बोलू ऐसे...

थ्री इडियट्स’ चित्रपटातील ‘ऑल इज वेल’ मंत्र खरंच वेळोवेळी उभारी देऊ शकतो. थोडक्यात काय, तर बोलणं गोड, खरं, स्पष्ट, आश्‍वासक, सकारात्मक आणि नेमकं असावं...
how to speak effectively personality development 3 idiots movie all is well
how to speak effectively personality development 3 idiots movie all is wellSakal
Updated on

- ऋचा थत्ते

‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील ‘ऑल इज वेल’ मंत्र खरंच वेळोवेळी उभारी देऊ शकतो. थोडक्यात काय, तर बोलणं गोड, खरं, स्पष्ट, आश्‍वासक, सकारात्मक आणि नेमकं असावं... आणि हो, उत्तम श्रोताही असायला हवं. प्रत्यक्ष आयुष्यातही श्रोत्याची भूमिका खरं तर छान पार पाडता यायला हवी...

पंधरा-सोळा वर्षांपूर्वीची गोष्ट! माझा चहा-पोह्यांचा कार्यक्रम होता. अगदी टिपिकल कुटुंब म्हणजे आई-वडील, दादा-वहिनी यांच्यासह मुलगा बघायला आला होता. मुलाची आई आणि वहिनी अखंड बोलत होत्या. अर्थातच त्यांच्या घराण्याबद्दल. शब्दाशब्दांत आमच्याकडे असंच असतं, तसंच लागतं हा अभिमान ओसंडून वाहत होता.

मध्येच त्यांचा मोर्चा माझ्याकडे वळला आणि म्हणाल्या, ‘काय गं तू निवेदन करतेस, स्टेजवर बोलतेस असं वाचलं! आत्ता तर त्यामानाने काहीच बोलली नाहीस.’ त्यावरही मी नुसतीच हसले. जाताना ‘हिने जरा अजून बोलायला हवं’ असा शेराही देऊन गेल्या.

पण खरंच, जी आपली प्रकृतीच नाही ती आहे असं भासवून उगाच सूरात सूर मिसळणं तेही फक्त त्यांना खूश ठेवायला, मला नसतंच जमलं. अर्थातच गोष्टी पुढे सरकल्या नाहीत. तोंडावर गोड बोलणं, गॉसिप करणं किंवा ज्या विषयातलं ज्ञान नाही त्याबद्दल बोलणं यापेक्षा मौन बाळगणं मला आजही आवडतं.

स्टेजवर मात्र बोलायला मनापासून आवडतं. याचं कारण हेच, विषय ठरलेला असतो. त्यात मुद्द्याला धरून, अभ्यास करून, तयारीनिशी, नेमकं आणि तरीही रंजक बोलायचं असतं. ‘अभ्यासोनि प्रकटावे’ हे समर्थांचं सूत्र व्यासपीठासाठीच आहे जणू!

आणि सगळ्यात महत्त्वाचं निवेदन असो किंवा भाषण. आपलं बोलणं चालू असताना बाकीचे सगळे श्रोते असतात. आपला विचार आपल्याकडून तरी व्यवस्थित पोहचवता येतो. प्रत्यक्ष आयुष्यातही श्रोत्याची भूमिका खरं तर छान पार पाडता यायला हवी.

प्रत्यक्ष भेटीत किंवा फोनवरही समोरच्याचं पूर्ण न ऐकताच मध्येच बोलायला सुरुवात करतात. त्यामुळे गोंधळ किंवा गैरसमजही होऊ शकतात. एकदा अशीच कुणाकडे मीटिंग असताना, काकू पोह्यांची तयारी करत होत्या.

एकदम म्हणाल्या, ‘अगंबाई, मी यांना चुकून कोथिंबीर आणायला सांगितली. कढीपत्ता हवा होता’ असं म्हणून फोन लावून ‘अहो कोथिंबीर...’ असं म्हणेपर्यंत काकांनी ‘आणतोय गं’ म्हणत फोन कटही केला. ही गोष्ट छोटी असली, तरी ही सवयप्रसंगी घातकही ठरू शकते नक्कीच!

‘बोलणाऱ्याची मातीही विकली जाते’ अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. व्यवसाय करायचा तर बोलायला हवंच; पण सूर सच्चा असेल, आश्‍वासक असेल, तर ग्राहकाचा नक्कीच विश्‍वास बसतो, हेही तेवढंच खरं. खूप पाल्हाळ लावून किंवा बढाया मारून तुम्ही फार टिकणार नाही.

कारण मुळात बोलणं हे केवळ तोंडानेच नसतं, तर डोळे, हावभावही खूप काही सांगत असतात. मला आठवतं, एकदा आजीसोबत मी तिच्या डॉक्टरांकडे गेले होते. आम्ही बसत असताना बाहेर पडणाऱ्या आधीच्या पेशंटने मागे वळून विचारलं, ‘डॉक्टर, काळजीचं काही कारण नाही ना?

यावर डॉक्टरांनी फक्त स्मितहास्य करत नकारार्थी मान हलवली. ‘नाही हो, अजिबात काळजी करू नका. त्यांची तब्येत ठणठणीत आहे. दिलेली औषधं घ्या. नाही फरक पडला तर मी आहेच...’

कितीही जोर देऊन बोलले असते, तरी त्यांची ती एक कृती या सगळ्या बोलण्यापेक्षा खूप बोलकी आणि आश्‍वासक होती. आधार वाटलाच पाहिजे, विश्‍वास बसलाच पाहिजे! कुठेतरी वाचलं होतं, शब्दांत धार नको आधार हवा! कबीरजीही म्हणतात, ‘शब्द सम्हारे बोलिए, शब्द के हाथ ना पाव, एक शब्द औषधी करे, एक शब्द करे घाव.’

मन तोडायला आणि जोडायला शब्दच कारणीभूत असतात. त्यामुळे त्यांचा वापर विचारपूर्वक करायला हवा. संक्रांतीलाही ‘तीळगूळ घ्या गोड बोला’ असं आपण म्हणतोच. गोड बोललेलं सगळ्यांनाच आवडतं; पण ते खरं आणि स्पष्ट असणंही महत्त्वाचं आहे. ‘चार वाजता तुमचा ड्रेस तयार असणार मॅडम’ असं टेलर ठणकावून सांगतो,

तेव्हा तो उशीर करणार हे समजून जायचं! त्यापेक्षा येण्यापूर्वी एक फोन करा म्हणणारा विश्‍वास संपादन करतो. अर्थात खरं आणि स्पष्ट बोलायचं, तर ते कटूच हवं, असं नाही. उलट बोलणं जितकं पॉझिटिव्ह असेल, तितकं छान वाटतं. म्हणजे ‘काळजी करू नकोस’ याऐवजी ‘निश्‍चिंत राहा’ या शब्दातच वेगळी ऊर्जा जाणवते. अर्थ एकच असला तरीही!

rucha19feb@gmail.com (लेखिका निवेदिका आणि व्याख्यात्या आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.