शेकडो वर्षे पोर्तुगीजांच्या वरवंट्याखाली भरडणाऱ्या गोमंतकीय जनतेने गोवा मुक्तीलढा यथाशक्ती चालू ठेवला होता.
गोवा : गोवा मुक्तीची ६० वर्षे आज साजरी हाेत आहे. परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्ततेचे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान, हौतात्म्य, वेळ आणि शक्ती यांचे स्मरण करणे महत्त्वाचे आहे.
शेकडो वर्षे पोर्तुगीजांच्या वरवंट्याखाली भरडणाऱ्या गोमंतकीय जनतेने गोवा मुक्तीलढा यथाशक्ती चालू ठेवला होता. गोमंतकीयांवरील अत्याचारांची, त्यांच्या हालअपेष्टांची कल्पना पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही होती. पण हा प्रश्न अहिंसक मार्गाने, समंजसपणाने सोडवण्यावर त्यांचा भर होता. गोवा प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यासाठी पोर्तुगाल सरकारने धूर्तपणे एक चाल रचली होती. १ जुले १९५५ रोजी कायद्यांत बदल करून पोर्तुगाल देशाचे नामकरण ‘उल्ट्रामार पोर्तुगीज’ असे करण्यात आले. या नामकरणात पोर्तुगीज हा बहुखंडीय देश बनला आणि गोवा, दमण, दीव त्या देशाचे भाग बनले.
‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत पोर्तुगीजव्याप्त गोवा प्रदेशावर हल्ला करण्यासाठी १६ डिसेंबर हा दिवस निश्चित करण्यात आला. शक्यतो सशस्त्र लष्करी कारवाई टाळण्याकडे कल असलेल्या भारताने आंतरराष्ट्रीय समुदायामार्फत पोर्तुगीज सरकारचं मन वळवण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत केले. अठरा डिसेंबरच्या भल्या पहाटे गोव्याच्या वेगवेगळ्या सीमाभागाहून भारतीय सेनेने गोव्यांत प्रवेश केला. जनरल ऑफिसर कमांडिंग इन चिफ लेफ्ट. जन. जे. एन. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मेजर जनरल के.पी. कँडेथ यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन विजय राबविले.
भारतीय लष्कराच्या विविध तुकड्या, उत्तर, उत्तर-पूर्व, आणि दक्षिण गोव्याच्या सरहद्दी ओलांडून गोव्यात प्रवेश करत्या झाल्या. २, शीख लाईट इन्फन्ट्री या लष्कराच्या तुकडीने दोडामार्ग या लष्कराच्या उत्तर-पूर्व दिशेच्या सरहद्दीतून गोव्यात प्रवेश केला. या इन्फन्ट्रीच्या तुकडीचे नेतृत्व मेजर- शिवदेव सिंग सिद्धू करीत होते. मेजर सिद्धू यांच्या तुकडीने पहाटे ५.१५ वाजता- गोव्याच्या दिशेने कूच केले. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने एक तात्पुरता कॉजवे तयार करून भारतीय सेनेने नऊच्या दरम्यान अस्नोडा पार केले. राजधानी पणजीच्या अलीकडल्या किनाऱ्यावर वसलेल्या बेती गावी पोचेस्तोवर संध्याकाळचे पाच वाजले होते. बेती गावात तळ ठोकताच मेजर सिद्धू यानी हवेत गोळीबार करून मांडवीच्या नदीपात्रात असलेल्या बोटीना आहे त्याच जागी स्थिर राहण्याचे आदेश दिले.
त्या आदेशाला न जुमानता पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका बोटीवर गोळीबार करून, सैनिकानी त्या बोटीला जलसमाधी घडविली. हा गोळीबार ऐकून गव्हर्नर जनरलच्या सचिवालयावरील पोर्तुगीज झेंडा खाली उतरवून त्या जागी पांढरा ध्वज फडकविण्यात आला. रात्री आठ वाजता पणजीहून पाद्री ग्रेगरीओ आंताव हे पणजी शहराच्या कमांडरने पाठवलेले शरणांगतीपत्र घेऊन बेती येथील भारतीय छावणीत दाखल झाले. मेजर शिवदेव यांनी हे पत्र आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याना दाखवून पुढील आदेश देण्याची विनंती केली. वरीष्ठांनी त्याना पुढील आदेश येईपर्यंत बेती किनाऱ्यावरच रहाण्याचे निर्देश दिले.
मेजरल सिद्धू वरिष्ठांची भेट घेऊन आपल्या तळावर परत येताच, दोन संशयित पोर्तुगीज सैनिकाना भारतीय सेनेच्या जवानांनी अटक केल्याची वर्दी आली. आम्ही पोर्तुगीज सैनिक नसून रेईश मागूश या गावातील स्थानिक नागरिक आहोत, असा त्या दोघांचा दावा होता. स्थानिक नागरिकानी अटक केलेल्याना ओळखले आणि ते त्यांच्याच गावातील रहिवाशी असल्याचं भारतीय सैनिकाना सांगितले. गावकऱ्यांकडून खात्री करून घेताच, भारतीय सैनिकांनी त्यांना मुक्त केले. या गावातील नागरिकानी मेजर सिद्धू याना जवळच्याच आग्वाद किल्ल्यातील जेलसंबंधीची माहिती दिली. किल्ल्यांत पन्नास ते साठ राजकीय कैदी शिक्षा भोगत असून, त्यांची सुटका केली नाही तर पोर्तुगीज सैनिकांकडून त्यांची हत्या होण्याची शक्यता गावकऱ्यांनी वर्तविली. निरपराध भारतीय नागरिकाना वाचविणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, या भावनेने मेजर सिद्धू यानी त्वरित आग्वादच्या दिशेने मार्गक्रमण केले.
१८ डिसेंबरच्या रात्रीच्या भीषण अंधारात साडेअकरा वाजता मेजर शिवदेव सिंग आपल्या सहकाऱ्यांसमवेत आग्वाद किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यासमोर पोचले. आपल्या समवेत असलेल्या वाटाड्या आणि दुभाष्याद्वारे मेजर सिद्धू यानी पोर्तुगीज पहारेकऱ्यास किल्ल्या बाहेर येण्यास सांगितले. पणजी येथील पोर्तुगीज लष्कराने शरणागती पत्करल्याचेही त्याला सांगण्यात आले. पण किल्ल्यातील पोर्तुगीज सैनिक शरणागती पत्करण्यास तयार नव्हते. त्यानी भारतीय सैनिकांवर गोळीबार करण्यास सुरवात केली. पोर्तुगीज सैन्यांच्या माऱ्यास तोंड देण्याची भारतीय सैन्याची शस्त्रसज्जता नव्हती, तरीही हाती असलेल्या शस्त्रास्त्रांसह त्यांनी पोर्तुगीजांवर प्रतीहल्ला चढविला. पोर्तुगीजांच्या हातबाँब, ग्रेनेडसच्या माऱ्यांत भारतीयांचा सैन्यट्रक उध्वस्त झाला. मध्यरात्र उलटून गेली होती.
१९ डिसेंबरच्या उत्तररात्रीचे पावणेदोन वाजले होते. पोर्तुगीज सैनिकांनी फेकलेला एक ग्रेनेड मेजर सिद्धू यांच्या जवळ फुटला आणि त्या स्फोटाने जबर जखमी झाले. काही मिनिटांतच त्याना वीरमरण प्राप्त झाले. एव्हाना भारतीय तळावर आग्वाद येथील चकमकीची वार्ता पोचली होती. पूर्ण तयारीनिशी भारतीय सेनेने आग्वाद किल्ल्यावर हल्ला केला. १९ डिसेंबरच्या पहाटे सहा वाजता पोर्तुगीज सैनिकानी शरणांगती पत्करली आणि आग्वाद किल्ला भारताच्या ताब्यात आला. त्यानंतर काही तासांतच २,शीख लाईट इन्फट्रीच्या जवानांनी पणजीवर चाल केली आणि राजधानीचे शहर ताब्यात घेतले. संध्याकाळी पोर्तुगीज सरकारने भारतीय सैन्यापुढे सपशेल शरणागती पत्करली आणि रात्री आठ वाजता पोर्तुगीज गव्हर्नर जनरल वासाल द सिल्वा यानी शरणांगती पत्रावर सही केली. ऑपरेशन विजय ही मोहीम फक्त चाळीस तासांत फत्ते झाली. शत्रूच्या सामर्थ्याची कल्पना न घेता केलेल्या आग्वाद येथील हल्ल्यात दोन कुशल सेनाधिकाऱ्यांचे हकनाक बळी मात्र गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.