‘इम्पॉसिबल’ सुपरहिरो!

टॉम क्रूझची जगाला सर्वप्रथम ओळख झाली ती, १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टॉप गन’ चित्रपटामुळे. भरपूर ॲक्शन सीन असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा यशस्वी ठरला.
tom cruise
tom cruisesakal
Updated on
Summary

टॉम क्रूझची जगाला सर्वप्रथम ओळख झाली ती, १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टॉप गन’ चित्रपटामुळे. भरपूर ॲक्शन सीन असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा यशस्वी ठरला.

- गिरीश वानखेडे

एकदा एक अभिनेता विमानप्रवास करत होता. विमानातील हवाईसुंदरीने त्याला ड्रिंक्सबद्दल विचारले. तो म्हणाला, ‘मी दारू पीत नाही आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, मी तुझ्यासारखा विमानात बसून प्रवास करणारा सर्वसामान्य प्रवासी नाही... विमानाला बाहेरून लटकत प्रवास करायला मला आवडते...’ तुम्ही ओळखला असेलच हा अभिनेता! हॉलीवूडचा मेगास्टार ‘द’ टॉम क्रूझ... परफेक्ट हिरो मटेरिअल असलेला टॉम लेडीकिलर तर आहेच; पण एखाद्या सुपरहिरोलाही लाजवेल असे कितीही कठीण आणि अशक्य वाटणारे स्टंट तो स्वतः करतो. आपल्या ॲक्शनपटांनी त्याने अख्ख्या जगावर गारूड केले आहे. विश्वास बसणार नाही; पण ३ जुलैला टॉम वयाची साठी ओलांडतोय. हा चिरतरुण अभिनेता आजही आपला प्रत्येक स्टंट तितक्याच समर्पित भावनेने करतो आणि म्हणूनच तो इतरांपेक्षा ग्रेट ठरतो...

टॉम क्रूझची जगाला सर्वप्रथम ओळख झाली ती, १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टॉप गन’ चित्रपटामुळे. भरपूर ॲक्शन सीन असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा यशस्वी ठरला. लेदर जॅकेट घातलेला टॉम तरुण वर्गासाठी फॅशन आयकॉन बनला. या चित्रपटात त्याचा सहकलाकार होता वॉल किलमर. तो आधीच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेला होता आणि टॉमची नुकतीच जगाला ओळख होत होती. टॉमने आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांत अनेक सुपरस्टार कलाकारांसोबत काम केले. चित्रपटसृष्टीत आपली जागा निर्माण करण्यासाठी धडपडणारा एखादा नवा अभिनेता प्रथितयश कलाकाराबरोबर काम करतो तेव्हा त्याच्या अभिनयाची तुलना हमखास केली जाते. तेव्हाही टॉमने अशा प्रकारच्या तुलनेची किंवा दिग्गज कलाकारांच्या प्रसिद्धीच्या वलयात हरवून जाऊ, अशी भीती बाळगली नाही. आपल्या घाऱ्या डोळ्यांतील आत्मविश्वासाची चमक त्याने कधीही कमी होऊ दिली नाही. म्हणूनच त्याचे ‘मिशन इम्पॉसिबल’ अविरत सुरूच राहिले.

टॉमने अनेक चित्रपटांत रिस्क घेतली. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कलर ऑफ मनी’मध्ये टॉमचा सहकलाकार होता पॉल ह्युमन. त्या काळात प्रसिद्ध असलेल्या पॉलच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली होती. १९८८ मध्ये झळकलेल्या ‘रेन मॅन’मध्ये टॉमचा सहकलाकार असलेला डस्टिन हॉफमन तर ऑस्कर विजेता होता. त्यानंतर १९९२ मध्ये प्रदर्शित ‘अ फ्यू गुड मेन’ चित्रपटात टॉमने आपल्यापेक्षा वरचढ असलेल्या जॅक निकोलसनबरोबर भूमिका साकारली होती. याच यादीतील आणखी एक सुपर हिट चित्रपट म्हणजे १९९४ मध्ये सुप्रसिद्ध अभिनेता जॉनी डेपबरोबर टॉमने केलेला ‘इंटरव्ह्यू विथ द व्हॅम्पायर.’ टॉमला हॉलीवूडमधील दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची इच्छा होती. म्हणूनच त्याने १९८९ मध्ये ऑलिव्हर स्टोन दिग्दर्शित चित्रपट ‘बॉर्न ऑन द फोर्थ ऑफ जुलै’ स्वीकारला होता.

आव्हानांचा पाठलाग...

टॉमच्या चित्रपटांची यादी पाहताच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, तो पडद्यावर स्टंट करतानाच नाही, तर व्यक्तिगत कारकीर्द घडवतानाही प्रत्येक पावलावर आव्हाने स्वीकारताना डगमगला नाही. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काही सिनेमांपासूनच टॉमने आपल्यापेक्षा मोठ्या, प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकारांसोबत काम करत हॉलीवूडमध्ये स्वतःचे साम्राज्य निर्माण केले. दिग्गज अभिनेत्यांच्या तुलनेत तरुण अन् रूपाने देखण्या टॉमच्या भूमिका थोड्या छोट्या असल्या तरीही त्याने त्यातून आपली चुणूक दाखवली आणि जगभरात सर्वांचा आणि विशेषत्वाने तरुणींचा ‘फेव्हरेट’ बनला. तसे पाहायला गेले तर, टॉमने १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एंडलेस लव्ह’ चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, तो चित्रपट काही खास कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर १९८३ मध्ये आलेला ‘रिस्की बिझनेस’ आणि १९८५ मधील ‘लिजंड’ चित्रपटही आले आणि गेले. टॉम जगाला माहीत व्हायला १९८६ साल उजाडावे लागले.

‘ॲक्शन फ्रेंचायझी’वर फोकस

‘मिशन इम्पॉसिबल’ चित्रपटांच्या भागांच्या दरम्यान टॉमने शॅटर्ड ग्लास, लास्ट सामुराई, कोलॅटरल, वॉर ऑफ वर्ल्डस्, एलिझाबेथ टाऊन, आस्क द डस्ट, लायन्स ऑफ लॅंब्स, टॉपिक थंडर, वालकरी, द ममी आणि नाईट ॲण्ड डे अशांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले. मात्र, ते बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. त्यातून टॉमने धडा घेतला की, आपले भावनिक छटा उलगडणारे चित्रपट यशस्वी ठरत नाहीत, तेव्हा आपण आपल्या ‘ॲक्शन फ्रेंचायझी’वर लक्ष केंद्रित करणेच इष्ट! त्यानंतर त्याने केलेले चित्रपट ‘जॅक रिचर्ड - हिट’ आणि ‘जॅक रिचर्ड - नेव्हर गो बॅक’ बरे कमाई करणारे ठरले. २०२२ साली टॉमचा ‘टॉप गन ः मॅव्हरिक’ आला. या ॲक्शनपटानंतर चाहते पुन्हा एकदा टॉमच्या प्रेमात पडले. चित्रपटाने जगभरात एक अब्ज डॉलरची कमाई केली. ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे. याच चित्रपटाच्या पहिल्या भागाने टॉमला यशस्वी कलाकारांच्या यादीत समाविष्ट केले होते. म्हणूनच त्याने ‘मॅव्हरिक’ची निर्मिती केली... एक निर्माता म्हणून त्याने प्रेक्षकांची नस अचूक ओळखली होती. उल्लेखनीय म्हणजे १९९० साली आलेल्या ‘डेज ऑफ थंडर’ चित्रपटात टॉमने अभिनयाबरोबरच सहकथा लेखक म्हणूनही काम केले आहे. ‘रॉक ऑफ एजेस’ चित्रपटात त्याने पार्श्वगायनही केले आहे.

परफेक्ट सीनसाठी कठोर समर्पण

सध्या टॉम क्रूझ चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी ठरणाऱ्या ‘मिशन इम्पॉसिबल’च्या भाग ७ आणि ८ च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. चित्रीकरणादरम्यानच संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट कोसळले. कोरोना प्रतिबंधामुळे टॉमला त्याच्या चित्रपटात एक खास ट्रेन सिक्वेन्स चित्रीत करता आला नाही. अर्थात त्यात नुकसान चाहत्यांचेच आहे. कारण नेहमीच इतरांपेक्षा हटके अन् थरारक असे भरपूर ॲक्शन सीन्स आता आपल्याला दिसणार नाहीत. एक ॲक्शन ट्रिट मात्र आहे. चित्रपटात टॉम एक असा सीन करणार आहे ज्यात तो डोंगराच्या कड्यावरून मोटरबाईकवरून खाली उडी मारतो. जमिनीवर पोहोचण्यापूर्वीच पॅराशूटने हवेत उड्डाण करतो. या प्रसंगासाठी टॉमने स्वतःही जोरदार तयारी केली आहे. तब्बल पाचशे तासांचे स्काय डायव्हिंग तो शिकला. १३०० वेळा उडी मारण्याचा सराव केला. त्याने सहा वेळा सीन चित्रित केला असून त्यातला परफेक्ट तो चित्रपटासाठी निवडणार आहे... यावरूनच टॉमचे चित्रपटांप्रती असलेले प्रेम अन् समर्पण दिसून येते.

‘बुर्ज खलिफा’वरून उडी

टॉम क्रूझने कधी बॉडी डबल वापरला नाही. स्वतःचे स्टंट त्याने स्वतःच केलेत. ते कसे करायचे हे तोच जाणे. असे अनेक ॲक्शन सीन करताना तो अनेकदा मृत्यूच्या जवळ जाऊन आलाय, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ‘मिशन इम्पॉसिबल’च्या ‘रॉग्यू नेशन’मधील एका दृष्यात तो उडत्या विमानाला लटकला होता. विमान उतरेपर्यंत तो तसाच होता. ‘घोस्ट प्रोटोकॉल’साठी जगातील सर्वात उंच ‘बुर्ज खलिफा’वरून त्याने मारलेली उडी एखाद्या सुपरहिरोलाही मान खाली घालायला लावेल अशी होती. तो सीन गाजला आणि टॉम ॲक्शनपटांचा अनभिषिक्त सम्राट का, ते स्पष्ट झाले.

‘मिशन इम्पॉसिबल’चे गारूड

‘मिशन इम्पॉसिबल’च्या वर्णनाशिवाय टॉम क्रूझच्या कारकीर्दीचा आढावा अशक्यच आहे. ‘मिशन इम्पॉसिबल’ मालिकेतील पहिला चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झाला. आता टॉम केवळ अभिनेता राहिला नव्हता तर तो चित्रपट निर्माताही बनला होता. आजवर चित्रपटाचे सहा भाग प्रदर्शित झाले असून त्यातून इतरांना मिळणे ‘इम्पॉसिबल’ अशी लोकप्रियता टॉमला मिळवून दिली. एक निर्माता म्हणून टॉमला भारतातील मार्केट आणि चाहत्यांचीही चांगलीच जाण होती. म्हणूनच ‘घोस्ट प्रोटोकॉल’च्या प्रमोशनसाठी तो विशेष करून भारतात आला होता. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘आईज वाईड शट’ चित्रपट वेगळ्या पद्धतीने ट्रेंडसेटर ठरला. चित्रपटाचे दिग्दर्शक होते स्टॅनली कुब्रिक आणि चित्रपटात टॉमबरोबर पडद्यावर दिसणार होती त्याची त्या काळातील पत्नी निकोल किडमन. चित्रपटातील प्रणयदृश्यांच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक स्टॅनली यांनी दोघा पती-पत्नीमधली ‘केमिस्ट्री’ दिसत नाही असे सांगत हॉलीवूडमध्ये प्रथमच ‘इंटीमसी सुपरवायझर’ ठेवण्याची परंपरा सुरू केली. चित्रपट अपूर्ण असतानाच स्टॅनलीने जगाचा निरोप घेतला. टॉमने पदरमोड करून तो पूर्ण केला, पण विशेष कामगिरी करू शकला नाही.

अभिनयाच्या प्रशंसेपासून दूर

एकाच गोष्टीची खंत वाटते की, टॉम क्रूझच्या अभिनयाची प्रशंसा कधीच झाली नाही. नेहमीच तो ॲक्शन हिरो म्हणून ओळखला गेला. त्याची गणना नेहमीच सुमार अभिनय करणाऱ्या अभिनेत्यांच्या गटांमध्ये झाली; पण त्याकडे लक्ष न देता तो आपल्या कामात मग्न राहिला आणि ॲक्शनपटांचा ब्रॅण्ड बनला. कान्स शहरात ‘घोस्ट प्रोटोकॉल’ चित्रपटाच्या प्रीमियर शोच्या आयोजनात टॉम जेव्हा कार्पेटवरून चालला होता तेव्हा आकाशातून प्रेक्षकांच्या डोक्यावरून फ्रेंच फायटर विमाने जात होती... एका ॲक्शनपटाचा प्रीमियर सोहळा यापेक्षा भव्य असणे केवळ अशक्यप्राय आहे. टॉमचे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांना अचंबित करणारे, लार्जर दॅन लाईफ आणि प्रेक्षकांच्या कल्पनांना नवे आयाम देणारे असेच आहेत. म्हणूनच तो आजही वयाच्या साठीत राज्य करतोय. ॲक्शन किंग टॉमला वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.