडगर हुअर यांच्यावर आधारित चित्रपटात त्यांच्या भूमिकेसाठी लिओनार्दो द कॅप्रिओ यांची निवड दिग्दर्शक क्लिंट इस्टवूड यांनी केली होती. लिओनार्दो मात्र या चित्रपटात कोणत्याही कोनातून जे ॲडगर वाटला नाही. त्यामुळे अगदी कमी फ्लॉप चित्रपट देणाऱ्या लिओनार्दोचा हा चित्रपट आपटला. लिओनार्दोला ॲडगरचा ॲटिट्यूड कॅरी करताच आला नाही. त्यामुळे त्याचा एफबीआयप्रमुख प्रभावहीन ठरला. स्टीव्ह जॉब्स चित्रपटात ॲश्टन कुचरला स्टीव्हची भूमिका देणे हीदेखील दिग्दर्शकाची मोठी चूक होती. म्हणूनच २०१३ चार सर्वांत वाईट अभिनेत्याचा रिट्झ पुरस्कार ॲश्टनला देण्यात आला.

बायोपिक चित्रपट करत असताना कलाकारांची निवड अत्यंत चोख असली पाहिजे. त्यासाठी त्या कलाकाराचा अभिनय आणि विश्वासार्हता लक्षात घेतली पाहिजे. बेन किंग्जलेला घेऊन गांधीजीसारखा अजरामर बायोपिक बनवण्यात आला. अशी अनेक चांगली उदाहरणे आहेत; पण चांगल्यापेक्षा वाईट उदाहरणांची संख्या जास्त आहे. कारण प्रत्येक वेळी गांधी बनेलच असे नाही. कारण लोक भूमिका साकारणारा कलाकार आणि बायोपिकची मुख्य व्यक्तिरेखा यांना एकमेकांशी पडताळून पाहत असतात. म्हणूनच इतिहासातील अशी एखादी व्यक्तिरेखा जिच्याबद्दल आपल्याला निष्ठा प्रेम वाटत असते ती भूमिका साकारणाऱ्या नटाचे पूर्वआयुष्य, व्यक्तिगत आयुष्यदेखील तसेच आदर्श असेल, तर प्रेक्षकांना अडचण नसते. रामायणात रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा त्यांना रामाची भूमिका मिळाली तेव्हा त्यांनी सर्वात आधी आपले दारू पिणे, सिगारेट ओढणे बंद केले. कारण ते एका पूजनीय व्यक्तिरेखेची भूमिका साकारणार होते. त्यांनी रामाचा आदर्श आपल्या व्यक्तिगत आयुष्यातही पाळण्याचा प्रयत्न केला म्हणूनच आज इतकी वर्षे लोटल्यानंतरही अरुण गोविल यांना प्रेक्षक रामासमान पूजनीय मानतात आणि त्यांच्या पाया पडतात. बायोपिक करताना फक्त नटाने केवळ त्या भूमिकेत शिरून चालत नाही, तर त्या व्यक्तिरेखेचे आदर्श आपल्या अंगी भिनवणे आवश्यक आहे.

बॉलीवूडमधील दीपिका पादुकोण अभिनित छपाक या चित्रपटात तिने ॲसिडहल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारली होती. योग्य रंगभूषेचा वापर करूनदेखील दीपिका या चित्रपटात लक्ष्मी अग्रवाल भासली नाही. यामुळेच या चित्रपटात लक्ष्मी अग्रवालला जी सहानुभूती मिळायला हवी होती ती मिळाली नाही. कारण हा चित्रपट आणि दीपिकाचा अभिनय प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करू शकला नव्हता. दीपिका स्वतः खूप चांगली अभिनेत्री आहे; पण तिला या चित्रपटात मात्र आपली जादू दाखवता आली नाही. लक्ष्मीवर ॲसिडहल्ला करणारे गुन्हेगार वास्तविक पाहता मुस्लिम होते; पण चित्रपटात मात्र ते हिंदू दाखवण्यात आले. हादेखील एक वादाचा मुद्दा होता. असे संदर्भ बदलून लक्ष्मीच्या बायोपिकमध्ये छेडछाड केल्याचा आरोप या चित्रपटावर करण्यात आला. बायोपिक नेहमी जे जसे घडले ते तसे दाखवणारा असावा, अशी प्रेक्षकांची अपेक्षा असते. याचप्रमाणे जेव्हा सुरेश ओबेरॉय यांनी नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवला आणि प्रमुख भूमिकेसाठी विवेक ओबेरायला निवडले, तेव्हाही मिस कास्टिंगची चूक घडली. तापसी पन्नूचा शाबास मिठू, सायना नेहवालचा बायोपिक सना, गुंजन सक्सेना, सरदार उधम सिंग, थलैवी, सुरमा, हसिना पारकरदेखील असेच मिस कास्टिंगमुळे भरकटलेल चित्रपट.

काही बायोपिकनी मात्र खरोखरीच कमाल केली आहे. मिल्खा सिंग यांच्या बायोपिकवेळी फरहानने त्यांची भूमिका साकारण्यासाठी स्वतःचे केस वाढवले आणि हे एका क्रीडापटूप्रमाणे पिळदार शरीरही बनवले होते. म्हणूनच या चित्रपटाची सर्वत्र प्रशंसा झाली आणि प्रेक्षकांनीही हा चित्रपट उचलून धरला. फरहानचे कौतुक करत ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी ‘अभिनय करण्यासाठी शरीरही बनवावे लागते’ अशी मिश्किल दाद दिली होती. फुलन देवीच्या भूमिकेला सीमा बिस्वासने ‘बँडिट क्वीन’मध्ये योग्य न्याय दिला होता. एम. एस. धोनीदेखील सुशांत सिंगने चांगल्या रीतीने उभारला होता. ‘सुपर ३०’मध्ये ऋतिक रोशनने खरोखरीच नॉन ग्लॅमरस रोल करत कमाल केली होती. ८३ मध्ये रणवीर सिंग कपिलदेवच्या भूमिकेत; तर गंगुबाई काठीयावाडीमध्ये आलिया भट गंगुबाईच्या भूमिकेत अनुरूप ठरले होते. शकुंतला देवी, मेरी कोम, डर्टी पिक्चर, तान्हाजी हे बायोपिक योग्य कलाकारांच्या निवडीमुळेच प्रशंसनीय ठरले आहेत.

या सर्व लेखाजोख्यावरून अक्षय कुमार शिवाजी महाराजांची भूमिका करणार, याबद्दल सर्वांच्या मनात धाकधूक सुरू आहे. ‘तान्हाजी’ चित्रपटाइतके तरी यश अक्षय कुमारच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपटाला लाभेल का, चित्रपटाला घवघवीत यश मिळेल का, हेच आता पाहायचे आहे.

(लेखक प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.