‘धनेश’ संवर्धनाची झेप!

महाधनेश अर्थात हॉर्नबिल पक्षी निसर्गत: जंगलांची निर्मिती करण्यात मोलाचा हातभार लावतो. मात्र, अमर्याद जंगलतोडीमुळे त्याचे अन्न, वृक्ष आणि घरट्यांच्या ढोल्या असलेली झाडे नष्ट होत आहेत.
hornbill bird
hornbill birdsakal
Updated on

महाधनेश अर्थात हॉर्नबिल पक्षी निसर्गत: जंगलांची निर्मिती करण्यात मोलाचा हातभार लावतो. मात्र, अमर्याद जंगलतोडीमुळे त्याचे अन्न, वृक्ष आणि घरट्यांच्या ढोल्या असलेली झाडे नष्ट होत आहेत. देवरूखमधील काही मित्रांनी धनेशच्या संवर्धनाचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. त्यांच्या चळवळीला राजाश्रयाची गरज आहे.

सह्याद्रीच्या पट्ट्यात महाधनेश पक्ष्याच्या संवर्धनासाठीची अर्थात पर्यावरण रक्षणाची चळवळ आकार घेऊ लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख गावातील काही मित्र त्यासाठी एकत्र आले आहेत. धनेश संवर्धनाच्या उद्दिष्टाने ते झपाटून काम करत आहेत. त्यात धनेश मित्र संमेलनामुळे जनजागृतीला चालना मिळाली आहे. निसर्गातील एका अत्यंत महत्त्वाच्या वन्यजीवाच्या संरक्षणासाठी सरसावलेल्या तरुण पिढीचा प्रयत्न पर्यावरण रक्षणासाठी उपयुक्त ठरणारा आहे. त्यांच्या चळवळीला लोकाश्रयाबरोबरच राजाश्रयाची गरज आहे.

कोकणातील ककणेर, तळकोकणातील माडगरुड आणि इंग्रजीमधील हॉर्नबिल अशा विविध नावांनी ओळख असलेला जंगलचा शेतकरी महाधनेश पक्षी सर्वांनाच परिचित आहे. भारतात दक्षिणेकडे केरळ आणि नैऋत्येकडील राज्यातही तो आढळतो. जगभरात महाधनेशच्या ५५ प्रजाती असल्याची नोंद आहे. त्यातील फक्त नऊ प्रजाती भारतात आढळतात.

कोकणात फक्त महाधनेश, मलबारी धनेश, राखी धनेश आणि मलबारी राखी धनेश अशा चार प्रजाती आहेत. मलबारी धनेश आणि मलबारी राखी धनेश या प्रदेशनिष्ठ प्रजाती असून फक्त पश्चिम घाटात आढळतात. वड, पिंपळ, उंबर, पिंपरी, दासवन, लिम्बारा अशा वृक्षांची फळे खाण्यासाठी धनेश पक्ष्यांची झुंबड उडते.

या वृक्षांची गोड, रसाळ आणि पौष्टिक फळे खाऊन त्यांच्या बीजांचा प्रसार जंगलात सर्वदूर करण्याचे महत्त्वाचे पर्यावरणीय काम धनेश पक्षी वर्षानुवर्षे इमानेइतबारे पार पाडत आहेत. म्हणूनच त्यांना जंगलचे शेतकरी म्हटले जाते. पावसाच्या तोंडावर या पक्ष्याचे सर्वाधिक वेळा दर्शन होते; परंतु मोठ्या वृक्षांच्या देवराईमध्ये सर्रास तो कधीही पाहायला मिळतो.

हल्ली शहरी भागातही त्याचे वास्तव्य आढळते. मोठमोठ्या मोबाईल टॉवरवरही तो दिसून येतो. पंख पसरून वेगाने धनेश जात असेल तर विमान गेल्यासारखा हलका आवाज त्याच्या पंखांमधून ऐकायला येतो. निसर्गातील अनोख्या पक्ष्याची भुरळ सर्वांनाच आहे.

भल्यामोठ्या ढोल्यांमध्ये आढळणाऱ्या धनेशचे आयुष्य तसे रंगतदार, किंबहुना रोमँटिकच म्हटले पाहिजे. सांसरिक सुख कसे असते याचा धडा या पक्ष्याकडून गिरवण्यासारखाच. नर आणि मादी यांनी एकमेकांना पसंत केले की त्यांची प्रणयाराधना सुरू होते. नर माडगरुड ठिकठिकाणाहून चविष्ट फळे गोळा करून आपल्या गळ्यात साठवून आणतो आणि मादीला भरवतो. मिलन होण्याआधी ढोलीमध्ये मादी स्वतःला कोंडून घेते.

बेहडा, सातवीण, आंबा, शेवर, ऐन असे महावृक्ष सहसा ढोल्या असणारे आणि वर्षानुवर्षे टिकून राहिलेले वृक्षराज धनेशाची नवीन पिढी या जगात आणण्यास मदत करतात. मादीने आत प्रवेश केला की धनेश मातीच्या साह्याने ढोलीचे तोंड फक्त चोच बाहेर येईल एवढी जागा ठेवून बंद करून घेतो. पुढे अंड्यांना किंवा पिल्लाला कांडेचोर, बिबट्या आणि माकडे अशा शिकाऱ्याच्या नजरेस पडण्यापासून वाचवण्याचे आव्हानच असते.

मादीने अंडी दिली, की साधारण ५० दिवसांनी पिल्लू बाहेर येते. त्या दिवसांत नर अख्खे जंगल पालथे घालून वेगवेगळी फळे गळ्यात साठवून घेऊन येतो आणि मादीला भरवतो. अशा फळात ७० टक्के फिग म्हणजेच वड-पिंपळ प्रजातीचे प्रमाण असते. पिल्लांची वाढ पटकन होण्यासाठी प्रोटीनरिच फूड म्हणून मांसाहारसुद्धा त्यांच्या आहारात असतो.

छोट्या पक्ष्यांची पिल्ले, साप, सरडे, पाली वा उंदीर असे काही प्राणी त्यांच्या आहारात असतात. त्या काळात मादी कृश होते. तिचे पंख आणि मानेवरची पिसे गळतात, वजन कमी होते. आपल्या पुढच्या पिढीच्या संरक्षणासाठी केलेला तो त्यागच असावा.

गेल्या काही वर्षांत पश्‍चिम घाटातील जंगले ओसाड पडू लागली आणि धनेश पक्ष्याचा अधिवास धोक्यात येऊ लागला. शेती-बागायती, घरबांधणी, रस्तारुंदीकरण, खाणकाम इत्यादी कामांसाठी जंगले तोडली जाऊ लागली. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील ९६ टक्के वनक्षेत्रे खासगी जमिनीवर आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईतही अडथळाच. अशा परिस्थितीमुळे धनेशच्या वास्तव्यावरच सावट निर्माण झाले आहे.

कुठे शिल्लक असलेल्या दाट जंगल भागातील भल्यामोठ्या वनराईत धनेश दिसून येत आहे. धनेशबाबतची वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर संवर्धनासाठी पावले उचलण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे, असे विचार पुढे येऊ लागले आणि त्यातूनच देवरूख सह्याद्री संकल्प सोसायटी, सृष्टीज्ञान संस्था, आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, नेचर कॉन्झर्व्हेशन फाऊंडेशन, सह्याद्री निसर्गमित्र, महाएमटीबी, एनव्ही ईको फार्म, निसर्ग सोबती आणि स्थानिक वनविभाग यांनी धनेश संरक्षणाचा विडा उचलला.

त्यामध्ये आघाडीचा शिलेदार आहे प्रतीक मोरे. एवढ्या सगळ्यांना एकत्र आणून मोहिमेत सुसूत्रता आणण्याची भूमिका प्रतीक यांनी लीलया पार पाडली आहे. त्यांना देवरूख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सदानंद भागवत, भरत चव्हाण, धनंजय मराठे, डॉ. अमित मिरगळ, अक्षय मांडवकर, डॉ. शार्दूल केळकर आणि तनुजा माईन यांची मोलाची साथही मिळाली. धनेश संवर्धनाची मुहूर्तमेढ रोवली गेली ती त्याच्या प्रजोत्पादन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या मोठी ढोली असणाऱ्या वृक्षांच्या रक्षणाने.

मोठे वृक्ष जगवण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्यासाठी मोठ्या वृक्षांच्या बी संकलनाला आरंभ झाला. त्यात देवरूखच्या ए. एस. पी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मोलाची मदत झाली. दुसऱ्या टप्प्यात स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर तालुक्यांतील धनेशचे वास्तव्य असणाऱ्या खासगी जागांमधील वृक्षांच्या संवर्धनाला हात घालण्यात आला.

त्यासाठी ते वृक्ष अगदी भाडेतत्त्वावरही घेण्यात आले. त्यासाठी देणगीच्या माध्यमातून निधीही उभारला गेला. धनेश पक्षी आणि त्याचे स्थानिक जैवविविधतेचे असलेले महत्त्वाचे स्थान ग्रामस्थांना पटवून देण्यासाठी काही गावांमध्ये स्लाईड शो, पोस्टर प्रदर्शन आणि खेळांचे आयोजनही केले गेले.

शाळाशाळांमध्ये धनेश पक्षी मित्र क्लब स्थापन करण्यास सुरुवात केली गेली. धनेशच्या घरट्यांवर अभ्यास करण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले आहेत. घरट्याला धोका ठरू शकतील असे प्राणी आणि मानवी हालचाली यांचेही निरीक्षण केले जात आहे.

चळवळीला बळकटी

धनेशच्या संवर्धन मोहिमेबाबत बोलताना प्रतीक मोरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात धनेश संवर्धनाला बळकटी आल्याचे सांगितले. ते म्हणाले, की आतापर्यंत महाधनेश पक्ष्याची १२ घरटी, मलबारी कवडा धनेशची १४ घरटी, भारतीय राखी धनेशचे एक घरटे आणि मलबारी राखी धनेशची दोन घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात ३० घरट्यांचे संवर्धन केले गेले आहे. सोशल मीडियावरील संपर्कामुळे त्यात आणखी भरही पडेल.

आता धनेश पक्ष्याच्या नैसर्गिक अधिवासाच्या निर्मितीसाठी आम्ही पावले उचलली आहेत. २०२४ मध्ये दोन हजार आणि २०२५ मध्ये तीन हजार खाद्यान्न वृक्षांची लागवड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केली जाणार आहे. धनेशच्या पुढील पिढीच्या वाढीवर वातावरणाचा परिणाम होत असल्याचे अभ्यासामधून स्पष्ट झाले आहे. उष्णतेमुळे अंडी खराब होतात, असा अनुभव संवर्धन केलेल्या तीन ते चार घरट्यांत दिसून आला आहे.

ती अंडी खराब झाली की पुढील पिढीचे आगमन लांबते. तसेच उन्हाळ्यातील पाणीटंचाईमुळे धनेशला आवश्यक फळे मिळत नाहीत. नव्याने जन्मलेल्या पिल्लांना आवश्यक खाद्य मिळाले नाही तर ती जगण्याची शक्यता कमी होते. या सर्वांवर आम्ही अभ्यास करत आहोत. त्यामधून नक्कीच काहीतरी सकारात्मक हाती येईल, असे प्रतीक मोरे सांगतात. देवरूखमध्ये पार पडलेल्या धनेश मित्र संमेलनाने संवर्धन मोहिमेला दिशा मिळाली आहे.

त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा आणि मुंबईतील सहभागी झालेल्या पन्नास अभ्यासकांच्या विचारविनिमयातून नक्कीच सकारात्मक निर्णय झाले आहेत. धनेश पक्ष्याला असलेले धोके, त्यांचे संवर्धन करण्यासाठी उचलावी लागणारी पावले, सध्या सुरू असलेले प्रयत्न, त्यातील अडथळे, धनेशच्या अभ्यासातून आलेले निष्कर्ष इत्यादी विविध गोष्टींचे संकलन करून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्याची तयारीही उपस्थितांनी केली आहे.

धनेश संवर्धन प्रकल्प फक्त रत्नागिरी जिल्ह्यापुरताच मर्यादित न ठेवता सह्याद्रीच्या टप्प्यातील अन्य सहा जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी संस्थाविरहित सिटीजन सायन्स प्रकल्प राबवला जाणार आहे. अहवाल तयार आहे, मात्र लोकसभा निवडणुकांमुळे थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे! त्यानंतरच्या काळात राजकीय निर्णय धनेश पक्ष्यासाठी पक्षविरहित झाले तर पृथ्वीमातेचे ऋण फेडल्याचे समाधान काही अंशी तरी मिळेल.

rajesh.kalambate@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.