कृष्णाला तुम्हाला भुलवू देऊ नका!

कृष्ण पूर्ण योगी आहेत. ते सर्वाधिक आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. कृष्णाचा अर्थ आहे, जो पूर्णपणे आकर्षित करतो, चैतन्य निर्माण करतो.
कृष्णाला तुम्हाला भुलवू देऊ नका!
कृष्णाला तुम्हाला भुलवू देऊ नका!sakal
Updated on

संसारी, भौतिक आयुष्य जगत असतानाच त्यापलीकडे जाऊन अाध्यात्मिक बैठकही साधायची असते, याचे शिक्षण श्रीकृष्णांच्या चरित्रातून मिळते. त्याचे आजच्या (ता. ३० आॅगस्ट) गोकुळअष्टमीनिमित्ताने केलेले स्मरण...

कृष्ण पूर्ण योगी आहेत. ते सर्वाधिक आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. कृष्णाचा अर्थ आहे, जो पूर्णपणे आकर्षित करतो, चैतन्य निर्माण करतो. हे दैवी तत्त्व ऊर्जेने ओतप्रोत व्यापलेले असून, ते सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करत असते. श्रीकृष्ण असे निराकार केंद्र आहे, जे सर्वव्यापी, सर्वठायी आहे. कोणत्याही वस्तू कोठेही उत्पन्न झाल्या तरी त्या अखेरीस श्रीकृष्णांपाशीच पोहोचतात. कोणत्याही वस्तूचे आकर्षण कृष्णापासूनच निर्मित आहे. बहुधा लोक त्या आकर्षणामागचा चैतन्याचा झरा ओळखत नाहीत आणि फक्त बाह्य स्थितीला, दृश्‍यस्वरूपाला धरून ठेवतात. ज्या क्षणी तुम्ही बाह्य स्वरूपाला धरायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला कळून येतं की, कृष्णाने तुम्हाला भुलवलं आहे. बाह्यरूप तुमच्या हातात ठेवून तुम्ही गुंतला आहात आणि डोळ्यांत अश्रू तरळत आहेत.

विरोधाभासी तत्त्वांना आत्मसात करा

जन्माष्टमी हे ज्ञात आणि अज्ञात वास्तविक अंशाच्या पूर्ण संतुलनाचे प्रतीक आहे. दृश्‍यमान भौतिक विश्व आणि अदृश्य अाध्यात्मिक क्षेत्र. कृष्णाचा जन्म अष्टमीला झाला, हे दोन्ही, अध्यात्म आणि भौतिक विश्व यांचा मध्यबिंदू आहे. एका बाजूला ते योगेश्वर आहेत, (योगाचे ईश्वर -ती स्थिती ज्याची प्रत्येक योगी अभिलाषा करत असतो). ते कोणत्याही संतापेक्षा पवित्र आहेत, तरीही सर्वांत जास्त खोडसाळही आहेत. त्यांचं वर्तन दोन वेगवेगळ्या विरोधाभासी वस्तूंचे पूर्णपणे संतुलन आहे. म्हणूनच श्रीकृष्णांचे चरित्र समजण्यास कोणापेक्षाही जास्त अवघड आहे. एक तो जो आतून त्यागी आहे आणि बाह्य स्वरूपात संसारात पूर्णपणे रमलेला आहे. एक राजनीतिज्ञ, एक राजा ज्याने आध्यात्मिक क्षेत्र आत्मसात केले आहे. कृष्ण द्वारकाधीश आणि योगेश्वर दोन्हीही आहेत.

कृष्ण आजच्याही काळाशी सुसंगत असे विचार देतात, जे आपल्याला संसारी आयुष्यात पूर्णपणे गुरफटून देत नाहीत. जर कोणी थकला, भागलेला आहे, ताणतणावाने त्रासलेला आहे, जो भौतिक जगतात पूर्णपणे व्यापून गेलेला आहे, त्याच्यात जीवनशक्ती, नवी उर्मी भरून त्याला पुन्हा सक्रिय, गतिमान करतो. नवी ऊर्जा, चैतन्य निर्माण करतात. कृष्ण तुम्हाला त्याग आणि कौशल्य दोन्हीही गोष्टी शिकवतात. गोकुळाष्टमीचा उत्सव पूर्णपणे परस्परविरोधी आणि तरीही परस्पर पूरक गोष्टी आत्मसात करण्याचा आणि त्याला आपल्या जीवनाचा भाग बनवण्याचा आहे.

म्हणून जन्माष्टमीचा उत्सव करणे म्हणजे जीवनात एक बरोबर दोन भूमिका वठवणे आहे. पहिली भूमिका ही की, गृहस्थी म्हणून असलेली आपली जबाबदारी सुखरूपपणे पार पाडणे आणि दुसरी बाब म्हणजे सर्व घटनांपलीकडे जाऊन अलिप्ततेचे, तिऱ्हाइतासारखे जीवन जगणे, म्हणजे आपण अलिप्त ब्रह्म आहोत, अशी अनुभूती घेणे. आपल्या जीवनात काही प्रमाणात अवधूत अवस्था निर्माण करणे, त्याचवेळी क्रियाशीलताही निर्माण करणे, या दोन्हीही गुणांचा समुच्चय हा खरे तर जन्माष्टमी साजरी करण्यामागील हेतू आहे.

राधेप्रमाणे चतुर बना

मन नेहमी सौंदर्य, प्रसन्नता आणि सत्याकडे आकर्षित होत असतं. कृष्ण अर्जुनाला सांगतात की, मी सौंदर्यवंतातील सौंदर्य आहे, शक्तिशाली लोकातील शक्ती आहे आणि बुद्धिमान लोकातील बुद्धी आहे. या प्रकारे ते मनाला आपल्यापासून दूर जाण्यापासून अडवून ठेवतात. राधेप्रमाणे चतुर बना, जी कृष्णांच्या कोणत्याही युक्तीला बधली नाही आणि कृष्ण राधेपासून स्वतःला वाचवू शकले नाहीत. तिचे संपूर्ण विश्व श्रीकृष्णांनी भरून गेले. जर तुम्ही हे पाहू शकला की, जिथे ही आकर्षणे आहेत तिथे श्रीकृष्ण आहे, तेव्हा तुम्ही राधा होता आणि तुम्ही केंद्रात स्थिर होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.