दिवस बदलले की..

हार्दिक पंड्या हा एक अजब रसायन असलेला खेळाडू आहे. गुणवत्ता कमालीची.
Hardik Pandya
Hardik Pandya ESAKAL
Updated on

कितीही कठीण परिस्थिती आली तरी खचून न जाता प्रयत्न करत रहायचं, काळ हा सर्वांवर उतारा असतो... हे बौद्धिक अनेकदा आपल्या कानांवर पडत असतं. एवढंच कशाला, प्रत्येकाला कमी-अधिक प्रमाणात या परिस्थितीचा सामना करावा लागत असतो. सूर्योदय, सूर्यास्ताप्रमाणे आपला दैनंदिन वस्तुपाठ वर्तुळाप्रमाणे होत असतो; पण ज्या ठिकाणी पूर्णविराम मिळाल्यासारखं जाणवतं आणि तिथेच नवा आशेचा किरण सुरू होतो, तो आनंद परमोच्च असतो... हार्दिक पंड्या सध्या याच आनंदाच्या लाटेवर स्वार आहे....

‘कॉफी विथ करन’ या कार्यक्रमात महिलांबाबत केलेलं आक्षेपार्ह विधान त्याला भोवलं. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात असताना त्या कार्यक्रमाचा एपिसोड प्रसिद्ध झाला आणि वादळ उठलं. क्रिकेट चाहत्यांच्या नजरेतून हार्दिक पंड्या आणि केएल राहुल एकदम पडले होते (हार्दिकने वादग्रस्त विधान केलं आणि राहुलने स्मितहास्य करत मूक पाठिंबा दर्शवला होता). हार्दिक आणि राहुल यांना ‘बीसीसीआय’नं निलंबित केलं, त्यामुळे दौऱ्यावरून मध्येच परतावं लागलं. ऑस्ट्रेलियातील त्या मालिकेनंतर भारतीय संघ जोडूनच न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार होता, त्यासाठी हार्दिक आणि राहुल यांच्याऐवजी बदली खेळाडू निवडण्यात आले होते. २०१९ म्हणजे कोरोनापूर्वीचा तो क्षण. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा खेळत आहे, त्यानंतर लगेचच न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे आणि या दौऱ्यात हार्दिक पंड्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी देशाचं नेतृत्व करणार आहे... जिथं निलंबनाच्या गवऱ्या वेचण्याची वेळ आली होती, तिथं कर्णधारपदाची फुलं हार्दिकच्या गळ्यात पडली, यालाच म्हणतात कालाय तस्मै नमः

हार्दिक पंड्या हा एक अजब रसायन असलेला खेळाडू आहे. गुणवत्ता कमालीची. मुळात ही गुणवत्ता नैसर्गिक असल्यामुळे सामना एकहाती जिंकण्याची क्षमता; परंतु स्वभावही बिनधास्त, त्यामुळे कधी कसा वागेल याचा नेम नाही. ‘कॉफी विथ करन’ या कार्यक्रमात महिलांबाबत विधान करताना आपण काय बोलतोय याचं भान त्याला नसावं याचं आश्चर्य वाटतं. काही महिन्यांपूर्वी एका सामन्यात तो गोलंदाजी करत होता आणि क्षेत्ररक्षण बदलावरून शिवी दिल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. ती शिवी कर्णधार रोहित शर्माला दिली की अन्य कोणाला, हे स्पष्ट होत नव्हतं. हा स्वभावगुण एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला तंदुरुस्तीची मोठी अडचण. तसं पहायला गेलं तर हार्दिक हा विराटनंतर पुशअप आणि डिप्स मारून तंदुरुस्त असल्याचं जाणवणारा खेळाडू; पण पाठीच्या दुखापतीची पीडा त्याचा पिच्छा सोडत नव्हती. परिणामी संघातलं स्थान सोडावं लागलं. आता तर कसोटी सामन्यासाठी त्याचा विचारही होत नाही. कपिलदेवनंतरचा भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून पाहिलं जायचं; पण पाठदुखीमुळं गोलंदाजी करू शकत नव्हता. हार्दिक पंड्याकडे जर अष्टपैलू म्हणून पाहिलं जात असेल आणि तो गोलंदाजी करत नसेल, तर संघात स्थान कसं मिळवू शकतो, अशी टिप्पणी खुद्द कपिलदेव यांनीही केली होती. हार्दिकला पर्याय म्हणून शार्दूल ठाकूर, दीपक चहर आणि शिवम दुबे, तसंच व्यंकटेश अय्यर असे पर्याय तपासून पाहण्यात आले होते.

उघडलं दैवाचं दार...

आयपीएलमध्ये दोन नवे संघ तयार झाले आणि तिथूनच हार्दिकच्या दैवाचं दार उघडू लागलं. नवा संघ असलेल्या गुजरातला कर्णधार नेमायचा होता. बडोद्याच्या काही मोजक्या सामन्यांचा अपवाद वगळता त्याच्याकडे नेतृत्व करण्याचा अनुभव नव्हता, तरीही गुजरात संघाने त्याला पसंती दिली आणि काय चमत्कार, हार्दिकने गुजरातला पदार्पणात आयपीएल जिंकून दिली. विराट कोहलीने अथक प्रयत्न करूनही बंगळूर संघाला विजेतेपदाचा मुकुट तो मिळवून देऊ शकलेला नाही. आयपीएलमध्ये दहा संघ तयार झाले नसते, तर हार्दिक अजूनही मुंबई इंडियन्स संघात एक खेळाडू म्हणूनच राहिला असता.

मॉनिटर आणि कर्णधार

म्हणतात ना, जबाबदारी आली की मुलं सुधारतात. वर्गामधील वाह्यात आणि खोडकर मुलाकडे मॉनिटरची जबाबदारी दिली, की त्याच्यासह वर्गातील इतर मुलंही सुधारतात, असे अनुभव सांगितले जातात. वर्गातील मॉनिटरपद आणि क्रिकेटमधील संघाचं नेतृत्व या दोन्ही गोष्टी भिन्न असल्या, तरी जबाबदारी दोन्हीकडे कायम असते. आयपीएलमध्ये नेतृत्व करत असताना हार्दिक कमालीचा संयमी झाल्याचं जाणवत होतं. संघ अडचणीत असताना फलंदाजी अतिशय जबाबदारीने करत होताच; पण संघ जिंकला तरी विजयाचा आनंद आणि पराभव झाला तरी तेवढ्याच खिलाडूवृत्तीने स्वीकारण्याची त्याची देहबोली आदर्श असलेल्या महेंद्रसिंह धोनीसारखी होती. हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे.

भविष्यातही पसंती

विराट कोहलीने नेतृत्व सोडलं आहे. रोहित शर्मा आता तिन्ही प्रकारांत नेतृत्व करत असला तरी वर्कलोड पाहता भविष्यात तो ट्वेन्टी-२० प्रकार किती खेळेल हे सांगता येत नाही. निवड समिती बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून वेगवेगळ्या कर्णधारांची रचना तयार करू शकते. आत्ताच्या क्षणी केएल राहुल उपकर्णधार आहे; पण तंदुरुस्ती आणि फॉर्म पाहता त्याच्याकडे सातत्याचा अभाव आहे. रोहित, राहुल यांच्या अनुपस्थितीत हार्दिककडे आता न्यूझीलंड दौऱ्यातील ट्वेन्टी-२० मालिकेसाठी कर्णधारपद देण्यात आलं आहे; परंतु पुढच्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी हार्दिक भारताचा कर्णधार झाल्यास आश्चर्य वाटायला नको. महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली हे अतिशय भिन्न देहबोलीचे कर्णधार. एकाने दोन विश्वकरंडक जिंकून दिले, तर दुसऱ्याच्या नावावर एकही विश्वकरंडक लागला नाही, तरीही त्याने पाडलेला प्रभाव आणि निर्माण केलेला दरारा अफलातून आहे. हार्दिकचा स्वभावगुण कसाही असला तरी, तो त्याच्यातील नेतृत्वगुणाचं अस्तित्व निश्चितच निर्माण करू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.