भीती घालवायला स्मशानात नेली सहल; लीलाताईंची जगावेगळी शाळा

heramb kulkarni writes about lilatai patil and her school
heramb kulkarni writes about lilatai patil and her school
Updated on

स्थळ - स्मशानभूमी कोल्हापूर. जळणारं प्रेत आणि समोर चौथीच्या वर्गातील मुले उभी. ही मुले मेलेल्या व्यक्तीची नातेवाईक नाहीत. ती आहे एका शाळेची मुले. मुलांची भीती इतकी जाते की भांडी घासायला इथली राख घ्यायची का? असं विचारतात. मुलांच्या मनातली भुतांची भीती घालवायला शाळेने थेट स्मशानात सहल काढली होती. शाळेचे नाव सृजन आनंद विद्यालय कोल्हापूर. लीलाताई आज ८८व्या वर्षी पैलतीराकडे डोळे लावून बसललेल्या पण वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत शाळेत येवून शिकवत होत्या. याची तुलना वृद्धपणी मुलांच्या नाटकात काम करणाऱ्या  टागोरांशीच फक्त होऊ शकते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आज उपक्रमशील शाळा ठिकठिकाणी निर्माण होताहेत. पण, बरोबर ३० वर्षापूर्वी शिक्षणातील प्रयोगांची कुठेच चर्चा नसताना लीलाताई पाटील यांनी या प्रयोगशीलतेची मुहुर्तमेढ रोवली. महाराष्ट्रातील या उपक्रमशीलतेच्या ज्या काही पूर्वसूरी आहेत. त्यात प्रमुख एक नाव लीलाताई आहेत. शिक्षण सहसंचालक या पदावरून निवृत्त झाल्यावर पेन्शन आणि पुरस्कारांच्या रकमा घालून १९८६ला कोल्हापूरला सृजन आनंद शाळा सुरू केली. प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य राहावं म्हणून हेतुत: अनुदान घेतलं नाही. सृजनाचा शोध घ्यायचा होता. शिकण्यात आनंदाच्या शक्यता त्यांना शोधायच्या होत्या.
--------
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; प्रशासनाने घेतला 'हा' निर्णय
---------
दिल्लीनंतर जम्मू काश्मीरसह गुजरातही हादरलं; ६.८ तीव्रतेचा भूकंप
----------
दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल
----------
या शाळेत सगळं आगळं वेगळं. शिक्षकांच्या पहिल्या नावाला ताई दादा लावून मुलं हाका मारणारं. मला लीलाताईंचं मोठेपण हे वाटतं की अनेक तज्ञ आजचे अभ्यासक्रम टाकावू, व्यवस्थेला मजबूत करणारे मानतात आणि ही शिक्षणपद्धती फेकून नवी आणली पाहिजे असे मानतात. ती विद्रोही मांडणी आकर्षक असते. पण, ही व्यवस्था बदलेपर्यंत काय करायचं याचं उत्तर ते देत नाहीत. त्याचं उत्तर लीलाताई आहेत. त्यांनी आहे त्याच अभ्यासक्रमात भर घातली. आपल्याला जो सामाजिक आशय मुलांपर्यंत पोहोचवायचाय ना तो त्यांनी पाठांना जोडून शिकवला व मुलांना समाज वास्तवाचा परिचय करून दिला. ‘गोरी गोरी पण फुलासारखी छान’ ही कविता भेदभाव करणारी आहे आणि यामुळे मुले आपल्या घरातल्या काळ्या माणसांविषयी नकारर्थी होतील, अशी लीलाताईंनी त्यावर टीका केली आणि तिथेच न थांबता पर्यायी कविता बनवली ‘हसरी खेळकर असणारी छान दादा मला एक वाहिनी आण” हे लीलाताईंचे वेगळेपण आहे. ‘कमावणे’ या क्रियापदाचा प्रसिद्धी कमावणे, पैसा कमावणे हा अर्थ सगळ्याच शाळा शिकवतात पण, कमावणेचा एक अर्थ ‘कातडे कमावणे’ असा आहे हे सांगायला लीलाताई नाक्यावर चपला शिवणार्याक चर्मकार बंधूला शाळेत सन्मानाने बोलावतात आणि कातडे कमावण्याची प्रक्रिया समाजवून सांगण्याची विनंती करतात. निवारा वर्ष साजरे होताना मुलांना रस्त्यावर बरणी विकणारी माणसे कशी राहतात हे त्यांची वस्ती दाखवायला नेतात.

आज प्रकल्प शाळेत केले जातात. पण ही पद्धती लीलाताई ३० वर्षे अमलात आणताहेत. एकदा मुलांनी वर्तमानपत्र बनविले. आयोडीनयुक्त मिठाची सक्ती केली गेली तेव्हा साधे मीठ त्याचे फायदे दांडी यात्रेपासून तर आयोडीनची कमतरता यावर अभ्यास मुलांनी केला. पाण्याचे महत्व कळावे म्हणून पाणी प्रकल्प केला. त्यात पाणी तयार कसे होते याचे प्रयोगशाळेतील प्रयोग, छतावरील पाण्याचा पुन्हा वापर,गळणार्या  नळांचे एका मिनिटात इतके तर वर्षात किती पाणी वाया जात असेल? असे गणित मुले मांडतात. २७२ कुटुंबाचे सर्वेक्षण करतात. इथेच प्रकल्प थांबत नाही तर नर्मदा घाटीत पाण्यात जी गावे बुडाली त्या गावातील मुलांना शाळेत बोलावून मुले त्यांची वेदना समजाऊन घेतात आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात.पाण्यावरच्या कविता गोळा करतात.

शाळेतील अध्यापनपद्धती ही आज आपण चर्चा करतो त्या ज्ञानरचनावादी पद्धतीची आहे. शिक्षक सतत मुलामधील जिज्ञासा जागी करतात.त्यातून मुले खूप बोलकी झाली आहेत. शाळेत प्रश्न विचारा? असा प्रत्येक विषयात उपक्रम असतो. फळ्यावर झाडाचे चित्र काढले जाते आणि मुले १२५ प्रश्न विचारतात. झाडाचे पान जसे वाळते तसा माणूस वाळत का नाही? असा प्रश्न असतो तर सापाला दूसरा साप चवतो का? सगळ्या म्हशी काळ्या रंगाच्याच का असतात? असे निरुत्तर करणारे प्रश्न मुले गोठा दाखवायला नेल्यावर विचारतात. मराठी भाषा शिकवण्यात या शाळेने जे रचनावादी उप्क्र्म केले ते थक्क करणारे आहेत. या विषयावर ‘लिहिणं वाचणं मुलाचं’ असं त्यांचं छान पुस्तकच आहे. ‘ग’ अक्षरापासून  जास्तीत जास्त शब्द सांगा असले खेळ. लीलाताई पहिला शब्द आणि शेवटचे क्रियापद सांगणार आणि मधले ७ शब्द जोडत वाक्य पूर्ण करायचे. असे बिनखर्चिक आनंद त्यांच्याकडे खूप आहेत. मुलांना रुमाल दिला तर मुले त्याच्या साठ वस्तू बनवून दाखवितात. हे बिनखर्चिक आनंद या शाळेकडून शिकले पाहिजेत.
आज परीक्षा बंद करून आपण आनंददायी मूल्यमापन करतो आहोत. लीलाताईंची शाळा हे सारे ३० वर्षे करते आहे. त्यांचे या विषयावर ‘अर्थपूर्ण आनंद शिक्षणासाठी (उन्मेष प्रकाशन) एक पुस्तकच आहे. भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेत महाराष्ट्रातील काना,वेलांटी,उकार नसणार्याी जिल्हयांची नावे लिहा. तर विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेत पाण्याचे रंगदर्शक, चवदर्शक, तापमानदर्शकशब्द लिहा असे प्रश्न असतात. मराठीत ‘स्म’ ने सुरू होणारे शब्द लिहा. (आपल्याला फक्त स्मशान आठवते पण ही मुले खूप शब्द लिहितात) गणित विषयात दिलेल्या संख्येचे ५ वाक्यात वर्णन करा यासोबत वर्तमानपत्रात जसे शब्दकोडे असते तसे गणिताचे शब्दकोडे बघितले की शिक्षकांच्या प्रतिभेचे कौतुक वाटते. असहकार चळवळ सुरू झाल्याचे वर्ष म्हणजे ती संख्या तिथे लिहायची. एकाचवेळी इतिहास व गणिताचा अभ्यास. वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या प्रश्नपत्रिकेत चिकटवून त्यावर मुलांना व्यक्त व्हायला सांगीतले जाते. ‘एका आश्रमशाळेत लहानग्या मुलीला दिलेला चटका’ ही बातमी प्रश्नपत्रिकेत देवून त्यावर मुलांना विचारलं जातं.

शाळेचे स्नेहसंमेलन असेच वेगळे. महागडी ड्रेपरी गरीब मुले आणू शकत नाही म्हणून शाळेच्या गणवेशातच मुले स्टेजवर असतात आणि गरज असेल तिथे कागदाचे मुखवटे, कपडे केले जातात. रेकॉर्ड डान्सपेक्षा आगळेवेगळे कार्यक्रम असतात. मुले वाढदिवसाला खूप खर्च करतात. गरीब मुले तो करू शकत नाहीत. यातून एकाच दिवशी शाळेतल्या सर्व मुलांचा वाढदिवस साजरा केला जातो. मी पासून आम्ही आणि आपण असा स्वत:चा विस्तार शिकवला जातो. आणि पुन्हा हे सामुदायिक वाढदिवस अंधशाळा, आश्रमशाळा, साखरशाळा अशा मुलांसोबत केले जातात. तिथे सर्व मुलांना औक्षण केले जाते. लीलाताई सांगतात “आत्मकेंद्रितता कमी होऊन सामुदायित्वाच्या स्पर्शाने आपल्यातील माणूसपण उजळते.’

डी. एड. नसलेल्या अनेक गृहिणी आणि शिक्षणात रुची असणार्यांसना लीलाताईंनी शिक्षक बनविले. जून महिन्यात सलग ६ तासांची वार्षिक नियोजनाची मीटिंग होते. दर शुक्रवारी आठवड्याच्या नियोजनाची मीटिंग होते. यात लीलाताई शिक्षक सक्षमीकरण करायच्या. एखादा लेख कविता चित्रपट यावर बोलायच्या. शिक्षकांच्या स्वयंमूल्यमापनाच्या अनेक पद्धती विकसित केल्या. ‘मी आणि पुढील वर्ष’ असे लिहून घेत शिक्षकांना विविध उपक्रम करायला त्या प्रेरित करत. आत्मशोध घेणार्याम प्रश्नावल्या देत. शिक्षकांनी एकमेकांचे गुण दोष सांगत एकमेकांच्या विकासाला मदत करायची असं खूप काही.

राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी आवर्जून लीलाताईंना भेटायला बोलावले. केंद्रीय शिक्षण सचिवांनी त्यांना दिल्लीला बोलावले. १९८६ च्या धोरणाबाबत चर्चा केली .शाळेला आर्थिक मदतीचा हात देवू केला पण नोकरशाहीने तो पर्यटन हाणून कसा पाडला हे लीलाताईंनी ‘प्रवास ध्यासाचा–आनंद सृजनाचा ‘ या पुस्तकात सविस्तर सांगितलाय. ते वाचून कुणालाही क्लेश होतात आणि आपले शिक्षण वेगाने पुढे का जात नाही याची उत्तरे मिळतात. अशा या लीलाताई आज ८८ वर्षाच्या झाल्यात. अनेकदा शिक्षणतज्ञ शिक्षणातल्या प्रश्नांना खूप अमूर्त उत्तरे देतात पण लीलाताई देशातील सर्व प्रश्नांची उत्तरे ही वर्ग खोलीत शोधतात. देशाचे भवितव्य भारताच्या वर्ग खोलीत घडते आहे या वाक्याचा साक्षात्कार लीलाताई च्या शाळेत येतो. लीलाताई या प्रयोगशील शिक्षणातील शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी विजेचा शोध लावला आता पुढे खेड्यापर्यंत वीज नेण्याची जबाबदारी आपली आहे.  प्रयोगशील शिक्षणाची पायवाट निर्माण केली शासनाने त्या पायवाटेचा हाय वे आता करायला हवा. लीलाताई आता शाळेत येत नाही पण सुचेता पडळकर आणि त्यांच्या १६ सहकारी १४८ मुलासह शाळा त्याच लीलाताईंच्या मार्गाने त्याच जोमाने चालवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.