- विवेक पंडित, pvivek2308@gmail.com
माझी मुंज झाल्यानंतर मला जानवं घालून पूजा करण्याचा अधिकार मिळाला. म्हणजे अधिकृतपणे ब्राह्मण झाल्याचं ते पहिलं वर्ष माझं फार हौसेत गेलं. त्या वेळेस मला जानव्याचा कोण अभिमान वाटे. मी सायकलवर टांग मारून पूजेच्या अपॉइंटमेंट्स पूर्ण करीत फिरत असे.
माझ्या वडिलांच्या जिथे दहा-पंधरा पूजा व्हायच्या, तिथे माझ्या वीस-पंचवीसएक पूजा होऊन जात. कारण, ज्यांच्याकडे पूजेची तयारी नसे त्यांना मी परखड बजावत असे, ‘पूजेची तयारी असेल तर ठीक, नाहीतर मी थांबणार नाही...’ मी अनेक भटजी पाहिलेत, की जे मंगलाष्टक म्हणून बिनदिक्कत रामरक्षा म्हणत...
माझी मुंज व्हायच्या आधीपासूनच वरोरला असताना जेव्हा आप्पा पौरोहित्य करायला जात, तेव्हा मी त्यांच्याबरोबर क्वचितच जात असे. मात्र; मी भिक्षा मागायला त्यांच्यासोबत जात असे. आम्ही जेव्हा मालाडला आलो, तेव्हा मी भाईंसोबत पौरोहित्य करायला जायला लागलो. तेही मला आवडीने घेऊन जायचे. खासकरून सत्यनारायणाची पूजा, लग्न, गणपती पूजन, गणेश चतुर्थीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा, गणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायणाच्या पूजा, गणपतीची उत्तर पूजा इत्यादी काही महत्त्वाच्या विधींना लागणारे किमान मंत्र माझे आपोआप पाठ झालेले होते.
भूमीचे पूजन, कलश पूजन, नद्यांचे पूजन, दिव्याचे पूजन, आसनाचे पूजन, घंटेचे पूजन अशासाठीचे जे काही मंत्र होते, ते माझे मुखोद्गत झाले. त्याशिवाय पूजेला एक संकल्प ठरलेला असतो, त्यामध्ये फक्त यजमानाचे नाव, तिथी आणि विधी कशाचा आहे याच्या मोकळ्या जागा तेवढ्या भरायच्या असतात तेही माझे तोंडपाठ झाले होते.
कुठलाही विधी असला तरी गणेश पूजन असतंच, त्यामुळे गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष यांच्या पाठांतराचा मला उपयोग होई. सत्यनारायणाच्या पूजेला भर पडत असे, सत्यनारायणाच्या पोथीची... शिवाय विष्णुसहस्र नामावलीची. या काही पाठ करण्याच्या गोष्टी नव्हत्या, त्या फक्त वाचायच्या होत्या.
भाई, खूप गंभीरपणे विधींचे हे सर्व सोपस्कार प्रत्येक ठिकाणी करत असत. मी सुरुवातीला वटपौर्णिमेदिवशी वडाच्या बाजूला पाटावर बसत असे. वडाभोवती फेऱ्या घालायला येणाऱ्या ज्या महिला माझ्या कपाळावर गंध लावून माझ्या पायाला हात लावून नमस्कार करून माझ्या हातावर दक्षिणा ठेवत, त्या प्रत्येकीला मी ‘अष्टपुत्र सौभाग्यवती भव’ असा जोरदार आशीर्वाद देई.
त्या महिलासुद्धा ‘छोटा भटजी’ म्हणून माझं कौतुक अन् चेष्टा दोन्हीही करीत. वटपौर्णिमेच्या दिवशी मी दोन-तीन पिशव्या शिधा भरून घरी यायचो. त्यात जास्त करून फणस, फणसाचे गरे, जांभळं, आंबे अशी बरीच फळं मिळत आणि भरपूर चिल्लरही जमा होई.
हे काम करत असताना सत्यनारायणाच्या पूजा करायला मला स्वतंत्रपणे बोलावणं यायला लागलं. लोक येऊन भाईंना सांगायचे, की ‘गुरुजी तुम्ही नका येऊ... छोट्या भटजीला पाठवा.’ मग भाई म्हणायचे, ‘ठीक आहे. मलाही कामं आहेत, तुम्ही त्याला घेऊन जा...’ लोकांना मी अशासाठी आवडायचो, कारण माझी दक्षिणा कमी असायची. माझे वडील जर सत्यनारायणाच्या पूजेला अकरा रुपये घ्यायचे, तर मला पाच रुपयांत चालायचं... पण मी पूजा वडिलांसारखीच करायचो. लोकांना मी पूजाविधी, मंत्रांचा अर्थ समजावून सांगायचो.
हे समजावून सांगायचो की, हा विधी असा आपण का करतो? विशेष संकल्प का असतो? तसेच ‘महागणाधिपतये नमः इष्ट देवताभ्यो नमः ग्राम देवताभ्यो नमः’ अशा सर्व देवतांचं आपण आवाहन का करतो? हे लोकांना समजावून सांगायचं. मी संस्कृत मंत्रही म्हणायचो आणि मराठीतही समजवायचो. लोकांना ते खूप आवडायचं.
सत्यनारायणाची पूजा असेल, तर बहुतेक ठिकाणी ब्राम्हणालाच प्रसाद करायला लागे. तेव्हा माझ्या वडिलांनी प्रसादाची एक पद्धत स्वतःच शोधून काढली होती. कारण, त्याआधी मी तसा प्रसाद कुठेच खाल्ला नव्हता. त्यातलं रवा भाजणं, त्यानंतर प्रसाद घाटणं हे काम मात्र मला काही केल्या जमत नसे, पण मी ते सगळं बघत असे.
मी जेव्हा स्वतंत्रपणे पूजा करायला लागलो, तेव्हा मी पूजेआधीच लोकांना सांगून मोकळा व्हायचो की, ‘मी येईन, पण प्रसाद बनवताना मी रवा भाजणार नाही, प्रसाद घाटणार नाही. मी तुम्हाला सांगेन, तसं तुम्ही करायचं. तरच मी येतो, नाहीतर मी नाही येणार..’ कारण, तेव्हा मी सहावी-सातवीत असेन, तेवढं क्लिष्ट काम मला जमायचं नाही. तरी लोक मला हौसेने बोलवत. कारण, एक तर भटजी स्वस्तात मिळायचा, शिवाय इतर भटजींसारखे बाकी अवाजवी सोपस्कारही नसत.
बहुतेक ठिकाणी मी असं बघायचो की, लोक प्रसादात केळीनंतर वरून टाकत आणि मग दुसऱ्या दिवशी त्या प्रसादाला तार येई अन् प्रसाद खराब होई. माझे वडील मात्र केळी पहिल्यांदा तुपात चांगली परतत असत. मग त्यात भिजवलेले काजू-बदाम, मनुका टाकत. भिजवलेल्या मनुका तुपात टाकला की त्या टर्रर्र फुगून येत आणि नंतर विरघळून जात. काजू, बदाम, केळंही नंतर प्रसादात वेगळं दिसत नसे, एकजीव होई.
रवा भाजल्यावर हळूहळू त्यात दूध घालून तो फुलला की, मग घाटत घाटत साखर परतत राहायची. असा विशिष्ट पद्धतीने प्रसाद केला की, त्याचा खरपूस घमघमाट संपूर्ण घरभर अन् शेजारीपाजारीही सुटत असे. बालपणाच्या काही गंधांची स्मृती आपल्या मेंदूत इतकी घट्ट बसलेली असते की, नंतर आपण आयुष्यभर त्या गंधाच्या जवळ जाणारे गंध आपल्या नकळत धुंडाळत राहतो, इतके ते गंध आपल्यात रुतून बसलेले असतात.
वडिलांनी बनवलेल्या सत्यनारायणाच्या प्रसादाचा वास असाच माझ्यात घट्ट रुतून बसलाय. त्यामुळे रवा भाजणे आणि प्रसाद घाटणे हे वगळता प्रसाद बनवणं हा एक मोठा उपक्रम सत्यनारायणाच्या पूजेत मी आनंदाने करीत असे.
सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळेत एक हजार विष्णूची नावं असतात, ज्याला ‘विष्णुसहस्रनाम’ म्हणतात. सत्यनारायणाच्या पूजेत तो महत्त्वाचा विधी असतो. यजमानांना हजार तुळशीपत्रं आणायला सांगितली जातात आणि त्यांनी विष्णूच्या प्रत्येक नामानिशी एक एक तुळशीपत्र बाळकृष्णाला वाहायचं असतं. लांबट-उभ्या आकाराची पोथी असते. तिचं एकेक पान उलटत विष्णूची हजार नावं घ्यायची. पूजेला बसलेल्या त्या यजमानांनी नावागणिक एकेक तुळशीचं पान लंगड्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर वाहायचं, असा तो विधी...
मी मनापासून प्रत्येक नाव यजमानांना ऐकू जाईल इतक्या अस्खलित व स्पष्ट शब्दांत वाचत असे. कितीही वेळ लागला तरीही मी प्रत्येक नाम सावकाश व स्पष्टच वाचत असे. माझ्या बऱ्याचदा असं लक्षात आलं, की मी वाचतोय, घसाफोड करतोय; पण पूजेला बसलेल्याचं त्याकडे लक्षच नाही. मग मला सांगायला लागायचं, ‘अहो यजमान, लक्ष द्या... मी बोलतोय.
हे तुळशीपत्र वाहा...’ मात्र त्यांचं सगळं लक्ष, ‘तो पाहुणा आला, त्याला चहा दे, याला हे दे..’ याकडेच असायचं. सांगून सांगून थकल्यानंतर मी असा विचार केला की, मी तरी हजार नावं कशाला वाचू? मग मी चार-पाच पानं पलटायला लागलो आणि मग हजार नावांच्या जागी शंभर-दोनशे नावंच घेऊन, यजमानांना तुळशीपत्र वाहायला सांगायला लागलो. असंच सत्यनारायणाच्या पोथीच्या वेळेलाही व्हायचं. लोकांचं लक्षच नसायचं.
मग मलाही जीव ओतून विधी करायला कंटाळा येई; पण भाईंचं तसं नसे. माझी ही चतुराई जर भाईंच्या लक्षात आली असती, तर भाई मला नक्कीच रागावले असते. त्या वेळी पूजा करताना माझ्या लक्षात असं आलं की, आपल्याकडे लोकांना बोलावण्यासाठी, त्यांची ऊठबस करायला पूजेच्या सोहळ्याचं निमित्त असावं, त्याच्यामागे भक्तीची भावना मला अभावाने दिसायला लागली.
माझी मुंज झाल्यानंतर मला जानवं घालून पूजा करण्याचा अधिकार मिळाला. म्हणजे अधिकृतपणे ब्राम्हण झाल्याचं ते पहिलं वर्ष माझं फार हौसेत गेलं. मी एक साठ रुपयांची जुनी सायकल घेऊन तिला काळा रंग वगैरे देऊन ती खास पौरोहित्याच्या कामाकरिता तयार केली होती. त्या वेळेस मी लाल सोवळं नेसायचो आणि बाकी उघडाबंब. त्यामुळे गळ्यात जानवं अधिक उठून दिसे.
त्यावेळेस मला जानव्याचा कोण अभिमान वाटे. मी सायकलवर टांग मारून पूजेच्या अपॉइंटमेंट्स पूर्ण करीत फिरत असे. माझ्या वडिलांच्या जिथे दहा-पंधरा पूजा व्हायच्या, तिथे माझ्या वीस-पंचवीसएक पूजा होऊन जात. कारण, ज्यांच्याकडे पूजेची तयारी नसे त्यांना मी परखड बजावत असे, ‘पूजेची तयारी असेल तर ठीक आहे, नाहीतर मी थांबणार नाही. कारण, गणेश चतुर्थीचा एकच दिवस आहे.
माझ्याकडे वेळ नसणार. सगळी तयारी करून ठेवायची.’ मग तिथे गेल्यावर जर पाहिलं की यजमानांची तयारी नाही आणि ते म्हणाले, ‘पाच मिनिटं थांबा...’ तर मी सांगायचो, ‘तुम्ही तयारी करून ठेवा, `मी दुसऱ्यांकडे जाऊन मग नंतर येईन. आता तुमचा नंबर गेला.’ असं करून मी वीस-पंचवीस गणपतीच्या पूजा त्या सोवळ्यावर करीत असे; पण स्पष्ट मंत्रोच्चार अन् संपूर्ण विधीसह.
त्यामुळे लोकांचं पूर्ण समाधान होत असे. मी त्यांना सांगत असे, ‘एक आरती घेणार आणि मंत्रपुष्पांजली घेणार.`दुसरी आरती घेणार नाही. नंतर तुम्ही बाकीच्या आरत्या घेत बसा... प्राणप्रतिष्ठेच्या वेळी फक्त एकच आरती... ‘सुखकर्ता दुःखहर्ता...’ पुढच्या आरत्या म्हणायच्या नाहीत अन्यथा मी निघून जाईन.’ कारण, त्या बाकीच्या आरत्या मी घेत बसलो असतो, तर पुढच्या पूजा मला करता आल्या नसत्या.
असंच मग दीड दिवसाचे गणपती, पाच-सात-दहा दिवसांचे गणपती, माझ्या पूजाविधी चालूच राहायच्या... पण पहिल्या दिवशी मात्र खूप हौसेने सकाळपासून रात्रीपर्यंत जितक्या म्हणून गणपतीच्या पूजा करता येतील, तेवढ्या मी सायकलवर रपेट मारून करीत असे.
वडील चालत ये-जा करणार असल्याने त्यांना मर्यादा होत्या. वडील एखाद्याकडे गेले आणि त्यांनी पुढील आरत्या केल्याच, तर ते थांबत. म्हणत, ‘ठीक आहे करा...’ पण मी थांबत नव्हतो. माझी गाडी सुपरफास्ट असे. त्यामुळे मी वडिलांच्या दुप्पट पूजा करीत असे, पण मी हे करायला लागल्यापासून घराला एक प्रकारे हातभार लावायला लागलो होतो. म्हणजे भाईंवरील आर्थिक भार हा मी बऱ्यापैकी कमी करायला लागलो होतो.
हे पौरोहित्याचं काम करीत असताना विशेषतः माझा मोठा मामा हा भाईंदर परिसर म्हणजे घोडदेव, खारीगाव, नवघर ही जी भाईंदरमधील गावं होती, त्या गावांमध्ये पूजा करायला जाई आणि त्यासाठी त्याला कुणाची तरी मदत लागे. माझ्या मोठ्या मामाच्या उच्चारापेक्षा माझे उच्चार फार स्पष्ट असायचे, त्यामुळे एखाद्या ठिकाणी एकदा मी गेल्यानंतर लोकांची माझ्याकरिताच मामाकडे मागणी असायची, ‘त्या बारक्या भटजीला घेऊन या...’ त्यामुळे माझा मामा मला आवर्जून घेऊन जाई.
त्या परिसरात अशी पद्धत होती, की श्राद्ध, दिवसकार्याला ब्राम्हणाने यजमानांच्याच घरी जेवायचं, त्यामुळे लोकांचा आग्रह असायचा, की तुम्ही आमच्याकडेच जेवलं पाहिजे. मात्र; लोकांनी केलेलं जेवण ब्राम्हणाने नाही जेवायचं, ब्राम्हण स्वतः स्वयंपाक करीत असत. त्या काळात जास्त करून स्टोव्हच होते. सगळी भांडी, ताट-वाट्या, पाणी, शिधा जे जे आम्ही सांगू ते सामान यजमान आणून देत. मग आम्ही तिथेच स्वयंपाक करीत असू.
भात-वरण, भाजी एवढंच मुख्यतः... माझ्या वडिलांसोबत मी ब्राम्हण भोजनाला गेल्याचं मला आठवत नाही; पण मामाबरोबर मी भाईंदर परिसरात अनेकदा गेलो आणि तेव्हाच स्वयंपाक करायला शिकलो. बेसिक पाककृतींना जिन्नस आलटून-पालटून तेच लागत. फक्त बनवण्याच्या पद्धती थोड्याफार भिन्न असतात, हे पाककलेचं मर्म मी लहानपणीच आपसूक अवगत केलं...
तेव्हा मामासोबत मी मोठ्या प्रमाणावर लग्नं लावलीत. निरनिराळ्या ठिकाणचे विवाहाचे विधी निरनिराळे असत. मला आठवतंय, भाईंदरमध्येच एका ठिकाणी यजमानांनी विवाह झाल्यानंतर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधायचं असतं, तर ते मंगळसूत्र बांधायला माझ्या मामालाच सांगितलं... यजमान म्हणाले, ‘भटजी,`मंगळसूत्र तुम्ही बांधा...’ त्यावर मामा स्पष्ट म्हणाला, ‘अहो,`असं नसतं.
हे मंगळसूत्र नवऱ्यानेच बांधायचं असतं. भटजी कसा बांधणार?’ ‘नाही... नाही... आमच्यात भटजीच बांधतो..’ यजमानांनी आग्रह धरल्यावर उसळून मामा त्यांना म्हणाला, ‘तुमच्यात भटजी बांधत असेल, पण मंगळसूत्र नवऱ्यानेच बांधायचं असतं. मंगळसूत्र भटजी बांधत नाही. तुम्ही बांधणार नसाल तरीही मी नाही बांधणार. पाहिजे तर दुसरा भटजी बोलवा, पण मी मुळीच बांधणार नाही...’ असं तेव्हा मामाने त्यांना निक्षून सांगितल्याचं मला आठवतंय.
विवाहातील सर्वात महत्त्वाचा विधी... सप्तपदी. सप्तपदीच्या वेळेला माझ्या असं लक्षात आलं, की सप्तपदीची महत्त्वाची सात पावलं आणि त्या सात पावलांवर घेतल्या जाणाऱ्या सात प्रतिज्ञा, पण त्यात कोणाचंही लक्ष नसे.
खरं म्हणजे ‘सप्तपदी’ हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा विधी. सप्तपदी झाली, तरच विवाह झाला म्हणायचं अन्यथा नाही, पण आपल्याकडे विवाह म्हणजे केवळ अंतरपाट धरणं आणि मंगलाष्टकं, असा समज दृढ झालेला आहे.
सप्तपदी हा करार आहे, जो सात पावलं चालताना म्हणत अग्नीभोवती फिरायचं असतं, पण या विधीकडे लोकांचं लक्षच नसे. त्या वेळेस भटजी सप्तपदी समजावूनसुद्धा सांगत नसत. मी मात्र सप्तपदी समजावून सांगत असे, कारण, माझे वडील सप्तपदीचा अर्थ समजावून सांगत. त्यामुळे मलाही आपसूकच ती सवय लागली होती.
मंगलाष्टकं माझी तोंडपाठ असत... शाळेत आम्हाला शिकवलेलं होतं, की मंगलाष्टक म्हणजे शार्दूलविक्रीडित वृत्त... जे सर्वात मोठं, विशाल वृत्त असतं, ज्यात एकोणीस अक्षरं असतात. याच शार्दूलविक्रीडित वृत्तामध्येच मंगलाष्टकं रचलेली असतात. नाईक बाईंनी मजेशीर पद्धतीने हे वृत्त आम्हाला शिकवलं होतं, ‘शार्दूलविक्रीडित म्हणजे काय?’ तर गंमत म्हणून नाईक बाई मंगलाष्टकांच्या चालीत आमच्याकडून म्हणून घेत.
‘आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक’ किंवा ‘रामो राजमणि: सदा विजयते...’ मी अनेक भटजी पाहिलेत की, जे मंगलाष्टक म्हणून बिनदिक्कत रामरक्षा म्हणत. खरं तर रामरक्षेचा आणि विवाहाचा काडीमात्र संबंध नाही, पण रामरक्षा शार्दूलविक्रीडित वृत्तात असल्यामुळे ती विवाह विधीत मंगलाष्टकांऐवजी खपून जायची, पण माझी मात्र चांगल्या मराठी आणि संस्कृतमधील मंगलाष्टकं पाठ होती. आवाजही दणक्यात होता. उच्चारही अस्खलित स्पष्ट होते.
त्यामुळे दुसरं कुणी मंगलाष्टकं म्हणायच्या आधीच म्हणायची माझी स्पर्धा लागे. माझ्यापुढे मी कुणालाही मंगलाष्टकं घेऊ देत नसे. ‘शुभमंगल सावधान...’ पूर्ण व्हायच्या आधीच माझी दुसरी मंगलाष्टक सुरू होई. मग लोक येऊन हात जोडून मला विनवणी करीत, ‘आम्हालाही एक मंगलाष्टक म्हणू द्या.’ मग अशा विनवणीअंती, ‘ठीक आहे.
तुम्हालाही एक संधी देतो...’ अशा अविर्भावात मी त्यांना म्हणू द्यायचो... मला मजा वाटे, की मी कोणालाही मंगलाष्टक म्हणायलाच देत नाही. अशा रीतीने विवाहासाठी पौरोहित्य करणं माझ्यासाठी आनंददायी होतं... शिवाय ते कुटुंबाच्या उत्पन्नाचं महत्त्वाचं साधनही झालेलं होतं.
मी मनापासून प्रत्येक नाव यजमानांना ऐकू जाईल इतक्या अस्खलित व स्पष्ट शब्दांत वाचत असे. कितीही वेळ लागला तरीही मी प्रत्येक नाम सावकाश व स्पष्टच वाचत असे. माझ्या बऱ्याचदा असं लक्षात आलं, की मी वाचतोय, घसाफोड करतोय; पण पूजेला बसलेल्याचं त्याकडे लक्षच नाही.
मग मला सांगायला लागायचं, ‘अहो यजमान, लक्ष द्या... मी बोलतोय. हे तुळशीपत्र वाहा...’ मात्र त्यांचं सगळं लक्ष, ‘तो पाहुणा आला, त्याला चहा दे, याला हे दे..’ याकडेच असायचं. सांगून सांगून थकल्यानंतर मी असा विचार केला की, मी तरी हजार नावं कशाला वाचू? मग मी चार-पाच पानं पलटायला लागलो...
(क्रमशः)
(लेखक सामाजिक कार्यकर्ते आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.