वेदऋषी व्यासांनी रचलेलं महाभारत अठरा पर्वांमध्ये विभागलेलं आहे. यातील सतराव्या अर्थात महाप्रस्थानिक पर्वामध्ये कुरुक्षेत्रातल्या लढाईतील विजयानंतर पाच पांडव व त्यांची पत्नी द्रौपदी संन्यासाचा मार्ग धरतात व हिमालयात निघून जातात. सत्याच्या मार्गानं त्यांना स्वर्गाचा मार्ग प्राप्त करायचा असतो. मानवी शरीराच्या माध्यमातून स्वर्गात जायचं असेल तर एकच मार्ग होता तो मार्ग म्हणजे स्वर्गरोहिणी, जे आज स्वर्गरोहिणी ग्लेशियर म्हणून ओळखले जाते.
हिमालयात स्वर्गरोहिणी अशी ओळख असणाऱ्या दोन जागा आहेत, एक म्हणजे स्वर्गरोहिणी ग्लेशियर अर्थात हिमनदी आणि दुसरी जागा म्हणजे स्वर्गरोहिणी शिखर किंवा स्वर्गरोहिणी शिखर समूह. दोन्ही जागा या गढवाल इथं हिमालयातच आहेत. येथील स्वरस्वती मॅसिफमध्ये जे बंदरपूंच नावानं देखील ओळखलं जाते, त्याठिकाणी स्वर्गरोहिणी शिखर वसलेलं आहे.
खरंतर हा चार शिखरांचा समूह आहे, यातील स्वर्गरोहिणी-१ हे मुख्य शिखर आहे. या शिखराचं देखील स्वर्गरोहिणी पश्चिम व स्वर्गरोहिणी पूर्व असे दोन भाग आहेत. या दोहोंमध्ये पश्चिम शिखर अगदी पाच मीटरनं उंच आहे. पश्चिम शिखराची उंची ही सहा हजार २५२ मीटर इतकी असून पूर्व शिखर सहा हजार२४७ मीटर उंच आहे. गिर्यारोहणाच्या दृष्टीनं विचार करता पश्चिम शिखरावरील चढाईला प्राधान्य दिलं जातं.
या संपूर्ण परिसरात गिर्यारोहण - ट्रेकिंगसाठी जाणकार गिर्यारोहक व ट्रेकर्स प्राधान्य देतात. स्वर्गरोहिणी शिखरावरील पहिली यशस्वी मोहीम झाली ती १९७४ या वर्षामध्ये. स्वर्गरोहिणी एक शिखराच्या पश्चिम बाजूनं आपल्या देशाचे रतन सिंह व मोहन सिंह यांच्या समवेत कॅनडाचे पीटर फुहर्मन, ब्रूस मॅकिनॉन, दिलशेर सिंह विर्क व इंग्लंडचे चार्ल्स क्लार्क यांनी पहिली चढाई यशस्वी केली. या शिखरांचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला केदारकंठ सारख्या ट्रेकवर जावं लागतं. येथील शिखरमाथ्यावरून तुम्हाला पहाटेच्यावेळी सोनेरी रंगानं उजळून गेलेले स्वर्गरोहिणी शिखरसमूह दिसतात.
जर आकाश निरभ्र असेल तर सांकरी नावाच्या जवळच असलेल्या गावातून देखील स्वर्गरोहिणी शिखरांचं दर्शन स्पष्टपणानं घडतं. स्वर्गरोहिणी शिखरांसोबतच येथील बंदरपूछ शिखर, कालानाग अर्थात ब्लॅक पीक देखील प्रसिद्ध आहेत. ६ हजार ३८७ मीटर उंच असलेले ब्लॅक पीक हे बंदरपूछ मॅसिफमधील सर्वात उंच शिखर आहे. येत्या ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात आमच्या संस्थेच्या नवोदित गिर्यारोहकांची मोहीम इथं जाणार आहे.
हा संपूर्ण परिसर उत्तराखंड राज्यातील पश्चिमी गढवाल भागांत येतो. हा परिसर गोविंद नॅशनल पार्कचा भाग आहे, इथं जाण्यासाठी वन विभागाच्या, स्थानिक प्रशासनाच्या परवानगीची गरज भासते. काही स्थानिक लोकांचं असं मत आहे की पांडवांनी स्वर्गात जाण्यासाठी जो मार्ग अवलंबला तो म्हणजे हीच ती चार शिखरे. मात्र त्याला कोणतेही थेट असे संदर्भ सापडत नाहीत.
महाभारताशी निगडित असलेला संदर्भ म्हणजे ओसला गावातील दुर्योधनाचे असलेले मंदिर. मात्र, पांडवांनी स्वर्गाकडं जाण्यासाठी अवलंबलेला मार्ग म्हणजे ही शिखरे नव्हे तर हिमनदी. ही हिमनदी स्वर्गरोहिणी नावाशी निगडित दुसरा भाग. स्वर्गाकडे जाणारा मार्ग म्हणजे स्वर्गरोहिणी म्हणजे ही हिमनदी. पाच पांडवांनी ‘सत्य की पंथ’ म्हणजेच सत्याचा मार्ग अवलंबून मनुष्य देहाच्या मार्गानं स्वर्ग लोक गाठण्याचा प्रयत्न केला, मात्र फक्त युधिष्ठीरच यशस्वी ठरला.
हा सत्याचा मार्ग म्हणजे आजचे सतोपंथ ग्लेशियर व स्वर्गाचा मार्ग म्हणजे स्वर्गरोहिणी ग्लेयशीर. याच ठिकाणी असलेलं सतोपंथ सरोवर ज्याला सतोपंथ ताल असं म्हणतात ते विशेष प्रसिद्ध आहे. कधी काळी ब्रह्मा, विष्णू व महेश या तिन्ही देवतांनी या सरोवरामध्ये स्नान केले होते, म्हणून या जागेला खूप महत्व व पावित्र्य आहे.
अनेक ट्रेकर्स तर फक्त सतोपंथ तालचे दर्शन घेण्यासाठी येतात. या संपूर्ण मार्गावर महाभारताचे अनेक संदर्भ अनुभवायला मिळतात. रस्त्यात लागणारा भीम पूल, सरस्वती नदी, चक्रतीर्थ आदी बाबी तुम्हाला महाभारतातील जणू काही गोष्टीच तुमच्यासमोर उलगडतात.
बद्रीनाथच्या पूर्वेला असलेल्या माना गावातून पुढे गेल्यावर चौखंबा शिखराच्या बाजूनं असा एक भौगोलिक प्रदेश आहे, जिथं ग्लेशियर हे सतोपंथ सरोवरामध्ये विलीन होते, हा संपूर्ण भाग असा भासतो जसं काही सतोपंथ येथून स्वर्गरोहिणी ग्लेशियरच्या माध्यमातून पायऱ्या तयार झाल्या आहेत, त्यापुढे अतिउंच शिखरांमध्ये, गडद ढगांमध्ये विलीन होतात. त्यामुळं याला स्वर्गाचा मार्ग असं म्हणतात.
या आधी उल्लेख केल्याप्रमाणे हिमालय हा भारताच्या, आपल्या भारतीय संस्कृतीच्या जाज्वल्य इतिहासाचे पुरावे व संदर्भ देणारा एक महत्वाचा भौगोलिक प्रदेश आहे. हिमालयाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, इथं असलेलं मंदिर, विविध भौगोलिक रचना या इतिहासाची साक्ष देतात. स्वर्गरोहिणी हा त्यातलाच एक भाग. तुमची रुची इतिहासात असो वा भूगोलात, तुम्हाला आश्चर्यचकित केल्याशिवाय, संमोहित केल्याशिवाय हिमालय सोडणारच नाही. स्वर्गरोहिणी ग्लेशियर बघताना देखील तुमच्या भावना अशाच प्रकारे जागृत होतील. तुम्ही इथलं सौदर्य पाहून हरखून जाल अन् इथल्या निसर्गाच्या रुपाला तुम्ही नक्कीच सलाम कराल, याची मला खात्री आहे.
(लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक असून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.