- हृदयनाथ मंगेशकर, saptrang@esakal.com
जाग आली...का, तर कुणीतरी माझ्या दुखऱ्या पायाला धक्का दिला होता. मी डोळे उघडून बघितलं तर, डब्यात गर्दी झाली होती. कुणी माझ्या पायावर बसू नये म्हणून आशाताईनं मला वर खेचलं होतं. मग गर्दी वाढतच गेली. स्टेशनावर स्टेशनं येत गेली आणि दुपार झाली. ऊन्ह वाढतच गेलं. हवा बदलली होती. गावाकडची ‘हवा’ हवेतच विरली होती. आणि, जन्मापासून चिकटलेली ती भूक लागली. गाव, प्रांत, देश जरी बदलला तरी भूक काही बदलत नाही. वेळ झाली की ती हजर (आपली सखी भूक) हात पसरून ‘दे, दे, दे, दे’ म्हणत.