Ayodhya Ram Mandir : ‘भारतीयत्वा’ची प्राणप्रतिष्ठा...!

शेकडो वर्षांच्या प्रखर संघर्षांनंतर २२ जानेवारीला रामलल्ला अयोध्येत हक्काच्या निवासस्थानी - म्हणजे मंदिरात - विराजमान झाले. भारतीय संस्कृतीची अस्मिता यानिमित्तानं जगासमोर आली. परिणामी, या घटनेला वैश्विक संदर्भ प्राप्त झाले.
historical journey of Ayodhya Ram Mandir tracing its roots and significance  Pooja on 22nd January 2024 by PM Modi
historical journey of Ayodhya Ram Mandir tracing its roots and significance Pooja on 22nd January 2024 by PM Modisakal
Updated on

- आशिष तागडे

शेकडो वर्षांच्या प्रखर संघर्षांनंतर २२ जानेवारीला रामलल्ला अयोध्येत हक्काच्या निवासस्थानी - म्हणजे मंदिरात - विराजमान झाले. भारतीय संस्कृतीची अस्मिता यानिमित्तानं जगासमोर आली. परिणामी, या घटनेला वैश्विक संदर्भ प्राप्त झाले.

‘देव से देश’ आणि ‘राम से राष्ट्र’ हे सूत्र सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या काळाची भूमिका मुख्य भाषणात स्पष्ट केली व महत्त्वाचं म्हणजे, हिंदूंबद्दलची भूमिका स्पष्टपणे घेण्यास राजकीय प्रवाहाला भाग पाडलं. राममंदिराचं हे मुख्य यश आहे. हिंदूंच्या सकारात्मक प्रतिसादाची आणि सकारात्मक ऊर्जेची प्रचीती यानिमित्तानं संपूर्ण विश्वानं घेतली.

आज गली गली अवध सजाएंगे

आज पग पग पलक बिछाएंगे

आज सूखे हुए पेड़ फल जाएंगे

नैना भीगे भीगे जाएं

कैसे ख़ुशी ये छुपाएंगे...राम आएंगे

अयोध्येत प्रवेश करत असतानाच हा जयघोष लक्ष वेधून घेत होता. अयोध्या खरोखरच सजली होती आणि वातावरणात प्रचंड उत्स्फूर्तता होती. अयोध्यावासीयांनी केवळ घराभोवतीच मातीच्या पणत्या प्रज्वलित केल्या होत्या असं नव्हे तर, त्यांनी मनामनात रामनामाचे दीप उजळले होते,

याची प्रचीती अयोध्येतल्या गल्ली-मोहल्ल्यातून फिरताना येत होती. धर्मपथ, ‘लता मंगेशकर चौक’ ते हनुमान गढी आणि पुढं मुख्य राममंदिरापर्यंत जाणारा रस्ते उजळून निघाले होते. या भागातल्या घरांना एकसारखे रंग दिले गेले होते आणि दुकानांवरच्या पाट्याही एकसारख्याच होत्या. रामजन्मभूमीच्या जागेचा निकाल लागला आणि अयोध्येनं अक्षरक्षः कात टाकली.

अयोध्येपाठोपाठच प्रभू रामचंद्रांच्या जीवनातल्या सर्व घटनांची साक्षीदार असलेली शरयू नदी त्या दिवशी जणू काही विशेष ममत्त्वानं वाहत होती! राममंदिराच्या निमित्तानं केवळ अयोध्येचा विकास किंवा कायापालट होणार नसून ‘देशाची आध्यात्मिक राजधानी’ अशी ओळख होण्याच्या दिशेनंही या नगरीची वाटचाल सुरू आहे.

स्वभान आणि श्रद्धाजागृती

भारताला सांस्कृतिक परंपरा आहे. ती केवळ काही शेकडो वर्षांची नव्हे तर, हजारो वर्षांची आहे. ही सांस्कृतिक परंपरा अनुकरणीय आणि वैश्‍विक असून अनेक आक्रमणं आली तरी ही संस्कृती टिकून आहे. आता राममंदिराच्या निमित्तानं संपूर्ण भारतवर्षात भावजागृती झाली आहे.

एका अर्थानं स्वभान आणि श्रद्धाजागृती म्हणजे काय याची प्रचीती आली आहे. रामंदिरासाठीचा संघर्ष मोठा होता. मात्र, त्याला अधिक धार आली ती ऐंशीच्या दशकात. अयोध्येत राममंदिराची उभारणी करावी, असा ठराव देशभरातल्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून त्या काळात करण्यात आला. मनामनात दबलेला हुंकार

यानिमित्तानं मांडला गेला. त्यानंतर नव्वदच्या दशकात ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी देशभरात काढलेल्या रथयात्रेनंतर देशातलं वातावरण बदललं. या आंदोलनानं जनमानसाचं आत्मभान जागृत झालं.

त्या काळात राजसत्ता - पर्यायानं प्रशासन आणि विचारवंत - असं सर्व वातावरण विरोधात होतं. असं असताना हिंदू समाजमन आणि भान संघटित व्हायला सुरुवात झाली होती. एकात्म समाजाची कृती स्थायी स्वरूपाची असते याचं राममंदिर हे मूर्तिमंत उदाहरण आहे.

इथं आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे व ती म्हणजे, राममंदिर हे केवळ राजसत्तेमुळे निर्माण झालं असं नव्हे तर, त्यामागं समाजमनाचा रेटा आहे. हे समाजमन संघटितरीत्या एकत्र आल्यामुळे देशात २०१४ मध्ये राजसत्ता बदलली गेली;

राजसत्तेमुळे समाजमन एकत्रित आलं असं नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे. हिंदू समाजमनाची ही एकत्रित कृती आहे. आणि, हे परिवर्तन मैलाचा दगड ठरलं. मंदिराच्या उभारणीसाठी राजसत्ता कटिबद्ध राहिली, त्यासाठी केवळ समाजमनाचा एकत्रित आणि सकारात्मक रेटा कारणीभूत ठरला.

राम म्हणजे राष्ट्रभावना

मुळात आपल्या देशाला ठोस सांस्कृतिक परंपरा असल्यामुळे सांस्कृतिक राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे. या सांस्कृतिक राष्ट्रवादात श्रद्धा, भावना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रभू श्रीराम ही देशाची अस्मिता आहे.

ही अस्मिता जागृत करत असताना त्यातून स्वत्त्वाचं भान निर्माण केलं गेलं. राममंदिराची उभारणी हा या जागृतीचा अंतिम भाग आहे. अर्थात्, ही जागृती एका दिवसात निर्माण झालेली नाही. रामजन्मभूमीचा हा लढा हे हिंदू इतिहासातलं एक देदीप्यमान, दीर्घ काळ लढून यशस्वी झालेलं सोनेरी पान आहे.

हे मंदिर दानातून, श्रीमंतांच्या श्रद्धेतून किंवा राजसत्तेतून निर्माण झालेलं नाही. समाजाच्या इच्छेतून, समाजाच्या सामूहिक कृतीतून, सामूहिक गर्जनेतून तयार झालेलं आहे. रामजन्मभूमीवरील मंदिरासाठी अंतिम आंदोलनाची योजना आखणारे आणि काम करणारे कोण होते?

ते चेहरे कुठलं होते? त्यांची नावं काय होती? कुणीही सांगू शकत नाही...कारण, कुणी एक नेता नव्हता, कोणता ठरावीक चेहरा नव्हता. मात्र, हीच याच आंदोलनाच्या ताकदीची आणि यशाची हमी होती.

सामान्यतः नेता दिशा देतो आणि अनुयायी अनुसरण करतो. देशाचा प्रश्न असल्यास तो सरकारचा प्रश्न असतो, सामाजिक प्रश्न असल्यास तो प्रश्न विचारवंतांचा किंवा समाजसुधारकांचा ठरतो. अयोध्येच्या आंदोलनानं,

चळवळीनं या पायऱ्या ओलांडल्या आणि सर्वांत प्रगत समाज स्वबळावर कसं नेतृत्व करतो याचा पाया घातला. ही चळवळ कुण्या एका व्यक्तीच्या इच्छेनं हाती घेतली गेलेली नव्हती, तर संपूर्ण समाजानं ‘स्वीकृत ध्येय’ म्हणून ती हाती घेतलेली होती ही वस्तुस्थिती असून, राममंदिरानं भविष्यासाठी दाखवलेली दिशाही हीच आहे.

आणि म्हणूनच, हजारो वर्षांच्या आक्रमणानंतरही हा समाज पुनःपुन्हा प्रगती करत राहिला, याचा अनुभव या आंदोलनातही आला. ही जगातली एकमेव अशी चळवळ असेल, जीमध्ये कुणीही बोलका नेता नव्हता, सरकारी पाठिंबा नव्हता, श्रीमंतांचा पाठिंबा नव्हता, मान्यताप्राप्त विचारवंतांचा पाठिंबा नव्हता...तरीही, समाज उठला आणि पुढाकार घेऊन जिंकला.

सामाजिक अभिसरण

समाजमन काय असतं याचं वस्तुनिष्ठ उदाहरण म्हणजे आता उभं राहिलेलं राममंदिर. ‘कायमस्वरूपी सजग राहा...’ ही बाब हे राममंदिर सांगत आहे. राजसत्ता बुडते तेव्हा समाज आणि संस्कृती बुडते, असं जगाचा इतिहास सांगतो.

समाज स्वावलंबी असल्यास राजसत्ता - अर्थात् सरकार - हरलं तरी समाज हरत नाही आणि पुन्हा सुरुवातीपासून नवजीवन निर्माण करतो हे राममंदिरानं, समाजानं सिद्ध केलं आहे. भारताकडे जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. भारतीय संस्कृती अशीच विश्वमान्य आहे.

आपण भारतीयत्व पुनःप्रस्थापित केल्यास जगाचं नेतृत्व निश्चित करू शकतो हे सिद्ध झालं आहे. विश्वगुरू होण्याची ताकद आपल्या संस्कृतीत आहे. समाजभान आणि समाजमन एकाच दिशेनं चालल्यास त्याची परिणतीही विधायक कामात होऊ शकते, याचा वस्तुपाठ यातून मिळतो.

‘एक सहिष्णू नेतृत्व’ म्हणून अवघं जग सध्या भारत देशाकडं पाहत आहे. राजकीय नेतृत्वानं भारतीय संस्कृतीशी ताळमेळ राखण्यासाठी पावलं उचलल्यामुळेच हे बदल झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे राजकीय नेतृत्वाप्रमाणे समाजानंही जागतिक नेतृत्व जपलं पाहिजे, असं राममंदिर सूचित करत आहे.

यापूर्वी स्वामी विवेकानंदांनी हिंदू समाजाला जागतिक नेतृत्वाच्या जबाबदारीची जाणीव करून दिली होती. राममंदिराच्या ऐतिहासिक आंदोलनात हिंदू समाजानं जागतिक हिंदू-मूल्ये जगासमोर समर्पकपणे मांडली आहेत. सर्व विविधतांवर मात करून रामभक्तीची एकता किती शक्तिशाली होती हे जगानं अनुभवलं आहे. हीच अपेक्षा हिंदू समाजानं भविष्यासाठी व्यक्त केली आहे.

मंदिराची उभारणी...पुढं काय?

राममंदिराची उभारणी तर झाली, आता पुढं काय, हा प्रश्न स्वाभाविकच आहे. याचं स्वच्छ स्पष्टीकरण प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात देण्यात आलं.राममंदिराची उभारणी ही शांतता, धैर्य, सद्‍भाव आणि समन्वयाचं प्रतीक आहे...

‘देवापासून देश’ आणि ‘रामापासून राष्ट्र’ ही भूमिका मोदी यांनी या कार्यक्रमात मांडली. या भूमिकेतून भविष्याची दिशा स्पष्ट होत आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही, भविष्यात समाजमन आणि समाजभान कसं असावं, याचं वास्तव सांगितलं.

‘सर्व कलहांना पूर्णविराम देत व्यवहारात तपाचं आचरण करावं लागेल,’ असं सांगत त्यांनीही पुढची दिशा स्पष्ट केली. ‘‘त्यासाठी धर्माच्या ‘सत्य’, ‘करुणा’, ‘शुचिता’ आणि ‘तपस्या’ या चार मूल्यांचं आचरण करत अनुसाशित राहावं लागेल आणि सामाजिक जीवनात नागरिकत्वाचं पालन करावं लागेल...

धर्मस्थापनेसाठी अनुकूल स्थिती निर्माण करावी लागेल...तशी कृती केल्यास भारत विश्वगुरू होईल,’’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यातून स्पष्ट संदेश दिला गेला आहे. मान्यवरांच्या भाषणांकडं उपस्थित विशेष निमंत्रितांसह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. ‘जोश’मध्ये असतानाच ‘होश’मध्ये कसं राहायचं हाही संदेश भागवत यांनी या वेळी दिला.

रोजगाराची निर्मिती

भारतीय मंदिरं ही अर्वाचीन काळापासून स्वायत्त, स्वयंपूर्ण संस्था होत्या. विविध मंदिरांतून परंपरेनुसार अनुष्ठान, पूजा, उत्सव होतात. त्यातून रोजगाराला निश्चित चालना मिळत असते. त्या वेळी कदाचित रोजगाराचं मोजमाप करण्याची पद्धती वेगळी असेल.

अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मंदिर ही भारतीयांची नवी ओळख ठरली आहे. प्रभू रामचंद्र हे अस्मितेचा विषय असल्यानं देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि जगभरातून कोट्यवधी रामभक्त अयोध्येत दर्शनासाठी येत आहेत. आपली संस्कृती ‘अतिथि देवो भव’ अशी आहे. तीनुसार केवळ अयोध्याच नव्हे तर, परिसरात विकासकामांनी कमालीचा वेग घेतला आहे.

रेल्वेस्थानक, विमानतळ तयार असून अयोध्या शहरांतर्गत विकासाचा मार्गही प्रशस्त झाला आहे. अर्थात्, ही सोपी गोष्ट नाही. मठ, मंदिरं अशा संबंधित सर्वांना विश्वासात घेऊन विकासकामं सुरू झाली आहेत.

अयोध्येतल्या गल्ली-मोहल्ल्यातून फिरत असताना याची स्पष्ट जाणीव होते. मठांनी कात टाकायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आलेल्या भाविक पर्यटकांची मुक्कामाची व्यवस्था नीट होण्यासाठी नवीन गुंतवणूकही सुरू झाली आहे. भाविकांच्या ‘होम स्टे’साठी अनेकांनी आपल्या घरांमध्ये किरकोळ बदल करून घेतले आहेत. राहण्याच्या व्यवस्थेबरोबर उत्तम खाद्यान्नाचीही व्यवस्था आहे.

गल्ली-मोहल्ल्यांमध्ये हे बदल दिसत असतानाच मुख्य रस्त्यांलगत असलेल्या भिंतींवर प्रभू रामचंद्रांच्या जीवनातले (रामायणातले) प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत. ही चित्रं लक्ष वेधून घेत असतानाच रामायणाची सहजतेनं ओळख करून देतात. मंदिरातल्या प्राणप्रतिष्ठा-सोहळ्यानंतर अयोध्येत रोज किमान लाखापेक्षा अधिक भाविक दाखल होत आहेत. यावरून प्रभू श्रीरामांविषयी असलेली श्रद्धा लक्षात येते.

धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर ‘जगातलं अव्वल स्थान’ म्हणून अयोध्या निश्चितच ओळखली जाईल. पर्यटनाच्या दृष्टीनं आणि पूरक सुविधा निर्माण झाल्यानं रोजगारात भरीव वाढ होणार आहे.

याबाबत अयोध्येतल्या स्थानिकांमध्येही उत्साहवर्धक वातावरण आहे. या साऱ्या उलाढालीतून अर्थव्यवस्थेला मोठीच चालना मिळणार आहे. एका मंदिराच्या उभारणीमुळे धार्मिक, सामाजिकच नव्हे तर, त्यातून आर्थिक अभिसरणालाही चालना मिळणार आहे.

त्या ठिकाणी कॉरिडॉरसारख्या विकासामुळे पर्यटनाला आणि परिणामी आर्थिक विकासही मोठ्या प्रमाणावर साधला जाणार आहे. मंदिर पुन्हा एकदा आर्थिक उलाढालीचं, आर्थिक विकासाचं केंद्र होऊ शकतं. एकेकाळी विकास, अर्थकारण आणि रोजगार या तिन्ही पातळ्यांवर मंदिरं खूप मागं होती.

आता मात्र काशीविश्‍वेश्‍वर कॉरिडॉर, उज्जैनमधलं महाकाली मंदिर, अयोध्येतलं राममंदिर... ही मंदिरं आर्थिक उलाढालीची प्रमुख केंद्रं निश्चितच होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.