भुकेलेल्यांसाठीचा अन्नदाता

सावंतवाडीला दोन तास उशिरा आलेल्या कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये मी बसलो. गाडीत खूप गर्दी होती. तेवढ्या गर्दीमध्ये एक व्यक्ती वाट काढीत जेवणाचं पार्सल घेऊन आला.
bhartiy food queen
bhartiy food queensakal
Updated on

सावंतवाडीला दोन तास उशिरा आलेल्या कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये मी बसलो. गाडीत खूप गर्दी होती. तेवढ्या गर्दीमध्ये एक व्यक्ती वाट काढीत जेवणाचं पार्सल घेऊन आला. पार्सल उघडताक्षणी जेवणाचा एकदम सुगंध दरवळला. त्या जेवण देणाऱ्या व्यक्तीला बोलावून मीही जेवणाची ऑर्डर दिली. माझ्या बाजूला जेवणारी ती व्यक्ती मला म्हणाली, ‘या ट्रेनमध्ये जेवण केले म्हणजे खूप आनंद मिळतो, काहीतरी मिळवले असे वाटते.’

मी दिलेली ऑर्डर आली आणि ते जे सारे बोलत होते, त्याची प्रचिती मला आली. खरेच खूप चवदार जेवण होते. जेवण झाल्यावर मी हात धुण्यासाठी गेलो तर त्या ठिकाणी तो जेवण आणून दिलेला व्यक्ती कुणाचीतरी वाट बघत उभा होता. मी त्या व्यक्तीला म्हणालो, ‘जेवायला खूपच मजा आली. रोज या ट्रेनला असेच जेवण मिळते का?’ तो म्हणाला, ‘हो, असेच जेवण मिळते. सर, ही ट्रेन आणि मांडवी एक्स्प्रेस या दोन्ही ट्रेनची खास जेवणासाठी ओळख आहे.

मुंबई, कोकण विभाग आणि गोवा या ट्रेनचे जेवणामुळे चाहते आहेत. दोन्ही ट्रेनला ‘भारतीय फूड क्वीन’ असं नाव आहे. मी अनेक वर्षांपासून येथे काम करतो.’ सगळे जण असे म्हणतात, की येथे जेवायला फार मजा येते. रामू भदोरीया हे गेल्या कित्येक वर्षांपासून या रेल्वेमध्ये किचन सांभाळण्याचे काम करतात. आमचे बोलणे सुरू असताना रामू म्हणाले, ‘आमचे मालक ‘ताज’ हॉटेलमध्ये कुक होते. त्यांनी पुन्हा फूडसंदर्भात स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. त्याला यश मिळत गेले. मी त्यांची चौकशी केली, त्यांना भेटता येईल का असं विचारलं.

राजू म्हणाले, ‘अनेक वेळा मालक इथली व्यवस्था पाहणी करण्यासाठी ट्रेनच्या किचनमध्ये असतात. आज मालक ट्रेनमध्येच आहेत.’ मी म्हणालो, ‘कृपया माझी आणि त्यांची भेट करून द्या.’ रामू म्हणाले, ‘चला, मी पाहतो.’ रामू यांनी ज्या माणसाची मला मालक म्हणून ओळख करून दिली होती, ते त्याच कॅन्टीनमध्ये एक कागद अंथरून जमिनीवर झोपले होते. रामू यांनी त्यांना उठवले, आणि सांगितलं, मला त्यांच्याशी बोलायचे आहे.

लांब केस, अंगात पांढरा शर्ट, शर्टचे वर असणारे अर्धे बटण उघडे, निळ्या रंगाची शॉर्ट पॅन्ट, चेहऱ्यावर प्रचंड तेज. मनात कुठलाही विचार नाही, असा एक साधा माणूस माझ्या बाजूला होता. मी म्हणालो, ‘तुम्ही बनवलेले जेवण मी आताच केले. मला ते जेवण करून फार आनंद झाला. तुम्ही खूप चांगले अन्नदानाचे काम करता. जेवणही फार छान झाले. खूपच मजा आली.’ ते म्हणाले, ‘धन्यवाद!’ कधी ते मला प्रश्न विचारत होते, कधी मी त्यांना प्रश्न विचारत होतो. असा आमचा संवाद सुरू झाला.

त्यांचा अख्खा प्रवास थक्क करणारा होता. मी ज्यांच्याशी बोलत होतो त्यांचं नाव जगदीश राज! ज्या मांडवी एक्सप्रेस आणि कोकणकन्या या दोन रेल्वेला ‘फूड क्वीन ऑफ इंडिया’ म्हटलं जातं, त्याचं पूर्ण श्रेय जगदीश राज (९७६९००६४२०) यांना जातं. जगदीश या रेल्वेला अन्न पुरवणारे मालक आहेत. त्यांचे वडील पौल राज रेल्वेत नोकरीला होते.

जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत असणाऱ्या अनेक रेल्वेच्या संघटनांमध्ये पौल राज यांनी कामगारांसाठी मोठं काम उभारलं. जगदीश यांनी जिद्द आणि मेहनतीतून कुकिंग क्षेत्रावर अधिराज्य निर्माण केले. त्या जगदीश यांची कहाणी थक्क करणारी होती. जगदीश यांचे वडील पौल राज उत्तम कुक होते. ते घरी सगळ्यांना अनेक प्रकारचे पदार्थ करून खाऊ घालायचे.

संघटनात्मक बांधणी आणि उत्तम कुक या वडिलांच्या दोन्ही छंदांचं जगदीश यांना कमालीचं कौतुक होतं. सुरुवातीला नेहमी कामांमध्ये अपयश येणाऱ्या जगदीश यांनी एके दिवशी ‘ताज’ हॉटेलमधली कुकिंगसंदर्भातली जाहिरात पेपरमध्ये वाचली. तिथे जॉइन होण्यासाठी कपडे, नीटनेटकेपणा यासाठी जगदीश यांनी त्यांच्या एका मित्राकडून एक हजार रुपये उसने घेतले. सुरुवातीच्या काळात जगदीश यांना बारा-बारा तास ‘ताज’मध्ये भांडी घासायला लागत. काही महिन्यांनंतर जगदीश कुकिंगच्या मुख्य टीममध्ये आले.

अनेक ठिकाणी जगदीश यांनी हॉटेल सुरू केले. त्या सुरू केलेल्या व्यवसायात दानतत्त्वाची वृत्ती अधिक असल्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी अपयशच येत गेले. आज यशाच्या एका उच्च शिखरावर असताना, कित्येक हॉटेलचे मालक असताना जगदीश यांच्यामध्ये तो भांडी घासणारा कामगार आजही कायम आहे. याची अनेक उदाहरणं जगदीश यांनी मला बोलताना सांगितली.

जगदीश म्हणाले, ‘आज माझे वडील नाहीत; पण वडील सातत्याने सांगायचे, तुम्ही भुकेलेल्याला अन्न द्या. तुमच्या इच्छा-आकांक्षा निश्चितपणे पूर्ण होतील. तुम्हाला सुख-समाधान मिळेल. हे वडिलांचं सूत्र घेऊन मी नियमितपणे काम करतो. त्यातूनच मला यश येते.’ त्या अवघ्या प्रवासामध्ये ना बाहेर कधी लक्ष गेले ना सामान कुठे आहे त्या सामानाकडे माझे लक्ष गेले. माझे सारे लक्ष पूर्णपणे जगदीश यांच्या पूर्ण प्रवासावर होते. त्यांचा ५१ वर्षांचा प्रवास एखाद्या चित्रपटासारखा होता.

जगदीश म्हणाले, ‘माझे बाबा नेहमी म्हणायचे, माझ्या जगदीशने माझे नाव मोठे केले.’ आपल्या वडिलांच्या आठवणीमध्ये डोळे पुसताना आमच्या दोघांचे लक्ष गेले की बाहेर गाडी थांबली. पाहतो तर काय, आम्ही मुंबईला येऊन पोहोचलो. जगदीश आणि मी नवी मुंबईचा प्रवास एकाच गाडीतून करायचे आम्ही ठरवल.

गेल्या अनेक वर्षांपासून जगदीश यांच्या हॉटेलचा व्यवसाय पूर्णपणे पाहणारा सागर सामरेकर जगदीश यांना घेण्यासाठी स्टेशनला होता. राजू सारखी वेगळी कहाणी सागरची होती. ती कहाणी जगदीश यांनी मला सांगितली.

सीवूड येथे जगदीश यांचे घर होते. अगदी आदराने जगदीश यांनी मला घरी नेले. जगदीशच्या आई लक्ष्मी देवघरात पूजा करत बसल्या होत्या. मी गेलो, जगदीश यांनी आईला माझी ओळख करून दिली. जगदीश यांचा एकूण प्रवास आईने सांगितल्यावर माझ्याही माझ्याही डोळ्यांत अश्रू आले. आई तामिळनाडूच्या असूनही मला छान मराठीत बोलत होत्या.

जगदीश यांच्या आई लक्ष्मी मला म्हणाल्या, ‘माझ्या मुलाचे कसे होईल, याची मला काळजी वाटायची; पण आज माझा मुलगा सगळ्यांची काळजी घेतोय. शेकडो चुली त्याच्यामुळे पेटल्या. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती जगदीशमुळे सातासमुद्रापार गेली. ज्या महाराष्ट्राने, मुंबईने आम्हाला वाढवले, मोठे केले, त्या महाराष्ट्राचे, मुंबईचे ऋण फेडण्याचे काम आम्ही नक्की करतोय.’

आज इथे अन्नधान्य द्यायचे, उद्या तिथे, धान्य जेवण द्यायचे. परवा या झोपडपट्टीमध्ये, उद्या त्या वस्तीमध्ये जेवण अशी भलीमोठी लिस्ट जगदीश आणि त्यांच्या आई लक्ष्मी यांच्याकडे मी पाहिली. सुख नेमके कशात असते आणि ते काय केल्याने मिळते त्याचे हे आई आणि मुलाचे उत्तम उदाहरण होते. एवढे सगळे वैभव, यश मिळाले तरीही पाय जमिनीवर ठेवून, खूप मोठे काम उभे करणारा हा उमदा व्यक्ती उद्योगांमध्ये अपयश येते की काय, याची भीती वाटणाऱ्या त्या प्रत्येक तरुणाचा आयडॉल आहेत. जगदीश यांच्या आईचे आशीर्वाद घेऊन मी घराबाहेर पडलो.

गेटपर्यंत सोडायला आलेल्या जगदीश यांनी मला कडाडून मिठी मारली आणि सांगितले, ‘आपण चांगले काम करत राहू भाई. निसर्ग आणि देव आपल्याला भरभरून देईल.’ अपयशातून यशाकडं जाणाऱ्या प्रत्येक युवकासाठी जगदीश म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com