हुसेन, एक पर्व!

एम. एफ. हुसेन अर्थात मकबूल फिदा हुसेन (१७ सप्टेंबर १९१५ - ९ जून २०११) यांच्या जाण्याने ९६ वर्षांचा काळ ओंजळीतल्या वाळूसारखा निसटून गेला; पण आपल्या कलाकृतीतून आजही ते चित्रकला प्रवाहात अस्तित्वात आहेत.
great painter MF Hussain aka Maqbool Fida Husain referred to as Picasso of India
great painter MF Hussain aka Maqbool Fida Husain referred to as Picasso of IndiaSakal

- अरविंद हाटे

महान चित्रकार एम. एफ. हुसेन अर्थात मकबूल फिदा हुसेन यांचा उल्लेख भारताचा ‘पिकासो’ म्हणूनही व्हायचा. भरपूर रंगांचे लाघवी लेपन, उत्स्फूर्तपणा आणि कमीत कमी रेषांमध्ये चित्रण ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्ये होती. बिकट परिस्थितीशी सामना करत त्यांनी आपल्या कलेची साधना व प्रवास वेगवेगळ्या मार्गांनी अविरत चालू ठेवला. ९ जून रोजी त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त जागवलेल्या त्यांच्या आठवणी...

एम. एफ. हुसेन अर्थात मकबूल फिदा हुसेन (१७ सप्टेंबर १९१५ - ९ जून २०११) यांच्या जाण्याने ९६ वर्षांचा काळ ओंजळीतल्या वाळूसारखा निसटून गेला; पण आपल्या कलाकृतीतून आजही ते चित्रकला प्रवाहात अस्तित्वात आहेत.

त्यांची कलाकृती आजही प्रेरणादायी ठरते. हुसेन यांचे नाव आधुनिक भारतीय कलेच्या प्रवाहात अग्रगणी घेतले जाते. त्यांचा जन्म महराष्ट्रातील पंढरपूरमध्ये झाला. लहानपणापासूनच चित्रकलेची आस धरून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी तिची साधना अविरत सुरू ठेवली.

हुसेन जेमतेम एक वर्षाचेही नव्हते तेव्हा त्यांची आई झईनाब यांचे निधन झाले. छोटा मकबूल मातृप्रेमाला पारखा झाला होता. काही कालावधीनंतर त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले व हुसेन कुटुंब इंदूरमध्ये स्थायिक झाले.

हुसेन यांना वडिलांनी इस्लाम धर्माची शिकवण घेण्यासाठी आपल्या सासऱ्यांकडे सिद्धपूर (गुजरात) येथे पाठविले. त्यानंतर त्यांचे शालेय शिक्षण इंदूरमध्ये झाले.  पुढे व्ही. डी. देवळालीकर यांच्या कलाशाळेत हुसेन यांनी काही काळ कलाशिक्षण घेतले.

ते इंदूरमध्ये शिकत असताना अभिजात शैलीतील चित्रे रंगवायला त्यांनी सुरुवात केली होती.  त्या काळी इंदूरमधील होळकर प्रदर्शनात त्यांच्या चित्राला सुवर्णपदक मिळाले होते. १९३४ मध्ये हुसेन मुंबईत आले.

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये द्वितीय वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाले व त्याच सुमारास त्यांचे वडील फिदा हुसेन यांची गिरणीतील नोकरी गेली. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने त्यांनी शिक्षण सोडले व मुंबईत ते चित्रपटांची भव्य भित्तिपत्रके (पोस्टर्स) रंगवू लागले.

त्यादरम्यानच त्यांची ओळख विख्यात ज्येष्ठ चित्रकार  एन. एस. बेंद्रे  यांच्याशी झाली. त्यांचे मौलिक मार्गदर्शन त्यांना लाभले. मोठमोठ्या आकारांतील चित्रे रंगवायचा सराव त्यांना झाला.  तथापि तेवढ्या तुटपुंज्या अर्थार्जनात रोजच्या जगण्याच्या गरजा भागत नसल्यामुळे त्यांनी लाकडी खेळणी तयार करण्याची नोकरी स्वीकारली.

खेळण्याचे अभिकल्प स्वत: तयार करण्याच्या सवयीमुळे पुढे त्यांच्या चित्रशैलीस मदत झाली. भरपूर रंगांचे लाघवी लेपन, उत्स्फूर्तपणा आणि कमीत कमी रेषांमध्ये चित्रण ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्ये होती. बिकट परिस्थितीशी सामना करत आपल्या कलेची साधना व प्रवास वेगवेगळ्या मार्गांनी अविरत चालू ठेवला. अशा तात्त्विकदृष्ट्या संवेदनशील चित्रकाराला परिस्थितीमुळे मागे वळून पाहणे कदापी मान्य नव्हते.

हुसेन एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व व कलाकार होते. गडद रंग व मुक्त तथा दमदार रेषांकन ही त्यांच्या चित्रकारीची वैशिष्ट्ये. ऑईल, जलरंग व ॲक्रिलिकसारख्या माध्यमांचा प्रभावी वापर त्यांनी अप्रतिमरीत्या केला.

सेरीग्राफ व सुलेखन यांचाही उत्कृष्ट वापर त्यांनी केला. त्यांच्या चित्रकृती प्रतिमांकित असतात तसेच त्यांत प्रतीकात्मकताही असते. जलरंगात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या चित्रांत, चित्र रंगविण्यात आणि त्यांच्या जगण्यात एक तीव्र आसक्ती दिसून येते.

व्यक्तिचित्रे, भित्तिचित्रे, टॅपेस्ट्री यांसारखे चित्रप्रकारही त्यांनी सारख्याच सामर्थ्याने हाताळले. त्यांच्या चित्रांद्वारे त्यांनी स्वतःची स्वतंत्र परिभाषा निर्माण केली. हुसेन यांची चित्रे म्हणजे आकार, अवकाश आणि रंग यांच्याशी साधलेला मुक्त संवाद.

त्यांच्या कलाकृतीत आकार व प्रकाशाच्या विविधतेतून निर्माण झालेल्या अनुभूतीतून सृजनात्मक संवेदनांचा आविष्कार पाहायला मिळतो. बघणारा त्या चित्रात हरवून जातो; पण तेवढाच तो सजग-संवेदनशील असावा लागतो, हे तेवढेच खरे.

त्यांची चित्रे पाहताना त्यांचे रंगाशी, आकाराशी व समाजाशी असलेले नाते उलगडत जाते. त्या काळात स्वातंत्र्य चळवळीमुळे देशाप्रती जिव्हाळा आणि प्रेम कमालीचे वाढले होते. त्याच वेळी पश्चिमेकडील आधुनिक कला चळवळींच्या प्रयोगाचा, भारतातील काही तरुण कलाकारांवर प्रभाव पडत होता.

लँगहॅमरने तरुण कलाकार, के. एच. आरा, एस. एच. रझा, एम. एफ. हुसेन, एफ. एन. सौझा, ए. ए. रायबा यांच्या कलाकृतींद्वारे भारतात आधुनिक कला चळवळ उदयास आणली. १९४८ च्या सुरुवातीच्या काळात ‘कलाकार मदत निधी केंद्र’ला सहा दिग्गज कलाकारांसोबत अनोखे वैभव आणि वेगळे सहकार्य लाभले.

ज्यांनी ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप’चा गाभा बनवला, ही स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात क्रांतिकारी संस्था ठरली. ज्यांनी दृश्यकला जगताला वेगळी संवेदनशील व सृजनात्मक दिशा दाखवली. आधुनिक विचारांनी प्रेरित चित्रकार काळाघोडा येथील आर्टिस्ट सेंटरमध्ये एकत्र येऊन विचारविनिमय व संवाद साधायचे आणि तिथेच ‘प्रोग्रेसिव्ह ग्रुप’ची मुहूर्तमेढ रोवली गेली.

भारतीय कला परिदृश्य, त्याची कोणतीही निश्चित राज्यघटना नसली तरीही, त्याचे अध्यक्षपद आणि ते एकत्र ठेवणारा माणूस बंडखोर फ्रान्सिस न्यूटन सोझा होता. या गटाचे आर्टिस्ट सेंटर हे नियमित बैठकीचे ठिकाण बनले होते.

हुसेन यांची चित्रे १९४० च्या सुमारास लोकांसमोर येऊ लागली.  बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात त्यांचे ‘सुनहरा संसार’ हे चित्र झळकले (१९४७). त्याच सुमारास कुंभार हे चित्रही प्रदर्शित झाले. ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवरील त्यांची ही चित्रे विशेष गाजली.

याच साली  फ्रान्सिस न्यूटन सोझा या क्रांतिकारक विचारसरणीच्या चित्रकारासोबत स्थापन करण्यात आलेल्या  ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप’ या प्रागतिक चित्रकार संघात ते सहभागी झाले. या गटाच्या सर्व कलावंतांचा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन आधुनिक होता.

रंगांकडे आणि आकारांकडे पाहण्याची त्यांची पाश्चात्त्य घाटणी व तंत्र हे त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य होते. पुढे सोझा, रझा आणि अकबर पदमसी हे  प्रोग्रेसिव्ह ग्रुपमधील चित्रकार पॅरिसला गेले आणि हा गट संपुष्टात आला;  पण हुसेन यांची कलासाधना अविरत सुरूच राहिली.

त्यांच्या चित्रांचे पहिले स्वतंत्र चित्रप्रदर्शन १९५० मध्ये झुरिचमध्ये भरले. १९५२ मध्ये त्यांना चीनला जाण्याची संधी मिळाली. तेथील प्रसिद्ध चित्रकार ची पै हुंग यांची घोड्यांची चित्रे पाहून त्यांना प्रेरणा मिळाली व त्यांनी घोड्यांची चित्रमालिकाच बनविली. त्यानंतर हुसेन आणि घोडा हे समीकरणच झाले.

हुसेन यांचा जीवनाभिमुख विषयांकडे ओढा असल्यामुळे मानवी आकृतींतून तो अभिव्यक्त होत राहिला. अमूर्त अभिव्यक्तिवादी (ॲबस्ट्रॅक्ट एक्सप्रेशनिझम) पाश्चात्त्य शैलीतून भारतीय परंपरेला अनुसरणारे विषय त्यांनी चितारले.

‘होळी’, ‘बाळाराम स्ट्रीट’, ‘मराठी स्त्रिया’, ‘टोपलीतील मूल’, ‘बाहुलीचं लग्न’, ‘रेड’, ‘ न्यूड’   इत्यादी चित्रांना विशेष कीर्ती लाभली.  ‘लॉर्ड ॲण्ड लेडी रिसीव्ह्ड बाय हिज हायनेस महाराजा होळकर’  या चित्रात इंदूरचा संदर्भ आहे. त्यांनी आतापर्यंत पन्नास हजारांहून अधिक चित्रकृती घडविल्या असून त्यात ‘स्पायडर ॲण्ड द लॅम्प’, ‘इमेजिस ऑफ द ब्रिटिश राज’, ‘मदर तेरेसा’, ‘पोट्रेट ऑफ ॲन अम्ब्रेला’, ‘घाशीराम कोतवाल’  (विजय तेंडुलकरांच्या नाटकावर आधारित) आदी गाजलेल्या चित्रकृतींचा समावेश होतो.

‘रामायण’, ‘महाभारत’  आणि ‘हजयात्रा’  या त्यांच्या चित्रमालिका जगभर गाजल्या. पैकी ‘रामायण’   व ‘महाभारत’  मालिका त्यांनी राम मनोहर लोहियांच्या सूचनेवरून चितारल्या होत्या. त्यांच्या कलाकृतीतून त्यांची सामाजिक बांधिलकी प्रदर्शित तर होतेच;

पण तिच्या निर्मितीतला किंवा सृजनातला आनंद मिळविण्यासाठी प्रत्येक कलाकृतीत त्यांनी समाजाशी असलेले आपले नाते व संवाद साधला आहे. मग ती मदर तेरेसा, महात्मा गाधी यांच्या जीवनाशी निगडित असो अथवा इंदिरा गांधी यांची हत्या असो.

‘श्वेतांबरी’ प्रदर्शनामुळे खळबळ

हुसेन यांनी मद्रास (चेन्नई) येथील कलासंग्रहालयात जाऊन चोल शिल्पे व खजुराहो शिल्पे यांची दोनशे रेखाटने केली (१९५४). तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही त्यांना व्यक्तिचित्रासाठी बैठक (सिटिंग) दिली होती. 

१९८७ मध्ये त्यांनी विख्यात भारतीय भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांना आदरांजली म्हणून  ‘द रामन इफेक्ट’ यावर चित्रमालिका केली. हुसेन यांचे वेगळ्या प्रकारचे काम म्हणून त्याची दखल घेतली गेली.

 जपानच्या वतीने, ‘नेव्हर अगेन’ या हिरोशिमा-नागासाकी शहरांच्या विध्वंसाच्या स्मृत्यर्थ भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावरील सुमारे दहा मीटर कॅन्व्हास हुसेन यांनी रंगविला होता.

हुसेन यांनी १९७१ मध्ये साऊँ पाऊलू (ब्राझील) येथे भरलेल्या द्वैवार्षिक चित्रप्रदर्शनात महाभारतावरील चित्रमालिका मांडली होती. महान स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासो यांनाही तेथे निमंत्रण होते. पुढे १९९२ मध्ये मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये हुसेन यांनी भरविलेल्या  ‘श्वेतांबरी’ प्रदर्शनाने कलाजगतात चांगलीच खळबळ उडवून दिली.

चित्रपटसृष्टीतही योगदान

चित्रपटसृष्टीशीही हुसेन यांचा निकटचा संबंध राहिला आहे.  ‘फिल्म्स डिव्हिजन’करिता त्यांनी  ‘थ्रू द आइज् ऑफ अ पेंटर’ (१९६७) हा लघुपट निर्माण केला होता. त्यासाठी त्यांना बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  ‘गोल्डन बेअर’ हे सर्वोच्च पारितोषिक मिळाले.

त्यांनी काही इंग्रजी कविताही केल्या आहेत. सुफी काव्याचे वाचन करून त्यांनी त्यावर चित्रमालिका तयार केली होती (१९७८). ‘गजगामिनी’ (२०००) आणि ‘मीनाक्षी : अ टेल ऑफ थ्री सिटीज’  या हिंदी चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. अनेक मानाचे पुरस्कार त्यांनी मिळवले.

हुसेन यांच्या एका प्रदर्शनाच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्यांना आपली मातृभूमी सोडावी लागली. त्यानंतर ते दुबईत वास्तव्यास होते. तेथे त्यांनी नंतर ‘रेडलाईट म्युझियम’ची स्थापना केली.

भारतीय नागरिकत्व त्यागून त्यांनी नंतर कतारचे नागरिकत्व स्वीकारले (२०१०). तेथे त्यांनी अरबी आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास अशा दोन महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केले.  आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षांत त्यांनी दोहा, कतार आणि लंडनमध्ये वास्तव्य केले,  मात्र त्याही वेळेस भारतात परतण्याची तीव्र इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती.

मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण १९७२-७७ दरम्यान जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये विद्यार्थी असताना अनेकदा जहांगीर आर्ट गॅलरीत व आर्टिस्ट सेंटरमध्ये हुसेन, आरा, ज्ञानेश्वर नाडकर्णी, प्रभाकर बर्वे, प्रफुल्ला डहाणूकर अशा अनेक दिग्गजांशी संवाद साधण्याचे भाग्य मला लाभले.

हुसेन मात्र मितभाषी होते; पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसायची. पांढरेशुभ्र केस व दाढी, ऐटबाज पेहराव, हातात सदासर्वदा २.५ ते ३ फूट ब्रश, ऐश्वर्य असूनसुद्धा ते सर्वकाळ अनवाणीच वावरले. आजही फाऊंटन येथील जुन्या पंडोल आर्ट गॅलेरीबाहेर मोझॅक माध्यमात केलेला घोडा व त्यांची सही आठवते.

काळाच्या ओघात पंडोल आर्ट गॅलेरी बेलार्ड इस्टेटला स्थलांतरित झाली. काळा घोडा येथील ‘ऑडोर हाऊस’मधील पहिल्या मजल्यावरील आर्टिस्ट सेंटर आता तिथे अस्तित्वात नाही, तर जहांगीर आर्ट गॅलरीतील ‘समोव्हर रेस्टॉरंट’ व समोरचे ‘वे साईड ईन’ तेही बंदच झाले. या जागा म्हणजे समस्त कलाकारांचे भेटण्याचे अड्डे होते, तर त्या काळी आमच्यासारख्या तरुण चित्रकारांना प्रेरणास्थान होते. मुंबईतल्या या भावनिक खुणा काळाच्या ओघात अस्त पावल्या, ही सल कायम राहील.

२०१० मध्ये मी, प्राध्यापक काशिनाथ साळवे, प्राध्यापक वसंत सोनवणी, माझे मित्र प्रशांत शाह व राज शिंगे यांच्याबरोबर दुबईला ‘वर्ल्ड आर्ट फेअर’ला जाण्याचा योग आला होता, तिथे ‘सॅफ्रॉन आर्ट गॅलरी’च्या दालनात हुसेन यांना रुबाबदार काळ्या वेशात एका खुर्चीवर शांत बसलेले पाहिले.

त्यांना पाहून आम्ही सगळेच भावूक झालो व त्यांच्या जवळ जाऊन विचारले, ‘सर आप कैसे हो?’ त्यावर त्यांनी उत्तर दिले ‘ठीकही हू.’ एवढाच काय तो संवाद. पाचएक मिनिटे शांततेत गेली; पण त्याच पाच मिनिटांत अदृश्य अबोल संवाद त्यांच्याशी झाला. त्या वेळेस त्यांच्या डोळ्यात दिसलेली आपल्या मायभूमीबद्दलची आर्त अनामिक ओढ दिसली. आम्ही सर्वच सद्‍गदीत झालो व तिथून भावूक होऊन निघालो. हीच काय ती त्यांच्याबरोबरची शेवटची भेट.

प्रयोगशील व्यक्तिमत्त्व

संवेदनशील कलावंत असलेल्या मकबूल फिदा हुसेन यांचे सतत प्रयोगशील असणे, हीच त्यांची खरी ताकद होती. भटकंती हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यामुळे ते सतत फिरतीवर व काम करत असायचे. त्यांच्या प्रत्येक चित्रात एक आश्चर्यचकित करणारा दृश्य-परिणाम आहे. तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग होता.

त्यांचा उल्लेख भारताचा पिकासो म्हणूनही केला जातो. विषयात पूर्णपणे शिरून व्यक्त होत राहणे, आयुष्यात ध्येयाप्रती झोकून देणे, यश-अपयश पदरात काय पडेल याकडे लक्ष न देता, निर्भयपणे वाटचाल करीत राहणे हा त्यांचा स्वभावधर्म होता.

मकबूल फिदा हुसेन यांनी ९७ वर्षांचे दीर्घ आयुष्य उपभोगले. काही राजकीय दबावामुळे त्यांना स्वत:चा देश सोडावा लागला. त्या वेदनेतून ते म्हणाले, ‘नागरिकत्व आणि पासपोर्ट हे केवळ कागदाचे तुकडे आहेत. ते महत्त्वाचे नाहीत.’

हुसेन भावनिकदृष्ट्या भारताशी कायमचे अंतर्मनाने जोडले गेलेले होते आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत भारतात स्थायिक नसतानाही कलानिर्मितीचा आनंद घेत राहिले. स्वतंत्र भारताचे प्रतीक असलेल्या या अद्‍भुत आणि सर्जनशील कलाकाराने मातृभूमीपासून दूर देशी लंडन शहरात अखेरचा श्वास घेतला. अशा पद्मविभूषण चित्रकाराला त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त समस्त चित्रकारांतर्फे आदरांजली!

arvindhate@yahoo.com (लेखक प्रसिद्ध चित्रकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com