- प्रीती शिंदे
मुलीचं आयुष्य वेगवेगळ्या टप्प्यांचं असतं. पहिला टप्पा असतो, माहेरचा. दुसरा सुरू होतो सासरचा आणि तिथून सुरू होतो प्रवास विविध जबाबदाऱ्यांचा. त्या मुलीची स्त्री होते. मातृत्वाचा तिसरा टप्पा दहा-पंधरा वर्षं तरी विसरायला लावतो. चौथा टप्पा असतो चाळिशीचा. याच टप्प्यावर रजोनिवृत्तीचा काळही जवळ आलेला असतो. ही झुंज लढण्याची वेळ प्रत्येकीवरच येते. ती झुंज जिंकण्यासाठी जगावे जरा बिनधास्तपणे...
परंपरागत चालत आलेल्या रुढीनुसार मुलगी आपलं जिवाभावाचं माहेर सोडून सासरी येते. तिच्या आयुष्यातील दुसरा अतिशय महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. पत्नी, सून, जाऊबाई, भावजय, नणंद अशी कितीतरी नाती तिला नव्याने चिकटतात.
नाती म्हणण्यापेक्षा जबाबदाऱ्याच. त्या मुलीची स्त्री होते. राजा-राणीचा संसार चालू होतो. नंतर एक अतिशय महत्त्वाचा तिसरा टप्पा तिच्या आयुष्यात येतो, तो म्हणजे मातृत्व... माता, आई, मम्मी काहीही म्हणा; पण आयुष्य बदलून टाकणारा. स्वतःला दहा-पंधरा वर्षं तरी विसरायला लावणारा... कधी कधी सुखावह तर कधी त्रासही देणारा हा काळ.
आपल्या संसारात, मुलांत, जबाबदाऱ्यात पूर्णपणे हरवून गेलेली ती स्त्री-माता जेव्हा तिच्या आयुष्याच्या चौथ्या टप्प्यावर येते, तेव्हा ती चाळिशीच्या उंबरठ्यावर उभी असते. मुलांच्या बऱ्याच जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात.
दहा-बारा वर्षं होईपर्यंत आपल्या पाठी पाठी लागणारी मुलं, आपलं ऐकणारी मुलंदेखील आता त्यांच्या-त्यांच्या विश्वात रमलेली असतात. स्वतःच्या नवऱ्यालादेखील बायकोशी गप्पा मारण्यात, तिची विचारपूस करण्यात तेवढा रस राहिलेला नसतो. तो त्याच्या मित्रपरिवारात जास्त रमलेला असतो. घरातील कार्यक्रम, नातेवाईक, त्यांची उठबस मात्र ‘ती’च्याकडे असते.
आपण कितीही पुढारलेले, उच्चशिक्षित म्हटलं तरी ‘मुलांचे संगोपन’ ८० टक्के स्त्रीवरच असतं. हो त्यात ‘मुलांवरचे संस्कार’ हा महत्त्वाचा भाग आहेच... त्याच्यात स्त्री जर नोकरी करणारी असेल, तर तिची होणारी ओढाताण, तारेवरची कसरत, मुलांना वेळ देता येत नाही, याची अपराधी भावना आणि बरेच काही.
चौथा टप्पा म्हणजे स्त्रीची चाळिशी. ती शरीरापेक्षा मनाने जास्त थकून गेलेली असते. रोजची तीच कामे तिला आता कंटाळवाणी वाटायला लागतात. निवांत वेळ मिळालेला असतो; पण आरशात जेव्हा डोक्यावरचे पांढरे केस दिसू लागतात तेव्हा ती थोडी भानावर येते.
अंतर्मुख होते. वार्धक्याची चाहूल तिला लागते. ती स्वतःलाच प्रश्न विचारते कुठे होते मी? आणि हा ‘मी’च तिला त्रास देऊ लागतो. रजोनिवृत्तीचा काळही (मेनोपॉज) जवळ आलेला असतो. प्रचंड हार्मोनल बदल तिच्यात होत असतात. ती गोंधळून जाते.
तिची प्रचंड चिडचिड होऊ लागते. छोट्या छोट्या गोष्टींवरून तिला राग येऊ लागतो. तिच्यात झालेला हा बदल घरातील मंडळींना कळत नाही, असे नसते; परंतु त्याचे गांभीर्य त्यांना अजिबात वाटत नाही. ते दुर्लक्षच करतात. कारण, शरीराचा आजार दिसतो; पण मनाचाही आजार असतो, तो खूप विदारक असू शकतो; याची पुसटशी कल्पनाही घरच्यांना नसते.
ती स्त्री मात्र खूप गोंधळून गेलेली असते. कारण या टप्प्याचे तिच्याकडे ज्ञान किंवा माहिती नसते. ज्या स्त्रियांना याची कल्पना असते, त्यांना लक्षणे माहीत असतात; पण त्याच्यावरचे उपाय माहीत नसतात. असेच होते या वयात, असे त्या समजतात आणि स्वीकारतातही.
आता या दोन्ही प्रकारात या स्त्रिया निराशेच्या गर्तेत जाऊ शकतात; किंबहुना जातातही. या काळात त्या स्वतःच्या मनाशी मात्र खूप बोलत असतात. स्वतःचे अस्तित्व काय, इथपासून ते मी स्वतःसाठी का नाही जगले? माझी ओळख काय? हेच आयुष्य मला हवे होते का? असे एक ना अनेक प्रश्न ती स्वतःला विचारत असते.
इथे गरज असते तिला समजून घेण्याची; परंतु तिचा साता जन्माचा सोबतीही तिला समजून घेण्यात अपयशी ठरलेला असतो. तिने मोकळेपणाने तिचे मन उघड केलेच, तर हे काय वेड लागल्यासारखे बोलतेस, म्हणून तिची प्रतारणा केली जाते. तिलाही मग वाटू लागते, माझेच काही चुकलेय का?
तुमचं काहीही चुकत नाहीये, हे मुळात लक्षात घ्यायला हवे. स्वतःला सांगायची हीच वेळ असते, स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी जगण्याची, जीवनशैली बदलण्याची, छंद जोपासण्याची. एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची. जुन्या मैत्रिणींना भेटण्याची, मनसोक्त गप्पा मारण्याची. तेव्हाच उमजेल तुमच्या मैत्रिणीही देत आहेत झुंज या चौथ्या टप्प्याशी.
आपण एकटे नसतोच मुळी या चाळिशीच्या प्रवासात. त्यांचं आणि आपलं सारखंच आहे दुःख. गरज असते जरासं बिनधास्त जगायला शिकण्याचं. आलाच कधी कंटाळा तर घालवायला हवा वेळ एखादं चित्र रेखाटण्यात.
करायला हवी एखादी कविता आपल्या मनातली. ऐकत रहावं आवडीचं संगीत निवांत बसून. वाचत राहावं एखादं पुस्तक आवडीचं. मारायला हवा एक फेरफटका सायकलवरून. काहीच नाही वाटलं तर काढायला हवी शांत झोप... पण जगायला हवं स्वतःसाठी; मग वाटणार नाही ही चाळिशी नकोशी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.