दिलीप वेंगसरकर
मायदेशात कसोटी मालिका एका तपांनंतर गमवण्याची आणि व्हाइटवॉश स्वीकारण्याची नामुष्की ओढवली. या मानसिकतेतून सावरून भारतीय संघ ऑस्ट्रेलियात प्रतिष्ठेची गावसकर-बॉर्डर मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेत काय होणार याची जेवढी उत्सुकता, तेवढीच धाकधूक भारतीय पाठीराख्यांना लागणं स्वाभाविक आहे. एकूणच गेल्या काही दिवसांत काय झालं यापेक्षा पुढं (ऑस्ट्रेलियात) काय होईल याचा विचार करायला हवा. न्यूझीलंडविरुद्ध जे झालं त्यावरून ऑस्ट्रेलियात काय होईल याचा संबंध आपण जोडू शकत नाही. कारण न्यूझीलंडविरुद्ध फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर आपल्या फलंदाजांनी नांगी टाकली होती मात्र ऑस्ट्रेलियात तशा खेळपट्या नसतील आणि याचा फायदा आपल्या फलंदाजांना पूर्वीच्या फॉर्ममध्ये खेळण्यास होईल. मालिकेचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल यापेक्षा मालिका चुरशीची होईल हे महत्त्वाचं आहे.