- हृदयनाथ मंगेशकर
भाऊ-बहीण यांचं नातं मायेच्या ओलाव्याचं, नितळ आणि प्रेमानं ओथंबलेलं. थोरली बहीण आशा भोसले यांच्याविषयी लिहिताना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची प्रतिभा विलक्षण उंची गाठते. पंडित हृदयनाथ यांचा हा विशेष लेख 'सप्तरंग'च्या वाचकांसाठी...
‘संध्येची वेळ, पत्थरानी चढणित घर राहिले रे दूर...’ कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितेसारखी स्थिती...दहा वर्षांची आशाताई मला कडेवर घेऊन धुळीनं, म्हणजे फुपाट्यानं, भरलेल्या रस्त्यानं चालत होती. दुपारच्या उन्हानं तापलेला रस्ता अजूनही आपले उष्ण श्वास सोडत होता.
कडेवर पाच वर्षांचा भाऊ आणि एका हातात नदीवर धुतलेल्या कपड्यांचे पिळे घेऊन ही फक्त दहा वर्षांची आशाताई...उपाशीपोटी, अजाण आशाताई त्या खडकाळ तापलेल्या रस्त्यानं आनंदात चालत होती.
आलेल्या परिस्थितीला हसत तोंड देणं हा दैवी गुण तिला लहानपणापासूनच मिळाला होता. एका बाजूला एक पडका किल्ला, एका बाजूला तापी नदीचा भीतिदायक खोल डोह आणि पुरात नदीनं कापलेले बिहड आणि फुफाट्याचा एकाकी रस्ता...ही निर्भय पोरगी अगदी आरामात चाललेली होती. नेटका सुंदर चेहरा, सरळ नाक,
जाड; पण सुबक ओठ, अगदी निष्पाप डोळे, भोळा भाव असलेले; पण मोठे, गालाला गोड खळ्या, सावळा रंग, अतिशय प्रमाणबद्ध दणकट शरीर, बाबांचं (मा. दीनानाथ) सारं सौंदर्य, स्वभाव आणि मुख्यतः गाणं घेऊन आशाताई जन्माला आली होती. बाबा गायला बसायचे. समोर दीदी (लता मंगेशकर), तिच्या बाजूला मीनाताई आणि बाबांचे निवडक शिष्य रियाज करायचे आणि आशाताई? ती एकतर खेळत असायची किंवा आईला मदत करत असायची.
एकदा आईनं चिंतेनं विचारलं : ‘‘मालक, ही आशा नुसती खेळत असते. ही केव्हा गाणार?’’
बाबा शांतपणे म्हणाले : ‘‘काळजी करू नकोस. ती खेळता खेळता गाणं शिकत असते आणि गाणं शिकवून येतच नाही; त्याला दैवी देणगी असावीच लागते. हिला ती दैवी देणगी आहे आणि स्वभावानं ती ‘हब’ आहे. (‘हब’ म्हणजे म्हैस).
ती प्रेमळ आहे, भोळी आहे; पण कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेण्याची शक्ती तिच्यात आहे. वेळ आली की धडक देऊन ती अचानक गायला सुरुवात करेल आणि ‘मी मी’ म्हणणारे तिच्यापुढं लोटांगण घालतील असं ती गाईल; पण श्रीमती, हिचा भोळा स्वभाव? मला चिंता वाटते. बघू पुढं काय होते ते.’’
माझं आणि धुतलेल्या कपड्यांचं ओझं घेऊन आशाताई घरी पोहोचली. मला ओट्यावर बसवून ती कपडे वाळत घालू लागली.
‘‘ए आजी, भूक लागली आहे. काही खायला आहे?’’
म्हातारी आजी ताईबाई म्हणाली : ‘‘आशा, जेवून गेली होतीस ना? मग या वेळी तुला भूक का लागली?’’
‘‘ताई, सारे कपडे धुतले...वाळत घातले...सारी भांडी धुतली...सारं घर सारवलं...बाळला कडेवर घेऊन आताच तापीवरून आले आणि मग भूक नाही का लागणार?’’
‘‘बरं, मीच चुकले. आत भाकरी आणि तिखट-तेल आहे, लोणचंही आहे. खाऊन घे...पण आशा, लवकर जेवून घे. आज जडीबाई (शेजारीण) येणार आहे. थोडं गाऊ या.’’
मग जडीबाई आणि गावातल्या बायका यायच्या. संध्याकाळचं गार वारं सुखावू लागायचं. पाखरं घरी जाण्याच्या तयारीत किलबिल करायची. मग ताईबाई, आशाताई, उषाताई गायला सुरुवात करायच्या.
‘यशोदे घराकडे चाल
मला जेवू घाल
आई दही वाढ दही
वर कांद्याची कोशिंबिरी
पाई पडलिया फुटा
झिजली नखं
मला जेवू घाल.’
त्या अत्यंत मागासलेल्या खेड्यातल्या त्या जीर्ण घरात हे सगळं अतिकरुण वाटायचं. आशाताईच्या गळ्यातला हा करुण रस या खेड्यातल्या उपासमारीच्या आणि कामाच्या ताणामुळं समृद्ध झाला. त्यात युद्धाच्या काळात आलेलं दारिद्र्य सारं गाव भोगत होतं. त्यात खरूज या आजाराची साथ. खरजेनं आशाताईचं सारं अंग भरलेलं. माझंही. नुसत्या वेदना. या वेदनेनं शरीर नाही; पण भावजीवन समृद्ध झालं. पुढील संगीताच्या वाटचालीत या भोगलेल्या यातनांचा फार उपयोग झाला.
‘‘आशा, ते छल्ल्याचं गाणं गा. जडी, ही कशी ठसक्यात गाते, ते ऐक.’’
मग आशाताई गायला सुरुवात करायची.
‘मेरा छल्ला जो गम गया
ढूँढो जमादार
नको, नको जमादार
मेरे छल्ले के खातीर
मै तो तोडे बनाऊँगा
नको नको जमादार
मेरी छल्ला जो गम गया
ढूँढो जमादार.’
मग अशी अनेक लोकगीतं आशाताईला त्या थाळनेर गावी पाठ झाली.
‘‘आशाताई, तुझ्यासाठी एक खास गाणं तयार केलं आहे. अर्थात्, ‘एचएमव्ही’साठी. पैसे मिळणार नाहीत; पण रॉयल्टी मात्र मिळेल.’’
‘‘बाळ, मी फार कामात आहे. पैशाचा प्रश्नच नाही; पण मला वेळच नाही.’’
‘‘ठीक आहे, गाणं ऐकून घे. आवडलं तर वेळ मिळाल्यानंतर गा.’’
‘‘बरं गा, मी ऐकते.’’
मी गायला सुरुवात केली...
‘‘जिवलगा ऽऽऽ राहिले रे दूर घर माझे
पाउल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगाऽऽऽ’’
‘‘बस्स कर, थांब! थाळनेरमधले सारे भोग या गाण्यात उतरले आहेत. तुला कडेवर घेऊन उपाशीपोटी मी अशीच चालायची! बाळ, मी फिल्मची दोन गाणी रोज गाते आणि गातच राहणार; पण माझ्या जीवनाचं दर्शन घडवणारं हे गाणं मी इतर गाणी सोडून गाणारच. चल! आपण रिहर्सल करू या.’’
‘‘पण आशाताई, या गाण्यामध्ये अंतऱ्यासाठी संगीताचे तुकडे नाहीत. हे अनुभवनिष्ठ, दृष्टान्त देणारं गाणं आहे. गायिका फक्त आपल्या ‘जिवलगा’साठी गात आहे. गायिका, जिवलग, निसर्ग आणि जीवघेणी संध्याकाळ...या गाण्यात कुणालाही प्रवेश नाही.
‘जिवलगाऽऽऽ’ म्हणजे प्रियकर असं मुळीच नाही. जिवलगा ही एक आर्त हाक आहे, एक जीवघेणी पुकार आहे. ही आर्त हाक कुणासाठी आहे हे ज्यानं त्यानं आपल्या जीवनानुभूतीनं ठरवावं. संगीतकार, कवी, गायिका हे या जिवलगाच्या आर्त हाकेचे केवळ माध्यम आहेत.’’
एक दिवस आशाताईचा आईला फोन आला : ‘‘माई, मी फार त्रासात आहे. तू लवकर मला इथून बाहेर काढ.’’
माई घाबरली. म्हणाली : ‘‘चल बाळ, आशाला घरी आणू या. ती फार त्रासात आहे.’’
मग मी, आई, अर्जुन (माझा खास मित्र) असे तिघं आशाताईच्या घरी पोहोचलो. आशाताई आणि भोसले भांडत होते. आई त्यांना समजावत होती; पण कुणीच ऐकत नव्हतं. अचानक आशाताई घर सोडून निघून गेली. आठ महिन्यांची गरोदर बाई घर सोडून निघून गेली. मी बंगल्याखाली मोटारीत बसलो होतो.
माझ्यासमोरच आशाताई टॅक्सीत बसून निघून गेली. आई भोसलेंना समजावत बसली. तेवढ्यात मला आशाताईची मुलगी वर्षा दिसली. आशाताईचीच कॉपी...तसंच नाक, तोच रंग, त्याच खळ्या, तेच निष्पाप भोळे डोळे.
लहान आशाताई माझ्याकडं पाहत होती! मी काहीही विचार न करता गच्चीवर गेलो. वर्षाला उचललं आणि मोटारीत घालून वाळकेश्वर इथं घरी आलो. वर्षा इतकी लहान होती की ती मला आपला बापच समजली. लग्नाआधीच मी तीन वर्षांच्या मुलीचा बाप झालो.
थोड्या वेळानं आशाताई घरी आली. दोघी बहिणी खूप रडल्या.
‘‘आशा, आता तू इथंच माझ्या खोलीत राहा. बघू, तुझ्या केसाला कोण धक्का लावतंय.’’
‘‘पण दीदी, माझा हेमंत, वर्षा हे सारे इथंच राहतील?’’
‘‘अगं, हे तुझं घर आहे, जिथं आम्ही तिथं तू, जिथं तू तिथं तुझी मुलं. मी लता मंगेशकर, तू आशा भोसले...काय कमी आहे आपल्याला?’’ दीदी आशाताईला मिठीत घेत म्हणाली.
मग आशाताई निश्चिंतपणे ‘वाळकेश्वर हाऊस’ इथं आमच्याबरोबर राहू लागली. वर्षा मला सोडून राहायचीच नाही. मी तिचे सारे लाड पुरवत होतो. एक दिवस आई, दीदी, उषाताई कोल्हापूरला गेल्या. गरोदर आशाताईची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली.
मी थोडा अस्वस्थ झालो. कारण, आशाताई गरोदर होती आणि माझी अनामिक भीती खरी झाली. आशाताईला टायफॉईड झाला. डॉक्टरांनी सांगितलं : ‘चौदा दिवस बेडरेस्ट. पलंगावरून हलायचं नाही. कारण, पोटात गर्भ आहे.’ मी डॉक्टर कपूर यांना म्हणालो : ‘‘डॉक्टर, मी कसं सांभाळणार आशाताईला? ती गरोदर आहे आणि तिला विषमज्वर झाला आहे. तिची औषधं, पथ्यपाणी वगैरे मी कसं सांभाळणार?’’
डॉक्टर म्हणाले : ‘‘काळजी करू नका. आशाताई दणकट आहे. ती या आजारातून सहज बाहेर येईल. मी एक नर्स पाठवून देतो. ती सर्व औषधपाणी सांभाळेल.’’
मी सुटकेचा निःश्वास सोडला. मग नर्स आली. तिनं सारी जबाबदारी घेतली; पण संध्याकाळी, रात्री द्यायच्या औषधांची यादी आणि वेळा सांगून गेली. मीही फार विचार न करता तिला ‘हो’ म्हणालो. वेळेप्रमाणे औषध देऊ लागलो. शेवटचं औषध पहाटे पाचला होते. मी सूर्यवंशी... पहाटे कसा उठणार? मी जागतच बसलो.
असे चार दिवस गेले. आशाताई बरी होत होती; पण मी मात्र किंचित वेड्यासारखं बोलत होतो. माझा मित्र अर्जुन यानं मला सांगितलं, ‘तू असंबद्ध बोलत आहेस...’ मग माझ्या लक्षात आलं की, मी रोज रात्री जागरण करतोय, दिवसाही झोपत नाही...मग मी आशाताईला म्हणालो : ‘‘आज सकाळची औषधाची गोळी तू घे. आज मी जरा झोपतो.’’
आशाताई म्हणाली : ‘‘मी तुला सांगत होतेच की, इतका जागू नकोस; पण तू ऐकतोस कुठं? जा, झोप जा. मी वेळेवर औषध घेईन.’’
मग मी झोपायला गेलो; पण झोप येईच ना. बऱ्याच वेळानंतर डोळ्यांवर झापड येऊ लागली आणि माझा गतकाळात प्रवेश झाला :
ते पुणं...ते घर...ती रेवडीकरांची गल्ली... तो राजा गडी...
‘‘आशा, बाळला घे...मघापासून रडतोय बघ! काही तरी खेळव त्याला.’’ आईचा हळवा आवाज आला.
‘‘बघते आई, तू काळजी करू नकोस,’’ आशाताई मला कडेवर घेत म्हणाली. बाबांचा मृत्यू होऊन एक महिना झाला असावा. दीदी कामाला लागली होती. मीनाताई पोटाच्या विकारानं त्रस्त होती. उषाताई लहान. मग मला कडेवर कोण घेणार? आशाताई. कारण, शरीरानं ती दणकट होती; पण मला कडेवर का घ्यावं लागायचं?
कारण, मला चालता, अगदी रांगताही, येत नव्हतं. बोन टीबी म्हणजे हाडेव्रण झाला होता. पायात दूषित रक्त भरलं गेलं होतं. दिवस-रात्र फक्त वेदना आणि आक्रोश. आशाताईला हे कळत होतं. म्हणून ही माझी दुसरी आई मला सतत कडेवर घेऊन काम करायची.
खरंही वाटणार नाही; पण आशाताई मला कडेवर घेऊन झाडून घेणं, भांडी घासणं, कपडे धुणं ही सारी कामं करायची. पुढं मी सिंदबादची गोष्ट वाचली. तो म्हातारा, सिंदबादच्या खांद्यावरून उतरतच नाही. त्या म्हाताऱ्यासारखा मी आशाताईच्या कडेवरून उतरतच नसे. किती सेवा केली तिनं माझी! कसं उतरणार हे ऋण?
एखाद्या माणसाच्या नशिबात नियती असं गमतीदार; पण करुण भविष्य लिहून जाते की आश्चर्यच वाटतं. आशाताईचं प्रारब्ध असं काही विचित्र आहे...दणकट शरीर मिळालं; पण लहानपणापासून शारीरिक कष्ट सतत भोगावे लागले. गुणी मुलगी आणि प्रतिभावान मुलगा देवानं तिच्या ओटीत टाकला.
ती दोन्ही मुलं अल्पायुषी ठरली...आशाताईनं प्रेमविवाह केला. तो प्रियकर विक्षिप्त निघाला. लाथा, शिव्या, मार खातही अमर गाणी तिनं गायिली. अलीकडं मी टीव्ही पाहतो. तेव्हा, भारत सरकार ‘भारतरत्न’ ही पदवी खिरापतीसारखी वाटते आहे, हे मला काही दिवसांपूर्वी बातम्यांमधून कळलं...पण जगताला ७० वर्षं संगीतकलेचा प्रत्यय देणाऱ्या, नव्वदी उलटलेल्या एकमेव आशा भोसले यांना सरकार का विसरतं? नियती! आणि, दुसरं काय?
बाबा गेल्यानंतर आम्ही कोल्हापूरला गेलो. नुसते हाल. चुरमुऱ्यात पाणी घातलं की आमचं जेवण झालं. नुसतं दैन्य, वेदना, अवहेलना. बाबांचं श्राद्ध आलं की, बाबांचं एक चांदीचं ताट आई विकायची. ते ताट आणि मी कडेवर...अशा थाटात एप्रिल महिन्याच्या उन्हात आशाताई गुजरी गल्लीत जायची.
ते ताट विकून जे पैसे यायचे त्यांतून श्राद्ध करण्यास लागणारं सारं सामान घेऊन ती घरी यायची. मग आई, मीनाताई, आशाताई स्वयंपाकाला बसायच्या. गावातली एक समजूत की, श्राद्ध या कर्माला २१ भाज्या लागतात. मग या बायका २१ भाज्या करण्याचा खटाटोप करायच्या. मग दुसऱ्या दिवशी भटजींना दक्षिणा देऊन आम्ही पाची भावंडं गच्चीच्या तापलेल्या पत्र्यावर उभे राहून उपाशीपोटी, कावळा घासाला केव्हा शिवतो, याची वाट बघत राहायचो.
का कुणास ठाऊक, मी या कर्मकांडाच्या विरुद्ध झालो. थोडीफार आशाताईही या कर्मकांडाच्या विरुद्ध आहे. या कोल्हापुरात प्लेगची साथ आली आणि आम्ही थाळनेरला गेलो. ही खानदेशची राजधानी...पण नगण्य खेडं.
तिथं आशाताईच्या आणि माझ्या अंगावर खरूज या आजारानं हल्ला केला. सर्व अंग रक्ताळायचं. त्या वेदनामय आजारात आशाताई दीड-दोन मैल (किलोमीटरची भाषा त्या वेळी नव्हती) चालत तापी नदीवर आंघोळ करून, सगळ्यांचे कपडे धुऊन घरी यायची. मला सदैव कडेवर घेऊन.
मग आम्ही मुंबईला आलो. आता थोडे बरे दिवस आले होते. मी चालूही लागलो होतो. एक दिवस उग्र मुद्रेनं आशाताई भिंतीला टेकून उभी होती. आई तिच्यावर ओरडत होती. आशाताई निगरगट्टपणे उभी होती.
मग कळलं की, आशाताई घर सोडून गेली प्रियकराबरोबर. सगळ्यात जास्त धक्का मला बसला. आता आशाताई कधीही दिसणार नाही...मी उन्हात दुपारी रस्त्यावर उभा राहायचो आणि प्रत्येक मोटारीत बघायचो. कारण, माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं की, आशा या रस्त्यानं जाते. बरेच दिवस मी उन्हात उभा राहिलो; पण आशाताई दिसली नाही.
‘तुझ्याच साठी कितीदा... ऊन्ह सोशिले माथी रे, तुझ्याच साठी रे...’
कविवर्य ना. घ. देशपांडे यांची ही कविता मला वाचवेना. आताही मला झोप येईना. कारण, हा सारा भूतकाळ माझी झोप घेऊन गेला होता.
आशाताई बरी झाली आणि मुलाला जन्म देण्यासाठी रुग्णालयात गेली. दोन दिवसांनी तिनं एका सुंदर मुलाला जन्म दिला. सगळे आनंदानं वेडे झाले; पण आशाताईच्या नवऱ्यानं रुग्णालयाला धमकी दिली. बायकांचं रुग्णालय ते.
साऱ्या बायका घाबरल्या. आशाताई एक दिवसाची बाळंतीण; पण तिनं धैर्यानं त्या रुग्णालयाच्या संचालिकेला सांगितलं की, ‘तुम्ही काळजी करू नका. मी आत्ता घरी जाते.’ आणि, एका दिवसाच्या मुलाला घेऊन आशाताई घरी आली; पण जिना कसा चढणार?
मग मी, अर्जुन, हिरालाल यांनी आशाताईला खुर्चीवर बसवलं आणि आम्ही तिघांनी आशाताईला तिसऱ्या मजल्यावर नेलं. मी आशाताईला गमतीनं म्हटलं : ‘‘आशाताई, इतके दिवस तू मला खांद्यावर मिरवलंस...आज मी तुला खुर्चीवर बसवून मिरवलं.’’
दीदीनं मुलाचं नाव ठेवलं : ‘आनंद.’
‘‘आशाताई, आपला प्रयोग असलेलं ‘जिवलगा...’ हे गाणं मैफलीत शास्त्रीय संगीतकारही गायला लागलेत...मोठे समीक्षकही ‘जिवलगा’वर समीक्षा लिहीत आहेत. सर्वसाधारण श्रोत्यांना हे गाणं फार आवडलं आहे. आता एक नवा प्रयोग करतोय, गूढकाव्य स्वरबद्ध करतोय. तूच या गाण्याला न्याय देऊ शकशील याची मला खात्री आहे. गाणार का?’’
आशाताई हसली. म्हणाली : ‘‘प्रयोग असला की तुला माझी आठवण येते, नाही?’’
मी पहिल्यांदाच गंभीरपणे म्हणालो : ‘‘आशाताई, तुझी यासाठी आठवण येते; कारण, नियती आपल्या सहनशीलतेवर एक प्रयोगच करत होती. त्या प्रयोगाचे फक्त दोन साक्षीदार आहेत...तू आणि मी.’’
‘‘बरं, गाणं ऐकव,’’ आशाताई गहिवरून म्हणाली.
मी गाणं ऐकवलं.
‘‘फार छान चाल आहे. गाणाऱ्याला एक आव्हान आहे या चालीत; पण बाळ, काव्य ओ की ठो कळलं नाही आणि कळणारही नाही; पण मी हे गाणं गाणार.’’
‘‘नाही आशाताई, अंधारात बाण मारू नकोस. मी उद्या कवी आरती प्रभूंकडून याचा अर्थ नीट समजावून घेतो आणि तुला लिहून देतो. त्या अर्थामध्ये एकाकार होऊन मगच हे गाणं गा.’’
दुसऱ्या दिवशी मी तो कागद आशाताईला दिला. आशाताई ते गाणं गायिली.
नव्वद वर्षांची आशाताई नुकतीच मला भेटली. जुन्या आठवणी निघाल्या. एकदम हरवून म्हणाली : ‘‘बाळ, तुझी इतकी गाणी मी गायिले...अवघड, अनवट अशी गाणी. ‘जिवलगा...’, ‘केव्हातरी पहाटे...’, ‘तरुण आहे रात्र अजुनी...’, ‘मी मज हरपुन बसले गं...’, ‘मागे उभा मंगेश’, ‘जांभुळपिकल्या झाडाखाली...’, ‘नभ उतरू आलं...’ ही सगळी गाणी फार लोकप्रिय झाली; पण तुझं ते गाणं - जे कुणालाच पसंत नव्हतं ते गाणं - मी तुझ्या सर्व गाण्यांत उत्कृष्ट नव्हे, उत्कट गायिले, असं मला ठामपणे वाटतं.’’
ते गाणं अर्थासहित :
समईच्या शुभ्र कळ्या
उमलवुन लवते
केसातच फुललेली
जाई पायाशी पडते
भिवयांच्या फडफडी
दिठीच्याही मागे पुढे
मागे मागे राहिलेले
माझे माहेर बापुडे
साचणाऱ्या आसवांना
पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे
विसराळू मुलखाची
थोडी फुले माळू नये
डोळा पाणी लावू नये
पदराच्या किनारीला
शिवू शिवू उन गं ये
हासशिल हास मला
मला हासूही सोसेना
अश्रु झाला आहे खोल
चंद्र होणार का दुणा...
रामप्रहर होतो, कळ्यांना बहर येतो. त्या कळ्यांचा आकार कसा असतो? झाडाच्या डहाळीवर झोके घेत असलेली कळ्यांची लडी... समईच्या कोन्यावर झुलत असलेली शलाका...अनेक रंगांच्या जटा धारण केलेली धवलशुभ्र ज्योत ही समईवर उगवलेली मोगऱ्याच्या एक कळी भासते...
समईच्या वाती प्रज्वलित केल्या, त्या वेळी त्या नव्हाळीनं उभ्या होत्या; पण आता फार वेळ गेल्यामुळं त्या कोमेजल्या आहेत. त्या वाती मान लववून आहेत. रात्री केसात माळलेल्या कळ्या, उमलून केसातच फुलून आता कोमेजून पायाशी पडल्या आहेत. म्हणजे, रामप्रहर झाला आहे...दिठी म्हणजे दृष्टी.
विश्वाचं दर्शन घडवणारा तेजोपट...तेज म्हणजे प्रकाश...माझी अस्वस्थता माझ्या भिवयांच्या फडफडीतून व्यक्त होत आहे. त्या फडफडीचा वेग इतका विलक्षण आहे की, त्या वेगानं माझ्या दिठीच्या वेगाला अडथळा येतोय.
म्हणजे, माझ्या भिवयांची तडफड प्रकाशाच्या वेगालाही मागं टाकतेय आणि हा सारा जीवघेणा खेळ, माझं मागं मागं राहिलेलं माहेर बापुडपणे बघत आहे. मी सासुरवाशीण आहे म्हणून हे निमूटपणे भोगत आहे. काय भोग आहेत हे की जे अव्यक्त असावेत? इतकी रात्र झाली आहे. चांदणं चहूकडं पसरलं आहे. कालही झोप लागली नाही. आजही तीच अवस्था.
झोप नाही; पण पेंग येते...पण डोळ्यांत अश्रू साचल्यानं डोळे अर्धवट उघडे राहतात. त्या अश्रूंत चांदण्यांचं प्रतिबिंब पडतं...डोळ्यांना चांदणीची पेंग? नुसते डोळे मिटले की त्यांत अवकाश सामावलं हेही साधं उमजत नाही. डोळे बंद करण्याचं स्मरणच होत नाही. मुलखाची विसराळू झालेय, झालं!
माळायची आहेत तर थोडी फुलं माळू नयेत. साऱ्या रात्रभर पुरतील इतकी फुलं घ्यावीत. अहो! रात्र सरली पाहिजे ना...
झोप येते म्हणून डोळां पाणी लावू नये. झोप न येऊ देण्याचं काम अश्रू करताहेत ना!
रात्री फुलं माळायचं काम उजाडल्यावर संपलं. पदराच्या किनारीला सकाळचं ऊन्ह शिवायला लागलं. माझी ही दयनीय अवस्था पाहून तुला हसू येतंय ना? खरंय...तुला हसू येणारच. तुझं अस्तित्व मी उदरात जोपासते आहे ना! पण खरं सांगू?...मला तुझं हसू सोसत नाही. तुझ्या-माझ्यासारखा एका जिवाला मी जन्म देणार आहे.
मी बाळाला अंगावर पाजणार...एक शरीर माझ्या शरीरात जगतंय...मी जन्मदात्री माता, आई होणार...ही जाणीव इतकी विलक्षण आहे की, मी हादरून गेले आहे. माझी अवस्था तुम्हा पुरुषांना कळणारच नाही. अरे, माझा अश्रू खोल झाला आहे. त्याला करुणेचे, दुःखाचे, मायेचे कंगोरे आहेत. ‘जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है?’ आता मी रूपांतरित होणार आहे आणि चंद्रही दोन होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.